रविचंद्रन अश्विन निवृत्तीची घोषणा करताना झाला भावुक, कुणाकुणाचे मानले आभार?

फोटो स्रोत, Getty Images
भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. भारतातील आतापर्यंतच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आर. अश्विनला मानलं जातं.
आर. अश्विन आतापर्यंतच्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 अशा तिन्ही प्रकारांमधील 287 सामने खेळला असून, या कारकीर्दीत त्याने 765 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय क्रिकेटची सर्वोच्च संस्था असलेल्या बीसीसीआयनेही आर. अश्विनला पुढील प्रवासासाठी सदिच्छा दिल्या आहेत. आतापर्यंतच्या कारकीर्दीचं बीसीसीआयनं कौतुक केलं आहे.
ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर आर. अश्विननं निवृत्तीची घोषणा केली.
38 वर्षांचा आर. अश्विन 8 वेळा एकाच सामन्यात 10 विकेट्स घेतल्यात. तसंच, फलंदाज म्हणूनही त्याची खेळी चांगली राहिली. त्याने सहा शतकं आणि 14 अर्धशतकं स्वत:च्या नावावर नोंदवल्या आहेत.

ब्रिस्बेन कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासोबत आर. अश्विन पत्रकार परिषदेत आला आणि निवृत्तीची घोषणा केली.
त्यावेळी अश्विन म्हणाला की, "आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस आहे. मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे. मला खात्री आहे की, क्रिकेटपटू म्हणून अजूनही माझ्यात काहीतरी उरलं उरलं आहे, मात्र आता त्याचा वापर मी कदाचित क्लब स्तरावरील क्रिकेटमध्ये करेन. माझ्या कारकीर्दीत मी खेळण्यातून मनमुराद आनंद लुटला. क्रिकेटशी संबंधित अनेक सुंदर आठवणी जोडल्या गेल्या आहेत. मला रोहित शर्मा आणि अनेक सहकाऱ्यांसोबत घालवलेले क्षण आठवतात, ड्रेसिंग रूममध्ये त्याच्याशी निगडीत आठवणीही आहेत.
"मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो. याशिवाय अनेक नावे आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोहित, विराट कोहली, अजिंक्य, पुजारा... ज्यांनी माझ्या चेंडूंवर अनेक चांगले झेल घेतले. माझ्यासाठी भावनिक क्षण आहे, माफ करा... आता या क्षणी मी तुमच्या कोणत्याच प्रश्नांना उत्तरं देऊ शकणार नाही, पण तुमचे खूप खूप आभार."

अश्विनची खासियत
बीबीसी हिंदीसाठी लिहिलेल्या एका लेखात क्रीडा पत्रकार विधांशू कुमार यांनी आर अश्विनच्या गोलंदाजीबाबत लिहिलं होतं की, 'अश्विनची खासियत म्हणजे तो इतक्या विविध प्रकारे गोलंदाजी करू शकतो जे क्वचितच एखादा आधुनिक क्रिकेटपटू करू शकेल. वेगवेगळ्या प्रकारे गोलंदाजी करण्यात तो निपुण आहे, तो कॅरम बॉलचे तीन प्रकार टाकू शकतो, तो क्रिझच्या कोपऱ्यातून किंवा स्टंपच्या जवळ येऊन गोलंदाजी करण्यास सक्षम आहे, त्याच्याकडे संथ गोलंदाजीचे कसबही आहे आणि तो वेगवान गोलंदाजीही करू शकतो. ऑफ स्पिन हा त्याचा ठेवणीतला चेंडू असेल तर तो लेगब्रेक टाकूनही फलंदाजांना फसवू शकतो.'

'विविध प्रकारे गोलंदाजी करण्यात यशस्वी असलेला अश्विन शक्य तितक्या त्याच शैलीत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून चेंडू आत येईल की बाहेर जाईल हे फलंदाजांना ठरवता येणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने ही खासियत दाखवून दिली, ज्यासमोर सर्वश्रेष्ठ फलंदाजही नतमस्तक झाले.'
वरिष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार यांनी बीबीसीसाठी यापूर्वी आर. अश्विनच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा लेख लिहिला होता. तो लेख आम्ही अश्विनच्या निवृत्तीच्या निमित्तानं पुन्हा तुम्हाला वाचण्यासाठी इथे देत आहोत :
आर. अश्विनचा प्रवास : सुरुवातपासून निवृत्तीपर्यंत
"अरे जेसबॉल, ही तुझ्यासाठी फिल्डिंग लावली आहे, आता मार."
धर्मशाला कसोटी सामन्यापूर्वी रविचंद्रन अश्विनचे हे शब्द तुमच्या कानावर पडतात, तेव्हा भारतीय क्रिकेटचा हा दिग्गज सलामीवीर त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यापूर्वीही त्याच पद्धतीने वागतो जसं तो पहिल्या सामन्यावेळी होता, यावर विश्वास ठेवणं कठीण होतं.
अश्विनचा हा टोमणा ऐकून यशस्वी जैस्वालच नाही तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादवही जोरजोरात हसायला लागले.
मैदानाच्या आत अश्विनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत खेळाडू म्हणून अनेक बदल केले आहेत, पण मैदानाबाहेरही त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वात अनेक गुण जोडले आहेत. त्यामुळे तो प्रत्येक वयोगटातील आणि प्रदेशातील खेळाडूंसमोर अतिशय सहज वागतो.

फोटो स्रोत, Getty Images
तामिळनाडूमधून येणारे खेळाडू पारंपरिकरित्या हिंदी भाषेशी संघर्ष करतात, पण अनधिकृतपणे ही भारतीय ड्रेसिंग रूमची भाषा आहे.
100 कसोटी क्लबमध्ये सामील होणारा तामिळनाडूचा पहिला खेळाडू होण्याचा अर्थ काय आहे, असा प्रश्न पत्रकार परिषदेत अश्विनला विचारण्यात आला. त्याने अतिशय तात्विक उत्तर दिले.
अश्विन म्हणाला, "एक यशस्वी भारतीय क्रिकेटपटू होण्याचे अनेक पैलू आहेत आणि या काळात तुम्हाला शेकडो आव्हानांना सामोरे जावे लागेत."
पुढील काळात ते तामिळनाडूच्या युवा खेळाडूंसोबत आपले अनुभव शेअर करुन राज्यातील खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची इच्छा अश्विननं बोलून दाखवली.
अश्विनच्या विलक्षण कारकिर्दीची कहाणी केवळ तामिळनाडूचा क्रिकेटर किंवा फक्त भारतीय क्रिकेटपटू म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही.
इंग्लंडच्या क्रिकेटपटूची शेन वॉर्नशी तुलना
अश्विनने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली क्षमता सिद्ध केली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने त्याची तुलना शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरनसारख्या दिग्गजांशी केली आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज जो रूटने अलीकडेच या काळातील आणखी एक यशस्वी ऑफ-स्पिनर नॅथन लॉयन आणि अश्विन यांच्यातील फरकाबद्दल सांगितले.
रुट म्हणाला की, लॉयन फलंदाजाच्या चुका समजून घेताना कधीच थकत नाही, तर अश्विनच्या खेळात प्रत्येक क्षणी नावीन्यता असते त्यामुळे तो खेळाडूला आराम करण्याची संधी देत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
'अश्विनला फलंदाज व्हायचं होतं'
धर्मशाला कसोटीपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अश्विनचे भरभरून कौतुक केले.
त्याने सांगितले की, सुरुवातीच्या टप्प्यात अश्विनला गोलंदाज नव्हे, तर फलंदाज बनायचे होते. आणि त्याला स्वतः गोलंदाज बनायचे होते, तर तो कसा फलंदाज बनला. पुढे तो म्हणाला की हे योग्यच झालं कारण याचा भारतीय क्रिकेटला फायदा झाला.
रोहितने अश्विनबद्दल सांगितलेली सर्वांत खास गोष्ट म्हणजे एक वरिष्ठ खेळाडू म्हणून अश्विन कर्णधाराला कसा सपोर्ट करतो ते. अश्विन त्याचा सहकारी रवींद्र जडेजा सोबत केवळ बॅट आणि बॉलनेच नाही तर सूचना आणि सल्ला देऊन कर्णधाराचा भार कसा हलका करतो, हेही रोहितनं सांगितलं होतं.
खरं तर सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत अश्विनने आपल्या कसोटी प्रवासाबद्दल सर्वांचे आभार मानले आणि तो खूप आनंदी दिसला.
'कधीच कर्णधारपदाचा दावेदार समजलं नाही'
असं असलं तरी एक गोष्ट अश्विनला त्रास देत असेल. ती म्हणजे, कसोटी कर्णधारपदासाठी त्याला कधीही गंभीर दावेदार मानले गेले नाही. अश्विनची अनेकदा अनिल कुंबळे या महान गोलंदाजाशी तुलना केली जाते.
कुंबळेप्रमाणेच अश्विनला देखील सुरुवातीच्या टप्प्यात टोमणे ऐकावे लागले की, तो देशात उत्कृष्ट खेळतो, पण परदेशी खेळपट्ट्यांवर प्रभावी खेळत नाही.
पण, कुंबळेप्रमाणेच अश्विननेही प्रत्येक टीकेला त्याच्या शांत आणि अनोख्या शैलीत आपल्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले.
कुंबळेला त्याच्या शेवटच्या टप्प्यात कसोटी कर्णधारपद मिळाले होते. अश्विन आता त्या शर्यतीतूनही बाहेर पडला आहे.
अजिंक्य रहाणे आणि नंतर रोहित शर्मा सारख्या फलंदाजांना भारतीय कसोटी कर्णधारपद मिळाले. पण अश्विनने या निराशेबाबत कधीच वाच्यता केली नाही आणि ही काही क्षुल्लक गोष्ट नाही.
अश्विनची गोष्ट
खऱ्या अर्थाने पाहिले तर अश्विनची कहाणी खूप प्रेरणादायी आहे.
कसोटी सामन्यांत 50 पासून ते 500 गडी बाद करण्याच्या प्रवासात तो प्रत्येक भारतीय गोलंदाजापेक्षा वेगवान होता.
याचाच अर्थ असा की, त्याच्या आधी कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजाने 50, 100, 150, 200, 250, 300, 350, 400, 450 आणि अगदी 500 चा आकडा पार केला नाही.
एका दशकाहून अधिक काळ त्याने आपल्या खेळात किती सातत्य राखले हे यावरून दिसून येते.
कधी काळी हरभजन सिंगशी तुलना होऊनही अश्विनचं सर्वांत मोठं यश हे आहे की, तो त्याच्या नैसर्गिक प्रतिभेला पूर्ण न्याय देऊ शकला.
टी-20 क्रिकेट आणि आयपीएलमुळे टीम इंडियासाठी खेळावं असं ज्या खेळाडूला अनेकदा चुकीच्या पद्धतीने बोललं जायचं, त्या खेळाडूने तो कसोटी क्रिकेटपटू म्हणून चॅम्पियन असल्याचं सिद्ध केलं.
अश्विनच्या या यशाचा अंदाज त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत केलेल्या 3000 हून अधिक कसोटी धावा आणि 5 शतकांवरून लावला जाऊ शकतो. अनेक मोठ्या फलंदाजांनाही हे यश मिळालेले नाहीये.
परदेशी खेळपट्ट्यांवर (विशेषत: इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये) प्रत्येक कर्णधाराने प्लेइंग इलेव्हनमध्ये संतुलन राखण्याच्या नावाखाली त्याच्या महानतेवर प्रश्नचिन्ह उभे केले, पण त्याने त्याची तसदी घेतली नाही आणि तो टीम मॅन बनून राहिला.
अल्टिमेट टीम मॅन हे असं विशेषण आहे ज्यावर अश्विनला त्याची कारकीर्द संपल्यानंतर तेवढा अभिमान वाटेल, जेवढा 100-150 कसोटी सामने खेळण्यावर किंवा 500-600 कसोटी विकेट घेतल्यामुळे वाटणार नाही.


























