अचानक उमेदवारी मागे का घेतली, सुरतच्या काँग्रेस उमेदवारानं सांगितलं कारण

    • Author, शीतल पटेल आणि रुपेश सोनवणे
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी
  • Published

सुरत लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर भूमिगत असलेले काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी पत्रकारांसमोर आले आहेत. त्यांनी काँग्रेसवर विश्वासघाताचा आरोप केला आहे.

बीबीसी गुजरातीबरोबर बोलताना ते म्हणाले की, "उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर मी याचिका दाखल करण्यासाठी गुजरात उच्च न्यायालयात गेलो होतो. पण त्याचवेळी काँग्रेसचे कार्यकर्ते विरोध करण्यासाठी माझ्या घरी आल्याचं मला समजलं होतं. त्यानंतर मात्र काँग्रेसबरोबर राहायचं नाही, असा निर्णय मी घेतला."

माध्यमांशी बोलताना निलेश कुंभानी यांनी काँग्रेसवर अनेक गंभीर आरोपही केले आहेत, तर काँग्रेसनं यापूर्वीच कुंभानी यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

काँग्रेसनं सुरत लोकसभा मतदारसंघातून कुंभानी यांना उमेदवारी दिली होती. पण फॉर्मवरील समर्थकांच्या सहीच्या मुद्द्यावरून झालेल्या वादानंतर त्यांचा फॉर्म रद्द करण्यात आला.

त्यानंतर भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात असलेल्या इतर सर्व उमेदवारांनीही अर्ज मागे घेतले. त्यामुळं तिथून भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी ठरले.

निलेश कुंभानी यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस पक्ष आणि उमेदवारी अर्ज रद्द होण्याच्या संदर्भात माहिती दिली.

काँग्रेसवर काय आरोप केला?

माध्यमांशी बोलताना नीलेश कुंभानी म्हणाले की, "2017 मध्ये काँग्रेसनं तिकिटाचा 'सौदा' केला होता. लोकांचा जनादेश माझ्या बाजूनं असतानाही त्यांनी 100 लोक घेऊन भाजपमधून आलेल्या उमेदवाराला तिकिट देत माझ्याशी 'गद्दारी' केली होती. माझ्या समर्थक आणि कार्यकर्त्यांनी त्या विश्वासघाताचा बदला घेतला आणि आता मीही त्यांच्या बरोबर आहे."

"समर्थकांमध्ये माझा फक्त एकच नातेवाईक होता. इतर सर्व काँग्रेसमधील होते," असंही ते म्हणाले.

"समर्थक मला आपण निवडणूक लढवायला नको असं सांगत होते. ते काँग्रेस कार्यकर्त्यांना कंटाळले होते. आम आदमी पार्टीचे नेते आमच्या साथीनं काम करत होते, पण काँग्रेस कार्यकर्त्यांचा त्याला विरोध होता. त्यामुळं समर्थक मला नेहमी निवडणूक लढवायची नाही, असं सांगत होते,"असंही नीलेश कुंभानी म्हणाले.

"निवडणूक रद्द करण्याचा काहीही विचार ठरलेला नव्हता. माझ्याबरोबर जवळपास इतर 15 जणांनी फॉर्म भरला होता. त्यात काँग्रेसचे अपक्ष उमेदवार आणि इतर लोकांचाही समावेश होता. त्यांनी फॉर्म का मागे घेतले हे त्यांना जाऊन विचारा,"असंही त्यांनी म्हटलं.

निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेत्यांनी सहकार्य केलं नसल्याचा आरोपही निलेश कुंभानी यांनी केला. परेश धनानी जेव्हा सुरतला आले तेव्हा त्यांच्याबरोबर व्यासपीठावर काँग्रेसचा एकही मोठा नेता नव्हता. माझ्याबरोबर कोणीही प्रचार करत नव्हतं. फक्त मतदार माझ्याबरोबर होते.

निलेश कुंभानी पत्रकार परिषदेत म्हणाले की, "फॉर्म रद्द झाल्यानंतर मी याचिका दाखल करण्यासाठी अहमदाबाद हायकोर्टात गेले होतो. पण करजनला पोहोचलो तेव्हा मला समजलं की, काही काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी माझ्या घरी पोहोचले. त्यानंतर मी काँग्रेसबरोबर राहायचंच नाही, असा निर्णय घेतला."

निवडणुका संपल्यानंतर अचानक माध्यमांसमोर का आले? या प्रश्नाचं उत्तर देताना निलेश कुंभानी म्हणाले की, "माझ्या वक्तव्यामुळं काँग्रेसला नुकसान व्हायला नको म्हणून मी निवडणुकीनंतर समोर आलो. मला परेश धनानी आणि शक्तिसिंह गोहिल यांचा आदर कमी होऊ द्यायचा नव्हता. ते माझे सन्माननीय नेते आहेत. त्यामुळं मी आतापर्यंत शांत राहिलो."

कुंभानी भाजपमध्ये प्रवेश करणार का?

निलेश कुंभानी भाजपमध्ये सहभागी होऊ शकतात, अशी चर्चा गुजरातच्या माध्यमांमध्ये होती.

पण, बीबीसीबरोबर बोलताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं सांगितलं.

सध्या मला काँग्रेस पक्षानं निलंबित केलं आहे. त्यामुळं मी कोणत्याही पक्षात नाही. आगामी दिवसांत मी कार्यकर्त्यांशी चर्चा करेल. सध्या मी भाजपमधील कुणाच्याही संपर्कात नाही. शिवाय भाजपमधीलही कुणी मला संपर्क केलेला नाही, असं त्यांनी म्हटलं.

समर्थकांच्या अपहरणाबाबत बोलताना ते म्हणाले की, "माझ्या समर्थकांचं अपहरण झालेलं नाही. त्यांचा संपर्क तुटला होता. पण नंतर त्यांनी सुरक्षित ठिकाणी असल्याचं मला सांगितलं."

कुंभानींच्या आरोपावर काँग्रेसने काय म्हटले?

काँग्रेस नेते प्रताप दुधात यांनी बीबीसीबरोबर बोलताना कुंभानींच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. "निलेश कुंभानी यांनी भाजपच्या साथीनं हे संपूर्ण कारस्थान रचलं आणि लोकांना धोका दिला, हे अगदी स्पष्ट आहे. भारतीय जनता पार्टी, कुंभानी यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे."

प्रताप दुधात म्हणाले की, "काँग्रेसनं त्यांचा विश्वासघात केला होता तर त्यांनी 2022 ची आमदारकीची निवडणूक का लढवली? हे सर्व खोटं आहे. त्यांनी लोकांची खिल्ली उडवली आहे, सुरतच्या लोकांचा विश्वासघात केला आहे."

सुरत शहरचे काँग्रेस अध्यक्ष धनसुख राजपूत यांनीही कुंभानींच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. "हा पूर्वनियोजित कट होता हे त्यांच्या वक्तव्यांवरून स्पष्ट होतं. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची बदनामी करण्याचं काम केलं आहे. आम्ही या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करणार आहोत."

नेमके काय घडले?

गुजरातमध्ये लोकसभा निवडणूक प्रक्रियेत अर्ज छाननी दरम्यान काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला होता. त्यानंतर भाजपचे मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं होतं.

काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांच्या उमेदवारीवर भाजपनं आक्षेप घेतला. वादानंतर काँग्रेस उमेदवारांचे समर्थक उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळं त्यांचा फॉर्म रद्द करण्यात आला.

या प्रकरणी दोन्ही पक्षांनी रिटर्निंग ऑफिसरसमोर आपापली बाजू मांडली आणि त्यानंतर निर्णय सुनावण्यात आला.

निलेश कुंभानी यांचे समर्थक म्हणून सह्या करणाऱ्या चौघांपैकी तिघांनी फॉर्मवर त्यांच्या सह्या नसल्याचं शपथपत्र दिलं. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी नीलेश कुंभानी यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं.

त्यानंतर निलेश कुंभानी यांनी त्यांचे समर्थक उपस्थित राहतील असा दावा केला. पण त्यांचे समर्थक उपस्थित झालेच नाहीत. दोन्ही पक्षांनी रिटर्निंग ऑफिसरसमोर बाजू मांडली आणि नंतर त्यांचा फॉर्म रद्द ठरवण्यात आला.

कोण आहेत नीलेश कुंभानी?

निलेश कुंभानी हे सुमारे एका दशकापेक्षा जास्त काळापासून काँग्रेसमध्ये आहेत. यापूर्वी दोन वेळा त्यांनी सुरत महानगर पालिका आणि एकदा विधानसभेचे निवडणूक लढवली आहे. ते नगरसेवकही राहिले आहेत.

2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या सुरतमधीर कामरेज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांना फक्त आठ टक्के मतं मिळाली होती आणि ते तिसऱ्या स्थानावर राहिले होते.

भाजप नेते प्रफुल्ल पंशेरिया यांनी कामरेजमधून विजय मिळवला होता. तर आम आदमी पार्टीचे उमेदवार राम धादुक दुसऱ्या क्रमांकावर होते.

सुरत लोकसभा मतदारसंघातून आधी माजी केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश खासदार होत्या. 1989 पासून या ठिकाणी भाजपचा ताबा आहे. कांशीराम राणा इथून सहा वेळा भाजपचे खासदार म्हणून निवडून आले आहेत.