'गरोदर न राहताही मी माझ्या मुलाला स्तनपान कसे करू शकले?'

प्रातिनिधीक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ज्युलिया ग्रांची
    • Role, बीबीसी न्यूज ब्राझील, लंडनमधून
  • Published

लायब्रेरियन असलेल्या एलिन टेवेला आणि त्यांच्या पत्रकार पत्नी कॅमिला सुजा 13 वर्षांपासून एकत्र आहेत. हे दाम्पत्य दीर्घकाळापासून त्यांच्या आयुष्यात बाळाच्या आगमनाच्या प्रतिक्षेत होतं.

एलिन जेव्हा 2022 मध्ये ART च्या माध्यमातून गर्भवती बनल्या, त्यावेळी त्यांच्या पार्टनर कॅमिला यांनीही स्तनात दूध निर्मिती व्हावी यासाठी उपचार घेण्याचा विचार केला. त्याद्वारे त्यांनी गर्भवती न होताही बाळाला स्तनपान केलं.

"माझ्या एका मैत्रिणीनं यासाठी प्रयत्न केले होते, त्यामुळं मला त्याबाबत माहिती होती. तिच्या बाबतीत हा प्रयत्न यशस्वी ठरला नाही. पण शक्य असेल, तर प्रयत्न करायला का हरकत आहे? असा विचार मी केला. मातृत्वाबाबतचा अनुभव शेअर करण्याची माझी तयारी होती. तसं केलं नसतं तर मोठं नुकसान झालं असतं."

कॅमिला यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. तज्ज्ञांनीही त्यांची मदत केली आणि त्या गरोदर मातेच्या तुलनेत कमी स्तनपान करू शकतील, असं त्यांना समजावलं. पण तसं असलं तरी बाळाच्या पोषणासाठी आवश्यक गोष्टींमध्ये त्या योगदान देऊ शकतील, असंही सांगितलं. त्यांच्या दुधाची पोषकतत्वं त्यांच्या पार्टनरसारखीच असतील, असंही सांगितलं गेलं.

"मी फार अपेक्षा न ठेवता सुरुवात केली. पण सुरुवातीचं माहितीसत्र माझ्यासाठी खरंच फायद्याचं ठरलं. प्रोटोकॉल सुरू झाल्यानंतर नऊ दिवसांनी दुधाचा पहिला थेंब दिसला. प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाबरोबर असं होत नाही हे मला माहिती आहे," असं कॅमिला सांगतात.

बीबीसी न्यूज ब्राझीलनं या मुद्द्यावर अनेक आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांच्या मते, हे प्रकरण काही अंशी दुर्मिळ आहे आणि त्यात यश आलं असं मानण्यात हरकत नाही.

कॅमिला यांच्या स्तनांमध्ये एवढं दूध तयार झालं की, त्यांनी जास्तीचं दूध एका मिल्क बँकेत दान केलं. ज्या बाळांचा जन्म वेळेपूर्वी झाला असेल किंवा त्यांच्या माता काही कारणास्तव स्तनपान करू शकत नसतील, अशा बाळांसाठी दूध गोळा करण्यासाठी मिल्क बँकांची मदत होते.

"आमच्या मुलाच्या जन्माला तीन महिने झाले होते. त्यामुळं मला अतिरिक्त दुधाचा वापर करायचा होता. जेव्हा माझ्या स्तनांमधील दूध तयार करण्याची क्षमता सर्वाधिक होती, तेव्हा मी एका आठवड्यामध्ये एक लीटर दूध दान केलं, " असं त्या म्हणाल्या.

स्तनांमध्ये दूध कसं तयार होतं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गर्भावस्थेत निरोगी राहण्यासाठी आणि बाळाच्या जन्मापूर्वी दुधाची निर्मिती थांबवण्यासाठी गर्भावस्थेत एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन या हार्मोनचं प्रमाण वाढत असतं.

या हार्मोन्सचा मुख्य स्रोत प्लेसेंटा असतो. जन्माच्यावेळी नाळ कापली जाते. त्यामुळे दूध निर्मिती करणारं प्रोलॅक्टिन हार्मोन शरीरात त्याचं काम करण्यासाठी मुक्त होतं.

बाळ दत्तक घेतलेल्या माता गर्भवती न होता स्तनपान करता यावं म्हणून, गर्भवती महिलेत जी जैविक प्रकिया होते, त्याच प्रक्रियेचा अवलंब करत असतात.

जर अशा महिलांकडं तयारीसाठी अनेक महिने असतील, तर डॉक्टर एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोनबरोबरच गॅलेक्टागॉगसह हार्मोनल थेरेपी ठरवतात. गॅलेक्टागॉग हा स्तनपानाला चालना देणारा पदार्थ आहे.

सर्वाधिक वापर केला जाणारा घटक म्हणजे डोमपरिडोन आहे. ते प्लासिलसारख्या मळमळ रोखणाऱ्या औषधांमध्ये आढळतं.

तसं पाहता या औषधाला ब्राझीलच्या आरोग्य नियामक संस्थेनं मान्यता दिलेली नाही. पण त्याचा 'ऑफ-लेबल' प्रभाव आहे. म्हणजेच मुख्य उद्देशाशिवाय इतर उद्देशासाठी ते चांगल्या प्रकारे काम करतं.

काही लोक आरोग्याच्या कारणांमुळं हार्मोनचा वापर करू शकत नाहीत.

डीप व्हेन थ्रोम्बोसिस, हृदय रोग, अनियंत्रित उच्च रक्तदाब, स्तनांचा कॅन्सर, स्ट्रोकची हिस्ट्री आणि हार्मोन सेंसिटिव्ह कॅन्सर असलेल्या लोकांना हे औषध घेण्याचा सल्ला दिला जात नाही.

या प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा भाग चोखण्याचा आहे. ती प्रक्रिया औषधांपेक्षा वेगळी आहे. इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाइड लॅक्टेशन कन्सल्टंट्स (आयबीसीएलसी) शी संलग्न असलेल्या स्तनपान आणि बालरोग तज्ज्ञ होनोरिना डी अल्मिडा यांच्या मते, हार्मोनशिवायदेखिल चांगले रिझल्ट मिळवता येतात.

दूग्धपान

फोटो स्रोत, Getty Images

होनोरिना या साओ पावलोमध्ये कासा कुरुमिमच्या संस्थापक भागिदार आहेत. कासा कुरुमिमचं मेमप्लस आऊट पेशेंट क्लिनिक यासंदर्भात मार्गदर्शन करतं. तसंच ब्रेस्ट पंप आणि इतर साहित्य वापरासाठी निःशुल्क उपलब्ध करुन दिलं जातं.

होनोरिना यांच्या मते, "स्तनपान करताना बाळ चोखत असतं," त्या प्रक्रियेचं अनुकरण करण्यासाठी इलेक्ट्रिक पंप ही सर्वात प्रभावी पद्धत आहे.

प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिनला 'लव्ह हार्मोन' म्हणूनही ओळखलं जातं. ते दूध निर्मितीचं काम करतं. त्यात स्तनाच्या ग्रंथी आंकुचन पावतात. त्यामुळं दूध निप्पल्सकडं ढकललं जातं.

हे दोन्ही हार्मोन एका गुंतागुंतीच्या हार्मोनल प्रक्रियेचा भाग आहेत. पिट्यूटरी ग्रंथीपासून ती सुरू होते. पिट्यूटरी ग्रंथी मेंदूच्या खालच्या भागात असलेली एक लहान ग्रंथी आहे. दूध निर्मिती गरजेची आहे का, याची माहिती ही ग्रंधी एकत्रित करते.

स्तनपान

फोटो स्रोत, GETTY IMAGES

"अशा आईद्वारे त्यार होणाऱ्या दुधाचं प्रमाणं जैविक आईएवढंच नसेल, असंही शक्य आहे. याचा उल्लेख करणं गरजेचा आहे, कारण जैविक माता ही गर्भावस्थेदरम्यान स्तन परिपक्व होण्याच्या प्रक्रियेतून जात असतात," असं प्रसूती आणि स्तनपान सल्लागार रेनाटा आइक यांनी सांगितलं.

कॅमिला आणि एलिन यांचा मुलगा निकोला आता चार महिन्यांचा झाला आहे. त्याच्या बाबतीत कॅमिला या गर्भवती नसलेल्या आईचं दूध पुरेसं होतं. कारण त्यांच्या पत्नी एलिन यांचं प्रसुतीदरम्यानच्या समस्यांमुळं दुधाचं प्रमाण कमी झालेलं होतं.

रेनाटा आइक यांच्या मते, बहुतांश दाम्पत्यांसाठी एक महत्त्वाचा फरक आहे, "तो फरक भरुन काढण्यासाठी ट्रान्सलॅक्टेशन नावाच्या प्रक्रियेचा वापर करणं गरजेचं असू शकतं. त्यात बिगर-गर्भवती मातेच्या स्तनात दुधाची एक नळी टाकली जाते. जेव्हा बाळ निप्पल चोखतं, त्यावेळी ते स्तनाची उत्तेजना वाढवतं आणि मेंदूला अधिक दूध निर्मितीचा संदेश पाठवतं.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्यास ही प्रक्रिया धोकादायक ठरत नाही, असं त्या म्हणाल्या.

"दुहेरी स्तनपानानाला क्रॉस-स्तनपान समजलं जात नाही. कारण गर्भवती नसेलल्या व्यक्तीलाही ती निरोगी आहे किंवा नाही आणि बाळाला काही धोका तर होणार नाही, हे पाहण्यासाठी चाचण्या कराव्या लागतात."

ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी व्यक्ती आणि स्तनपान

डॉ. होनोरिया यांच्या मते, ज्या ट्रान्ससेक्सुअल पुरुषांनी पूर्णपणे स्तनग्रंथी हटवण्याची शस्त्रक्रिया केली नसेल, ते स्तनपान करण्यास सक्षम असतात.

त्यांच्या मते, "अनेकदा स्तन ग्रंथींचा काही भाग पुरुषांच्या छाती मध्ये असतो. ट्रान्स पुरुष त्यांच्या उर्वरित स्तन ऊतकाच्या प्रमाणाच्या आधोरे अधिक किंवा कमी दूध उत्पादन करू शकतं. त्याशिवाय पुरुष हार्मोन्सचं मूल्यांकनही गरजेचं आहे. कारण टेस्टोस्टेरोन गर्भधारण करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतं."

तज्ज्ञांच्या मते, ट्रान्सपुरुषांमधील स्तनपानाच्या विचाराबाबत चर्चा करताना शारीरिक मुद्द्यांबरोबरच प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक प्राधान्यांचंही मूल्यांकन करणं गरजेचं असतं.

"नैसर्गिक स्तनपान मौल्यवान आणि अत्यंत महत्त्वाचं आहे. तरीही सर्व ट्रान्स पुरुष त्यांच्या नवजात बालकांना स्तनपान करणं पसंत करत नाहीत. त्यात अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यात पुरुषांच्या हार्मोनची कमतरता किंवा ते नसणे यांचा समावेश असतो.

त्यामुळं जेंडर डिस्फोरियाचा धोका वाढतो," (ट्रान्सजेंडर त्यांची लैंगिक ओळख आणि ज्या लिंगासह त्यांना जन्म झाला आहे, त्यातील विसंगतीमुळं ज्या वेदना अुभवत असतात त्याला 'जेंडर डिस्फोरिया' म्हटलं जातं.)

ट्रान्सजेंडर महिलेसाठी स्तनपान ही काहीशी अधिक आव्हानात्मक प्रक्रिया असू शकते, पण तेही शक्य आहे.

स्तनपान

फोटो स्रोत, Getty Images

साधारणपणे एका व्यक्तीला बदलाच्या प्रक्रियेत महिलांचे हार्मोन प्राप्त होतात आणि त्यामुळं स्तनांचा विकास होतो.

"जेवढा अधिक काळ हार्मोन थेरपीला द्याल, तेवढा स्तनांचा अधिक विकास होईल. स्तनांचा विकास होण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो. स्त्री बनण्याच्या प्रक्रियेनंतर काही महिन्यांतच स्तन पूर्णपणे विकसित होत नसतात. दुसरीकडं अनेक ट्रान्स महिलांना पूर्णपणे काम करणारे स्तन विकसित होण्यासाठी काही वर्षही लागू शकतात," असं मत डॉ. होनोरिया यांनी मांडलं.

जेनिफर एक नॉन बायनरी (स्त्री किंवा पुरुष याव्यतिरिक्त) व्यक्ती आहेत. जेनिफर गर्भवती असल्याचं त्यांच्या पार्टनरला समजलं त्याच महिन्यात जेनिफर यांनी हार्मोनलायझेशन प्रक्रिया सुरू केली.

"मी जेव्हा दूध निर्मितीसाठी उपचार सुरू केले, तेव्हा मला त्याचा फायदा होईल की नाही हे माहिती नव्हतं. कारण माझ्या स्तन ग्रंथी विकसित होत होत्या. माझी पार्टनर सहा महिन्यांची गर्भवती होती. हा वेळ तयारीसाठी पुरेसा नव्हता," असं जेनिफर म्हणाल्या.

जेनिफर यांच्यासारख्या काही प्रकरणांमध्ये स्तनपानाच्या प्रक्रियेसाठी काही महिलांना हार्मोनच्या प्रमाणात तात्पुरती वाढ करण्याची गरज असू शकते. संबंधित व्यक्ती ते लॅक्टागॉगच्या वापराशिवाय घेत असते.

अल्मेडा यांच्या मते, "हे काही प्रमाणात गर्भावस्थेत हार्मोनच्या वाढीसारखं काम करण्यासाठी केलं जातं."

जेनिफर त्यांच्या पार्टनरच्या तुलनेत कमी दूध निर्मिती करू शकत होत्या, पण त्यांना या प्रक्रियेत यश आलं.

"स्तनपान हा बाळाबरोबर लळा लागण्याचा किंवा काळजी घेण्याचा एकमेव पर्याय नाही. पण हा माझ्या कुटुंबासाठी खूप फायदेशीर ठरला. माझी पार्टनर गेली दहावर्षे स्तनपान करत होती. कारण तिला दुसरी तीन मुलं होती.

मी आधी कधीही माझ्या बाळाबाबत विचार केला नव्हता. पण स्वतःच्या बाळाला स्तनपान केल्याचा अविश्वसनीय अनुभव मी घेऊ शकते."

दुधातील पोषकतत्वे

रेनाटा आइक यांच्या मते,"स्तनाग्रे स्तनपानादरम्यान एखाद्या परीक्षकासारखं काम करतं. ते बाळाच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेतं आणि त्यानुसार बाळाच्या गरजांप्रमाणे दूध उत्पादन करणाऱ्या शरीराला संदेश पाठवतं. शरीर पाहिजे त्या वेळेला मागणीनुसार दूध कसं उत्पादन करू शकतं, ही बाब आश्चर्यकारक आहे.

जर्नल ऑफ ह्यूमन लॅक्टेशनमध्ये प्रकाशित एका अभ्यासावरून हे समोर आलं आहे की, गरोदर नसलेल्या ट्रान्सजेंडर महिला आणि एस्ट्रोजेन-आधारित हार्मोन थेरेपी घेणारे नॉन बायनरी माता-पिता यांच्याद्वारे उत्पादीत दूध हे अत्यंत पोषक आणि नवजात बाळासाठी अत्यंत फायदेशीर असतं.

हे संशोधन अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. एमी. के. वायमर यांनी केलं आहे. त्यांच्या मते काही लोकांसाठी, "स्वतःच्या शरीरात दूध निर्मिती करून स्वतःच्या आपत्याचं पोषण करण्याची क्षमता ही अत्यंत समाधानकारक अनुभव देणारी असू शकते."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)