दत्ताचा अवतार असल्याचं सांगून ती MPSCच्या मुलांना पाय धुतलेलं पाणी प्यायला लावायची

फोटो स्रोत, Prachee Kulkarni/BBC
- Author, प्राची कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या मुलांना भोंदूगिरी करून फसवणाऱ्या महिलेवर सोमवारी (18 डिसेंबर) पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. पाषाण भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली ही महिला स्पर्धा परिक्षेत यश मिळवून देण्याचं आश्वासन या विद्यार्थ्यांना देत होती.
त्यासाठी त्यांना गंडेदोरे बांधून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार तिने केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचे कार्यकर्ते आणि पीडित व्यक्तीने स्टींग ऑपरेशन करत हा बनाव उघड केला आहे.
पाषाण मधल्या मुक्ता रेसिडन्सी या ठिकाणी छापे मारल्यानंतर पोलिसांनी ही कन्सल्टन्सी चालवणाऱ्या वृषाली ढोले शिरसाठ या 39 वर्षांच्या महिलेला ताब्यात घेतलं. तिच्या सोबतच तिचे साथीदार माया गजभिये आणि सतीश वर्मा यांच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
पुण्यातल्या पाषाण भागात गुरुदत्त कन्लस्टसी नावाने वृषाली शिरसाट आपलं दुकान चालवत होत्या. पीडित व्यक्ती नैराश्याने ग्रासलेला असताना समाज माध्यमांवरुन त्याने या कन्सल्टन्सीची जहिरात पाहिली.
त्यानंतर लॅाचा अभ्यास करत स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या या 23 वर्षांच्या मुलाने ढोलेंशी संपर्क साधला.
नोव्हेंबर 2021 पासून आत्तापर्यंत त्याला विविध माध्यमातून पैसे मागितले जात होते आणि राख खाण्यापासून ते पाय धूवून त्याचे पाणी पिण्यापर्यंत अनेक प्रकार करायला लावल्याचा या पीडित तरुणाचा आरोप आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना त्याने सांगितलं, “मी नोव्हेंबर 2021 मध्ये या महिलेकडे गेलो तेव्हा थोडा नैराश्याने ग्रासलो होतो. मी गेल्याबरोबर सुरुवातीलाच त्यांच्या रिसेप्शनीस्टने त्या कशा दैवी आहेत वगैरे सांगायला सुरुवात केली.
त्यानंतर मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी माझ्या हातावर एक धागा बांधला आणि दर 21 दिवसांनी यायला सांगितलं. मला त्या म्हणत होत्या की तुझ्या आयुष्यात खूप अडचणी आहेत. आर्थिक दृष्ट्या तू खूप कमकुवत आहेस. त्या अंगारा खायला द्यायच्या.”

फोटो स्रोत, Getty Images
अनेक वेळा या महिलेकडे गेल्यानंतर काहीच होत नसल्याचे जाणवल्यावर या तरुणाने न जाण्याचा निर्णय घेतला. पण हे समजल्यावर थेट तुझ्या जीवालाच धोका आहे, असं सांगण्यात आल्याचा दावा तो करतो.
"मला सांगितलं की तुझं आयुष्य फक्त 30 दिवसांचं आहे. आणि मी सांगितलं ते केलंस तरच तुझं आयुष्य वाढेल. मग त्यांनी एक पूजा करायला सांगितली.
त्यामध्ये त्यांनी मला माझं कपाळ त्यांच्या अंगठ्यावर टेकवायला लावलं. आणि पाय धुवून त्याचं पाणी प्यायला लावलं. मी पुन्हा न जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा मला त्या एका ट्रीपला घेवून गेल्या. आणि तिथे एक अंगारा दिला. जवळपास 63 वेळा मी त्यांच्याकडे गेलो आहे. आणि माझ्याकडून दरवेळच्या भेटीसाठीचे 1000 रुपये आणि वर पैसे उकळण्यात आले आहेत."

हा तरुण स्वता सोबत आपल्या एका नातलगाला आणि मित्रालाही या महिलेकडे घेवून गेला. त्यांच्याबाबत हाच प्रकार झाल्याचं ते सांगतात.
यातल्या एका पीडित तरुणीने तर या महिलेने अत्यंत धक्कादायक पद्धतीची वक्तव्य केल्याचं सांगितलं.
बीबीसी मराठीशी बोलताना ही तरुणी म्हणाली, “मी स्पर्धा परिक्षेची तयारी करत होते. माझ्या कुटुंबातील अनेक जण गेले. त्यांनी सांगितलं की तुला चांगला अनुभव येईल. त्या खूप मॅाडर्न आहेत.
मी जसं त्यांच्याकडे जायला लागले त्यांच्या रिसेप्शनिस्ट या मला शिरसाट देव आहेत त्या काहीही करु शकतात. आयसीयू मधल्या पेशंटलाही त्यांनी बरं केलं आहे अशा पद्धतीचे दावे सांगायला लागल्या. नंतर ट्रीपला गेले की त्या अंगारा काढून दाखवायच्या. पूजा करायला सांगायच्या. पूजेनंतर तीर्थ प्यायला सांगायच्या. माझं ध्येय स्पर्धा परिक्षांचं होतं. पण त्या मला नोकरी करायला सांगत होत्या.
त्या वडिलांविरोधात अनेक गोष्टी सांगत होत्या. वडिलांचीच दृष्ट लागतेय असं सांगत होत्या. कुटुंबापासून त्यांनी मला पूर्ण तोडलं. माझी अभियांत्रिकीची पार्श्वभूमी असली तरी त्यांनी मला सेल्समध्ये नोकरी करायला भाग पाडलं. त्यानंतरही परत जाण्यासाठी आग्रह करायच्या.
सुरुवातीला 21 दिवसांनी हाताचा धागा बदलायच्या. अंगारा खायला लावायच्या. धागा बांधण्यासाठी प्रत्येक वेळी 1 हजार रुपये घ्यायच्या. आणखी वस्तू म्हणजे रुद्राक्ष किंवा खडे लोकांना सोबत ठेवायला द्यायच्या.”
अडीच वर्षांत दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचं या तरुणीचं म्हणणं आहे.

अशीच फसवणूक झालेला 27 वर्षांचा तरुण म्हणाला, "मी युपीएस्सी एमपीएस्सीची तयारी करतोय. दोन वेळा परीक्षा दिली आहे. मी अध्यात्मिक प्रवृत्तीचा नसलो तरी श्रद्धाळू आहे. मी मित्रासोबत तिथे गेलो. त्या स्पिरीच्युअल गुरु असल्यासारखं मी त्यांच्याशी वागत होतो. वैयक्तिक गोष्टी सांगत होतो.
पण त्यांचे सल्ले पटायचे नाहीत. पुस्तक आणायला सांगायच्या. ते डेस्कवर ठेवून व्हायब्रेशन देतो म्हणून सांगायच्या. मला ते पटत नव्हतं. मी तीन वेळा त्यांच्याकडे गेलो. नंतर मी जायचे बंद केले. 21 दिवसांनी त्या यायला सांगायच्या तेव्हा त्यांनी मला शेअर मार्केटमध्ये मोठी रक्कम गुंतवायला सांगितले.
त्यानंतर माझं मोठं नुकसान झालं. त्यानंतर देखील त्या मोठी रक्कम गुंतव मी व्हायब्रेशन देते असंच सांगायच्या. तसंच माझ्या ज्या मित्रासोबत तिथे गेलो होतो त्याच्या बाबतच निगेटिव्ह गोष्टी सांगत होत्या. त्या स्वतः आपण दत्ताचा अवतार असल्याचं सांगायच्या.”

फोटो स्रोत, Getty Images
अनेक दिवस हा प्रकार सुरु राहिल्यानंतर तरुणाने तक्रार करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचा नंबर शोधून काढून त्याने संपर्क करुन हा प्रकार सांगितला.
नोव्हेंबर महिन्यात ही माहिती मिळाल्यानंतर महाअंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणांची शहानिशा केली. आणि त्यानंतर शिरसाट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र त्यांना प्रतिसाद दिला नाही.
महाअंनिसचे कार्यकर्ते विशाल विमल यांनी मग या महिलेकडे सल्ला मागण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला या महिलेची अपॅाईंटमेंट मिळण्यासाठी कॅाल केल्यावर आपल्याला प्रतिसाद न मिळाल्याचं विशाल विमल सांगतात. त्यानंतर संपर्क साधलेल्या पीडित तरुणाला त्यांनी अपॉईंटमेंट घ्यायला सांगितलं आणि शिरसाट यांचा पर्दाफाश केला.

विशाल विमल म्हणाले, “सलग तीन दिवस मी तिथे जात होतो. तिथल्या लोकांशी बोलत होतो. बहुतांश लोक त्या अवतार असल्याचं सांगत होते. पण कोणाच्या तरी संपर्कातून आल्याशिवाय त्यांची भेट मात्र होऊ शकत नव्हती. मी सुरुवातीला कॅाल केल्यावर माझे फोन घेणे त्यांनी बंद केलं. त्यामुळे मग आम्ही पीडित तरुणालाच अपॅाईंटमेंट घ्यायला सांगितलं.
त्यानंतर आम्ही तिथे गेल्यावर पुन्हा रिसेप्शनिस्टने खातरजमा केली आणि आम्हाला आत सोडलं. गेल्यानंतर वृषाली शिरसाट यांनी धागा बांधायला दिला आणि राख दिली. हा प्रकार झाल्यानंतर आम्ही पोलिसांना बोलावलं. त्यानी कारवाई करत शिरसाट आणि त्यांच्या साथिदारांना ताब्यात घेतलं. ”
वृषाली शिरसाट या आपण समुपदेशन करतो असं सांगतात. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडे याबाबतची पदवी नसल्याचं विमल यांनी स्पष्ट केलं.
तसंच त्यांचं शिक्षण हे बी. एड आणि त्यानंतर त्यांनी स्किल डेव्हलपमेंटचा कोर्स केल्याचेही त्या म्हणाल्या. गेली जवळपास 9 वर्षं ही कन्सल्टन्सी सुरु आहे.
त्यांच्या कन्सल्टन्सी मध्ये येणाऱ्यांमध्ये बहुतांश तरुणांचा समावेश होता.
चतुषृंगी पोलिसांनी शिरसाट आणि त्यांच्या साथिदारांना ताब्यात घेतलं. चौकशी करुन त्यांना सोडून देण्यात आलं आहे. त्यांच्या विरोधात कलम 420, कलम 506 आणि जादुटोणा विरोधी कायद्याच्या कलम दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलिस उपनिरिक्षक संभाजी गुरव म्हणाले, "या महिलेवर आणि तिच्या साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच वर्षांपेक्षा कमी काळाची शिक्षा होणारी कलमं असल्याने त्यांना अटक झालेली नाही.
त्या कन्सल्टंट असल्याचा दावा करतात. मात्र फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे गंडे दोरे वगैरे वस्तु आढळल्या आहेत.”
महाअंनिसचे अविनाश पाटील म्हणाले, "मुलांच्या मनामध्ये जी असुरक्षीततेची भावना असते तिला त्या खतपाणी घालायच्या आणि उपदेश देत होत्या.”
या आरोपांबाबत आम्ही वृषाली शिरसाट यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























