You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये आज रेड अलर्ट; जाणून घ्या पावसाची कुठे काय स्थिती असेल
आज म्हणजे 7 जुलै रोजी पालघर, रायगड हे जिल्हे आणि नाशिक व पुण्याच्या घाट प्रदेशात जोरदार पावसासाठी रेड अलर्ट आहे.
तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा पठारी भाग आणि साताऱ्याचा घाट प्रदेश तसंच अकोला आणि अमरावती इथे ऑरेंज अलर्ट आहे.
मुंबई, पालघर, ठाणे, रायगड तसंच नाशिक आणि पुण्याच्या घाट प्रदेशात फ्लॅश फ्लड म्हणजे अचानक पूर येण्याच्या घटना घडू शकतात.
हवामान विभागाच्या अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमधील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि सर्व महाविद्यालयांना आज म्हणजे 7 जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
नाशिकमध्ये ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा इशारा
नाशिक जिल्हा प्रशासनाने त्र्यंबकेश्वरसह नाशिक ग्रामीण, इगतपुरीत मंगळवारी (7 जुलै) ढगफुटी सदृश अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून नागरिकांनी दक्षता बाळगावी, असं आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केलं.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते, "महत्त्वाचा अलर्ट नाशिकसाठी आहे. नाशिकमध्ये एक मोठा लो प्रेशर बेल्ट तयार होत आहे. त्याला मेजर डिप्रेशन म्हणतात. त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या मधल्या भागात ढगफुटी होण्याची शक्यता आहे. ही ढगफुटी मोठी असू शकते. ढगफुटीमुळे या भागात जवळपास 300 मिमी पाऊस होऊ शकतो."
"या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. शाळांना सुट्टी दिली आहे, पाणी साचू शकतं अशा भागात काम केलं आहे, नाशिक शहर-नाशिक जिल्हा (ग्रामीण) येथे बऱ्याचशा उपाययोजना केल्या आहेत," अशी माहिती फडणवीस यांनी दिली होती.
SDRF आणि NDRF ची पथकं तैनात
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी 17 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF आणि) 6 राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्र यांनी दिली आहे.
मान्सून कालावधीकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) पथके पूर्व तैनात करताना पालघर व नागपूर येथे प्रत्येकी 2 आणि पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व धाराशिव प्रत्येकी 1 पथक तसेच मुंबई येथे 4 पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची एकूण 6 पथके सज्ज असून धुळे व नागपूर प्रत्येकी 2 आणि नांदेड, गडचिरोलीत पथके तैनात आहेत.
पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंकवरील दरड हटवली
पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक परिसरातील दरड व मातीचा मलबा आज रात्री 10.10 वाजता एमएसआरडीसी व बांधकाम कंपनीने पूर्णपणे हटविला आहे, अशी माहिती MSRDC ने दिली आहे.
एमएसआरडीसी, रोड सेफ्टी इंजिनिअर व बांधकाम कंपनी यांनी सदर मार्ग सुरक्षित असल्याचे सूचित केल्यानंतर पुणे–मुंबई मार्गावरील दोन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. उर्वरित दोन लेनवर अद्याप पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने त्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत, असंही सांगण्यात आलंय.
तसंच, नागरिकांनी वाहन चालविताना सावधगिरी बाळगावी, लेन शिस्त पाळावी, नियंत्रित वेगाने वाहन चालवावे तसेच महामार्ग पोलीस व वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन करण्यात आलंय.
11 वीच्या प्रवेशाची विशेष फेरी पुढे ढकलली
राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-1 चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार 8 जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता पुढील प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 जुलै रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध केली जाईल.
विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन प्रवेश प्रक्रियेतील सर्व कार्यवाही निर्धारित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती शालेय शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.
कोकण जलमय, मराठवाडा कोरडा?
रायगडच्या कर्जतमध्ये 297 मिलीमीटर, तर अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये शून्य मिलीमीटर.
महाराष्ट्रातल्या कर्जत नावाच्याच दोन गावांमधली 5 जुलैच्या सकाळची पावसाची ही आकडेवारी आहे.
सध्या राज्यात दोन प्रदेशांमधला पाऊस किती असमान आहे, हेच यावरून दिसून येतं.
एका बाजूला कोकणात मुसळधार तर राज्याच्या अंतर्गत भागांत तुलनेनं कोरडं हवामान, असं चित्र आहे.
6 जुलैच्या दुपारी सॅटेलाईटनं टिपलेल्या दृश्यांमध्ये मान्सूनच्या दोन्ही ब्रँचेस म्हणजे अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरातील शाखा सक्रीय असल्याचं दिसतं.
ओडिशाजवळ तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीचं 5 जुलैला डिप्रेशनमध्ये रुपांतर झालं आहे.
तर रविवारी (5 जुलै) दुपारीच या वादळानं किनारा ओलांडला, तसं महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरही पावसात वाढ झालेली दिसली.
बंगालच्या उपसागरालगत तयार होणाऱ्या अशा कमी दाबाच्या प्रणालींमुळे मान्सूनच्या वाऱ्यांना गती मिळते.
तर ते आणखी वेगानं पुढे सरकतात तसंच गेल्या दोन दिवसांत घडलं आहे.
5 आणि 6 जुलैला राज्यात विशेषतः मुंबई, पुणे, नाशिक आणि घाट प्रदेशात वेगानं ढग जमा होत गेले आणि मुसळधार पाऊस झाला.
याच दरम्यान, म्हणजे 5 जुलै सकाळी 8.30 ते 6 जुलै सकाळी 8.30 या 24 तासांत लोणावळ्यात 670 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ही एक अत्यंत दुर्मीळ घटना आहे. हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, लोणावळ्यात 650 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता सरासरी 1000 वर्षांत केवळ एकदाच घडते.
पुणे हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 48 तासांत कोकण किनारपट्टी तसेच घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
अशीच परिस्थिती 6 जुलैपासून पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तास कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासाठी पुढील अठ्ठेचाळीस तास महत्त्वाचे आहेत. त्यानंतर मात्र पावसाची तीव्रता कमी होताना दिसेल.
राज्यातील इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमाभागात एक चक्राकार वाऱ्यांची प्रणाली तयार झाली आहे.
काही हवामान तज्ज्ञांच्या मते या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात अगदी अंतर्गत भागांतही वादळी वारे अनुभवायला मिळाले आहेत.
7 जुलैलाही इथे मान्सून सक्रीय राहण्याची शक्यता आहे.
6 जुलैपासून पुढच्या 24 तासांत कोकणात अनेक ठिकाणी तर नाशिक, पुणे आणि आसपासच्या परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे.
विदर्भातही विशेषतः संध्याकाळच्या सुमारास काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावासाची शक्यता आहे.
मुंबईच्या प्रादेशिक केंद्रानं दिलेल्या इशाऱ्यांनुसार, 6 जुलैच्या रात्री पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी हे जिल्हे आणि लगतच्या घाट प्रदेशात रेड अलर्ट आहे.
तर नाशिक, पुणे आणि कोल्हापूरचा उर्वरीत भाग, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदियात ऑरेंज अलर्ट आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)