अतिविषारी खुळखुळ्या सापाचा अमेरिकेतल्या घरांमध्ये धुडगूस, नेमकं काय घडलं?

खुळखुळ्या साप

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ख्रिस बरानिऊक
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

सापाविषयी माणसाच्या मनात नेहमीच भीती असते. त्यामुळे जेव्हाही साप दिसतो तेव्हा त्याला मारण्याचाच प्रयत्न केला जातो. जगभरातील माणसांमध्ये ही समान भावना असते.

अमेरिकेतील अरिझोनामध्ये मानवी वस्त्यांचा विस्तार होत असल्यामुळे सापांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होतो आहे. त्यामुळे ते घराच्या अंगणात, मागच्या बाजूला शिरतात. यातून सापांविषयी चिंता निर्माण होते आहे. मात्र काही सर्पतज्ज्ञ आणि संस्था सापांना न मारता पकडून इतरत्र हलवत आहेत. या संदर्भात विस्तारानं जाणून घेऊया.

साप आणि मानवातील संघर्ष वाढत चालला आहे. काहीजणांना घरात साप आढळला की ते त्याला मारून टाकतात. मात्र यावर काही अधिक चांगला मार्ग आहे का?

त्यांनी रिनाकला विचारलं, ती 'खुळखुळ्या'साठीच्या हॉटलाईन कॉलवर होती. त्यांनी रिनाकला विचारलं की, त्यांच्या घराच्या मागच्या बाजूला 3 फूट लांबीचा (1 मीटर) खुळखुळ्या साप आहे का?

तसंच त्याच्या शेपटीवर पांढरे पट्टे आहेत का? (रॅटलस्नेक किंवा खुळखुळ्या हा एक विषारी साप आहे, जो शेपटी हलवून जोरजोरात आवाज काढतो) असंही विचारलं.

'तो तिथे आहे', असं रिनाकने सांगितलं. ती खिडकीतून बाहेर सापाकडे पाहत होती. सापाकडे पाहूनच कळत होतं की, तो एक विषारी वेस्टर्न डायमंडबॅक रॅटलस्नेक म्हणजे खुळखुळ्या होता. तो रिनाकच्या शेताच्या कुंपणात शिरला होता.

रिनाकला सांगण्यात आलं होतं की, सापाला पकडून दुसरीकडे घेऊन जाणारी व्यक्ती लवकरच तिथे येईल.

रिनाक वाट पाहत होती. सर्पदंश प्राणघातक ठरू शकतो, मात्र तरीदेखील तिला सापाची भीती वाटत नव्हती. ती तिच्या दोन चिनी शार-पेई कुत्र्यांसोबत घरात सुरक्षित होती.

रिनाक, अमेरिकेतील अरिझोना राज्यातील स्कॉट्सडेलजवळ रिओ व्हर्डे पर्वताच्या पायथ्याशी राहते. तिला हे माहिती आहे की, कधीकधी साप तिच्या घराच्या कंपाऊंडमध्ये येऊ शकतात. कारण तिचं घर वाळवंटाजवळ आहे.

मात्र सापांनी तिच्या घराच्या परिसरात फार काळ राहू नये असं रिनाकला वाटतं. त्यामागचं कारण म्हणजे तिचे घोडे. सापाकडे पाहण्यासाठी हे घोडे जेव्हा जमिनीवर त्यांचं डोक घासतात, तेव्हा साप त्यांच्या नाकावर दंश करू शकतो.

"त्यांच्या नाकाला सूज आली, तर ते श्वास घेऊ शकत नाहीत," असं रिनाकने म्हटलं.

साप आणि हवामानातील बदल

अमेरिकेत दरवर्षी 7 ते 8 हजार लोकांना विषारी साप चावतात. पाळीव प्राण्यांना सर्पदंश झाल्यामुळे मृत्यू होण्याचा धोका त्याहूनही अधिक असतो.

खुळखुळ्या ही अमेरिकेतील सर्वांत विषारी प्रजाती आहे. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की 2019 मध्ये 11,138 जणांना सर्पदंश झाला होता. यापैकी निम्म्याहून अधिक लोकांना दंश करणाऱ्या सापाची प्रजाती ओळखता आली होती. यामध्ये खुळखुळ्याने दंश केलेल्यांची संख्या अधिक होती.

यूएस सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शनच्या अहवालानुसार, सर्पदंश झालेल्या 10-44 टक्के लोकांना कायमस्वरुपी दुखापत होते. उदाहरणार्थ- बोट गमावणं.

बीबीसीशी बोलताना तज्ज्ञांनी सांगितलं की, रिअल इस्टेट डेव्हलपर्स म्हणजे बांधकाम व्यावसायिक अपार्टमेंट किंवा इमारती बांधण्यासाठी सापांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण करत आहेत. परिणामी मानव-सर्प संघर्षाची शक्यता वाढते.

खुळखुळ्या साप

फोटो स्रोत, Getty Images

हवामान बदलामुळे देखील ही समस्या वाढू शकते. त्यामुळे काही सापांचा अधिवास नष्ट होतो. उष्ण दिवसांमध्ये सापदेखील थंड ठिकाणी जाण्याची शक्यता असते.

स्थानिक इकोसिस्टम किंवा पर्यावरणात (निसर्ग आणि वन्यजीवांचं संतुलन) साप अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. तज्ज्ञ म्हणतात की, आपल्या घरात किंवा घराच्या परिसरात येणाऱ्या प्रत्येक सापाला मारणं हे केवळ अनैतिकच नाही, तर त्यामुळे शेवटी मानवासाठीच समस्या निर्माण होऊ शकतात.

काही वेळा, साप मारण्याशिवाय पर्याय नसतो. उदाहरणार्थ- जेव्हा साप स्थानिक वन्यजीवांवर अधिक हल्ला करू लागतात, तेव्हा त्यांना मारावं लागतं. अशा आक्रमक सापांना पकडणं आणि त्यांना मारणं यामुळे पर्यावरणाचं संतुलन राखण्यास मदत होऊ शकते.

खुळखुळ्याच्या अधिवासात मानवी शिरकाव

अरिझोना आणि अमेरिकेच्या इतर भागांमध्ये काही स्वयंसेवी संस्था स्थानिक सापांना जिवंत पकडण्यासाठी आणि त्यांना इतरत्र हलवण्यासाठी काम करत आहेत. अरिझोनातील गृहनिर्माण प्रकल्पांचा विस्तार वाळवंटी भागात झाला आहे.

त्यामुळे झुडुपांच्या जंगलांची जागा निवासी इमारतींनी घेतली आहे. त्यामुळे आता लोक अशा ठिकाणी राहत आहेत जिथे खुळखुळ्या सहज आढळतात.

'रॅटलस्नेक सोल्युशन्स' नावाची एक संस्था किंवा फर्म आहे. ही फर्म या समस्येवर उपाय शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आहे.

जेव्हा एखाद्या भागात साप आढळतात, जिथे त्यांच्यामुळे मानवी जीवाला किंवा पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, तेव्हा ही संस्था त्या सापांना पकडून त्यांना इतरत्र हलवते.

या संस्थेनुसार, डोंगराळ भागातील निवासी वस्त्यांमधून खुळखुळ्या हलवण्याच्या विनंत्यांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या एप्रिलमध्ये जेव्हा क्रिस्टा रिनाकला तिच्या शेतात इस्टर्न डायमंडबॅक साप दिसला, तेव्हा तिनं 'रॅटलस्नेक सोल्युशन्स' या फर्मला फोन केला. त्यानंतर फर्मचा एक सदस्य लगेचच क्रिस्टाच्या शेतात आला.

खुळखुळ्या सापाला पकडताना

फोटो स्रोत, Rattlesnake Solutions

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्या सर्पमित्रानं जेव्हा लांब 'स्नेक टाँग्स' म्हणजे सापाला पकडण्याचा रॉड वापरून सापाला हळुवारपणे उचललं आणि सापाला एका झाकण असलेल्या एका मोठ्या डब्यात ठेवलं, तेव्हा क्रिस्टा रीनाक ते पाहत होती.

सापाला श्वास घेता यावा, यासाठी त्या डब्याला बारीक भोकं होती. सर्पमित्रानं तो साप वाळवंटात सोडला. तिथे त्या सापाला लपण्यासाठी असंख्य बिळं होती आणि शिकार करण्यासाठी अनेक उंदीर होते.

तिथे दिव्यांचा प्रखर प्रकाश नाही. तिथे त्याच्या संगतीला आकाशातील हजारो तारे आहेत.

सर्वकाही व्यवस्थित झाल्यामुळे रिनाकला आनंद झाला होता. ती म्हणाली, "प्राणी त्यांचा अधिवास सोडून इकडे आल्यामुळे त्यांना मारून टाकावं, असं मला वाटत नाही."

जे लोक खुळखुळ्यांना इतरत्र हलवतात ते असं का करतात, यामागे आणखी एक कारण आहे. या सापांचे असंख्य फायदे आहेत.

उदाहरणार्थ ते भरपूर उंदीर खातात. त्यामुळे उंदरांची संख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. शेतकऱ्यांसाठी हे खूपच फायद्याचं आहे. कारण शेतात खूप जास्त उंदीर असतील तर धान्याची नासाडी होईल.

ऑस्ट्रेलियातील एका अभ्यासाचा अंदाज आहे की, ईस्टर्न ब्राऊन स्नेक दरवर्षी एक चौरस किलोमीटरच्या शेतजमिनीतून हजारो उंदीर खातात. उत्तर अमेरिकेतील खुळखुळ्या पर्यावरणात अशाच प्रकारचं योगदान देतात.

सापांमुळे होणारे फायदे

साप नवीन वनस्पती रुजविण्यामध्येही मदत करतात. उंदरांच्या तोंडात अनेकदा बिया असतात. खुळखुळ्या उंदीर खातात, त्यामुळे काहीवेळा नकळतपणे त्यांच्या शरीरात बिया जातात आणि त्या बिया शरीरातून बाहेर पडतात, तेव्हा त्या रुजायला मदत होते.

2018 मध्ये अमेरिकेतील संशोधकांनी ही प्रक्रिया स्पष्ट करणारा एका अभ्यास प्रकाशित केला होता.

खुळखुळ्या साप

फोटो स्रोत, Getty Images

खुळखुळ्याच्या शिकार करण्याच्या क्षमतेमुळे 'लाइम डिसीज' नावाच्या आजाराचं प्रमाणदेखील कमी होऊ शकतं. हा आजार गोचीडसारख्या कीटकामुळे पसरतो किंवा संक्रमित होतो.

कारण, ज्या छोट्या सस्तन प्राण्यांच्या शरीरावर गोचीड चिकटून असतात, त्यांना साप खातात.

मात्र इतके फायदे असूनदेखील सध्या सापाच्या काही प्रजाती नामशेष होण्याचा धोका आहे.

उदाहरणार्थ, ईस्टर्न डायमंडबॅक रॅटलस्नेकची संख्या कमी होते आहे. अरिझोना ब्लॅक रॅटलस्नेक ही सापाची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

2022 च्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की, हवामान बदलामुळे तापमानात वाढ होते आहे. त्यामुळे 2040 पर्यंत अमेरिकेतील खुळखुळ्याच्या 71 टक्के प्रजातींसाठी उपलब्ध असलेल्या अनुकूल अधिवासात घट होऊ शकते.

सापांना समजून घेत त्यांचं अस्तित्व स्वीकारणं

ब्रायन ह्युजेस यांनी जेव्हा पहिल्यांदा साप धरला तेव्हा ते पाच वर्षांचे होते. उभयचर आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करणाऱ्या आणि त्यांची काळजी घेणाऱ्या एका स्थानिक संस्थेच्या, हेर्पेटोलॉजिकल सोसायटीच्या सदस्यांनी एका निसर्ग केंद्रात एक स्कार्लेट किंग साप आणला होता.

त्यावेळेस ऑरेगॉनमध्ये ब्रायन जिथे राहत होते तिथून ते केंद्र जवळ होतं. तो साप लहान होता, मात्र अत्यंत सुंदर होता.

ब्रायन ह्युजेस सापाचे गडद लाल, पिवळसर आणि काळ्या रंगाचे पट्टे पाहून आश्चर्यचकित झाले. तो साप इतका चमकदार आणि इतका स्वच्छ होता की, तो जवळपास ओला असल्यासारखा वाटत होता.

"ते खूपच थक्क करणारं होतं. त्या क्षणी जेव्हा मी तो प्राणी माझ्या हातात धरला, तेव्हा एक अवर्णनीय भावना निर्माण झाली होती," असं ब्रायन त्या प्रसंगाची आठवण करताना सांगतात. खरंतर त्या प्रसंगाचं वर्णन करण्यासाठी त्यांना शब्द अपुरे पडतात.

त्यानंतर ब्रायन ह्युजेस यांनी ग्रंथालयात सापाविषयी असणारं प्रत्येक पुस्तक वाचलं. लवकरच ते जंगलात साप शोधू लागला. ते म्हणतात की, ते एखादा खजिना शोधण्यासारखं होतं.

2008 च्या जागतिक वित्तीय संकटानंतर ब्रायन यांना त्यांची मार्केटिंगची नोकरी गमावावी लागली. त्यानंतर त्यांनी त्यांना आवडत असलेल्या सापाच्या क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला.

ब्रायनने जरी औपचारिक प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं, तरीदेखील त्यांनी हेर्पेटोलॉजिकल सोसायटीसाठी काही काळ स्वयंसेवक म्हणून काम केलं. ही संस्था एखाद्या घरात, अंगणात किंवा गॅरेजमध्ये शिरलेल्या सापांना पकडून इतरत्र हलवत असे.

या गोष्टीसाठी इतकी जास्त मागणी होती की, ब्रायन ह्युजेस यांनी एक व्यवसाय म्हणून याच प्रकारची सेवा सुरू करण्याचं ठरवलं. त्यांनी एक लोगो तयार केला आणि एक वेबसाईट सुरू केली. जवळपास एका रात्रीतच 'रॅटलस्नेक सोल्युशन्स'चा जन्म झाला.

तेव्हापासून, ब्रायन ह्युजेस आणि अरिझोनातील त्यांच्या सहकाऱ्यांनी हजारो सापांना पकडून इतरत्र हलवलं आहे किंवा स्थलांतरित केलं आहे.

ते म्हणतात की, त्यांनी पकडून इतरत्र हलवलेल्या सापांची एकूण संख्या जवळपास 20,000 आहे. म्हणजेच दरवर्षी जवळपास 1,500 साप ते पकडतात आणि इतरत्र सोडून देतात.

खुळखुळ्या साप

फोटो स्रोत, Getty Images

ब्रायन ह्युजेस यांनी खुळखुळ्यावरील अनेक वैज्ञानिक शोधनिबंधांचं सह-लेखन देखील केलं आहे.

प्रत्येक सापाला इतरत्र हलवण्यासाठी घरमालकाला जवळपास 150 डॉलर्सचा (113 पौंड) खर्च येतो. साप पकडून तो इतरत्र सोडण्यासाठी साधारणपणे दोन तासांचा कालावधी लागतो.

अरिझोनामध्ये विषारी खुळखुळ्यासह विविध प्रकारचे साप आढळतात. यातील लक्षात घेण्यासारखे साप म्हणजे वेस्टर्न डायमंड बॅक्स आणि बिनविषरी सोनोरन ग्रॉफर्स. दोन्ही सापांची वाढ 6 फुटांपर्यंत (2 मीटर) होऊ शकते.

त्यामुळे ते जर एखाद्या घराच्या अंगणात किंवा मागच्या बाजूला फिरत असतील तर सहजपणे लक्षात येतात.

ब्रायन ह्युजेस म्हणाले की, ते आणि त्यांचे सहकारी नेहमीच, त्यांना पकडण्यासाठी बोलावलेल्या सापांची माहिती देण्याचा प्रयत्न करतात. सापांबद्दल घरमालकांना माहिती देण्याची किंवा विषारी सांपाना कसं हाताळावं याचा सल्ला देण्याची ही एक महत्त्वाची संधी असते.

रॅटलस्नेक सोल्युशन्स एक विशिष्ट प्रकारचं कुंपणदेखील बसवून देते. हे कुंपण घराच्या परिसरात जमिनीत छोटा खड्डा किंवा भोक पाडून बसवलं जातं.

"साप जिवंत राहील आणि लगेचच इतरांसाठी समस्या होणार नाही, याची खातरजमा करणं हे खूपच कठीण काम असतं," असं ह्युजेस म्हणतात.

साप-मानव संघर्ष का वाढतो आहे?

ब्रायन ह्युजेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असं आढळलं आहे की सापाशी मानवाच्या वाढत्या संघर्षामागचं मुख्य कारण गृहनिर्माण कंपन्या किंवा बिल्डर्स 'त्याच चुका' वारंवार करत आहेत.

वादळात जमिनीच्या मोठ्या भागाची धूप होण्यापासून बचाव करण्यासाठी ते दगडांचा वापर करतात. त्यांचे ढीग उभारतात. मात्र, यामुळे ती जागा सापांना लपण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण बनते.

त्याशिवाय, घरमालक अनेकदा त्यांच्या घराच्या बागेत पानं असणारी झुडपं लावतात. त्यांना कृत्रिम सिंचनाची आवश्यकता असते. सापांना त्या ओलसर, थंड झुडुपांखाली आश्रय घ्यायला आवडतं. हवामान बदलामुळे या चुकांच्या परिणामांची व्याप्ती आणखी वाढते.

सापांना त्यांच्या शरीराच्या तापमानाचं नियमन करता येत नाही. साहजिकच उन्हाळ्यात ते लोकांच्या हिरव्यागार बागेत आश्रय घेतात.

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, 2023 मध्ये अरिझोनातील फिनिक्समध्ये सलग 55 दिवस, 110 फॅरनहाईट (43.3 सेल्सिअस) तापमानाची किंवा त्याहून अधिक तापमानाची नोंद झाली.

याशिवाय, जेव्हा हवामान उबदार असतं, सूर्यप्रकाश असतो, तेव्हा लोक घराबाहेर जास्त वेळ घालवतात. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते, जिथे साप आणि मानवाचा एकमेकांशी अनेकदा संबंध येतो. अशा प्रकारच्या संघर्षामुळे सर्पदंशाची संख्या वाढत राहू शकते.

मात्र तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मानवाला सापासोबत कसं राहायचं हे शिकावं लागेल.

एमिली टेलर बर्कलेमधील कॅलिफोर्निया विद्यापीठात सर्पतज्ज्ञ आहेत. त्या म्हणतात, "खुळखुळ्या आणि माणसं एकत्र राहू शकतात."

त्या स्वत:हून स्थानिक सापांच्या प्रजाती इतरत्र हलवतात.

रॅटल स्नेक

फोटो स्रोत, Getty Images

ब्रायन ह्युजेस मित्र असल्याचं जरी टेलर सांगत असल्या तरी, त्या म्हणतात की, त्यांचा ब्रायन यांच्या कंपनीशी कोणताही व्यावसायिक स्वरुपाचा संबंध नाही.

ते या गोष्टीशी सहमत आहेत की, वाळवंटी भागात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण केल्यामुळे किंवा घरांचं बांधकाम केल्यामुळे माणसं आणि सापांचा एकमेकांशी येणारा संपर्क वाढत जाईल.

आगामी वर्षांमध्ये, अरिझोनातील अधिकाधिक घरमालकांना त्यांच्या जमिनीवर खुळखुळ्या दिसू शकतात. विशेषकरून प्रत्येक वसंत ऋतूमध्ये जोडीदाराच्या शोधात साप लांबचा प्रवास करून येतात.

रिनाकदेखील याच्याशी सहमत आहेत. त्या म्हणतात, "आम्ही वाळवंटात राहतो. मात्र साप हा त्या पर्यावरणाचा एक भाग आहेत."

खुळखुळ्या जेव्हा टीव्ही किंवा चित्रपटात दाखवले जातात, तेव्हा त्यांना खूपच धोकादायक आणि आक्रमक, हिंसक दाखवलं जातं. मात्र सापांबद्दलचं आकर्षण कधीही कमी न झालेल्या ब्रायन ह्युजेस यांना सत्य माहित आहे.

खुळखुळ्या हे वन्यजीव आहेत, ज्यांच्या अस्तित्वाला मानवी वस्त्यांच्या विस्तारामुळे आणि ज्यांना सरपटणाऱ्या प्राण्यांबद्दल खरोखरंच काहीही कळत नाही अशा समाजामुळे धोका निर्माण झाला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)