पाकिस्तानातील रब्बानी बंधू 20 वर्षानंतर अमेरिकन कैदेतून सुटले, अतोनात छळाचा आरोप

अमेरिकन नौदलाचे तुरुंग, ग्वांतानामो बे या ठिकाणी गेल्या 20 वर्षांपासून कैदेत असलेल्या दोन कैद्यांची अमेरिकेनी सुटका केली आहे.
रब्बानी बंधू म्हणून ओळखले जाणाऱ्या या कैद्यांवरील सर्व आरोप मुक्त करण्यात आले आहेत.
अब्दुल आणि मोहम्मद अहमद रब्बानी अशी या दोन भावंडांची नावे आहेत. या दोघांना 2002 मध्ये अटक करण्यात आली होती.
अमेरिकेचे संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनचे म्हणणे होते की अब्दुल रब्बानी हा अल कायदासाठी एक सेफ हाऊस चालवत होता. तर मोहम्मद अहमद हा अल कायदाच्या नेत्यांच्या दौऱ्यांचे नियोजन करत असे तसेच निधीची व्यवस्था देखील तो करत असे.
रब्बानी बंधूंनी म्हटले आहे की CIA च्या अधिकाऱ्यांनी त्यांना ग्वांतानामो बे'ला जाण्याआधीपासूनच छळण्यास सुरुवात केली.
ग्वांतानामो बे हे तुरुंग क्युबामध्ये आहे. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ड डब्ल्यू बुश यांनी हे तुरुंग बनवले होते.
न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर या हल्ल्याशी संबंधित संशयित कट्टरतावाद्यांना ठेवण्यासाठी या तुरुंगाची स्थापना करण्यात आली होती. अमेरिकेच्या नौदलातील तळावर हे तुरुंग उभारण्यात आले आहे.
आतंकवादाविरोधात लढाईच्या नावाखाली बनले अत्याचाराचे प्रतीक
आतंकवादाविरोधात लढण्याच्या नावाखाली हे तुरुंग अत्याचाराचे प्रतीक बनले आहे. या ठिकाणी चौकशीच्या वेळेत कैद्यांनी अनंत यातनांना सामोरे जावे लागते.
यामुळेच या तुरुंगाला 'कुख्यात तुरुंग' देखील म्हटलं जातं.

टीकाकारांचे म्हणणे आहे की याठिकाणी कैद्यांना कुठल्याही सुनावणीशिवाय अनेक दिवसांसाठी डांबून ठेवलं जातं आणि त्यांची छळवणूक केली जाते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी असा विश्वास दर्शवला आहे की हे तुरुंग लवकरच बंद केले जाणार आहे. या ठिकाणी सध्या 32 कैदी आहेत. 2003 मध्ये या ठिकाणी 680 कैदी होते.
'हे तुरुंग बंद करण्याच्या दृष्टीने अमेरिका जी पावलं उचलत आहे त्याला पाकिस्तान आणि इतर सहकाऱ्यांकडून सहयोग मिळत आहे. त्यांचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत', असे अमेरिकेनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
रब्बानी बंधूंसोबत काय झाले होते?
रब्बानी बंधूंना पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीजने सप्टेंबर 2002 मध्ये अटक केली होती. त्यानंतर त्यांना CIA कडे सोपवण्यात आले.
अफगाणिस्तानमध्ये CIAच्या डिटेंशन कॅंपमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. नंतर त्यांना ग्वांतानामो बे मध्ये स्थलांतरित करण्यात आले होते.

अहमद रब्बानीने 2013 मध्ये आपल्या अटकेच्या विरोधात उपोषण सुरू केले होते.
थोड्या थोड्या अवकाशानंतर ते दोघे उपोषण करत असत. सर्व काळ जर जोडला तर त्यांनी अंदाजे सात वर्षं उपोषण केल्याचं दिसतं.
या काळात ते न्यूट्रिशन सप्लिमेंटवर जिवंत राहिले. त्यांना ते कधी-कधी बळजबरी दिले जात असे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























