पैशासाठी त्यांनी देशाकडून खेळणं सोडलं, टीम हारत होती आणि ते मात्र...

न्यूझीलंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रेंट बोल्ट
Published

न्यूझीलंडचा संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने पाहुण्या न्यूझीलंड संघाचा धुव्वा उडवला. भारतीय संघाच्या शिलेदारांची कामगिरी उत्तम झालीच पण त्याचवेळी न्यूझीलंडने क्षमतेनुरुप संघर्षही केला नाही गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही.

या पराभवामागे न्यूझीलंडच्या काही खेळाडूंनी घेतलेले निर्णय तर नाहीत ना याची चर्चा सुरु झाली आहे.

ट्रेंट बोल्ट हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा डावखुरा वेगवान गोलंदाज. टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 अशा तिन्ही प्रकारात बोल्ट न्यूझीलंड संघासाठी आधारस्तंभ मानला जातो.

सलग दहा वर्ष तिन्ही प्रकारात न्यूझीलंडसाठी दिमाखदार प्रदर्शन केलेल्या बोल्टने गेल्या वर्षी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला राष्ट्रीय करार सूचीतून वगळावं अशी मागणी केली.

बोल्ट म्हणाला होता, न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व करणं हा माझ्यासाठी अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. पण मी आता घरच्यांना वेळ देऊ इच्छितो. मला तीन मुलं आहेत. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ असण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. कोरोना काळात बायोबबल मध्ये राहून खेळायचं असल्याने प्रदीर्घ काळ मी घरच्यांपासून दूर राहिलो. न्यूझीलंडसाठी मी दशकभराहून अधिक काळ खेळत आहे. कारकीर्दीच्या या टप्प्यावर भविष्याबाबत मी गांभीर्याने विचार करायला हवा.

प्रत्येक बोर्ड दरवर्षी ठराविक खेळाडूंना करारबद्ध करतं. साधारणत: 25 ते 30 खेळाडूंना करारबद्ध केलं जातं. हे खेळाडू टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी20 सामन्यात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कटिबद्ध असतात. दुखापत आणि कौटुंबिक अडचण यांचा अपवाद सोडला तर हे खेळाडू निवडीसाठी उपलब्ध असतात. बोल्टने या करारातून माघार घेतल्याने संघनिवडीवेळी प्राधान्याने त्याच्या नावाचा विचार होणार नाही.

बोल्टने निवृत्ती जाहीर केलेली नाही, तो अजूनही न्यूझीलंडसाठी खेळू शकतो. ठराविक सीरिजसाठी मी न्यूझीलंडकरता खेळण्यासाठी उपलब्ध आहे असं ट्रेंट बोल्ट सूचित करेल त्याचवेळी त्याची संघात निवड होऊ शकते. 15 सदस्यीय संघ निवडताना निवडसमिती करारसूचीतील खेळाडूंना प्राधान्य देईल.

ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्राँडहोम, जेम्स नीशाम, मार्टिन गप्तील

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रेंट बोल्ट

राष्ट्रीय संघासाठी खेळण्याच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याने बोल्ट जगभरात होणाऱ्या विविध ट्वेन्टी20 लीगमध्ये खेळू शकतो. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत बोल्ट राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. याआधी तो मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स संघांकडून खेळला आहे.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

याच धर्तीवर ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेतील मेलबर्न स्टार संघासाठी बोल्ट खेळतो. काही दिवसांपूर्वीच दुबईत सुरु झालेल्या इंटरनॅशनल ट्वेन्टी20 लीग स्पर्धेत तो मुंबई एमिरेट्स संघाचा भाग आहे.

सोप्या शब्दात समजून घ्यायचं तर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाशी करारबद्ध असल्यास, बोल्टला न्यूझीलंडसाठी उपलब्ध राहणं अनिवार्य ठरतं. न्यूझीलंड संघांच्या दौऱ्याबरोबरीने त्याला जगभरातील ट्वेन्टी20 लीगसाठी वेळ द्यावा लागतो. दोन्ही वेळापत्रकं भरगच्च असतात. यादरम्यान दुखापत झाल्यास मैदानापासून दूर राहावं लागतं.

आता बोल्ट राष्ट्रीय करार सूचीचा भाग नसल्याने त्याला न्यूझीलंडच्या सगळ्या सामन्यांसाठी उपलब्ध राहणं क्रमप्राप्त नाही. जगभरातील ट्वेन्टी20 लीग मध्ये सहभागी होण्यासाठी त्याला फारतर 6 महिने खेळावं लागतं. निम्मं वर्ष खेळून त्याला न्यूझीलंडसाठी करारबद्ध होऊन जेवढे पैसे मिळतात त्यापेक्षा जास्त पैसे मिळतात.

न्यूझीलंडचा संघ पाकिस्ताननचा दौरा आटोपून भारतात दाखल झाला. हैदराबाद, रायपूर आणि इंदूर इथे झालेल्या वनडे लढती पाहुण्यांनी गमावल्या. हे सगळं सुरु असताना बोल्ट ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धेत खेळत होता. तिथे काही सामने खेळल्यानंतर तो दुबईत सुरु झालेल्या इंटरनॅशनल लीग स्पर्धेत खेळण्यासाठी रवाना झाला.

न्यूझीलंडचा संघ आता भारताविरुद्ध ट्वेन्टी20 मालिका खेळणार आहे. आयपीएलमध्ये अनेक वर्ष खेळल्यामुळे बोल्टकडे भारतीय खेळपट्यांवर खेळण्याचा अनुभव आहे. पण बोल्ट दुबईत खेळतो आहे.

न्यूझीलंडचा संघ दरवर्षी साधारण 14 टेस्ट, 25 वनडे आणि 15 ट्वेन्टी20 सामने खेळतो. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाशी करारबद्ध झाल्यास त्याला 365 पैकी जवळपास 280 दिवस खेळावं लागतं. कारण सामन्यांचे दिवस, दोन सामन्यांदरम्यानचे दिवस आणि प्रवास यातही बराच वेळ जातो. यासाठी त्याला वार्षिक साधारण 1.5 ते 2 कोटी रुपये मिळतात.

दुसरीकडे आयपीएलमध्ये दीड महिना खेळण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघ त्याला 8 कोटी रुपये देतं. अन्य लीगद्वारे होणारी कमाई जोडली तर बोल्टसाठी ट्वेन्टी20 लीग खेळणं फायद्याचा सौदा आहे.

न्यूझीलंडसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये 300हून अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये बोल्टचा समावेश होतो. बोल्टने 78 टेस्ट, 96 वनडे आणि 46 ट्वेन्टी20 सामन्यात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप विजेत्या तसंच 2019 वर्ल्डकपविजेत्या संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. वर्ल्डकपमध्ये त्याच्या नावावर हॅट्ट्रिकही आहे. 100वी टेस्ट आणि 400 विकेट या विक्रमाच्या बोल्ट अक्षरक्ष: उंबरठ्यावर आहे. पण आता हा विक्रम होईल का याबाबतच शंका आहे.

बोल्टने निवृत्ती न घेता हुशारीने मार्ग काढला पण अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोमने राष्ट्रीय संघाला अलविदाच केला. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत अडलेड स्ट्रायकर्स संघाने ग्रँडहोमला करारबद्ध करणार असल्याचं स्पष्ट झालं तेव्हाच न्यूझीलंडसाठी त्याच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

दुखापती आणि अंतिम संघात निवडीसाठी असलेली स्पर्धा लक्षात घेऊन मी निवृत्तीचा निर्णय घेतो आहे असं 36वर्षीय ग्रँडहोमने सांगितलं. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर सपाटून मार खात असताना ग्रँडहोम ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धेत अडलेड स्ट्रायकर्स संघासाठी खेळतो आहे.

ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, जेम्स नीशाम, मार्टिन गप्तील

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कॉलिन डी ग्राँडहोम

ग्रँडहोमने 29 टेस्ट, 45 वनडे आणि 41 ट्वेन्टी20 सामन्यात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयपीएलमध्ये तो कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघांकडून खेळला आहे. त्याचा हा अनुभव न्यूझीलंडच्या कामी आला असता पण तसं झालेलं नाही.

ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्राँडहोम, जेम्स नीशाम, मार्टिन गप्तील

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जेम्स नीशाम

बोल्टप्रमाणे अष्टपैलू जेमी नीशामने राष्ट्रीय करारातून वगळावं असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला सांगितलं. जगभरात होणाऱ्या बहुतांश ट्वेन्टी20 लीगमध्ये नीशाम खेळतो. आक्रमक फटकेबाजी, उपयुक्त गोलंदाजी आणि अफलातून क्षेत्ररक्षण यामुळे नीशाम संघात असणं संघांना उपयुक्त ठरतं. 2019 वर्ल्डकप स्पर्धेतही नीशामने आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. 12 टेस्ट, 71 वनडे आणि 60 ट्वेन्टी20 सामन्यात नीशामने न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत नीशाम मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स या संघांकडून खेळला आहे. त्याचा हा अनुभव न्यूझीलंडच्या कामी आला असता पण सध्या तो दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या ट्वेन्टी20 लीग स्पर्धेत प्रिटोरिया कॅपिटल्स संघासाठी खेळतो आहे.

ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्राँडहोम, जेम्स नीशाम, मार्टिन गप्तील

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मार्टिन गप्तील

बोल्टचा कित्ता गिरवत न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्तीलनेही करारसूचीतून वगळा असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला सूचित केलं आहे. 36वर्षीय गप्तीलने 47 टेस्ट, 198 वनडे आणि 122 ट्वेन्टी20 सामन्यात न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. वर्ल्डकप स्पर्धेत द्विशतक झळकावण्याचा मान गप्तीलच्या नावावर आहे.

आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा अनुभवही गप्तीलच्या नावावर आहे. मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद या संघांकडून खेळला आहे. गप्तीलच्या समावेशाने न्यूझीलंडच्या संघाला बळकटी मिळाली असती पण सध्या तो बिग बॅश स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्स संघासाठी खेळतो आहे.

वादळी फलंदाजीसाठी प्रसिद्ध कॉलिन मुन्रोचं नाव न्यूझीलंडच्या निवडसमितीच्या योजनांमध्ये नाही. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये स्फोटक आक्रमण करत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करणारा मुन्रो न्यूझीलंडसाठी अगदीच उपयुक्त ठरला असता. मुन्रो न्यूझीलंडसाठी 1 टेस्ट, 57 वनडे आणि 65 ट्वेन्टी20 सामने खेळला आहे.

दुसरीकडे जगभरातील ट्वेन्टी20 लीगचा तगडा अनुभव मुन्रोच्या नावावर आहे. तब्बल 365 ट्वेन्टी20 सामने तो खेळला असून 140.87च्या स्ट्राईकरेटने 9195 धावा त्याच्या नावावर आहे. त्याच्या नावावर 5 शतकं आणि 53 अर्धशतकांचा समावेश आहे. मुन्रो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स या संघांकडून खेळला आहे. न्यूझीलंडचा संघ पराभवाला सामोरं जात असताना दुबईत डेझर्ट व्हायपर्स संघासाठी खेळतो आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)