आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र, तयार राहा – चित्रा वाघ #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. आगामी लोकसभा आणि विधानसभा एकत्र, निवडणुकीसाठी तयार राहा – चित्रा वाघ

फोटो स्रोत, facebook
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रच होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहावं, अशी सूचना भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.
सातारा येथील भाजप कार्यालयात महिला पदाधिकारी मेळाव्यात वाघ बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, “आपला पक्ष सर्वांत मोठा आहे. तो आणखी वाढवायचा आहे. पण संख्येने नाही तर लीडरनी. त्यामुळे केवळ हार-तुरे नको तर प्रभावी काम करून दाखवा."
“भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 16-18 तास काम करतात. राजकारणात शॉर्टकट नसतो. ते शिकण्यासाठी कोणता क्लासही नसतो. राजकारण हे बघूनच शिकायचं असतं, असंही चित्रा वाघ यांनी यावेळी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.
2. कोस्टल रोडवरील पुलाच्या खांबांमधील अंतर 120 मीटर होणार
मुंबईत निर्माण होत असलेल्या कोस्टल रोडवरील पुलांच्या खांबांमधील अंतर वाढवण्याची मागणी परिसरातील मच्छिमारांकडून करण्यात येत होती.
त्यानुसार ही मागणी मान्य करण्यात आली असून येथील दोन खांबांमधील अंतर 120 मीटर इतकं करण्यात येणार आहे.
नव्या निर्णयानुसार, वरळी समुद्रातील 7 ते 9 या तीन खांबांमधील क्रमांक 8 हा खांब रद्द करून दोन खांबांमधील अंतर 120 मीटर ठेवण्यात येईल.

स्थानिक मच्छीमारांना भविष्यात भेडसावणार्या अडचणींचा विचार करून उड्डाणपुलाच्या खांबाचे अंतर 60 मीटरवरून 120 मीटर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक मच्छीमारांना गुरुवारी (15 डिसेंबर) दिलं.
या कामासाठी सुमारे 650 कोटी रुपयांचा वाढीव निधी खर्च होईल.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यामुळे वाढणारा कालावधी युद्धपातळीवर काम करून भरून काढण्यात येईल, असं शिंदे यांनी म्हटलं. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
3. . गुजरातच्या मुंद्रा बंदरात हजारो टन ड्रग्ज कसे येतात? – नाना पटोले
केंद्रात भाजप सरकार आल्यापासून देशात ड्रग्जच्या तस्करीत वाढ झाली असून गुजरातच्या मुंद्रा बंदरात हजारो टन ड्रग्ज राजरोसपणे कसे येतात, असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

फोटो स्रोत, facebook
ते म्हणाले, “मुंबईत काही सेलिब्रिटींच्या घरी दोन-चार ग्रॅम गांजा सापडला तरी त्याचं भांडवल करून मुंबई म्हणजे नशेखोर लोकांचं शहर झाल्याचं चित्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्माण केलं जात होतं. हजारो टन अंमली पदार्थ रोखू न शकणारे त्यावेळी दोन-चार ग्रॅमवर आकांडतांडव करत होते.
“देशात नशा करणाऱ्यांची वाढती संख्या आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी येत असलेले अपयश ही चिंतेची बाब आहे. राजकारणापेक्षाही देशाच्या भविष्याचा हा प्रश्न असून केंद्र सरकारने तातडीने यामध्ये लक्ष घालावं,” अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
ही बातमी हिंदुस्तान टाईम्स मराठीने दिली.
4. वारकऱ्यांच्या भावना दुखावणाऱ्या सुषमा अंधारेंची हकालपट्टी करणार का? – आशिष शेलार
“वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणाऱ्या सुषमा अंधारे यांच्यावर उद्धव ठाकरे काय कारवाई करणार?” असा सवाल भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या सुषमा अंधारे यांनी पूर्वी हिंदू देवी-देवता आणि साधु संतांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असून, यावरून महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ आक्रमक झालं आहे.
वारकरी महामंडळाकडून सुषमा अंधारेंविरोधात तक्रारदेखील दाखल करण्यात आहे.
सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात माफीही मागितली आहे. मात्र, या मुद्द्यावरून त्यांच्यावर टीका सुरूच असल्याचं दिसून येतं.

फोटो स्रोत, facebook
आशिष शेलार याबाबत म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने हिंदुत्व सोडलं, त्यानंतर त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट तसेच हिंदुत्व विरोधी असलेल्या सुषमा अंधारे जवळच्या वाटायला लागल्या आहेत.
त्यामुळे, सुषमा अंधारेंच्या व्हायरल वक्तव्यासंदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार आहेत? तुम्ही सुषमा अंधारेंवर कारवाई करणार का, हे स्पष्ट करावे, असं शेलार यांनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.
5. ‘मला स्वत:च्या क्षमतेवर विश्वास होता’
माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आपल्या पहिल्या रणजी सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर त्याचं कौतुक होताना दिसत आहे.
अर्जुनने गोव्याकडून राजस्थानविरुद्ध खेळताना 207 चेंडूत 120 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 16 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
या शतकानंतर आपली प्रतिक्रिया देताना अर्जुनने म्हटलं, "मला स्वतःच्या क्षमतेवर विश्वास आहे.”

फोटो स्रोत, ISHARA S. KODIKARA
तो पुढे म्हणाला, “मला नेहमीच माझ्या क्षमतेवर विश्वास होता आणि मला माहित होते की जर मी सेट झालो तर मी मोठी धावसंख्या करू शकेन. मला फक्त पहिला तास नाटी खेळायचं होता आणि नंतर त्याचा फायदा घ्यायचा होता. जेव्हा मी खेळायला गेलो तेव्हा मी बहुतेक चेंडूंचा सामना केला कारण सुयश 80 धावांवर खेळत होता आणि माझे काम त्याला साथ देणं होतं.” ही बातमी एबीपी माझाने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























