4 तास 10 मिनिटांनी लागला पहिल्या सामन्याचा निकाल

फोटो स्रोत, ANI
ट्वेन्टी20 म्हणजे झटपट आणि वेगवान फॉरमॅट असं समीकरण. सर्वसाधारणपणे ट्वेन्टी20 सामना 3 तासात आटोपतो. पण IPL च्या 2023 च्या हंगामातील पहिल्या सामन्याला तब्बल सव्वाचार तासांचा वेळ लागला.
आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची सुरुवात शुक्रवारी झाली. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झाला.
अनेक नवीन नियम, रिव्ह्यू, जाहिरातींचा ब्रेक या सगळ्यामुळे ही लढत संपायला 4 तास 10 मिनिटं लागली. गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सवर 5 विकेट्सनी विजय मिळवला.
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईच्या ऋतुराजने 50 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकारांसह 92 धावांची खेळी केली.
ऋतुराज अफलातून फटकेबाजी करत असताना बाकी फलंदाज मात्र धावांसाठी झगडताना दिसले. चेन्नईने डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, बेन स्टोक्स आणि मिचेल सँटनर या चार विदेशी खेळाडूंना खेळवलं.
ऋतुराजच्या खेळीच्या बळावर चेन्नईने 178 धावांची मजल मारली. गुजरातकडून मोहम्मद शमी, रशीद खान, अल्झारी जोसेफ यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजराततर्फे शुबमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी 37 धावांची सलामी दिली. साहाला राजवर्धन हंगारगेकरने बाद केलं.
केन विल्यमसन दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्याऐवजी साई सुदर्शनला संघात समाविष्ट करण्यात आलं. त्याने शुबमनसह चांगली भागीदारी केली. त्याने 17 चेंडूत 22 धावांची खेळी केली. कर्णधार हार्दिक पंड्याला रवींद्र जडेजाने त्रिफळाचीत केलं.
एकीकडे साथीदार बाद होत असतानाही शुबमनची मुक्त फटकेबाजी सुरू होती. तुषार देशपांडेचा उसळता चेंडू षटकारात बदलण्याचा शुबमनचा प्रयत्न ऋतुराजच्या हातात जाऊन विसावला. त्याने 36 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 63 धावांची खेळी केली.
विजय शंकरने 21 चेंडूत 27 धावांची आश्वासक खेळी केली. विजय शंकर बाद झाला तेव्हा गुजरातचा संघ अडचणीत सापडल्याचं चित्र होतं पण रशीद खान आणि राहुल टेवाटिया यांनी 8 चेंडूत 26 धावांची भागीदारी करत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. राहुलने 14 चेंडूत 15 तर रशीदने 3 चेंडूत 10 धावा केल्या.
चेन्नईकडून राजवर्धनने पदार्पणाच्या लढतीत 3 विकेट्स पटकावल्या. 2 विकेट्स आणि 10 धावा करणाऱ्या रशीदला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
केन विल्यमसन दुखापतग्रस्त
न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने शुक्रवारी गुजरात टायटन्स संघासाठी पदार्पण केलं. सनरायझर्स हैदराबादचं नेतृत्व केलेल्या केनला गुजरात टायटन्स संघाने लिलावात ताफ्यात सामील करुन घेतलं.
डेव्हिड मिलर अनुपलब्ध असल्याने शुक्रवारच्या लढतीत केनने पदार्पण केलं. मात्र हे पदार्पण स्मरणीय ठरलं नाही.
ऋतुराज गायकवाडचा फटका अडवताना केन विल्यमसन सीमारेषेवर दुखापतग्रस्त झाला. केनने झेल टिपला पण सीमारेषेबाहेर जात असल्याचं लक्षात येताच त्याने चेंडू आत टाकला.
पण या प्रयत्नात तो गुडघ्यावर विचित्र रीतीने पडला. पडताक्षणी केन वेदनांमध्ये असल्याचं दिसलं. गुजरात तसंच चेन्नईच्या फिजिओने केनच्या दिशेने धाव घेतली.
दुखापतीचं स्वरुप गंभीर असल्याने केनने मैदान सोडलं. त्याने उर्वरित डावात क्षेत्ररक्षण केलं नाही. तो फलंदाजीला आला नाही, त्याच्याऐवजी साई सुदर्शनला समाविष्ट करण्यात आलं.
अरिजित सिंगने केला धोनीला नमस्कार
कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच होम आणि अवे पद्धतीने मायदेशात होत असलेल्या आयपीएल हंगामाचं शुक्रवारी दिमाखात उद्घाटन झालं.
मंदिरा बेदी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. या कार्यक्रमात रश्मीका मन्धाना, तमन्ना भाटिया यांनी नृत्य सादर केलं. गायक अरिजित सिंग याने आपल्या सुराने चाहत्यांची मनं जिंकली.
धोनी व्यासपीठावर येताच अरिजितने वाकून नमस्कार केला. सोशल मीडियावर या नमस्काराची जोरदार चर्चा रंगली होती.
आयर्लंडचं आयपीएल पदार्पण
जोशुआ लिट्ल आयपीएल स्पर्धेत खेळणारा आयर्लंडचा पहिला खेळाडू ठरला. यंदा भन्नाट फॉर्मात असलेल्या जोशुआला गुजरातने लिलावात संघात घेतलं. शुक्रवारी जोशुआने पदार्पण केलं. जोशुआने चेन्नईच्या अंबाती रायुडूला बाद करत पहिली विकेट पटकावली.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























