व्हिक्टर बाउट : अमेरिकेने रशियाबरोबर ‘एक्सचेंज’ केलेला हा गुन्हेगार कोण आहे?

व्हिक्टर बाउट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, व्हिक्टर बाउट
Published

हत्यारांच्या जगातील सर्वांत कुख्यात व्यापाऱ्यांपैकी एक असलेल्या व्हिक्टर बाउटला अमेरिकेतील तुरुंगातून बास्केटबॉल स्टार ब्रिटनी ग्रायनरच्या बदल्यात सोडून देण्यात आलं. ग्रायनरला या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात मॉस्कोमध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. तिच्या सामानातून गांजाचं तेल जप्त करण्यात आलं होतं, अशी वदंता होती. ती रशियात खेळून आपल्या देशात परतत होती. अमेरिकन माध्यमांमध्ये अनेक महिन्यांपासून एक चर्चा होत होती की, ग्रायरनरची सुटका निश्चित करण्यासाठी कैदी व्हिक्टर बाउटची अदलाबदली करण्यास अमेरिकन अधिकारी तयार आहेत.  

व्हिक्टर बाउट सोव्हिएत वायुदलाचा माजी अधिकारी आहे आणि तो इतका कुख्यात होता की, त्यांच्यावर हॉलिवूड चित्रपटही तयार झाला आहे आणि त्याला मृत्यूचा व्यापारी म्हटलं गेलं होतं. 

पण हा मृत्यूचा व्यापारी आहे कोण?

बाउटला 2010 मध्ये थायलंडमधून अमेरिकेत आणण्यात आलं होतं. त्याच्या दोन वर्षं आधी अमेरिकेच्या अंमली पदार्थविरोधी अंमलबजावणी (डीईए) एजन्सीने त्याच्याविरुद्ध एक स्टिंग ऑपरेशन केलं होतं. डीईएच्या एजंट्सनी कोलंबियाच्या रिव्होल्युशनरी आर्म्स फोर्सेसच्या (फार्क) अधिकाऱ्याचं सोंग घेऊन हत्यारांचा सौदा केला होता. आता हा गट समाप्त झाला आहे आणि त्या वेळी अमेरिकेने याला दहशतवादी संघटना म्हणून घोषित कोलं होतं. बाउटने दावा केला होता की, तो फक्त एक व्यापारी आहे. त्यांचा आंतरराष्ट्रीय वाहतुकीचा कायदेशीर व्यवसाय आहे. तो म्हणाला की, त्याच्यावर दक्षिण अमेरिकेतील बंडखोर गटांना हत्यारं पुरिवण्याचा खोटा आरोप लावण्यात आला आहे. पण न्यूयॉर्कमधील एका ज्युरीने बाउटच्या या कथनावर विश्वास ठेवला नव्हता. एप्रिल 2012 मध्ये बाउटला 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्यावर अमेरिकन नागरिक आणि अधिकाऱ्यांच्या हत्येचा कट रचण्याचा आरोप सिद्ध झाला होता. या व्यतिरिक्त दहशतवादी संघटनांना मदत करण्याचे आणि अँटि-एअरक्राफ्ट क्षेपणास्त्रं विकरण्याचे आरोपही त्याच्यावर सिद्ध झाले होते. तीन आठवडे सुरू असलेल्या या खटल्यात सांगण्यात आलं होतं की, बाउटला सांगितलं गेलं होतं की, जी हत्यारे तो विकत आहे त्याचा वापर कोलंबियाच्या अधिकाऱ्यांसोबत काम करणाऱ्या अमेरिकी वैमानिकांना मारण्यासाठी करण्यात येणार आहे. फिर्यादीच्या म्हणणण्यानुसार त्यावर बाउट उत्तरला होता, "आमचा शत्रू एकच होता." बाउटचा जन्म ताजिकिस्तानात झाला आणि तो रशियाचा नागरिक आहे. सोव्हिएत संघाचं पतन झाल्यावर त्याने 1990 च्या दशकात हवाई वाहतूक क्षेत्रात त्याचं करियर सुरू केलं. 2007 मध्ये प्रकाशित झालेल्या मर्चंट ऑफ डेथ या पुस्तकात दावा करण्यात आला होता की, बाउटने त्याचा व्यवसाय 1990च्या दशकात सोव्हिएत संघाच्या पतनादरम्यान विमानतळांवर सोडून देण्यात आलेल्या विमानांच्या बळावर स्थापित केला होता. हे पुस्तक सुरक्षा तज्ज्ञ डगलर फारा आणि स्टिफन ब्राउन यांनी लिहिलं होतं.

व्हिक्टर बाउट

फोटो स्रोत, Getty Images

त्या कालखंडात सोव्हित संघाची मजबूत अँटोनोफ आणि इल्यूशिन विमानं वैमानिक दलाच्या सदस्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध होती आणि त्यांचा वापर जगभरातील विमानतळांवर सामान पोहोचविण्यासाठी केला जाऊ शकत होता. बाउटला जेव्हा शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा त्याचं वय 45 वर्षं होतं. अनेक कंपन्यांच्या माध्यमातून त्याने युद्धग्रस्त आफ्रिकेत शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू केल्याचं सांगितलं जातं. 2012 मध्ये, चार्ल्स टेलरला युद्ध गुन्ह्यांसाठी आणि सिएरा लिओनच्या गृहयुद्धात युद्ध गुन्ह्यांना मदत आणि प्रोत्साहन देण्यासाठी दोषी ठरविण्यात आले. संयुक्त राष्ट्रांकडील दस्तऐवजांनुसार "बाउट एक व्यापारी आहे, तो शस्त्रास्त्रं आणि खनिजांचा मालवाहतूकदार आणि व्यापारी आहे. त्याने माजी राष्ट्राध्यक्ष टेलर यांच्या सत्तेला समर्थन दिलं होतं, जेणेकरून सिएरा लिओनमध्ये अराजक माजवता येईल आणि तेथील हिऱ्यांपर्यंत अवैध माध्यमातून पोहोचून ते ताब्यात घेता येतील. आखाती देशांतील माध्यमांमधील अहवालांनुसार बाउटने अल-कायदा आणि तालिबानलाही शस्त्रास्त्रे पुरविली होती. अंगोलाच्या गृहयुद्धात त्याने दोन्ही पक्षांना हत्यारं पुरविली होती, असा आरोप आहे. या व्यतिरिक्त त्याने सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, लिबिया आणि दक्षिणी सुदानच्या सरकारांना आणि मिलिशिया कमांडरांनाही शस्त्रास्त्रं पुरविली होती.

2009 मध्ये ब्रिटनच्या टीव्ही चॅनल-4ला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने अल कायदा आणि तालिबानला हत्यारे पुरविल्याच्या आरोपाचं खंडन केलं होतं. पण, 1990 च्या दशकात त्याने अफगाणिस्तानला शस्त्रास्त्रं पुरविली होती, हे त्यानं मान्य केले होतं. या शस्त्रास्त्रांचा वापर तालिबानविरुद्ध लढणाऱ्या कमांडरांनी केला होता. रवांडामधील शिरकाणानंतर त्याने फ्रान्स सरकारला तेथे सामान पोहचविण्यास मदत केली होती. त्याने संयुक्त राष्ट्रांच्या शांतिदलांनासुद्धा रवांडामध्ये पोहोचविल्याचा दावा केला होता. 2000च्या दशकात कायदेशीर एजन्सी त्यांच्या मागे लागल्या होत्या. बेल्जिअमच्या अधिकाऱ्यांनी 2002 मध्ये त्याच्या नावे अटक वॉरंट जारी केलं. तेव्हा त्यांनी तो देश सोडला. बाउटने अनेक नावं धारण केली होती आणि तोतया नावाने तो प्रवास करत असे. तो संयुक्त अरब अमिराती आणि दक्षिण आफ्रिकेत येत असे आणि 2003 मध्ये रशियात तो सर्वांसमोर आला होता. याच वर्षी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री पीटर हाइन यांनी त्याचं मृत्यूचा व्यापारी असं नामकरण केलं होतं. 2003 मध्ये बाउटबद्दल लिहिला गेलेला एक रिपोर्ट वाचून पीटर हाइन म्हणाले होते, "बाउट हा मृत्यूचा व्यापारी आहे, ज्याची शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याच्या मार्गांवर आणि ती घेऊन जाणाऱ्या विमानांवर एकाधिकारशाही आहे. तो पूर्व युरोप, मुख्यतः बल्गेरिया, माल्दोवा आणि युक्रेनमधून लिबेरिया आणि अंगोलपर्यंत शस्त्रास्त्रं पुरवतो."

व्हिक्टर बाउट

फोटो स्रोत, Getty Images

"संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं की, बाउट हा अशा नेटवर्कचं केंद्र आहे जे शस्त्रास्त्रांचे व्यापारी, हिऱ्यांचे व्यापारी आणि युद्ध सुरू ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या इतर लोकांनी मिळून तयार झालेलं आहे. 2011 मध्ये दोषी सिद्ध करण्यात आल्यापासून रशिया बाउटच्या सुटकेची मागणी करत आला आहे. अमेरिका 2000च्या दशकात बाउटच्या मागे लागली होती, सन 2006 मध्ये त्याच्या संपत्तीवर टाच आणली होती. पण बाउटवर खटला चालविण्यासाठी अमेरिकेत एकही कायदा नव्हता. अमेरिकेतील एजंट वाट पाहत होते. 2008 मध्ये अमेरिकन एजंट कोलिंबियातील बंडखोर गट असलेल्या फार्कशी संबंधित असलेले खरेदीदार होऊन एका माजी सहकाऱ्याच्या माध्यमातून बाउटला भेटले. अमेरिकी अधिकाऱ्यांनी खरेदीदार होऊन बाउटशी शस्त्रास्त्रांचा सौदा केल्याच्या काही वेळानंतर थायलंडच्या पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर त्याला अमेरिकेत आणण्याची अत्यंत वेळखाऊ कायदेशीर प्रकिया सुरू झाली. बाउटने दावा केला होता की, अमेरिकेत त्याच्यावर दाखल केलेला खटला राजकारणाचा भाग आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोफ म्हणाले होते की, रशिया त्याला आपल्या देशात परत घेऊन जाण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. लाव्हरोफने बाउटला अमेरिकेत पाठविण्याच्या थायलंड न्यायालयाच्या निकालाला अनुचित आणि राजकारणाचा भाग असल्याचं म्हटलं होतं. 2005 मध्ये लॉर्ड ऑफ द वॉर नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बाउटच्या आयुष्यावर आधारित होता. या चित्रपटातही खलनायक अखेर न्यायाच्या कचाट्यातून सुटतो. असं वाटत होतं की, बाउटसोबत असं होणार नाही आणि त्याला शिक्षा भोगावी लागेल. पण तुरुंगात 12 वर्षं काढल्यानंतर तो आता घरी परतणार आहे, जिथे स्वातंत्र्य त्याची वाट पाहत आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)