हिवाळी अधिवेशनात दोन आठवड्यात काय काय झालं?

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे
    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published

हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस उजाडला. आपल्या नेत्यांबरोबर फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी वाढत होती.

इतके पास कोण देत? हा प्रश्न विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबरच सत्ताधारी नेतेही एकमेकांना विचारत होते. संत्रा बर्फ्यांचे बॉक्स संपत होते. कोण कधी जाणार? याची विचारपूस लोक एकमेकांना करत होते.

मुख्यमंत्री अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करणार होते. दोन आठवडे अधिवेशन खूप झालं. आता घरी जायची ओढ लागलीये असं सगळेजण एकमेकांना सांगत होते.

पायर्‍यांवर लोक फोटोग्राफरकडून फोटो काढून घेत होते. मुख्यमंत्र्यांचं अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण सुरू होणार होतं.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात 'तेच ते...?

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात काय नवीन मिळणार याची चर्चा सुरू होती. त्याचं सरकार स्थापन होऊन आता सहा महिने होणार आहेत. त्यामुळे गुवाहाटीचा' करेक्ट' कार्यक्रम, बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही कसे पुढे नेतोय, 50 आमदारांनी दाखवलेली हिंमत, उध्दव ठाकरेंवर टीका हे मुद्दे निश्चित असणार याचा अंदाज पत्रकारांना होता. भाषण सुरू झालं तेव्हा हा अंदाज खरा ठरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकारांनी अंदाज लावलेल्या सगळ्या मुद्यांना स्पर्श केला. भाषणात उध्दव ठाकरेंवर जोरदार टीका केली. हे भाषण सुरू असताना शिवसेनेच्या बाकावर फक्त सुनील प्रभू बसलेले होते. शिवसेनेच्या इतर आमदारांच्या जागा रिकाम्या होत्या. आदित्य ठाकरे हे उध्दव ठाकरे आणि संजय राऊतांसोबत एक दिवस आधीच चार्टर्ड विमानाने मुंबईत पोहचले होते. अजित पवार शिवसेनेच्या वतीने 'किल्ला' लढवत होते. "आपल्या मुलासारख्या व्यक्तीवर तुम्ही बोलता हे शोभतं का? मुलगा आहे म्हणून सोडून द्यायचं. बाहेर तुमच्या वतीने बोलणारा एक प्रवक्ता ठेवा. सभागृहाबाहेर बोललेल्या टीकांना तुम्ही सभागृहात उत्तर देता त्याच्याशी आमचं काय घेणं देणं?" अजित पवारांनी 'मुख्यमंत्र्यांनी सभागृहात राजकीय भाषणं करू नये' हा सल्ला दिला. ते भाषण ऐकणार्‍या अनेकांना तो पटला होता. मुख्यमंत्र्यांनी जरी जोरदार टीका करणारं भाषण केलं असलं तरी शेवटच्या 'राईट टू रिप्लाय'ने अजित पवारांनी बाजी मारली होती. बाहेर पडल्यावर अजित पवारांना अनेकजण तुम्ही कसं मस्त बोललात हे सांगत होते.

अजित पवारांवर आमदारांची नाराजी? 

अजितदादा दुसर्‍या आठवड्यात जितके आक्रमक दिसले तितके सुरवातीला दिसले नाहीत.  यासंदर्भातली चर्चाही विरोधी पक्षाच्या आमदारांमध्ये कायम राहीली. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशीपासून मुख्यमंत्र्यांच्या कथीत घोटाळ्याचा विषय समोर आला. पायर्‍यांवर आंदोलनं झाली. पण सभागृहात अजित पवार तितकेसे आक्रमक दिसत नव्हते. 

दिशा सलियन आत्महत्या प्रकरणात एकामागोमाग एक सत्ताधारी पक्षाच्या 14 आमदारांना बोलण्याची संधी दिली. पण त्यावर अजित पवार आक्रमक भूमिका घेत नव्हते. आदित्य ठाकरे, भास्कर जाधव हे सतत हात वर करून बोलण्याची संधी मागत होते. एका आमदाराने नाव न घेण्याच्या अटीवरून दिलेल्या माहितीनुसार, "आदित्य ठाकरे हे स्वतः उठून तुम्हाला जी चौकशी करायची आहे ती करा. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही हे सभागृहात सांगणार होते. पण अजित पवारांनी असं करणं योग्य नाही असं सांगून आदित्य ठाकरे यांना थांबवलं." .त्यानंतर भास्कर जाधव यांना बोलू न दिल्यामुळे जयंत पाटील हे आक्रमक झाले. त्यानंतर पाटील यांचं निलंबनही झालं. तेव्हाही अजित पवार यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं काही आमदारांचं मत होतं. 

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात एसआयटी चौकशी लावताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहादचा कायदा आणण्यासंदर्भात भाष्य केलं. पक्षातल्या काही नेत्यांची भूमिका वेगळी असताना यावरही अजित पवार काहीही भाष्य केलं नाही. 

अजित पवार

फोटो स्रोत, FACEBOOK/AJIT PAWAR

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

लोकायुक्त विधेयक ज्या दिवशी विधानसभेत मांडले गेले त्यादिवशी काही वेळापूर्वीच अजित पवार सभागृहात बसलेले होते. पण अनिल देशमुखांच्या सुटकेसाठी मुंबईला रवाना झाल्यानंतर हे विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आले. त्यानंतरही या विधेयकाबाबत अजित पवार काहीच बोलले नाहीत. हे विधेयक आणणे म्हणजे चौकश्यांचा ससेमिरा लावण्यासाठी आणखी एक यंत्रणा उभी करणे आहे अशी काही आमदारांची भावना होती.

पण त्यानंतरही या विधेयकाबाबत अजित पवार काहीच बोलले नाहीत.  अजित पवार यांच्या नरमाईच्या भूमिकेबद्दल माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाली. मग दुसर्‍या आठवड्यात अजित पवार भाषणांमधून आक्रमक दिसू लागले. त्यानंतरही अजित पवारांना त्यांच्या नरमाईच्या भूमिकेमुळे थेट शरद पवारांचा फोन केल्याचं काही आमदार सांगत होते. त्याला कोणताही अधिकृत दुजोरा नसला तरी त्यानंतर अजित पवार आक्रमक विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावताना दिसले. 

अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याबाबत 29 आमदारांच्या सह्यांचं पत्र सचिवांकडे दिलं. त्याबद्दल आपल्याकडे काहीही माहिती नसल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाही असं सांगत नाना पटोलेंनी सारवासारव केली. त्याचबरोबर अजित पवार हे याबाबत सभागृहात बोलतील असंही ते म्हणाले. पण अजित पवारांनी याबाबत काहीही भाष्य केलं नाही. त्यामुळे अनेक आमदार नाराज झाले. 

आदित्य ठाकरेंचे आरोप सभागृहाबाहेरच? 

पहील्या दिवसापासून आदित्य ठाकरे पायर्‍यांवरच्या आंदोलनात सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांच्या भूखंडाचा घोटाळ्याचे आरोप झाले. त्यावर विरोधकांनी घोषणाबाजी केली. पण त्या दिवशी मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. दुसर्‍या दिवशीच्या आंदोलनाची तयारी काय करायची याची चर्चा सुरू होती. कोणी नव्या घोषणा सांगितल्या तर कोणी अजून काही...भूखंड लिहीलेले श्रीखंडाचे डबे आणून भूखंडाचा श्रीखंड... च्या घोषणा द्यायची कल्पना आदित्य ठाकरे यांनी दिली. ती कल्पना सर्वांना आवडली. त्यानंतर भूखंड लिहीलेले श्रीखंडाचे डबे विरोधकांनी आणले. ते आंदोलन चर्चेत राहीलं. 

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर त्यांच्या गटातील आमदारांवर आरोप करत होते. पण हे सगळे आरोप ते सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना करताना दिसले. सभागृहात ते बसून असायचे पण  आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघाबाबत एकही लक्षवेधी किंवा तारांकित प्रश्न दिसला नाही.

त्याचबरोबर सभागृहात झालेल्या कोणत्याही चर्चेत त्यांनी भाषण केलेलं दिसलं नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे हे सभागृहाबाहेर कितीही आक्रमक दिसले तरी  कामकाजातला त्यांचा सहभाग कमी दिसला. आदित्य ठाकरे मतदारसंघातले प्रश्न मांडणार की फक्त खोक्यांच्या घोषणा देणार? याचं उत्तर मिळालं नाही. 

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

दीपक केसरकरांना उध्दव ठाकरेंनी सुनावलं तेव्हा? 

अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी उध्दव ठाकरे हे उपसभापती निलम गोर्हेंच्या केबिनमध्ये बसले होते. उध्दव ठाकरे, वरूण सरदेसाई, संजय राऊत, निलम गोर्हे हे सगळेच त्या केबिनमध्ये होते. त्यादरम्यान मुंबई महापालिकेतील कार्यालयावरून ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये जुंपली होती.

याची चर्चासत्या केबिनमध्ये सुरू होती. तितक्यात मंत्री दीपक केसरकर तिथे पोहोचले. त्यांना आत उध्दव ठाकरे बसले आहेत हे कदाचित माहिती नसावं. उध्दव ठाकरेंनी केसरकरांना पाहील्यावर ते संतापले. ते म्हणाले, "सगळं घेतलं ना आता अजून तुम्हाला महापालिकेतलं कार्यालयही पाहीजे? सत्ता हवी होती. ती मिळाली ना... मग त्यात खुश रहा ना." दिपक केसरकर काहीही न बोलता तिथून निघून गेले. उध्दव ठाकरे बोलत होते. 

अधिवेशनाचा शेवटचा दिवस संपला होता. आमदार निघण्याच्या तयारीत होते. विधीमंडळाच्या बाहेर हाता हल्दीरामच्या पिशव्या असलेले असंख्य लोक दिसत होते. सीताबर्डीच्या रस्त्याने जाताना हीरा स्विट्स आणि हल्दीराममध्ये मोठमोठ्या लागलेल्या रांगा दिसत होत्या. हे  अधिवेशन संपल्याचं चित्र दर्शवत होतं. 

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)