भटके कुत्रे आसामला पाठवा, बच्चू कडूंचा राज्य सरकारला सल्ला

फोटो स्रोत, facebook
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा -
1. भटके कुत्रे आसामला पाठवा, बच्चू कडूंचा राज्य सरकारला सल्ला
राज्यातील भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हे कुत्रे आसामला पाठवावेत, तिथे भटक्या कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं, तिथे कुत्रे 8 ते 9 हजारांना विकले जातात, असा सल्ला आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे.
विधानसभेत शुक्रवारी (3 मार्च ) भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर आमदार प्रताप सरनाईक, आमदार अतुल भातखळकर, आमदार सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
भटक्या कुत्र्यांबाबत सुरु असलेल्या लक्षवेधीवर बोलताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, खरे तर भटक्या कुत्र्यावर सोप्पा इलाज आहे. पाळीव कुत्रे रस्त्यांवर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याच्यावर समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला हवी. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यावा.
“रस्त्यांवर असलेल्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये कुत्र्यांना किंमत आहे. आठ ते नऊ हजार रुपयांना कुत्रे विकले जातात. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर तिथे कळलं, जसं आपल्याकडं बोकडाचं मांस खाल्लं जातं. तसे, तिकडे कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं,” असं बच्चू कडूंनी सांगितलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.
2. फॉक्सकॉन कंपनीची तेलंगणात गुंतवणूक
फॉक्सकॉन कंपनीने शेजारच्या तेलंगण राज्यात गुंतवणूक केल्याची माहिती तेथील मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी एक ट्विट करून दिली आहे.
फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी गुरुवारी तेलंगणाचे

फोटो स्रोत, Getty Images
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या बैठकीनंतर या प्लांटबाबतची घोषणा करण्यात आली.
या कराराद्वारे 10 वर्षांच्या कालावधीत राज्यातील 1 लाखाहून अधिक लोकांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत. ही तैवानची कंपनी राज्यात किती गुंतवणूक करणार आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
फॉक्सकॉनने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्यूफॅक्चरिंग युनिटमुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे तेलंगणा सरकारने म्हटले. राज्यात यापुढेही अनेक उद्योगधंदे येतील असा विश्वासही सरकारने व्यक्त केला.
फॉक्सकॉन आणि तेलंगणा सरकारने मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या प्रगती भवन येथे या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ही बातमी एबीपी माझाने दिली.
3. ईशान्येत काँग्रेसचा सुपडा साफ, दुर्बिणीतूनही दिसणार नाही – अमित शाह
ईशान्य भारतात काँग्रेसचा सुपडा साफ झाला असून काँग्रेस आता दुर्बिणीतूनही दिसणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे.
कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यात एका प्रचारसभेत बोलताना शाह यांनी हे वक्तव्य केलं.

फोटो स्रोत, ani
ते म्हणाले, “ईशान्येत काय घडलं, हे तुम्हाला माहीत आहे. त्रिपुरा, नागालँड आणि मेघालयचे निकाल जाहीर झाले आहेत. या तिन्ही राज्यांमधून काँग्रेसचा सुपडा साफ झाला. नागालँडमध्ये काँग्रेसला शून्य, मेघालयात 3 आणि त्रिपुरामध्ये फक्त 4 जागा मिळाल्या. आता दुर्बिणीतून पाहिलं तरी ते दिसत नाहीत.”
“ईशान्येत भाजपचा प्रवेश होऊ शकत नाही, असं ते म्हणायचे. पण आता तिथे दुसऱ्यांदा एनडीएचं सरकार स्थापन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू ईशान्येपासून गुजरातपर्यंत, उत्तर प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत आहे, असं शाह यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.
4. पुण्यात मद्दधुंद एसटीचालकाला प्रवाशांनी पकडले
पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावरून एका एसटी चालकाने मद्यधुंद अवस्थेत तब्बल 62 किलोमीटर बस चालवल्याचा प्रकार शुक्रवारी (3 मार्च) समोर आला.
अखेर, प्रवाशांनी आरडाओरडा करून चालकास बस थांबवण्यास भाग पाडल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे.

फोटो स्रोत, KAILASH PIMPALKAR/BBC
महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनुसार, स्वारगेट-सांगोला ही बस दुपारी दीड वाजता स्वारगेटवरून निघाली. बसस्थानकाबाहेर येताच ती दुभाजकाला धडकली. पण त्यावेळी प्रवाशांना काही जाणवलं नाही.
पुढील प्रवासादरम्यान बस वारंवार विचित्र प्रकारे चालवण्यात येत असल्याचं प्रवाशांच्या निदर्शनास आलं. पुढे पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी गेटपासून बसचा प्रवास डांबरी रस्ता सोडून साईडपट्टीवरून सुरू झाला.
या प्रकारामुळे प्रवासी भयभित झाले. त्यांनी चालकाकडे विचारणा केली असता त्याने मद्यपान केल्याचं लक्षात आलं. अखेर प्रवासी आणि वाहकाने चालकाला बस चालवणं थांबण्यास भाग पाडलं. याप्रकरणी तक्कारदाखल करण्यात आली असून चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
5. विना हॉलमार्क सोनं विकण्यास 1 एप्रिलनंतर बंदी
येत्या 31 मार्च 2023 नंतर विना हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन असलेले सोन्याचे दागिने विकण्यास केंद्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. ग्राहक संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
ग्राहकांमध्ये 4 अंकी आणि 6 अंकी हॉलमार्किंगबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयाने म्हटलं.
नव्या नियमांनुसार, 1 एप्रिलपासून केवळ 6 अंकी अल्फान्युमेरिक हॉलमार्किंग दागिनेच विकण्यास परवानगी असेल. त्याशिवाय सोने किंवा सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत. तसंच 4 अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद होईल, असं मंत्रालयाने सांगितलं. ही बातमी आजतकने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























