मराठी गाणी न लावल्यामुळे मनसे कार्यकर्त्याची हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण, मालकाची माफी

Published

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया

मनसे कार्यकर्त्याची हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण

फोटो स्रोत, @GajananKaleMNS

फोटो कॅप्शन, मनसे कार्यकर्त्याची हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण

1.मराठी गाणी न लावल्यामुळे मनसे कार्यकर्त्याची हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण

हॉटेलमध्ये मराठी गाणी न लावल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हॅाटेल व्यवस्थापकाला बेदम चोप दिला आहे. नवी मुंबईतील वाशीमध्ये ही घटना घडली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

वाशीमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून हॅाटेल व्यवस्थापकाला मारहाण चोप देण्यात आला आहे. नवी मुंबईतील वाशी येथील सतरा प्लाझा मधील द टेस्ट ॲाफ पंजाब हॅाटेल व्यवस्थापकाला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे.  

हॅाटेलमध्ये मराठी गाणी लावा, अशी मागणी करूनही याकडे व्यवस्थापकाने दुर्लक्ष केले. वारंवार सांगितल्यानंतरही हॉटेल व्यवस्थापकाने मराठी गाणी लावली नाहीत. याबाबत मनसे पदाधिकारी यांनी विचारणा केली असता हॉलेट व्यवस्थापकाकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली.

त्यामुळे संतापलेल्या मनसेतील वाशी पदाधिकार्यांकडून हॅाटेल व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर हॅाटेल मालकांने याबाबत दिलगिरीचे पत्र पोस्ट करण्यात आले आहे. 

2. सावरकरांनी नेहमीच भारत तोडण्याचा प्रयत्न केला, भाजप-आरएसएस तेच करत आहेत: जयराम रमेश

सावरकरांनी नेहमीच भारताचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आणि भाजप-आरएसएसही तेच प्रयत्न करत आहेत. पण, आम्ही भारताला एकसंध करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले आहेत. भारत यात्रेदरम्यान मध्य प्रदेशच्या खारगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले जयराम रमेश.

फोटो स्रोत, @Jairam_Ramesh

फोटो कॅप्शन, भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले जयराम रमेश.

ते पुढे म्हणाले, “आर्थिक आव्हानं, समाजात होत असलेलं ध्रुवीकरण आणि राजकारणातील हुकूमशाही यामुळे देश तुटत चालला आहे. त्यामुळेच आम्ही भारत जोडो यात्रा काढली आहे.”

3. सचिन पायलट गद्दार आहे, त्यांना मुख्यमंत्री बनवता येणार नाही - अशोक गेहलोत

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना ‘गद्दार’ संबोधलं आणि त्यांना मुख्यमंत्री बनवता येणार नाही, असं ठणकावून सांगितलं आहे. द हिंदूनं ही बातमी दिलीय. गहलोत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पायलट यांनी म्हटलंय की, हे आरोप खोटे आणि निराधार आहेत.

अशोक गहलोत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अशोक गहलोत

पाली जिल्ह्यात एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गेहलोत म्हणाले की, राज्याचे काँग्रेस आमदार बंडखोर आणि गद्दार म्हणून ओळखल्या गेलेल्या व्यक्तीला कधीही स्वीकारणार नाहीत. “त्यांनी पक्षाचा विश्वासघात केला. ते गद्दार आहेच. त्यांच्याकडे 10 आमदारही नाहीत. लोक त्यांना कसे स्वीकारतील?”

4. आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करा – UIDAI

भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीने (UIDAI) राज्य सरकार आणि संस्थांना आधारचा दुरुपयोग रोखण्यासाठी भौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आधार स्वीकारण्यापूर्वी त्याची पडताळणी करण्यास सांगितलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीय. UIDAI ने म्हटलं आहे की, आधार धारकाच्या संमतीनंतर आधार क्रमांकाची पडताळणी करणे हे आधार लेटर, ई-आधार, आधार पीव्हीसी कार्ड आणि एम-आधार, म्हणजे आधारच्या कोणत्याही स्वरूपाची सत्यता स्थापित करण्यासाठी योग्य पाऊल आहे.

5. प्रताप सरनाईकांकडून तब्बल 75 तोळं सोनं तुळजाभवानीला अर्पण

शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी तुळजाभवानी देवीला 75 तोळं सोनं अर्पण केलं आहे. प्रताप सरनाईक आपल्या कुटुंबीयांसबत तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी तब्बल 37 लाख 50 हजार किंमतीचे 75 तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

प्रताप सरनाईक

फोटो स्रोत, FACEBOOK/PRATAP SARNAIK

फोटो कॅप्शन, प्रताप सरनाईक

“तुळजाभवानी आमची कुलदैवता आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नावेळी नवस केला होता. तसंच दोन्ही नातवंडांचं जायवळ करायचं होतं. नवस फेडण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. नवस केला होता तेव्हा 51 तोळ्यांच्या पादुका आणि 21 तोळ्याचा हार देईन असं म्हटलं होतं. मध्यंतरी करोना काळ आणि काही संकटांमुळे येता आलं नव्हतं. प्रसिद्धी किंवा प्रसारमाध्यमांसाठी हे काही केलेलं नाही. वर्षातून एकदा मी दर्शनासाठी येत असतो,” असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)