You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'येडी हाय वाटत असल म्हणून मला नेत नाही', मानसिक आजारातून सावरूनही महिलांना का स्वीकारत नाहीत नातेवाईक?
- Author, रेणुका कल्पना
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 14 मिनिटे
"माझं लेकरू सहा वर्षाचं व्हतं तेव्हा मला नवऱ्यानं माहेरी आणून सोडलं अन् माहेरच्यानी हिथं. तवापासून पोराला पायलं नाय. त्याची लै आठवण यती," पुण्याच्या प्रादेशिक मानसिक रुग्णालयात राहणाऱ्या 35 वर्षांच्या सरिता वाघमारे (नाव बदललेले) सांगतात.
पुण्यातल्याच एका वस्तीत वाढलेल्या सरिता यांची दोन लग्नं झाली आहेत. तरीही त्यांना स्वीकारणारं कुणीही नाही.
"सातवीत नापास झाले तवा मी डोकं फोडून घेतलं. पण शाळा सुटली ती कायमचीच आणि पंधराव्या-सोळाव्या वर्षीच पयलं लग्न झालं," सरिता सांगत होत्या.
"त्ये मालक रोज पिऊन यायचे. मंग काय की एक दिस वरून खाली चिठ्ठी पडली. त्यात माझ्या नवऱ्याचं दुसऱ्या बाईसंगट लफडं असल्याचं लिवलं होतं," त्या सांगत होत्या.
वर्षभरातच दोघांचा कायदेशीर घटस्फोट झाला. रुग्णालयाच्या फाईलवर लिहिल्याप्रमाणे त्यांना तेव्हापासूनच मानसिक आजार सुरू झाला होता.
"पयलं लग्न झाल्यावर नाय का मला भूतं दिसायची, साप दिसायचे. माझ्या डोक्यावर लै परिणाम झालता. त्यासाठी मम्मी-पप्पांनी मला फिरवलं," त्या म्हणाल्या. फिरवलं म्हणजे अनेक तांत्रिक-मांत्रिकाकडे, देवांच्या देवळात घेऊन गेले, असं त्यांना म्हणायचं असावं.
कशाचाच उपयोग झाला नाही तेव्हा त्यांना लष्करी रुग्णालयातून इंजेक्शन्स, गोळ्या असे उपचार दिले असल्याचं सरिता यांना आठवतं. पुढे 2011 मध्ये त्यांचं दुसरं लग्न लावून दिलं आणि त्यांना पुन्हा नवा धक्का बसला.
"तिकडं पारनेर तालुक्याला सासरी गेले अन् मालकाला पहिली बायको आणि तिच्यापासून चार पोरी हायती त्ये समजलं," सरिता पुढे सांगत होत्या. वंशाला दिवा मिळावा म्हणून या दुसऱ्या नवऱ्यानं त्यांच्याशी लग्न केलं होतं.
सवत, आधीच्या चार मुली आणि सरिता यांच्या एकत्रित संसारात नवऱ्याला हवा असणारा मुलगाही झाला. तेव्हा सरिताची गरज संपली.
2016 पासून त्या पुणे मनोरुग्णालयात उपचार घेत आहेत. स्थिर झाल्यावर काही दिवस घरीही जातात. पण आजार उलटला की परत येतात आणि सहा महिने, वर्षभर इथेच राहतात. एप्रिल 2025 मध्ये रुग्णालयात दाखल व्हायची त्यांची पाचवी वेळ होती.
"त्यांना वाटत आसल मी कसली येडी हाय म्हणून मला नेत नाहीत," सरिता म्हणाल्या. पण त्या कोणालाही मुद्दाम त्रास देत नाहीत, असं येशूची शप्पथ घेऊन त्या रडून रडून सांगत होत्या.
स्क्रिझोफेनियाच्या लक्षणांसोबतच बायपोलर ॲफेक्टिव्ह डिसॉर्डर हा आजार त्यांना असल्याचं निदान रुग्णालयातल्या मानोसोपचारतज्ज्ञांनी केलं आहे.
या आजारानं पीडित व्यक्ती अचानक उत्साही, भरपूर उर्जा असलेली अशी दिसते किंवा त्यांना अचानक डिप्रेशनचा झटके येतो. मूडमधले हे बदल अतिशय तीव्र आणि नाटकीय असतात.
"मी आता काय योजना आखलीया ऐका. नवरा नसेल बोलत तर जाऊ दे. पण मी चर्चमध्ये कामाला जाणार.सहा एक महिने पैसे कमावणार. मुलाला, सवलतीच्या मुलीला खाऊ, कपडे घेणार आणि पारनेरला जाणार," त्या म्हणाल्या.
पण जोपर्यंत त्यांना त्यांचे नातेवाईक रुग्णालयात येऊन घेवून जाणार नाहीत तोपर्यंत त्यांना यापैकी काहीच करता येणार नाही.
त्यांच्यासारख्या मानसिक आजारातून सावरलेल्या कितीतरी महिला, नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसल्यानं पुणे मानसिक रुग्णालयाच्या भिंतीत अडकून पडल्या आहेत.
महाराष्ट्रातल्या ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर या इतर प्रादेशिक मनोरुग्णालयांत आणि राज्यातल्या अनेक सामाजिक संस्थांमध्येही कमी जास्त प्रमाणात हेच चित्र दिसतं.
मानसिक आजारातून सावरलेल्या रुग्णांमध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलांना स्वीकारण्याचं प्रमाण कमी असतं हेच रुग्णालयाची आकडेवारी, या महिलांचे अनुभव आणि तज्ज्ञांच्या अभ्यासातूनही दिसून येतं.
कुटुंबाच्या आधारानं सुधारतो आजार
फक्त मानसिक आजाराबद्दलचा सामाजिक कलंक एवढंच यमागचं कारण नाही. तर, नव्यानं आयुष्य सुरू करण्याची संधी कोणाला द्यायची हे ठरवण्याचा पुरूषसत्ताक दृष्टीकोन आहे, असंही तज्ज्ञ सांगतात.
"मानसिक आजारातून सावरलेल्या पुरुषांचा स्वीकार हे त्यांचं वय काय आहे? त्याने आजारपणात कधी हिंसा केली होती का? त्याचे कोणते नातेवाईक जिवंत आहेत? वैवाहिक स्थिती काय आहे? कुटुंबाची मानसिक आजाराबद्दलची समज किती? यावर अवलंबून असतो. हे घटक सगळ्यांनाच लागू होतात," असं श्रद्धा रिहॅबिलिएशन फाऊंडेशन या संस्थेच्या कर्जत प्रकल्पात काम करणाऱ्या मनोचिकित्सक डॉ. स्वराली कोंडवीलकर सांगतात.
"पण महिलांबाबतीत या निरपेक्ष घटकांपेक्षा तीचं बाईपण केंद्रस्थानी असतं," असंही कोंडवीलकर सांगतात.
मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वाटवानी यांनी स्थापन केलेल्या 'श्रद्धा' या संस्थेकडून रस्त्यावर सापडलेल्या निराधार, बेघर मानसिक रुग्णांवर उपचार करून त्यांना परत घरी पोहोचवलं जातं.
महिलांचं शरीरशास्त्र पुरुषांच्या तुलनेत फार गुंतागुंतीचं असतं, असं डॉ. स्वराली सांगतात. संपूर्ण आयुष्यात महिलांना हार्मोन्सच्या (संप्रेरकांच्या) बदलांना अनेकदा सामोरं जावं लागतं.
मासिळ पाळी येण्याचं वय, पौडांगवस्था, गरोदरपण, बाळंतपणानंतरचे दिवस आणि रजोनिवृत्तीच्या काळ या सगळ्यामुळे महिलांमध्ये मानसिक आजार उत्पन्न होण्याची शक्यता जास्त असते.
घरातल्या महिलेच्या औषधांकडे तसंही दुर्लक्ष होत असतं. तेच मानसिक आजाराबाबत झालं, की त्याचं स्वरूप तीव्र होतं, असं डॉ. स्वराली सांगतात.
मानसिक आजार हे कधीही पूर्णपणे बरं न होणारे असतात, असंही डॉ. स्वराली पुढे सांगतात. म्हणजे रक्तदाब, मधुमेहासारखं मानसिक आजारांचं निदान झाल्यानंतर नियमित औषधं घेतली तरच ते नियंत्रणात राहतात.
औषधं नीट घेतली गेली नाहीत किंवा आजार बळावण्यासाठीचं पूरक वातावरण मिळालं तर रुग्णाला आजाराचा झटका येतो. अशा प्रत्येक तीव्र झटक्यावेळी त्याला रुग्णालयात दाखल करावं लागतं.
रुग्णालयात उपचारानंतर रुग्ण पुन्हा आधीसारखा स्थिर झाला, स्वतःची काळजी घेऊ लागला, त्याचं खाणं-पिणं नीट झालं, व्यवस्थित झोप येऊ लागली, नियमितपणे काम करू लागला आणि आजाराची इतर लक्षणं कमी झाली की, रुग्णाला घरी सोडता येऊ शकतं असं मानोसोपचारतज्ज्ञ ठरवतात.
पुणे मनोरुग्णालयात वरिष्ठ मनोचिकित्सक म्हणून काम करणाऱ्या डॉ. शमा राठोड सांगतात की, "रुग्णालयात रुग्णांची भावनिक उपासमार होत असते. त्यामुळे आपल्या कुटुंबात आपलं अमूक अमूक स्थान आहे ही सुरक्षितता मिळणं, कुटुंबातल्या जबाबदाऱ्या मिळणं, घरातल्या माणसांकडून प्रेमाची ऊब मिळणं हे त्यांचा आजार आटोक्यात ठेवण्यासाठी फार महत्त्वाचं असतं."
रुग्णालयातून बरा झाल्यावर रुग्ण घरी गेल्यानंतर औषधांसोबतच कुटुंबाचा प्रेमळ आधार असेल तर आजार पुन्हा ढासळण्याची शक्यता अगदी नगण्य असते, असं अनेक संशोधनातूनही समोर आलेलं आहे.
महिला सासरची की माहेरची?
"मानसिक आजारी महिला नेमकी कुठल्या घरची हे ठरतच नाही," असं पुणे मनोरुग्णालयात मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता (सायकेएट्रीक सोशल वर्कर) म्हणून काम करणारे भाऊसाहेब माने सांगत होते. रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
रुग्णालयात दाखल होणाऱ्या बुहतेक महिलांचं लग्न झालेलं असतं आणि पण त्यांना माहेरच्या लोकांनीच दाखल केलेलं असतं, असंही निरीक्षण त्यांनी पुढे नोंदवलं.
भरती झाल्यानंतर या महिलांशी बोलताना लक्षात येतं की, सासरचे त्यांना नांदवून घ्यायला तयार नसतात.
उपचारानंतर कुटुंबासोबतच्या पुर्नमिलनाचा प्रश्न येतो तेव्हा माहेरच्या लोकांना सासरच्यांनी जबाबदारी घ्यावी असं वाटत असतं, तर सासरच्यांसाठी तिचं उपयोगिता मूल्य संपलेलं असतं.
अनेकदा तिची जबाबदारी टाळण्यासाठी माहेरचे पुन्हा तिचं लग्न दुसऱ्याशी लावून देतात. त्यातून आजार आणखी खालावतो.
मानसिक आजारी भाऊ चालेल, बहीण नको
सरिता यांच्या पुण्यातील एका वसाहतीतल्या घरी भेट दिल्यावरही तेच समोर आलं.
"आमच्या घरात दोन रुग्ण आहेत. सरितासोबतच आमच्या मधल्या भावालाही रुग्णालयात भरती केलं आहे," ते म्हणाले. ग्रॅज्यूएट असूनही ते बेरोजगार असल्यानं वडिलांच्या चहाच्या टपरीवर कसातरी घरखर्च चालतो.
"घरात सरिता काहीच काम करत नाही. रात्री 3 वाजता उठून जेवण करत बसते, घरात कोणाला झोपू देत नाही. अंघोळ केली तर दोन तास करत बसते. नाही केली तर कित्येक दिवस अंगाला पाणी लावत नाही," ते अशा अनेक तक्रारी सांगत होते.
दोन्ही लग्नात झालेल्या फसवणुकीनं सरिताच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचं कुटुंबीयांना वाटतं. पण घरातल्या दोन्ही रुग्णांना नेमका काय आजार आहे हे त्यांना समजलेलं नाही.
सरिता यांचा दुसऱ्या नवऱ्यासोबतच्या घटस्फोटाचा खटलाही कोर्टात चालू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यातही सरिता योग्य ती साथ देत नाहीत, असं त्यांचं म्हणणं होतं.
त्यातच आता नणंद परत घरी आणली तर मी दोन पोरांना घेऊन माहेरी निघून जाईन असं घरातल्या सुनेनं सांगितलं आहे. मानसिक आजारी नवऱ्याची काळजी घ्यायची मात्र, त्यांची तयारी आहे.
"मेट्रो प्रकल्पासाठी आमचं घर पाडल्यानंतर पुनर्वसित घरासाठी आम्ही सरिताच्या नावाने वेगळा अर्ज केला होता. तो मान्य झाला नाही. सगळ्यात मिळून आम्हाला एक घर विमाननगरला मिळालं.
आमची कामाची जागा इथं, आमचं आयुष्य गेलं इथं मग आता अचानक तिथं जाऊन कसं रहायचं?" सरिताचे भाऊ पुढे म्हणाले.
तीन लाख रुपयांचं कर्ज काढून त्यांनी पुन्हा मेट्रोच्या आरक्षित जमिनीवरच एक पत्र्याची झोपडी बांधली आहे.
सरितासाठी वेगळ्या घराची सोय होत नाही तोपर्यंत तिला इथं आणणं शक्य होणार नाही, असं सरिता यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
"आमचं घर लहान आहे, घरात लहान मुलं आहेत, या रुग्णाला सांभाळायला कोणी नाही अशीही कारणं रुग्णालयाला नेहमी दिली जातात," असं भाऊसाहेब माने सांगत होते.
अनेकदा अशा महिलांचा लैंगिक छळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नातेवाईकांना रुग्णालय किंवा उपचार मिळतो ती जागा त्यांच्यासाठी सर्वात जास्त सुरक्षित वाटते. म्हणून महिलेनं तिथेच राहावं असा त्यांचा आग्रह असतो.
मानसिक आजाराच्या अवस्थेत अनेकदा रुग्ण घरातून कधीही निघून जातात, कोणाशीही बोलतात. मात्र महिलांबाबत त्याचा संबंध थेट त्यांच्या चारित्र्याशी लावला जातो.
"ही रात्री अपरात्रीही बाहेर जाते, रस्त्यावर फिरते. कोणत्याही पुरूषाशी बोलते. तिचं बाहेर कुठेतरी लफडं चालू आहे, असा संशय अनेकदा सासरकडची मंडळी घेत असतात," माने पुढे म्हणाले.
'आमची इज्जत जाते'
"मानसिक आजारी असताना मुली फार हतबल झालेल्या असतात. त्यांच्या अवस्थेत त्या कोणावरही पटकन विश्वास ठेवतात. अनेकदा मुली घरातून पळून त्या पुरूषासोबत जातात," डॉ. स्वराली कोंडवीलकर सांगत होत्या.
एखाद्या महिलेचं असं पळून जाऊन किंवा आंतरजातीय लग्न झालं असेल तर माहेरचेही त्यांच्याकडे पहात नाहीत.
अशाच काहीशा कारणामुळे कर्जतच्या 'श्रद्धा' संस्थेत राहणाऱ्या जुळ्या बहिणी मानसिक आजारासोबतच कुटुंबाच्या नकाराशी एकत्रितपणे झगडत आहेत.
27 वर्षांच्या रॉय बहिणींनी 'डी' आणि 'एन' हे त्यांच्या नावांचं पहिलं अक्षर वापरण्याची विनंती केली आहे. मुळच्या पश्चिम बंगालच्या असलेल्या या बहिणी पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबईत आल्या.
नेमका त्यावेळीच कोव्हिड लॉकडाऊन सुरू झाल्यानं कोर्ससाठी भरलेले लाखो रुपये वाया गेले.
"शैक्षणिक संस्थेकडून झालेली फसवणूक, मोठा आर्थिक तोटा अशी पूरक परिस्थिती निर्माण झाली तेव्हा त्यांचा जनुकीय स्क्रिझोफेनिया वर आला," डॉ. कोंडवीलकर सांगतात.
अशा अवस्थेत त्यांनी स्वतःच्या कल्पनाविश्वात दोघींनी दोन मुस्लीम नावांचे बॉयफ्रेंड्स तयार केले.
"आमचे बॉयफ्रेंड्स आम्हाला रात्री दोन वाजता भेटायला यायचे. आम्ही खूप बोलायचो. लहानपणी आमची एक शिक्षिका आम्हाला टॉर्च, बॉल यांच्या मदतीनं सूर्य कसा फिरतो हे सांगायची. आमचे बॉयफ्रेंड्स सेम तसंच सांगायचे. असे आमचे विचार खूप पटायचे," डी सांगत होती.
'तिचा बॉयफ्रेंड मुंबईच्या समुद्रकिनारी बांद्राला कुठेतरी राहतो,' असं ती म्हणाली.
2024 मध्ये त्या 'बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी' या दोघी तिथंच फिरत होत्या तेव्हा पोलिसांना सापडल्या आणि त्यांना श्रद्धा संस्थेमध्ये पहिल्यांदा दाखल केलं गेलं.
त्यांचे उपचार पूर्ण झाल्यानंतर वडिलांसोबत पुन्हा त्यांच्या घरी कलकत्त्यालाही गेल्या होत्या. पण तिथे औषधं न घेतल्यानं आजार पुन्हा बळावला आणि त्या पुन्हा मुंबईला निघून आल्या. मागच्या वेळी ब्रांदाला जिथं सापडल्या होत्या तिथंच त्या पुन्हा पोलिसांना सापडल्या.
"वडिलांना परत फोन केला होता. पण आमचे केस एकदम छोटे केले आहेत ना तर आसपासचे लोक काय म्हणतील असं ते म्हणाले. त्यामुळे केस वाढवून घरी परत या असं त्यांनी सांगितलं आहे. आम्ही त्याचीच वाट बघतोय," डी आणि एन सांगत होत्या.
"हम मम्मी-पापा के अच्छे बच्चे बनके दिखाएंगे," त्या म्हणाल्या.
कलकत्त्यात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना बीबीसीने फोनवर संपर्क साधला. त्या दोघी मुस्लिम मुलांसाठी घरातून पळून गेल्यामुळे समाजात आमची फार नाचक्की झाली आहे, असं त्यांचे वडील सांगत होते.
"तुम्ही त्यांना भेटलात ना? तुम्हाला त्या वेड्या वाटल्या का?" असाही प्रश्न त्यांनी विचारला. "त्या दोघी चांगल्या ग्रॅज्युएट आहेत. त्या वेड्या नाहीत. त्यामुळेच त्यांना गोळ्या औषधांचीही गरज नाही," असं रॉय यांचं म्हणणं होतं.
मुंबईला जाऊन मुस्लीम पोरांच्या नादी लागल्यानं त्या अशा वागत आहेत, असा त्यांचा समज आहे.
ही मुलं त्यांच्या आजारपणाचा भाग असावीत हे त्यांना मान्य नाही. त्यामुळे दोघींना आता परत कधीही घरी आणायचं नाही, असं त्यांनी ठरवलं आहे. व्यवसायानं ते कलकत्त्यात जनरल फिजिशियन म्हणजेच डॉक्टर म्हणून काम करतात.
काळजी घेणारीची काळजी कोण घेणार?
"विवाहीत पुरुषाला मानसिक आजार झाला असला तरी त्याची बायको त्याला, त्याच्या घरालाही सांभाळते. तिने दुसरं लग्न केलंय असं फार क्वचित प्रसंगी घडतं.
पण घरात बायको नाहीशी झाली की, बहुतेक पुरुषांनी सहा महिन्यांच्या आत लग्न केलेलं असतं. बाई ही खूप सहजरीत्या बदलता येण्यासारखी असते," डॉ. स्वराली सांगतात.
दुसरी बायको असेल तर आधीची आजारी नकोशी वाटते. अनेकदा मानसिक आजारी महिला जादुटोणा करते किंवा तिच्यावर कोणीतरी जादुटोणा केलेला आहे अशी कुटुंबाची अंधश्रद्धा असेल तरी तिला नाकारलं जातं.
शहराच्या तुलनेत रुग्णांचा स्वीकार करण्याचं प्रमाण ग्रामीण भागात जास्त असल्याचं त्या नोंदवतात. पण तरीही ते त्या त्या समाजाच्या विचारांवर अवलंबून असतं.
"पुरुषसत्ताक पद्धतीत महिलांचं कुटुंबासोबतचं नातं तिच्या या काळजी घेणारीच्या भूमिकेत ठरत असतं. पण आजारी झाल्यावर या भूमिका पूर्ण होत नाहीत तेव्हा त्यांचा नवऱ्याशी, मुलांशी असलेल्या नातेसंबंधावरही परिणाम होतो. तेव्हा ती महिला नकोशी होते," असं त्या म्हणतात.
थोडक्यात, बाईकडे नेहमी काळजी घेणारी म्हणून पाहिलं जातं. पण बाईची काळजी घ्यायची वेळ येते तेव्हा मात्र तिची जबाबदारी स्वीकारणं अवघड जातं.
कुटुंबाच्या नकारानं बळावतो आजार
नातेवाईकांनी नाकारलंय हे कळाल्यावर रुग्णांना काय वाटतं?
डॉ. शमा राठोड सांगतात, की पुरूष रुग्णांमध्ये राग निर्माण होतो. मला आत्ताच्या आत्ता घरी जायचंय असं ते म्हणतात. खरंच पळूनही जातात.
तर महिला जेवणारंच नाही, आंघोळ करणार नाही असा असहकार पुकारतात. "मला या मावशींनी त्रास दिला, त्या नर्सने असं केलं अशा तक्रारी करतात. अखेर त्यांच्यातली विरोध करण्याची ताकद संपून जाते आणि त्या सत्य स्वीकारतात. त्यांना असं मोडताना पाहणं आम्हाला चांगलं वाटत नाही," डॉ. राठोड म्हणतात.
तर नातेवाईक स्वीकारत नाहीत यावर महिला पहिले विश्वासच ठेवत नाहीत, असा अनुभव डॉ. स्वराली कोंडवीलकर सांगतात.
"असं नसेल, ते असं करणार नाहीत. काही अडचण असेल. ती संपली की येतील, असं त्यांना वाटतं."
मग हळूहळू त्यांना सत्य समजू लागतं. मग तुम्ही मला सोडून द्या. मी माझं माझं जगेन, कशीही राहीन अशा प्रतिक्रिया महिला देतात.
शेवटी, संस्थेतल्या इतर रुग्णांशी त्या नाळ जोडतात. आई-मुलगी, आजी-नात, मावशी-भाची, बहिणी अशी सरोगेट नाती त्या एकमेकींत तयार करतात. आपलं कुणीतरी आहे ही भावना तयार होते तेव्हा कुटुंबानं दिलेला नकार पूर्णपणे पचवता येतो.
तर काही महिला पूर्णपणे कोलमडतात. कुटुंबाचा नकार त्यांच्या मनात सल निर्माण करतो. अनेकदा त्याने त्यांचा आजारही बळावतो.
कायदा काय सांगतो?
पेशंटला घरी कधी सोडायचं हे ठरवताना प्रादेशिक मनोरुग्णालयाला रुग्णाच्या स्थितीसोबतच नव्या 'मानसिक आरोग्य कायदा, 2017' यातल्या नियमांचा आधार घ्यावा लागतो.
"या कायद्यानुसार रुग्णांना आता स्वतंत्रपणेही घरी सोडता येतं. यावर्षी मार्च महिन्यात कुटुंबानं न स्वीकारलेल्या एका पुरूष रुग्णाला छत्रपती संभाजीनगरचं तिकिट काढून देऊन स्वतःच्या घरी पाठवलं गेलं. अशा पद्धतीचा डिस्चार्ज रुग्णालयाकडून पहिल्यांदाच देण्यात आला होता.
त्यानंतर अशा पद्धतीने आणखी पाच पुरूष स्वतंत्रपणे घरी सोडण्यात रुग्णालयाला यश आलं," भाऊसाहेब माने म्हणाले.
रुग्णालयात असलेल्या एका पुरूष रुग्णाला एका टोलनाक्यावर तर आणखी दोघा-तिघांना हॉटेलमध्ये काम मिळाल्याने त्यांनाही रुग्णालयातून बाहेर सोडलं आहे.
पण समाजात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने अशा पद्धतीने महिलांना स्वतंत्रपणे सोडता येत नाही किंवा त्यांचं व्यावसायिक पुर्नवसनही करता येत नाही.
कायद्याप्रमाणे सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस रुग्ण रुग्णालयात ठेवता येत नाही. अशा रुग्णांना 'दीर्घकाळ वास्तव्य' या वर्गवारीत टाकलं जातं.
अशा रुग्णांमध्ये जे बेवारस आहेत, ज्यांच्या घरी आता कोणीही नाही, ज्यांच्या घरच्यांची माहिती नाही, ज्यांच्या घरच्यांनी पत्ता बदलला आहे आणि ज्यांचे कुटुंबीय स्वीकारायला तयार नाहीत, असे पाच प्रकार पडतात.
यातले नेमके किती रुग्ण कुटुंबीयांनी न स्वीकारल्याने रुग्णालयात आहेत याची अधिकृत आकडेवारी बीबीसीने मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठांची परवानगी मिळाल्याशिवाय आकडेवारी दिली जाणार नाही असं ठाणे मानसिक रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक नेताजी मुळीक यांच्याकडून सांगण्यात आलं.
उर्वरित तीन रुग्णालयाची आकडेवारी वरील तक्त्यात दिली आहे.
असे नातेवाईकांनी न स्वीकारलेले अनेक रुग्ण गेली कित्येक वर्षे रुग्णालयातच रहात होते. मात्र अलिकडेच एका जनहीत याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने या रुग्णांचं योग्य पुर्नवसन करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार राज्य सरकारने सांगितलेल्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये पुर्नवसन केलं गेलं, अशी माहिती रुग्णालयांकडून मिळाली.
त्यामुळे कुठल्याही आकडेवारीत गणना नसलेल्या मात्र नातेवाईकांनी न स्वीकारल्यानं एखाद्या सामाजिक संस्थेत राहणाऱ्या अनेक महिला आपल्या आसपास आहेत.
पुरूष खाटांची संख्या जास्त का?
तीनही मनोरुग्णालयात पुरूष खाटांचं प्रमाण जास्त आहे कारण तशी गरज आहे, असं भाऊसाहेब माने सांगतात.
या तफावतीमागची दोन कारणं ते मांडतात. एक, कुटुंब प्रमुख म्हणून येणारी जबाबदारी, आर्थिक अडचणी, बेरोजगारी या सगळ्याने येणारा ताण मोकळेपणाने मांडण्याची भावनिक जागा पुरूषांसाठी सहजपणे उपलब्ध होत नाही.
शिवाय, पुरूषांना उपचार मिळण्याचं प्रमाणही महिलांच्या तुलनेत जास्त आहे. "आपल्याकडे अजूनही तातडीची परिस्थिती असल्याशिवाय महिलांना रुग्णालयात आणलं जात नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं," ते म्हणतात.
तर, डॉ. भरत वाटवानी यावर थोडं वेगळं मत मांडतात. पुरूष रुग्णांची संख्या जास्त असण्यामागचं कारण हे भारतातील सामाजिक-आर्थिक आणि व्यवहारिक परिस्थितीला आपण कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतो यात आहे असं त्यांना वाटतं.
काही परिस्थितीत मानसिक आजारी महिलेला स्वीकारण्याबाबत लिंगाधारित भेदभाव केला जातोच. पण केवळ पितृसत्ताक दृष्टिकोनातूनच हा मुद्दा पाहणं चुकीचं ठरेल, असं डॉ. वाटवानी सुचवतात. मानसिक आरोग्याच्या उपचारांपर्यंत कोण पोहोचतं यामागेगरिबी, हिंसाचाराचा धोका आणि आर्थिक व्यवहार्यतेसारखे प्रमुख घटक काम करत असतात.
"भारतात बहुतेक कुटुंब भयानक, लाचार बवणाऱ्या आणि जीवघेण्या गरिबीत जगतात. अशा परिस्थितीत जगताना घरात पैसे कमावून आणणाऱ्या पुरूषाला प्राधान्य दिलं जातं," ते म्हणतात.
या सगळ्यामागे गरिबी हेच मुख्य कारण आहे असं डॉ. वाटवानी अधोरेखित करतात. रुग्ण महिला असो वा पुरूष, कुटुंबांना दोन्हीकडून सम प्रमाणात प्रेम दिलं जातं. पण परिस्थितीपुढे दोघांवरही उपचार करणं त्यांना शक्य होतच असं नाही. अशा हतबल परिस्थितीत पुरूषाचं आर्थिक मूल्य ओळखून त्याला उपचार दिले जातात.
"कामाच्या निमित्ताने घराबाहेर अगदी शहरं, राज्य ओलांडून जाण्याचं प्रमाण पुरूषांमध्ये जास्त असतं. त्यामुळे बेघर रुग्णांमध्येही पुरूष जास्त आहेत, असं दिसतं," डॉ. वाटवानी म्हणाले. म्हणून त्यांच्या श्रद्धासारख्या संस्थेत पुरूष रुग्णांसाठीच्या खाटांची गरज थोडी जास्त प्रमाणात पडते.
शिवाय, डॉ. वाटवानी सांगतात की महिला आणि पुरूष दोघेही आजार होण्यासाठी सम प्रमाणात हतबल असतात. मात्र, पुरूषांना उपचारासाठी घेऊन जाण्यामागे दोन महत्त्वाची कारणं असू शकतात.
एक, पुरुषांच्या संप्रेरकांच्या रचनेमुळे त्यांच्यात आक्रमकता जास्त असते. त्यामुळे घरात गोंधळ घालणारा, हिंसक वागणारा रुग्ण बहुतांश वेळा पुरुषच असतो.
ही स्थिती गंभीर बनते आणि त्यामुळे त्याला उपचारासाठी नेलं जातं. महिलांमध्ये अशी आक्रमकता कमी दिसते. त्या वेगळ्या संप्रेरकांच्या रचनेमुळे आजारी असल्या तरी धोकादायक नसतात.
आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांचा स्वीकार
"घरवाले बहुत टेन्शन देते है," 41 वर्षांच्या मालाडच्या फरिदा (नाव बदललेले आहे) सांगतात. गेली अनेक वर्ष 'श्रद्धा' येथे राहिल्यानंतर आत्ताच ईदसाठी त्या घरी गेली होती.
तीव्र नैराश्यातून बाहेर आलेल्यानंतर फरिदा संस्थेतल्याच कामकाजात मन रमवू लागल्या, त्या कामाचा मोबदला त्यांना मिळू लागला तेव्हा घरच्यांनीच सुट्टीसाठी म्हणून तिला बोलावून घेतलं होतं.
मूळचं उत्तर प्रदेशचं फरिदाचं कुुटुंब वडिलांच्या टेलरिंगच्या कामासाठी मुंबईला स्थायिक झालेलं. पण वडील लहानपणीच वारले. टीबीनं मोठा भाऊही वारला. पण नंतर सोळाव्या-सतराव्या वर्षी आई आजारी झाली तेव्हा मात्र फरिदा ढासळली.
"लग्न झाल्यापासून भैय्या अम्मीकडेही नीट पहात नव्हता. मी काहीतरी शिकावं, मोठं व्हावं असंच अम्मीला वाटायचं. ती जगली असती तर जिंदगी वेगळी असली असती," फरिदा सांगत होत्या.
तू नीट रहात नाहीस, नीट वागत नाहीस असं म्हणत भावांनी त्यांचं लग्न करून दिलं नाही. त्यांच्या दोन्ही लहान भावांनी मावस बहिणींशी लग्न केलं आहे. एक भाऊ आणि भावजय दुबईला राहतात.
दुसऱ्या मोठ्या भावजयीला फरिदा नको आहेत. जवळचं नातं म्हणून मावशीला त्यांना सांभाळायची इच्छा आहे. पण मावशीच्या सासरच्यांचा त्याला विरोध आहे.
"घरात काही संपलं तर तूच खाल्लं म्हणून भाभी ओरडेत. तू कपडे फाडतेस असं म्हणते," ती फरिदा पुढे म्हणाल्या.
आत्ताही त्या घरी गेल्या तेव्हा भाभीनं स्वयंपाकघरात कॅमेरा लावल्याचं त्या सांगत होत्या. "मी फ्रीजमध्ये अंडी ठेवत होते. ते भाभीला दिसलं. तर ती फोन करून खूप ओरडली," त्या म्हणाल्या.
हे टोमणे जास्त होतात तेव्हा त्यांना घर सोडून जावंसं वाटतं. तशा नैराश्याच्या अवस्थेत त्या अनेकदा घर सोडून गेल्या होत्या.
"मुंबईतल्या एका संस्थेच्या मार्फत फरिदा पहिल्यांदा इथे आली तेव्हा ती गरोदर होती. तिच्या घरच्यांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. तीच एका पुरूषासोबत पळून गेली असं घरच्यांचं म्हणणं होतं," डॉ. स्वराली सांगतात.
पण फरिदासारखंच काही महिला संस्थेत काम करत आहेत, पैसे कमवत आहेत हे कुटुंबीयांना लक्षात आलं की आधी नाकारणारे त्यांना सुट्टीसाठी बोलावून घेतात.
त्यामुळेच मानसिक आजारातून सावरलेल्या महिलांना कुटुंबीयांनी स्वीकारण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं फार महत्त्वाचं असल्याचं त्या म्हणतात.
काळजी घेणाऱ्यावरचा भार कमी करण्याची गरज
तसंच, मानसिक आरोग्याविषयीच्या जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवायला हवी, असं मत मॅगसेसे पुरस्कार विजेते मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी मांडतात.
त्यासोबतच, मानसिक आजाराच्या सरकारी सेवांचाही दर्जा सुधारायला हवा. भारत सरकारच्या एकूण आरोग्य बजेटपैकी मानसिक आरोग्यावरचा खर्च हा एका टक्क्यापेक्षाही कमी आहे.
"आज ग्रामीण भागात मानसिक आरोग्य सेवा फारच दयनीय स्थितीत आहे. खेड्यांमध्ये मूलभूत वैद्यकीय सुविधाच नाहीत, तिथे मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक मिळणं तर अशक्यच. अनेकदा सामान्य उपचारांसाठीही माणसाला मैलोनमैल प्रवास करावा लागतो," ते म्हणाले.
"आपल्याला कुटुंब, समाज, कायदा, आणि वैद्यकीय पातळीवर सगळीकडे एकत्रित बदल घडवावा लागेल, तेव्हाच मानसिक आजारातून सावरलेल्यांना संपूर्ण स्वीकार मिळेल."
मानसिक आजारी रुग्णांची काळजी घेणाऱ्यांवरचा भार कमी करण्याची गरज असल्याचं ते अधोरेखित करत होते. त्यासाठी सरकारी पातळीवर समुपदेशन केंद्रांची, डे केअर सेंटर्सची सोय व्हायला हवी.
"शेवटी, ज्यांचं कुणी नाही, अशा रुग्णांची जबाबदारी शासनाची आहेच," असं पुणे मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड म्हणतात.
अनेक नातेवाईक रुग्णाला घरी नेण्याऐवजी रुग्णालयच त्यांच्या हक्काचं समजतात. म्हणून रुग्णालयातल्या कोणत्याही सुविधांबद्दल ते तक्रार करत नाहीत, अपशब्द वापरत नाहीत, असंही ते पुढे सांगत होते.
"कोणत्याही सार्वजनिक संस्थेवर लोकांचा काहीसा दबाव असावा, ही लोकशाहीची गरज असते. पण इथे जबाबदारी नाकारल्यामुळे रुग्णालयाला कुणीही जाब विचारत नाही. रुग्णाची जबाबदारी नाकारताना नातेवाईक जाब विचारण्याचा नैतिक अधिकारही गमावून बसतात," डॉ. कोलोड म्हणतात.
महत्त्वाची सूचना
- औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत.
- यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड अलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाईन-011 2980 2980
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.