'सैयारा' हा कोरियन सिनेमाचा रिमेक असल्याचा दावा किती खरा, किती खोटा?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, YRF/INSTAGRAM

फोटो कॅप्शन, सैयारा हा चित्रपट 'अ मूमेंट टू रिमेम्बर' या कोरियन चित्रपटाचा चा रिमेक आहे, असं म्हटलं जातंय.
    • Author, यासिर उस्मान
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

आजकाल यशराज फिल्म्सचा नवीन चित्रपट 'सैयारा'ची थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र चर्चा होत आहे.

चित्रपटातील भावनिक दृश्यांनी तरुणांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे आणि हाऊसफुल्ल थिएटरमुळे निर्मात्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

पण यशाच्या या लाटेत, सैयारा हा चित्रपट 'अ मूमेंट टू रिमेंबर' या कोरियन चित्रपटाचा चा रिमेक आहे का? अशा चर्चांनाही उधान आलं आहे.

जर तुम्ही सैयारा पाहिला नसेल, तर इथे काही स्पॉयलर्स असू शकतात.

'अ मूमेंट टू रिमेम्बर' हा कोरियन चित्रपट चर्चेत का?

2004 साली कोरिया तसेच जपानमध्ये प्रचंड हिट झालेला 'अ मूमेंट टू रिमेम्बर' हा एक दक्षिण कोरियन रोमँटिक चित्रपट आहे.

या चित्रपटाची कथा 'प्युअर सोल'या जपानी टीव्ही मालिकेपासून प्रेरित होती. 2012 मध्ये तुर्कीमध्ये 'इविम सेन्सिन' नावानं या चित्रपटाचा अधिकृत रिमेक बनवण्यात आला.

'अ मूमेंट टू रिमेंबर' ची कथा ही दोन वेगवेगळ्या सामाजिक वर्गातून येणारा नायक चोई चुल-सू आणि नायिका किम सू-जिन यांच्याभोवती फिरत असते.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, NETFLIX

फोटो कॅप्शन, 'अ मूमेंट टू रिमेम्बर' ची कथा ही दोन वेगवेगळ्या सामाजिक वर्गातून येणारा नायक चोई चुल-सू आणि नायिका किम सू-जिन यांच्याभोवती फिरत असते.

कडक शिस्तीचा पण अतिशय संवेदनशील असलेला नायक चोई चुल-सू (जंग वू-सुंग) हा बांधकाम क्षेत्रात काम करत असतो आणि सोबत आर्किटेक्ट बनण्याचं स्वप्न ही पाहत असतो.

तर दुसरीकडे, नायिका किम सू-जिन ही एक फॅशन डिझायनर असते, अलीकडेच झालेल्या ब्रेकअपमधून सावरण्याचा ती प्रयत्न करत असते. दरम्यान, या दोघांची भेट होते आणि ते प्रेमात पडतात आणि नंतर लग्न करतात.

पण लग्नानंतर लगेचच एक कटू सत्य समोर येतं की, नायिका किम सू-जिनला अल्झायमर या आजाराची सुरुवात झालेली असते. तिच्या आठवणी हळूहळू कमी होऊ लागतात.

या दोन चित्रपटांची तुलना

'सैयारा'मध्ये नायिका अनित पड्डानं साकारलेली वाणी देखील अल्झायमरच्या सुरुवातीच्या टप्प्यात संघर्ष करत असते. ती देखील एका तुटलेल्या नात्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असते. कथेतील या साम्यतेमुळेच बरेच लोक 'सैयारा' ला 'अ मूमेंट टू रिमेम्बर'चा रिमेक म्हणत आहेत.

'अ मूमेंट टू रिमेंबर'मध्ये कथेच्या अगदी सुरुवातीलाच नायक आणि नायिका लग्न करतात आणि त्यानंतर सु-जिनला अल्झायमर झाल्याचं सत्य समोर येतं. त्यानंतरची उर्वरित कथा या संघर्षावरच आधारित आहे.

एक पती जो आपल्या पत्नीच्या तिच्या आठवणी कमी होताना आणि हळूहळू त्याच्यापासून दूर जाताना पाहत आहे, परंतु तरीही तिच्यासोबत आहे.

मात्र,'सैयारा'ची कथा थोड्या वेगळ्या वळणानं जाते. 'अ मूमेंट टू रिमेंबर' एका प्रौढ जोडप्याचा भावनिक संघर्ष दाखवतो, तर 'सैयारा' हा तरुण प्रेमाच्या निरागसतेनं भरलेला आहे.

यामध्ये नायक-नायिका, क्रिश आणि वाणी यांच्यातील नातं हळूहळू फुलत जातं आणि चित्रपटाच्या शेवटच्या भागात त्यांचं लग्न होतं.

आणखी काय वेगळं आहे?

'सैयारा'मध्ये दोन वेगवेगळ्या सामाजिक वर्गातील संघर्षाची झलकही दिसत नाही, जी मूळ कोरियन चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग होती.

'सैयारा'मधील दोन्ही पात्रांना संगीताची पार्श्वभूमी आहे. ही कथा एका गायकाच्या संघर्षाबद्दल आहे आणि या भावनिक कथेतील गाणी एक पात्र म्हणून उदयास येतात. या गोष्टी 'सैयारा'ला 'अ मूमेंट टू रिमेम्बर'च्या थेट रिमेकपेक्षा वेगळं करतात.

पण असं असूनही 'सैयारा'वर असलेला कोरियन चित्रपटाचा प्रभाव पूर्णपणं नाकारता येत नाही.

योगायोग हे विचित्र असतात, विशेषतः जेव्हा ते वारंवार घडतात. दोन्ही चित्रपटांमध्ये, नायिका अल्झायमरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असते, तिच्या स्मरणशक्तीवर परिणाम होत असतो, ती तिच्या आधीच्या प्रियकरासह दिसते.

दोन्ही कथांमध्ये मुलगी कुठेतरी पळून जाते आणि नंतर नायक तिला आठवण करून देण्यासाठी जुने सोनेरी क्षण पुन्हा उभे करतो.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, YRF/INSTAGRAM/NETFLIX

फोटो कॅप्शन, 'सैयारा'मध्ये दोन वेगवेगळ्या सामाजिक वर्गातील संघर्षाची झलकही दिसत नाही, जी मूळ 'अ मूमेंट टू रिमेम्बर' या कोरियन चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग होती.

कथेच्या आणि चित्रीकरणाच्या बाबतीत,'सैय्यारा'मध्ये एक दृश्य असं आहे जे थेट कोरियन चित्रपटावरून घेतल्यासारखं वाटतं.

या दृश्यात नायिका वाणी तिच्या आधीच्या प्रियकरासह आहे. क्रिश रागाच्या भरात त्याच्यावर हल्ला करतो. त्याच वेळी वाणीची स्मरणशक्ती नीट काम नाही आणि ती अचानक क्रिशवर चाकूनं हल्ला करते.

'अ मूमेंट टू रिमेंबर'मध्येही सू-जिन आणि चुल-सू यांच्यातील एक सीन असाच आहे. दोन्ही चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी हे सीन टिपले आहेत आणि आता ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .

प्रेरणा कुठूनही येऊ शकते. मग तो कोरियन चित्रपट असेल,एखादी जुनी कहाणी असेल किंवा संध्याकाळचा उदास सूर्य. तसेच प्रेरणेला 'रीमेक' म्हणत नाही.

जसं यशराज फिल्म्सनं आतापर्यंत 'सैयारा'ला रिमेक म्हटलं नाही. कदाचित उद्या ते असं म्हणूनही शकतात. परंतु दोन्ही चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांची मनं हीच खरी परीक्षक आहेत.

खरंतर, दिग्दर्शक मोहित सुरी यांची कोरियन चित्रपटांनी प्रेरित होण्याची ही पहिलीच वेळ नाही.

मोहित सुरी यांच्या 'प्रेरणा' चा प्रवास

रोमान्स, वेदना आणि थरार यांचं मिश्रण करण्यात तज्ज्ञ असलेले मोहित सुरी हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांचे भाचे आहेत.

त्यांनी 2005 मध्ये भट्ट फिल्म्सच्या 'जहर' या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून आपला प्रवास सुरू केला होता. या चित्रपटाचा नायक त्यांचा जवळच्या नात्यानं भाऊ लागणारा इमरान हाश्मी होता.

हा चित्रपट हॉलिवूडच्या 'आऊट ऑफ टाइम' (2003) पासून प्रेरित होता. सुरुवातीपासूनच मोहित सुरीनं भट्ट कॅम्पची सुपरहिट संगीताची परंपरा अबाधित ठेवली. 2006 मध्ये त्यांनी कंगना राणौत आणि शायनी आहुजा यांच्यासोबत 'वो लम्हे' हा हिट चित्रपट दिग्दर्शित केला, जो महेश भट्ट-परवीन बाबी यांच्या कथेवर आधारित होता.

कोरियन चित्रपटांशी त्यांचं नातं 2007 मध्ये आलेल्या 'आवारापन' या चित्रपटापासून सुरू झालं. चित्रपटाची कथा दक्षिण कोरियन हिट चित्रपट 'अ बिटरस्वीट लाईफ' पासून प्रेरित होती.

या चित्रपटानं मोहित सुरी यांच्या त्या सिग्नेचर शैलीची सुरुवात झाली, ज्यात 'प्रेमानं ग्रासलेली, खोलवर तुटलेली पात्रं' वेड आणि विनाशाच्या उंबरठ्यावर उभी असतात.

मोहित सुरी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मोहित सुरी हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांचे पुतणे आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्याच्या नंतरच्या चित्रपटांमध्येही अशाच नायक आणि नायिका होत्या. त्यांचा सुपरहिट चित्रपट 'मर्डर 2' हा कोरियन चित्रपट 'द चेझर' पासून प्रेरित होता, तर आशिकी 2 हा हॉलिवूड चित्रपट 'अ स्टार इज बॉर्न' पासून प्रेरित होता आणि 'एक व्हिलन' मध्ये 'आय सॉ द डेव्हिल' या कोरियन चित्रपटाची झलक होती.

सुन रहा है ना तू, तेरी गलियाँ, हमदर्द यासारख्या या चित्रपटांमधील हिट गाण्यांची तरुणांमध्ये मोठी क्रेझ होती. मात्र, आपल्या चित्रपटांवर कोरियन चित्रपटांचा प्रभाव होता, हे मोहित सुरी यांनी नेहमीच हे नाकारलं आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे 'एक व्हिलन'नंतर, त्यांच्या दिग्दर्शनात बनलेले चार चित्रपट 'हमारी अधुरी कहानी' (2015), 'हाफ गर्लफ्रेंड' (2017), 'मलंग' (2020) आणि 'एक व्हिलन रिटर्न्स'(2022) जे परदेशी चित्रपटांपासून प्रेरित नव्हते, पण ते सर्व फ्लॉप ठरले.

जरी यशाच्या शोधात 'सैयारा'नं थोड्या वेदना, थोड्या भावना आणि काही क्षण कोरियन चित्रपटांमधील पात्रांकडून घेतले असतील, तरी इतक्या सुंदरपणे प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणं, त्यांना स्वतःच्या रंगात रंगवून, प्रेक्षकांना पुन्हा सिनेमागृहात खेचणं सोपं काम नाही.

बॉलिवूडला कोरियन चित्रपट का आवडतात?

हे फक्त 'सैयारा' किंवा मोहित सुरी यांच्याबद्दल नाही, बॉलीवूडवर वर्षानुवर्षे कोरियन चित्रपटांचा प्रभाव राहिला आहे.

दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी कोरियन क्लासिक मानल्या जाणाऱ्या 'ओल्ड बॉय'वर आधारित संजय दत्त-जॉन अब्राहमचा 'जिंदा' बनवला, त्यानंतर '7 डेज'वर आधारित इरफान-ऐश्वर्याचा 'जज्बा', सलमानचे 'राधे' आणि 'भारत' हे चित्रपट 'द आउटलॉज' आणि 'ओड टू माय फादर' हे कोरियन चित्रपटांचे रिमेक होते.

याशिवाय अगली और पगली, रॉकी हँडसम, धमाका यांसारख्या रोमँटिक किंवा थ्रिलर चित्रपटांच्या कथा कोरियामधून आल्या.

मग असं काय विशेष आहे की बॉलिवूड कोरियन कथांकडे वळलं?

खरं तर, मुख्य प्रवाहातील बॉलीवूड आणि कोरियन व्यावसायिक चित्रपटांमध्ये अनेक खोल सांस्कृतिक धागे सापडतात.

हॉलिवूड आणि युरोपियन चित्रपटांपेक्षा वेगळं ठरणाऱ्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेकदा अनेक शैलींचे मिश्रण असतं. म्हणजेच प्रेक्षकांना इमोशन, ड्रामा, अ‍ॅक्शन आणि रोमान्स हे सर्व एकाच थाळीत दिलं जातं.

त्याचप्रमाणे, बहुतेक कोरियन चित्रपट आणि मालिका भावनांचं एक संपूर्ण जग निर्माण करतात, जिथं मनोरंजनाचं एक आकर्षक, सुंदर कापड विणलं जातं आणि कथेत अनेक शैली मिसळल्या जातात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बॉलीवूडवर वर्षानुवर्षे कोरियन चित्रपटांचा प्रभाव राहिला आहे.

आणखी देखील साम्य आहे. कोरियन टीव्ही मालिका किंवा 'के-नाटक' बहुतेकदा तीव्र भावना आणि मानवी नातेसंबंधांवर केंद्रित असतात, जसं की आई-मुलीचं नातं किंवा पहिलं प्रेम. भारतीय प्रेक्षक या भावनांशी सहजपणे जुळवून घेऊ शकतात. त्यामध्ये कुटुंब, आदर, कठोर परिश्रम आणि मानवता यासारख्या मूल्यांवर भर दिला जातो.

भारतीय समाजातही हीच मूल्यं महत्त्वाची मानली जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बहुतेक कोरियन कथा साधेपणा आणि संवेदनशीलतेनं सादर केल्या जातात, ज्यामध्ये इंग्रजी चित्रपटांप्रमाणे अश्लीलता किंवा जास्त कामुक दृश्यं नसतात, त्यामुळे त्या कुटुंबासोबत पाहता येऊ शकतात.

कोव्हिड लॉकडाऊन दरम्यान हिंदी किंवा इंग्रजीमध्ये डब केलेल्या कोरियन टीव्ही मालिकांकडे भारतीय प्रेक्षकांचं लक्ष वळण्याचं कारण हेच आहे. नेटफ्लिक्सची सर्वात यशस्वी मालिका ही कोरियन मालिका 'स्क्विड गेम'हीच आहे.

यापूर्वी पॅरासाईट, क्रॅश लँडिंग ऑन यू, इट्स ओके टू नॉट बी ओके, द क्वीन्स क्लासरूम आणि 'के-ड्रामाज' हे चित्रपट भारतात खूप लोकप्रिय झाले आहेत.

यशराजचा हा रोमँटिक चित्रपट आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्यानं, चित्रपटसृष्टीतील इतर निर्मातेही रोमान्ससोबतच भावनांच्या या 'कोरियन लाटेचा' फायदा घेण्यात मागे राहणार नाहीत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.