अमेरिकेत पुराचं थैमान, 81 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 28 लहान मुलांचा समावेश

हवामान खात्याने टेक्सासमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

फोटो स्रोत, Eric Vryn/Getty Images

    • Author, गॅरी ओ'डोनोह्यू, अँजेलिका कासस आणि ॲलेक्स लीडरमॅन
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

अमेरिकेतील टेक्सास राज्यात ग्वाडालुपे नदीला आलेल्या पुराने थैमान घातलं आहे. अमेरिकेतील या जलतांडवात 81 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 41 जण बेपत्ता आहेत. मृतांमध्ये 28 लहान मुलांचा समावेश असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बेपत्ता पूरग्रस्तांचा शोध अजून सुरू आहे.

जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती सापडत नाही, तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत ही शोधमोहीम आम्ही थांबवणार नाही अशी ग्वाही टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी दिली आहे.

आतापर्यंत 850 जणांची सुटका करण्यात आली आहे. टेक्सासमधील केर काउंटीचे पोलीस अधिकारी लॅरी लाथा यांनी म्हटले आहे. जोपर्यंत प्रत्येक जण सापडणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे बचावकार्य सुरू ठेवू.

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नदीकाठावर कॅम्पसाठी आलेल्या मुलांना पुराचा फटका बसला. ख्रिश्चन युथ कॅम्पमधील 27 मुली पुरात अडकल्या आहेत आणि अद्याप त्या सापडल्या नाहीत.

सोशल मीडियावर काही पालकांनी आपल्या मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

4 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास ग्वाडालुपे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. काही तासांतच पुराचे अचानक लोंढे आले आणि त्यात या भागाचे भरपूर नुकसान झाले.

उन्हाळी सुट्टीनिमित्त एका स्वयंसेवी संस्थेकडून नदीकाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, उन्हाळी सुट्टीनिमित्त एका स्वयंसेवी संस्थेकडून नदीकाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या पुरात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही सुरक्षितस्थळी पोहोचवत नाही तोपर्यंत हे बचावकार्य सुरू राहील अशी ग्वाही टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अबॉट यांनी दिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. स्थानिक प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

पुरातून आतापर्यंत 850 जणांची सुटका करण्यात आली आहे.
फोटो कॅप्शन, पुरातून आतापर्यंत 850 जणांची सुटका करण्यात आली आहे.

उन्हाळी सुट्टीनिमित्त एका स्वयंसेवी संस्थेकडून नदीकाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अंदाजे 750 मुलींनी निवासी शिबिरात सहभाग घेतला होता.

आयोजकांनी पालकांना इमेल करून सांगितले आहे की जर तुमच्याशी थेट संपर्क करून माहिती देण्यात आली नसेल तर तुमचे पाल्य हरवले आहे असे समजावे.

काही पालकांनी आपल्या पाल्यांच्या मृत्यूची घोषणा केली आहे.

मृतांच्या कुटुंबीयांनी काय प्रतिक्रिया दिली?

पुरातील मृतांमध्ये रेने स्मज्स्ट्रला या आठ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. पुराचे पाणी या उन्हाळी शिबिरात घुसले त्यावेळेस रेने 'कॅम्प मिस्टीक'मध्ये होती. याबाबत रेनेच्या काकांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली.

त्यांनी लिहिलं की, "रेने आम्हाला सापडली पण ती सुखरूप सापडावी अशीच आमची आशा होती. पण आमची प्रार्थना ऐकली गेली नाही, असं त्यांनी लिहिलं आहे. तिचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर लोकांनी सहकार्य केलं. त्यामुळे तिची ओळख पटली.

"ती खुश होती. तिच्या मैत्रिणींसोबत ती आनंदी होती आणि याचा पुरावा म्हणजे तिचा हा कालचा फोटो. जो काळ ती आमच्यासोबत होती, त्यात आमचे आयुष्य आनंदी झाले, त्यासाठी आम्ही तिचे आभारी आहोत," असं त्यांनी लिहिले.

रेने स्मज्स्ट्रला

फोटो स्रोत, Camp Mystic

फोटो कॅप्शन, रेने स्मज्स्ट्रला

कॅम्प मिस्टिक, हे टेक्सासमधील हंटजवळ असलेल्या ग्वाडालुपे नदीकिनारी असलेलं जवळपास शंभर वर्ष जुनं ख्रिश्चन उन्हाळी शिबिर आहे. याच कॅम्पमधील 27 मुली पुरात अडकल्या असून त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

1930 च्या दशकापासून एकाच कुटुंबाच्या पिढ्यांनी चालवलेलं हे शिबिर, मुलींना आध्यात्मिकदृष्ट्या वाढण्याची तसेच सुसंस्कारित ख्रिश्चन वातावरणात उत्कृष्ठ वैयक्तिक गुण विकसित करण्यासाठीचं स्थान म्हणून ओळखलं जातं.

जेन रॅग्सडेल

हार्ट ओ' द हिल्स हे ग्वाडालुपे नदीच्या काठावर वसलेले आणखी एक मुलींसाठीचे शिबिर आहे, आणि शुक्रवारी आलेल्या पुराच्या थेट मार्गातच हे शिबिर होते.

जेन रॅग्सडेल या आमच्या शिबिराच्या सारंकाही होत्या. त्या वाचल्या नाहीत असं शिबिराच्या अधिकृत वेबसाईटने सांगितलं आहे.

रॅग्सडेल यांनी लहानपणी शिबिरात सहभाग घेतल्या तेव्हापासून त्या या संस्थेशी जोडल्या गेल्या. पुढे त्या काउन्सेलर झाल्या आणि नंतर शिबिराच्या संचालिका झाल्या असं वेबसाईटने सांगितलं आहे.

जेन रॅग्सडेल

फोटो स्रोत, Heart O' the Hills

फोटो कॅप्शन, जेन रॅग्सडेल

पुढे रॅग्सडेल यांच्याबाबत लिहिण्यात आलं की त्यांनी असंख्य लोकांवर प्रभाव टाकला आणि कणखरपणाचे त्या मूर्तीमंत रूप होत्या.

हार्ट ओ' द हिल्स शिबिर त्यावेळी सुरू नव्हते आणि त्यावेळी शिबिरात उपस्थित असलेल्यांपैकी बहुतेकजण सापडले असून ते सुरक्षित असल्याचं पोस्टच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे.

"साईटपर्यंत पोहोचणे कठीण आहे आणि सध्या अधिकाऱ्यांचे मुख्य लक्ष बेपत्ता असलेल्यांचा शोध घेणे आणि आणखी जीव व मालमत्तेची हानी होण्यापासून प्रतिबंध करणे यावर आहे."

घटनास्थळी पोहोचणे सध्या कठीण आहे. तर उपस्थित कर्मचारी, अधिकारी बेपत्ता लोकांना शोधून सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं कार्य करत आहेत.

सारा मार्श

टेक्सासमधील चेरोकी बेंड प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी सारा मार्श ऑगस्टमध्ये तिसरीत जाणार होती.

पूर आला तेव्हा ती देखील कॅम्प मिस्टिकमध्ये जात होती. पुरात बेपत्ता झालेल्या इतर कॅम्पर्समध्ये साराचाही समावेश असल्याची नोंद करण्यात आली होती.

साराची आजी डेबी फोर्ड मार्श यांनी शुक्रवारी फेसबुकवर सारासह पुरात अडकलेल्या इतरांसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली होती. काही तासांनंतर त्यांनी ऑनलाईन पोस्टच्या माध्यमातून आपल्या नातीचा मृतांमध्ये समावेश आहे असे सांगितले.

"साराच्या आमच्या जीवनातील सुंदर तेजस्वी आशेचा किरण होती. ती आम्हा सर्वांच्या हृदयात कायम जिवंत राहील!" अशी भावनिक पोस्ट मार्श यांनी फेसबुकवर केली.

सारा मार्श

फोटो स्रोत, Camp Mystic

फोटो कॅप्शन, सारा मार्श

अलाबामाच्या सिनेटर केटी ब्रिट यांनी साराच्या मृत्यूबाबत संवेदना प्रकट केल्या. फेसबुकवरून त्यांनी एक पोस्ट करत म्हटलं की, "सारा मार्शच्या निधनाने माझं मन सुन्न झालं आहे. या कठीण प्रसंगी आम्ही साराच्या कुटुंबीयांसोबत आहोत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करू."

लायला बॉनर

नऊ वर्षांची लायला बॉनर, डलास येथील रहिवासी होती. एनबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, कॅम्प मिस्टिकजवळ पुरात ती मृतावस्थेत आढळली.

लायलाच्या कुटुंबीयांनी एक निवदेन जारी करत विनंती केली. निवेदनात म्हटलं आहे की, "ही अतिशय वेदनादायी घटना आहे. या कठीण काळात सांत्वनासाठी आम्हाला पुरेसा वेळ मिळू द्यावी अशी आम्ही सर्वांना विनंती करतो. सध्या आम्ही कोणतीही माहिती देऊ शकत नाही. लायलावर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठीच हा एक धक्का आहे, आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करू."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.