नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात नेमका वाद काय?

नवनीत राणा, यशोमती ठाकूर

फोटो स्रोत, Facebook

    • Author, नितेश राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, अमरावती
  • Published

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि काँग्रेसच्या नेत्या तसंच तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यातील राजकीय शत्रुत्व सर्वश्रूत आहे.

मात्र, अलिकडे या दोन्ही महिला नेत्यांनी एकमेकींवर केलेल्या आरोपांमुळे या दोघींमधला राजकीय संघर्ष पुन्हा पेटला आहे.

दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या स्टेजवरुन खासदार नवनीत राणा यांनी आरोप केला की, "आमदार यशोमती ठाकूर यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी पैसे घेतले. मात्र, काम केले नाही."

नवनीत राणा यांना प्रत्युत्तर देताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "खासदार नवनीत राणा या ‘जातचोर’ आहेत."

काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेदरम्यान यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले.

त्या म्हणाल्या, “नवनीत राणा माझ्याविषयी हीन पातळीवर बोलल्या,असं कळलं. त्यांना गरीब माणसाची किंमत नाही. जातचोर इकडे आले होते. ते आम्हाला काय पैशाच्या गोष्टी सांगतात. आमच्या वडील-आजोबांनी लोकांसाठी जमिनी विकल्या. बारदाना भरण्याचे काम केले नाही.”

अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. एका सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ आहे.

याच पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी राणा यांचा 'जातचोर' या शब्दाने उल्लेख केला.

वर्चस्वाची लढाई

यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा या दोघींची ओखळ अमरावतीमध्ये धडाडीच्या नेत्या अशी आहे. त्यांच्यातल्या या वादाला अमरावती जिल्ह्यात वर्चस्व कुणाचं याचीसुद्धा किनार आहे.

राणा पहिल्यांदा खासदार झाल्या आहेत. पण लोकसभेतला त्यांचा वावर आणि लोकांमध्ये त्यांच मिसळणं त्यांची महत्त्वाकांक्षा दाखवून देतात.

शिवाय लोकसभेच्या पुढच्या निवडणुकांची त्यांची तयारीसुद्धा यातून दिसून येतेय.

तर ठाकूर यांची आमदारकीचीही तिसरी टर्म आहे त्या एकदा मंत्री राहील्या आहेत. काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष होत्या. तसंच त्या राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या मर्जीतल्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात.

दिल्लीतल्या काँग्रेसच्या वर्तुळातही त्यांची चांगली उठबस आहे. त्यामुळे जिल्ह्यावर एकछत्र अंमल निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो.

राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात पुढे जाण्याआधी स्वतःचा जिल्हा मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतोय.

तर खासदार म्हणून जिल्ह्यावर आपलंच वर्चस्व असावं ही नवनीत राणा यांची महत्त्वाकांक्षा लपून राहीलेली नाही.

ठाकूर-राणांमधील आरोप-प्रत्यारोप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसाचं वाचन करण्याच्या घटनेचा संदर्भ घेत, आमदार यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांना उद्देशून म्हटलं की, "मला नाटक जमत नाही, नाटक करणारे जेलमध्ये गेलेत."

तर राजपेठ उड्डाण पुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आला होता.

"यशोमती ठाकूर पालकमंत्री असताना कोरोना काळात परिस्थिती हाताळण्यात त्या सपशेल अपयशी ठरल्या," असा आरोप राणांनी केला होता.

तर, "काम कमी करायचे आणि प्रसिद्धीची ओढ जास्त, अशी राणांची अवस्था आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भरवश्यावर निवडून यायचं आणि आणि लगेच रंग बदलायचा राणा यांचा स्वभावच आहे. जिधर दम उधर हम," अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली होती.

यशोमती ठाकूर

फोटो स्रोत, Facebook

ठाकूर-राणा वादालाही इतिहास

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमरावतीच्या राजकारणात खासदार नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यातील वाद तसा नवा नाही. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर तो प्रकर्षाने पुढे आला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी आघाडीचा पाठिंबा मिळवला होता. या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी नवनीत राणा यांचा प्रचार केला होता.

“निवडणुकीनंतर नवनीत राणा या भाजपमध्ये जातील, असा संशय यशोमती ठाकूर यांना सुरुवातीपासून होता. त्यामुळे प्रचारादरम्यान नवनीत राणा यांच्याकडून आघाडीशी प्रामाणिक राहील, अशी शपथ घेण्यास यशोमती ठाकूर यांनी भाग पाडले होते,” याची आठवण लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार मोहन अटाळकर यांनी करुन दिली.

अटाळकर सांगतात की, “यशोमती ठाकूर यांनी आग्रह धरल्यामुळे नवनीत राणा यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर ठाकूर यांनी राणा यांच्या समर्थनार्थ बैठकाही घेतल्या होत्या. ही निवडणूक राणा यांनी चांगल्या मताधिक्याने जिंकली. पण खासदार झाल्यानंतर राणांची भूमिका बदलली. आणि त्या हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन भाजपच्या कळपात सहभाही झाल्या."

खासदार झाल्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपचं समर्थन करायला सुरुवात केली. त्यांच्या तेव्हाच्या जाहीर सभेतही त्यांचा भाजपकडे जाण्याचा कल दिसून आला.

2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्या काळात यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यात छुपे वाद सुरूच होते.

एका सभेत बोलताना खासदार नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्या गालावरच्या खड्ड्यांबाबत टीका केली. त्यांच्या वयाचा उल्लेख करत "आमच्यापेक्षा 10-15 वर्षांनी मोठ्या आहेत. कितीही केलं तरी तुमच्या चेहऱ्यावर खड्डे दिसणारच. तेवढे वय दिसणार," अशी टीका राणा यांनी केली होती.

नवनीत राणा

फोटो स्रोत, Facebook

या टीकेला यशोमती ठाकूर यांनीही तातडीने प्रत्युत्तर देताना म्हटलं होतं की, “माझ्या पायावरच्या भेगा, हातावरचे चट्टे आणि चेहऱ्यावरचे खड्डे हेच शेतकऱ्याच्या मुलीचं खरं सौंदर्य आहे. माणूस गोड असून चालत नाही. त्याचं कामही गोड असावं लागतं.”

गेल्या काही वर्षांत यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्यातील वाद विकोपाला गेलाय.

छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या वादाचे रुपांतर आता उघड होऊ लागले आहे.

महत्त्वाचं म्हणजे अमरावती जिल्ह्यातील असा एकही नेता उरला नसेल, ज्यांच्यावर राणा दाम्पत्याने टीका किंवा आरोप केला नसेल.

पण या दोन महिलांमधील वादाचा राजकीय परिणाम काय होईल, या प्रश्नावर अटाळकर सांगतात की,

“तिवसा मतदारसंघात आता राजेश वानखडे यांच्या रुपाने नवे नेतृत्व मिळाले आहे. राजेश वानखडे हे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख होते. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये गेले. त्यामुळे राणा दाम्पत्याला तिवसा मतदारसंघात यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध राजेश वानखडे यांच्या रुपात एक चांगला मोहरा मिळाला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य आता ठाकूरांना थेट लक्ष्य करताहेत,” असं अटाळकर म्हणाले.

ज्येष्ठ पत्रकार संजय शेंडे म्हणतात की, "गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारणाचा विशेषत: अमरावती जिल्हाच्या राजकारणाचा स्तर अंत्यत खालावला आहे. सार्वजनिक भाषणात अशा स्वरुपाची भाषा करणे योग्य नाही."

शेंडे पुढे म्हणतात, “ज्या प्रकारची भाषा नेते वापरतात. ती लोकांची करमणूक करण्यासाठी ठिक आहे. मात्र राजकीयदृष्ट्या याचा विशेष फायदा होणार नाही. सार्वजनिक ठिकाणी असं विधान करताना त्याचे सामाजिक परिणाम काय होतील याचा विचार नेत्यांनी करायला हवा. मात्र सध्याचं राजकारणाचं स्वरुप बघता नेते हे भान विसरल्याची परिस्थिती आहे.”

लोकसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्यावर पैसे खाण्याचा आरोप करुन खासदार नवनीत राणा यांनी हा वाद नव्याने उकरुन काढला आहे. या विधानाविरुद्ध आमदार यशोमती ठाकूर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं जाहीर केलंय.

त्याचबरोबर पैसे दिल्याची माहिती निवडणूक विभागाला दिली होती का? असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक विभागाकडेही रितसर तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

म्हणजेच, एकंदरीत पुढच्या काही दिवसात या दोन महिला लोकप्रतिनिधींची नवी लढाई अमरावती जिल्हात आणि महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)