'मुलगा दारू पिऊन मारायचा म्हणून हाकललं, पण कुठे भटकत बसेल विचाराने परत बोलावलं'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, आदर्श राठोड
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
- Published
“कुटुंबात असा एकही सदस्य नाही ज्याला त्यानं मारहाण केली नसेल. एकदा त्यानं आईला एवढी मारहाण केली की तिच्या हाताचं हाड फ्रॅक्चर झालं. मी थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं माझ्या डोक्यावर काठीनं वार केला."
शिमला जवळील गावात राहणारे धर्मवीर (नाव बदललं आहे) सांगतात की, त्यांचा धाकटा मुलगा अनेकदा दारू पिऊन हिंसक होतो.
धर्मवीर सांगतात की,"पूर्वी तो बरा होता. पण कॉलेजमध्ये गेल्यावर तो बदलू लागला.अनेकदा दारू पिऊन घरी परतायचा आणि आम्ही आक्षेप घेतला तर गोंधळ घालायचा. एकदा तर त्यानं आईकडे पैसे मागितले,तिनं देण्यास नकार दिल्यावर त्याने तिला धक्का देत खाली पाडलं. मला हे कळताच मी त्याला घर सोडून जायला सांगितलं."
मात्र नातेवाईकाच्या घरी राहायला गेलेल्या मुलाला धर्मवीर यांनी दोन दिवसांनीच परत बोलावलं.
ते सांगतात,"मी विचार केला की बिचारा कुठे भटकत राहिल. काही महिने सर्व सुरळीत चाललं, पण नंतर परिस्थितीनं आणखीन वाईट वळण घेतलं. दारूच्या नशेत तो आम्हाला मारहाण करू लागला. लाजेनं आम्ही गप्प बसलो. त्यानं ना शिक्षण पूर्ण केलं ना नोकरी केली.
"त्याची इतकी बदनामी झाली की त्यानं लग्नही केलं नाही.आता तो 45 वर्षांचा आहे आणि माझ्या पेन्शनवर आश्रित आहे.त्याच्या या वागण्याला कंटाळून मोठा मुलगा आणि सून वेगळे राहू लागले."
"आता आमचं वय झालं आहे,आमच्या नंतर त्याचं काय होईल,कोणास ठाऊक."
धर्मवीर यांच्यासारखे अनेक पालक ज्यांना त्यांच्या मुलांकडून सतत होणार ताण, छळ आणि शोषण यातून मुक्ती हवी आहे.
त्यांना माहीत आहे की, हे जीवावर बेतलेलं नातं तोडणं आवश्यक आहे. परंतु इच्छा असूनही ते विभक्त होऊ शकत नाहीत
अतूट बंधन
आई वडील आणि मुलांचं नातं हे प्रेमाचं अतूट नातं मानलं जातं जे प्रत्येक सुख -दुःखात टिकून असतं. पण काही पालकांना हे नातं टिकवणं कठीण जातं.
असा टप्पा काहींच्या आयुष्यात येतो, जेव्हा ते जड अंतःकारणानं हे नातं तोडायचं ठरवतात. मुलांनी त्यांच्या आई वडिलांशी बोलणं बंद केलं, हे ऐकायला आजकाल सामान्य झालं आहे. आई-वडील देखील मुलांशी बोलणं बंद करतात, पण काही संशोधनं असं दर्शवतात की, अशी प्रकरणं कमी समोर येताहेत.

फोटो स्रोत, Getty Images
'स्टॅन्ड अलोन' या ब्रिटिश सामाजिक संस्थेनं 2015 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार मुलांपासून विभक्त झालेल्या पालकांपैकी केवळ पाच टक्के पालकांनीच स्वतःला वेगळं करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणं त्यांच्यासाठी खूप कठीण आणि वेदनादायक असल्याचं या पालकांनी सांगितलं. या निर्णयामुळं त्यांना एकटेपणा आणि स्वतःची लाज ही वाटत होती.
लूसी ब्लॅक या वेस्ट ऑफ इंग्लंड, ब्रिस्टल विद्यापीठात मानसशस्त्राच्या लेक्चरर आणि एस्ट्रेंजमेंट तज्ज्ञ आहेत.
त्या सांगतात,"संशोधन आणि सांस्कृतिक मुख्य प्रवाह,या दोन्ही बाबतीत मुलांशी संबंध तोडणारे पालक दुर्मिळ आहेत, कारण हा वर्जित विषय आहे,आणि लोकलाजेच्या भीतीनं आपल्या भावना व्यक्त करत नाहीत."
जबाबदारीचं ओझं
ज्या कारणांमुळं आई-वडील आपल्या मुलांशी नातं तोडतात,त्याचं कारणामुळं मुलं ही आई वडिलांशी नातं तोडतात. जसे कौटुंबिक वाद,अंमली पदार्थांचं व्यसन, विचारसरणीतील फरक आणि वाईट वागणूक इत्यादी, पण मुलांच्या तुलनेत पालकांसाठी हे नातं तोंडण सोपं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मानसशास्रज्ञ राजेश पांडे हे लखनौमध्ये सुमारे दोन दशकं समुपदेशन करतात, ते याची कारणं सांगतात.
"पालकांनी मुलांवर बिनशर्त प्रेम करणं आणि त्यांची काळजी घेणं सामाजिकदृष्ट्या अपेक्षित आहे."
ते सांगतात " आई-वडील मुलांना जन्म देतात, त्यांना वाढवतात.मानसिकदृष्ट्या त्यांना असं वाटत की मुलाला पुढे नेण्याची जबाबदारी आपलीच आहे. जर मुलाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर मुलांना पालकांकडून काहींना काही मिळालेलं असतं, त्यांनी मात्र दिलेलं नसतं.अशा परिस्थितीत आई-वडिलांइतकी जवळीक मुलांना साधता येत नाही"
" आई-वडील त्यांच्या मुलांमध्ये त्यांचं भविष्य पाहतात. जेव्हा मुलं त्यांच्या भविष्याकडे पाहतात तेव्हा त्यांचं प्राधान्य वेगळं असतं-जसं करियर,पैसा,यश."
आई-वडीलही त्यांच्या प्राधान्यक्रमात असतात, मात्र पहिल्या क्रमांकावर नसतात. पण याउलट आई-वडील आपल्या मुलांनां प्रथम प्राधान्य देतात."
कदाचित याचं कारणानं मुलं त्रास देतात, तरीही दुखावत असताना आई वडील त्यांना सोडू शकतं नाही.
हिंसक वागणूक देऊनही धर्मवीर आणि त्यांची पत्नी आपल्या मुलासोबत राहतात. ते म्हणाले की, अनेकदा त्यांनी वेगळं होऊन मोठ्या मुलांकडे जाण्याचा विचार केला पण धाकट्या मुलाचं काय होईल या विचारानं आम्ही गेलो नाहीत .
जेनिफर स्टोरी या ब्रिटनच्या केंट युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्राच्या लेक्चरर आहेत. त्यांनी व्यक्तींकडून कडून केल्या जाणाऱ्या हिंसेविषयी अभ्यास केला आहे.
त्या सांगतात की, "मला अशी एकही केस आठवत नाही ज्यात आई वडिलांना त्याच्या मुलांसोबत नातं तोडायचं असेलं. छळ आणि शोषण थांबावं, पण नातं टिकून राहावं असं जवळजवळ प्रत्येकालाच वाटतं."

फोटो स्रोत, Getty Images
अशा परिस्थितीत पालक, मुलं आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना वास्तव स्वीकारणं सोपं नसतं.
लूसी ब्लेक सांगतात,"आम्ही आई वडिलांकडून खूप अपेक्षा ठेवतो.अगदी देवासारख्या, त्यांनी बिनशर्त प्रेम करत राहावं अशी आमची इच्छा असते." पण यामुळं अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.आम्ही देऊ ती वागणूक त्यांनी मान्य करावी अशी अपेक्षा असते, अगदी मानसिक आणि आर्थिक शोषणही."
सामाजिक व्यवस्था
अमॅण्डा हॉल्ट यांनी किशोरवयीन मुलांकडून आई-वडिलांना होणाऱ्या अत्याचारवर "अडॉलसेंट टू पॅरेंट अब्युज: करंट अंडरस्टँडिंग इन रिसर्च,पॉलिसी अँड प्रॅक्टिस हे पुस्तक लिहलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्या सांगतात की,असं मानलं जातं की,"आई-वडील हे प्रभावशाली असतात,पण मुलं जसजशी मोठी होतात.परिस्थिती बदलू लागते.मूलंही आपल्या आई वडिलांचा छळ करू शकतात.एका मर्यादेच्या पलीकडे जाऊन हा छळ झाल्यास नातं तुटू शकतं.पण आई-वडील आपल्या मुलांशी नातं तोडण्याचा निर्णय घेताना कचरतात."
अमाण्डा होल्टच्या मते, पालकांनी त्याच्या मुलांशी जैविक,कायदेशीर आणि सामाजिक बंध असतात.बोलणं बंद केलं तरी हे बंध कायम राहतात.त्यांना तोडणं फार कठीण आहे.
मानसशास्त्रज्ञ राजेश पांडे सांगतात की,"भारतात कदाचित एक लाखात फक्त एक किंवा दोन पालक असतील जे मुलापासून वेगळं होऊ शकतील.कारण आपल्या संस्कृतीत आणि समाजात याला पाप मानलं जातं.आमची सामाजिक रचना हे मान्य करत नाही."
सकारात्मक वातावरण आवश्यक
अनेकदा मुलांच्या यश-अपयशाचा संबंध त्याच्या पालकांशी असतो.अशा परिस्थितीत,अशा मुलांशी संबंध तोडण्याची संधी असल्यास,त्यांना लाज वाटते आणि ते स्वतःला दोषी मानतात.
यामुळं ते एकाकीपणाचे बळी ठरू शकतात आणि त्यांच्या मित्रांपासून आणि नातेवाईकांपासून दूर राहू शकतात.
लूसी ब्लेक म्हणतात,"मुलांपासून वेगळे राहिल्यानं त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंवर परिणाम होऊ शकतो.नातं तोडण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या पालकांबद्दल समजूतदारपणा आणि सहानुभूती दाखवणारे फार कमी लोक असतात.हे एक वेगळ्या प्रकारचं दुःख आहे कारण त्यांना असं वाटू शकतं की त्यांचं जीवन रिकामं आणि निरर्थक झाले आहे.परिणामी,तो इतर कुटुंबातील सदस्यांशी आणि मित्रांशीही संबंध तोडू शकतो."
अशा नात्यातून बाहेर पडणाऱ्या पालकांना एकटं वाटू नये,असं वातावरण समाजात निर्माण करण गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.सण आणि वाढदिवसासारख्या विशेष प्रसंगी त्यांना एकटं वाटू नये.'स्टॅन्ड अलोन' संशोधनात असं म्हटलं आहे की आजच्या काळात वेगळे राहणारे लोक जास्त भावनिक असतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.
























