काही मृतदेह पुरल्यानंतर मोठा काळ होऊनही का कुजत नाहीत? जाणून घ्या कारण धार्मिक आहे की वैज्ञानिक

एका मृतदेहाच्या फॉरेन्सिक तपासणीचं प्रतिकात्मक चित्र

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, आर्ची अतंद्रिला
    • Role, बीबीसी न्यूज बांगला
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो मृतदेह दफन करण्यासाठी किंवा त्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी अनेकदा वेळ लागतो.

पूर्वी उन्हाळ्यात मृत्यू झाल्यास तो मृतदेह तागाच्या पट्ट्यांनी झाकून ठेवला जात असत, पण आता त्यासाठी रेफ्रिजरेटेड व्हॅनचा वापर केला जातो.

ज्या मृतदेहांचं जतन करणं गरजेचं असतं, त्यांच्यात कुजण्याची किंवा सडण्याची प्रक्रिया सुरू होऊ नये यासाठी त्यांना कमी तापमानात ठेवलं जातं.

वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिलं तर माणसाच्या मृत्यूनंतर शरीरात जीवाणू वाढू लागतात आणि त्यामुळे शरीर विघटनाची प्रक्रिया सुरू होते. ही प्रक्रिया साधारण 12 तासांनी सुरू होते.

पण अनेक वेळा असं दिसून येतं की, काही मृतदेह पुरल्यानंतरही अनेक दिवस कुजत नाहीत.

जुन्या कबरींच्या उत्खननादरम्यान कधी कधी असे मृतदेहही सापडतात जे अनेक वर्षांनीही जवळपास सारखेच दिसतात. अशा गोष्टी अनेकदा धार्मिक गोष्टींशी जोडल्या जातात, पण त्यामागे वैज्ञानिक कारणंही असतात.

अशा घटनांमागे अनेक नैसर्गिक कारणं असतात. त्यामुळे मृतदेह सहज कुजत नाही.

फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते, मृतदेह न कुजण्याची दोन मोठी कारणं असतात. एक म्हणजे ममीफिकेशन, आणि दुसरं म्हणजे अॅडप्सोरी, ज्यात मृतदेहाभोवती मेणासारखा थर तयार होतो आणि त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया थांबते.

नैसर्गिकरीत्या तयार झालेली ममी

तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा मृतदेह कोरड्या, कमी आर्द्रता आणि उष्ण अशा जागी ठेवला जातो, तेव्हा शरीरातील पाणी लवकर सुकतं. त्यामुळे जंतू वाढत नाहीत आणि शरीर बराच काळ जसंच्या तसं राहतं.

सर सलीम उल्लाह मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक विभागाच्या प्रमुख सहयोगी प्राध्यापक डॉ. नजमुन नाहर रोझी यांच्या मते, या प्रक्रियेला ममीफिकेशन म्हणतात.

वाळवंटी भागात काही मृतदेह नैसर्गिकरीत्या ममीसारखे बनतात आणि अनेक वर्षं आहे त्या स्थितीच राहतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वाळवंटी भागात काही मृतदेह नैसर्गिकरीत्या ममीसारखे बनतात आणि अनेक वर्षं आहे त्या स्थितीच राहतात.

या प्रक्रियेचा उद्देश मृतदेह जतन करून ठेवणं हा आहे. वाळवंटी भागात काही मृतदेह नैसर्गिकरित्या ममी बनतात आणि अनेक वर्षे आहे त्या स्थितीतच राहतात.

कोरड्या, वाळूसारख्या मातीतही नैसर्गिकरित्या मृतदेह ममीसारखे राहू शकतात.

पण बांगलादेशात हवा आणि मातीत ओलावा जास्त असल्यामुळे (जमिनीतील उच्च आर्द्रता) तिथे साधारणपणे असं होत नाही.

मृतदेहाभोवती मेणासारखा थर

ॲडप्सोरी टिश्यू हा मुळात साबणाप्रमाणे मेणासारखा विशिष्ट प्रकारचा पदार्थ असतो. त्यामुळे शरीरातील चरबीचं विघटन होण्याऐवजी ती तशीच टिकून राहते.

अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, अॅडप्सोरी तयार होणं किंवा नष्ट होणं हे वातावरणातील घटकांवर अवलंबून असतं.

एकदा अॅडप्सोरी तयार झाली की ती शेकडो वर्षं टिकू शकते.

डॉ. नजमुन नाहर रोझी यांच्या मते, अॅडप्सोरी तयार होणं अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. यामध्ये वातावरणाचं तापमान, हवामान, खाण्या-पिण्याच्या सवयी, मृतदेह कसा दफन केला गेला आणि मृत व्यक्तीच्या शारीरिक अवस्थांसारख्या गोष्टींचा समावेश होतो.

एखाद्या वस्तूचे विघटन किती लवकर होईल हे वातावरणातील अनेक गोष्टींवर अवलंबून असतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एखाद्या वस्तूचे विघटन किती लवकर होईल हे वातावरणातील अनेक गोष्टींवर अवलंबून असतं.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉ. रोझी यांनी बीबीसी बांगला म्हटलं, "दमट वातावरणात मृतदेह पांढरे दिसतात. त्यावर कसला तरी थर किंवा लेप लावला आहे, अशा पद्धतीने ते दिसतात. शरीरातील चरबी पाण्यासोबत रासायनिक प्रक्रिया करून मृतदेहाभोवती तेलासारखा मेणाचा थर तयार करते."

त्या म्हणतात की, जर असा अॅडप्सोरी तयार झाला, तर मृतदेह बराच काळ जसाच्या तसा राहतो. म्हणजे त्यात कुजण्याची प्रक्रिया सुरू होत नाही.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या आणखी एका संशोधनानुसार, असे मृतदेह अनेक दशकं जतन केले जाऊ शकतात.

यात अॅडप्सोरीशी संबंधित आणखी तीन गोष्टींचाही उल्लेख करण्यात आला आहे.

प्रथम- हायड्रॉक्सी फॅटी अॅसिड तयार होणं

दुसरं- ज्या ठिकाणी मृतदेह ठेवला जातो, तिथल्या हवामानात पाण्याची मात्रा जास्त असणे

तिसरं- ऑक्सिजनची कमतरता असणे

तज्ज्ञ म्हणतात की, या कारणांमुळे अनेक वेळा जमिनीच्या खोलवर मृतदेह दफन केल्यावरही असं वातावरण तयार होऊ शकतं.

डॉ. रोझी सांगतात की, काही अशी औषधं आहेत जी शरीरात असल्यास असं वातावरण तयार होऊ शकतं.

वेगवेगळे धातू आणि आर्सेनिकच्या उपस्थितीमुळे देखील शरीराच्या विघटनाची प्रक्रिया मंदावण्याची शक्यता असते.

ग्राफिक्स

ढाका मेडिकल कॉलेजचे माजी फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. कबीर सोहेल हे अॅडोप्सरी प्रक्रिया वेगळ्या पद्धतीने स्पष्ट करतात.

त्यांच्या मते, "शरीरातील चरबी घट्ट झाल्यास जंतू आणि विघटनासाठी जबाबदार असणारे जीवाणू काम करत नाहीत. अशा परिस्थितीत शरीर बराच काळ आहे तशा स्थितीत राहतं आणि चेहरा ओळखता येतो. मृतदेह खूप पूर्वी दफन केला होता, पण आजही तो पूर्वीसारखा आहे तसाच राहिला आहे, असं या परिस्थितीला म्हटलं जातं."

ढाका विद्यापीठाचे मायक्रोबायोलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मोहम्मद मिजानूर रहमान देखील सांगतात की, शरीरात चरबीचं प्रमाण जास्त असल्यास अशी शक्यता वाढते.

त्यांच्या मते, जर दफन केलेल्या ठिकाणी हवा असेल, माती नापीक असेल जिथे झाडं उगवत नाहीत किंवा माती वालुकामय असेल, तर काही वेळा मृतदेह कुजण्याची प्रक्रिया मंद होऊ शकते.

रहमान सांगतात, "बांगलादेशसारख्या वातावरणात साधारण 6 ते 12 दिवसांमध्ये त्वचा सैल होऊन वेगळी होते. पण लठ्ठ शरीर असेल, तर ही प्रक्रिया उशिराने होते आणि त्यासाठी महिना किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो."

बांगलादेशात हिवाळ्यातील कोरडं हवामान चरबीसाठी अनुकूल ठरू शकतं. परंतु, भारतीय उपखंडाचं हवामान साधारणपणे जलद विघटनासाठीच जास्त अनुकूल असतं.

रासायनिक बदलांचा परिणाम

डॉ. सोहेल सांगतात की, काही वेळा मृतदेह जपून ठेवण्याची गरज असते. अशा वेळी फॉर्मेलिनसारखी वेगवेगळी रसायनं वापरली जातात.

असे रासायनिक थर लावलेले मृतदेह दीर्घकाळ टिकून राहू शकतात.

ते उदाहरण देताना सांगतात की, परदेशात एखाद्याचा मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह मायदेशात पाठवायचा असेल किंवा काही कारणाने जतन करणं गरजेचं असेल, तर अशा वेळी एम्बामिंग केलं जातं.

यासाठी फॉर्मेल्डिहाइड, मिथेनॉल आणि इतर काही रसायनांचा वापर करून मृतदेह जतन करून ठेवला जातो.

असे मृतदेह दफन केल्यानंतरही रसायनांमुळे ते बराच काळ आहे तशाच अवस्थेत राहतात.

याशिवाय, जमिनीमध्ये काही रसायनं असले तरी असं होऊ शकतं.

ग्राफिक्स

'जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्स'मध्ये म्हटलं आहे की, मातीतील धातू, खनिजं किंवा आम्लता यांसारख्या रासायनिक गुणधर्मांमुळे शरीर कुजवणाऱ्या जंतूंवर परिणाम होतो आणि त्यामुळे विघटनाची गती मंद होऊ शकते.

मृतदेह किती दिवस टिकतो यावर तापमानाचाही परिणाम होतो. उदा. हिमालयात मृत्यू झाल्यास थंड हवामानामुळे शरीर अनेक दिवस सुरक्षित राहतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)