रोज 7 तास मोबाईल आणि स्क्रीनचा वापर? स्क्रीनसमोर बसणाऱ्यांमध्ये 'हे' आजार वेगाने वाढतायत

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डॉ. हिमानी
- Role, बीबीसीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
आजकाल प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन दिसणे ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. या नवीन तंत्रज्ञानानं आपलं जीवन सोपं झालं असलं तरी मोबाईल पाहण्याच्या वेळेवर (स्क्रीन टाईमवर) आपले नियंत्रण राहिलेलं नाही. यामुळेच आपल्या आरोग्यावर याचे वाईट परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत.
सामान्य नोकरदार असो, आयटी क्षेत्रात काम करणारे तरुण असोत, बिझनेसमन, लहान मुलं की अगदी गृहिणी..
सर्वच वर्गातील लोक स्मार्टफोनचा अतिवापर करत आहेत आणि यामुळे नवीन आरोग्य समस्या ओढवून घेत आहेत.
लोक फोनच्या इतके आहारी जात आहेत की, सकाळी उठल्या उठल्या हातात फोन घेऊन व्हॉट्सॲप मेसेज, सोशल मीडिया आणि बातम्यांचे अपडेट्स पाहिल्याशिवाय बहुतांश लोकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही.
ऑफिसमध्ये कॉम्प्युटरसमोर तासंतास काम करून घरी आल्यानंतरही लोक फोन पाहत वेळ घालवत आहेत. रात्री झोपण्यापूर्वी देखील इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर रील्स स्क्रोल करत, बेडवरच फोन ठेवून झोपी जात आहेत.
एका अंदाजानुसार, जगभरात प्रत्येक व्यक्ती दिवसातील सरासरी सुमारे 7 तास कॉम्प्युटर, मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनवर इंटरनेट वापरण्यात घालवत आहे.
'डिजिटल बेबी सिटर'
पूर्वीच्या काळी मुलं संध्याकाळी शाळेतून घरी आली की बाहेर मैदानावर मित्रांसोबत खेळायची, पळायची आणि दंगा करायची. पण आता सगळंच बदललंय.
आजकालची मुलं घरी आल्या आल्या मोबाईल किंवा टॅब हातात घेऊन बसतात आणि व्हीडिओ, रील्स, ऑनलाईन गेम्सच्या नावाखाली स्क्रीनसमोर तासंतास घालवतात.
मुलांनी आपल्या कामात त्रास देऊ नये किंवा त्यांनी दंगा करू नये असं वाटणारे पालकसुद्धा काहीवेळा मोबाईलला "डिजिटल बेबी सिटर" सारखं वापरत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
कामासाठी स्क्रीन पाहणं आवश्यक असलं तरी मनोरंजन, सोशल मीडिया आणि मोबाईल गेम्सच्या नावाखाली विनाकारण अतिरिक्त वेळ स्क्रीनसमोर घालवणं लहान मुले असोत की मोठे.. या सर्वांच्याच आरोग्यासाठी संकट बनत चाललं आहे.
डोळ्यांवर वाढणारा ताण
जास्त वेळ कॉम्प्युटर किंवा मोबाईलकडे पाहिल्यामुळे "डिजिटल आय स्ट्रेन" (Digital Eye Strain) नावाची समस्या निर्माण होते. यालाच 'कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम' (Computer Vision Syndrome) असं ही म्हणतात.
डोळे जळजळणे किंवा कोरडे पडणे, दृष्टी अंधुक होणे, वारंवार डोकेदुखी, डोळे दुखणे, प्रकाश सहन न होणे ही याची मुख्य लक्षणं आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
स्क्रीनवर लक्ष केंद्रित केल्यावर आपण कमी वेळा पापण्या मिटतो यामुळे डोळ्यांतील ओलावा कमी होतो आणि डोळ्यांना त्रास होतो.
ही समस्या कमी करण्यासाठी "20-20-20 नियम" पाळणे योग्य ठरेल. याचा अर्थ असा की, दर 20 मिनिटांनी एकदा, कमीत कमी 20 फूट दूर असलेल्या कोणत्याही वस्तू कडे सलग 20 सेकंद पाहिले पाहिजे.
लहान मुलांनी जास्त वेळ स्क्रीन पाहिल्यामुळे मायोपिया (दूरचे नीट न दिसण्याचा दोष) नावाची समस्या वाढते.
झोप खराब करणारा निळा प्रकाश
मोबाईल, टॅबलेट आणि कॉम्प्युटर स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश (ब्लू लाईट) आपल्या झोपेवर वाईट परिणाम करतो.
रात्रीच्या वेळी जर स्क्रीनचा वापर वाढला तर मेंदूमध्ये 'मेलॅटोनीन' नावाचे झोपेचं हार्मोन कमी तयार होतं. परिणामी, झोप उशिरा लागणे, रात्री मध्येच जाग येणे, सकाळी उठल्यावर थकल्यासारखे वाटणे आणि दिवसा कामात लक्ष न लागणे अशा समस्या उद्भवतात.
अपुऱ्या झोपेमुळे स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही मूल न होण्याच्या समस्या उद्भवू शकतात, असे अनेक संशोधनांतून समोर आले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मुलांमध्ये एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्ती कमकुवत होणे, चिडचिड वाढणे, अभ्यासात मागे पडणे, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे आणि हार्मोन्सचे असंतुलन यांसारख्या गोष्टी घडतात.
पुढे जाऊन यामुळे मोठ्या माणसांमध्ये हृदयविकार, लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो.
स्क्रीनसमोर तासंतास बसून राहिल्यामुळे शारीरिक हालचालही कमी होते. यामुळे लठ्ठपणा, कमी वयातच रक्तदाब, मधुमेहाची लक्षणे निर्माण होणे आणि शरीराची ताकद कमी होणे अशा समस्या वाढत चालल्या आहेत.
मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम
सोशल मीडियाचा वापर जसा वाढत आहे तशी इतरांशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करणे, सतत ऑनलाईन राहण्याचा दबाव, लाईक्स आणि कमेंट्ससाठी वाट पाहणे या गोष्टींमुळे मानसिक ताण आणि चिंता वाढू लागली आहे.
जास्त स्क्रीन टाईममुळे चिंता, तणाव, नैराश्य, चिडचिड, एकाग्रतेचा अभाव आणि कार्यक्षमता कमी होणे अशा समस्या वाढत असल्याचे अनेक संशोधनांतून समोर आले आहे.
लहान मुलांमध्ये राग, उतावळेपणा, वागण्यात अचानक होणारे बदल आणि एका जागी लक्ष केंद्रित न करू शकणे यांसारख्या समस्या वाढताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
सध्या 'गेमिंग डिसऑर्डर'ला जागतिक आरोग्य संघटनेने एक आरोग्य समस्या म्हणून मान्यता दिली आहे.काही मुलांची स्थिती इतकी वाईट झाली आहे की, ती जेवण आणि अभ्यास सोडून देतात. घरात कोणाशीही बोलत नाहीत आणि रात्रीची झोप मोडून फक्त गेम्स खेळत बसतात.
याचे व्यसन जडले तर डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागू शकतो.
फोन खाली वाकवून पाहिल्याने आणि कॉम्प्युटरसमोर तासंतास एकाच स्थितीत बसल्यामुळे "टेक नेक" नावाची समस्या प्रामुख्याने दिसून येत आहे.
यामुळे मान दुखी, खांदे आखडणे, पाठीच्या कण्यावर जास्तीचा ताण पडणे आणि हाताची बोटे दुखणे किंवा त्यांना बधिरता येणे (मुंग्या येणे) अशा समस्या होत आहेत. आजकालच्या तरुण नोकरदारांमध्येही 'सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस'चे (मानेचा मणका झिजणे) प्रमाण वाढत असल्याचे हाडांच्या डॉक्टरांचे म्हणणे आहे.
स्क्रीन टाईमवर नियंत्रण कसे ठेवावे?
- गरज नसलेले नोटिफिकेशन बंद करावेत.
- प्रत्येक तासाला किमान 5 मिनिटे बसलेल्या जागेवरून उठून चालले पाहिजे.
- रात्री झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल, लॅपटॉपचा वापर थांबवला पाहिजे.
- जेवणाच्या वेळी आणि कुटुंबासोबत वेळ घालवताना "नो फोन रूल" (फोन न वापरण्याचा नियम) पाळावा.
- दिवसातील किमान 30-45 मिनिटे व्यायाम किंवा चालण्यासाठी वेळ काढावा.
सुट्टीच्या दिवशी आपला काही वेळ "डिजिटल डिटॉक्स" करण्यासाठी (म्हणजेच फोन, टॅब किंवा लॅपटॉपपासून दूर राहण्यासाठी) काढला पाहिजे आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे किंवा पुस्तके वाचण्याची सवय स्वतःला लावली पाहिजे.
लहान मुलांचा स्क्रीन टाईम नियंत्रित करण्यात पालकांचा वाटा सगळ्यात महत्त्वाचा आहे. 2 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांना स्क्रीनपासून पूर्णपणे दूर ठेवावे. तर 2-5 वर्षांच्या मुलांसाठी स्क्रीन पाहण्याची वेळ दिवसातून 1 तासापेक्षा जास्त असणार नाही याची मर्यादा ठरवून दिली पाहिजे.
घरामध्ये एक "स्क्रीन-फ्री झोन" बनवावा (जिथे मोबाईल किंवा टीव्ही वापरण्यास बंदी असेल).

फोटो स्रोत, Getty Images
मुलांसोबत एकत्र बसून पुस्तके वाचणे, त्यांना गोष्टी सांगणे किंवा त्यांचे बोलणे स्वतः ऐकून घेणे, अशी सवय लावून घ्यावी.
खेळ, संगीत आणि चित्रकला यांसारख्या इतर पर्यायी छंद किंवा कामांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
पालकांनी स्वतः मोबाईलचा वापर जेवढा शक्य होईल तेवढा कमी करून मुलांसमोर एक चांगला आदर्श ठेवावा.
तंत्रज्ञानाला आपल्या आयुष्यातून पूर्णपणे बाजूला करणे शक्य नाही. डिजिटल शिक्षण, माहिती मिळवणे आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी स्क्रीन खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पण जर आपण त्यांचा गरजेपेक्षा जास्त वापर केला तर त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
कामापुरताच स्क्रीनचा वापर करून उरलेला वेळ आपल्या कुटुंबाला, आरोग्याला, व्यायामाला आणि आवडीच्या छंदांना दिल्यास आपण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवू शकतो.
"तंत्रज्ञान आपल्या मुठीत असायला हवे, आपले आयुष्य तंत्रज्ञानाच्या मुठीत जाता कामा नये".
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























