उद्योजक श्यामसुंदर भारतीय यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल, भारतीय यांनी आरोप फेटाळले

फोटो स्रोत, Youtube/WorldEconomicForum
उद्योजक श्यामसुंदर भारतीय यांच्याविरोधात ठाण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
2024 च्या नोव्हेंबर महिन्यात एका अभिनेत्रीने ठाणे पोलीस स्टेशनमध्ये श्यामसुंदर भारतीय यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. मात्र, तेथील पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही. त्यानंतर या अभिनेत्रीने उच्च न्यायालयासमोर हा गुन्हा नोंदवण्याची याचिका दाखल केली.
न्या. नीला गोखले यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. तक्रारदार महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले. आता या प्रकरणातली अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उद्योजक श्यामसुंदर भारतीय यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी आता होणार असून, न्यायालयात सुनावणी देखील सुरू होणार आहे.
ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये 22 फेब्रुवारी 2025 रोजी ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडचे अध्यक्ष श्यामसुंदर भारतीय यांच्यासह इतर तिघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
श्यामसुंदर भारतीय यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, हे सर्व आरोप धादांत खोटे असल्याचं ते म्हणाले आहेत.
एफआयआरमध्ये काय म्हटलं आहे?
एफआयआरमध्ये बलात्कार, धमकी आणि जातीवर आधारित गैरवर्तनाचे आरोप समाविष्ट आहेत. तसेच, अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या (अॅट्रॉसिटी) तरतुदींचा देखील समावेश आहे.
एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने दुसऱ्या आरोपी पूजा कमलजीत सिंग यांच्याशी संपर्क साधला होता.

तक्रारदार महिलेने असा आरोप केला आहे की, पूजा सिंग यांनी तिला चित्रपटात काम मिळवण्यासाठी या क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींसोबत ओळख करून देण्याचं आश्वासन दिलं होतं.
या महिलेने तक्रारीत असं म्हटलं आहे की, सांताक्रुझच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ती 3 मे 2023 रोजी श्यामसुंदर भारतीय यांना पहिल्यांदा भेटली. त्यानंतर भारतीय यांनी त्या अभिनेत्रीला सिंगापूरला बोलावल्याचा दावा करण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि पूजा सिंग या 19 मे 2023 रोजी सिंगापूरला गेल्या.
श्यामसुंदर भारतीय यांच्यावर असा आरोप आहे की, त्यांनी या दोघींना त्यांच्या घरी नेलं आणि या अभिनेत्रीला जबरदस्तीने दारू प्यायला भाग पाडलं. तिथेच या अभिनेत्रीवर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. हे अत्याचार होत असताना पूजा सिंगने या घटनेचं मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचा आरोप देखील लावण्यात आला आहे.
या घटनेची कुठे वाच्यता केल्यास तो व्हीडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे.
आरोपांवर भारतीय काय म्हणाले?
'ज्युबिलंट फूड वर्क्स' ही फूड सर्व्हिस सेक्टरमधील भारतीय कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय दिल्लीजवळील नोएडामध्ये आहे.
कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीकडे भारतात तसेच इतर शेजारील देशांमध्ये आंतरराष्ट्रीय फूड ब्रँडसाठीच्या मास्टर फ्रँचायझी आहेत. यामध्ये डॉमिनोज् पिझ्झा, पोपेयज् आणि डंकीन्स डोनट्सचा समावेश होतो.


भारतीय यांच्या विरोधात झालेल्या आरोपांविषयी खुलासा करण्यासाठी ज्युबिलंट फूड वर्क्सने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
कंपनीनं म्हटलंय की, त्यांना श्याम भारतीय यांचं वैयक्तिक निवेदन प्राप्त झालं असून त्यामध्ये भारतीय यांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांचं खंडन केलं आहे. हे आरोप पूर्णपणे निराधार, चुकीचे आणि बदनामीकारक आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. भारतीय यांनी ठामपणे असा दावा केला आहे की, त्यांच्यावरील हे आरोप कुटील हेतू ठेवूनच करण्यात आले आहेत.
या निवेदनात पुढे असंही म्हटलं आहे की, भारतीय या प्रकरणातील चौकशीसाठी तपास यंत्रणांना पूर्णपणे सहकार्य करणार आहेत. मात्र, तपास सुरू असल्यामुळं त्यांनी यावर अधिक भाष्य करणं टाळलं आहे.
ज्युबिलंट फूड वर्क्स भारतातील 400 हून अधिक शहरांमध्ये कार्यरत आहे आणि त्यांचे 30 हजारहून अधिक कर्मचारी आहेत.
कंपनीने पुढे असाही दावा केला आहे की, या प्रकरणाबाबत माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांचा कंपनीच्या कामकाजावर किंवा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























