अमित शाह म्हणतात, 'शिवसेनेत आता कोणताही गट राहिलेला नाही, आता एकच शिवसेना'

फोटो स्रोत, Getty Images
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी कोल्हापूर येथे आयोजित सभेत शिवसेना पक्षाबाबत भाष्य केलं.
ते म्हणाले, आता शिवसेनेत "कोणताही गट उरलेला नाही" आणि शिवसेना "एकच झाली आहे."
जेव्हा शिवसेना (UBT) चे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी होणार असल्याच्या बातम्या येत आहेत, अशाच काळात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला हे सहा खासदार उपस्थित नव्हते.
शनिवारी कोल्हापूरमध्ये आपल्या भाषणादरम्यान केंद्रीय गृहमंत्री उपस्थित प्रमुख व्यक्तींची नावे घेत होते.
त्यावेळी ते म्हणाले, "माझ्यासोबत उपस्थित माझे मित्र आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, शिवसेना अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी... आधी शिंदेजींच्या मागे शिवसेना शिंदे गट म्हणावं लागत होतं, आता कोणताही गट उरलेला नाही. एकच शिवसेना झाली आहे."
वर्धापनदिनी आरोप-प्रत्यारोप
शुक्रवारी शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम दोन्ही गटांमध्ये आणि त्यांच्या नेत्यांच्या भाषणात शाब्दिक चकमकी आणि आरोप-प्रत्यारोप झाले.
उद्धव ठाकरे आपल्या शिवसेना (UBT) पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चांबद्दल भावनिक आवाहन करताना दिसले. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षालाच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा खरा वारस असल्याचा दावा केला.
उद्धव ठाकरे यांनी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात पक्षनेते आणि कार्यकर्त्यांसमोर पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.
ते म्हणाले की, पक्ष सोडून गेलेल्या खासदारांनी त्यांच्यावर केलेले आरोप जर खरे वाटत असतील, तर ते पक्षप्रमुख पद सोडण्यास तयार आहेत.

फोटो स्रोत, SHIVSENA and Shivsena (UBT)
त्यांनी शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'ला घाणेरडं राजकारण म्हणत टीका केली आणि शिवसेना (UBT) काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे आरोप फेटाळले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेत्यांना आपल्या बाजूला आणण्याच्या प्रयत्नाला कथितपणे 'ऑपरेशन टायगर' असं नाव दिलं आहे.
शिवसेना (UBT) चे सहा खासदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चा आहेत. पक्षाच्या संसदीय बैठकीला हे सहा खासदार अनुपस्थित होते.
शिवसेनेची स्थापना उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती आणि वाघ हे या पक्षाचे चिन्ह आहे. शिवसेना (UBT) च्या नऊपैकी सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन संसदेत वेगळे बसण्याची मागणी केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
उद्धव ठाकरेंनी दाखवली पक्षप्रमुख पद सोडायची तयारी
मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे 'पक्षातील फूट'मुळे भावूक झाल्याचं दिसून आलं. या कार्यक्रमाला नेते, कार्यकर्ते आणि पक्षाचे फक्त तीन खासदार उपस्थित होते.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जर आरोपांवर विश्वास असेल तर ते पद सोडण्यास तयार आहेत.
ते म्हणाले, "गेल्या 12-13 वर्षांपासून मी नेता म्हणून तुम्हा सगळ्यांचं ऐकत आलो आहे. पण जर तुम्हाला वाटत असेल की माझ्यावरचे आरोप खरे आहेत, तर मी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देण्यास तयार आहे. माझ्यासाठी एक गोष्ट स्पष्ट आहे की सोन्यासारखी शिवसेना चोरांच्या हाती देऊ नये. मला नेते होण्याची महत्त्वाकांक्षा नाही."
ते पुढे म्हणाले, "पक्ष सोडून गेलेले खासदार म्हणत आहेत की मी उपलब्ध नसतो, वेळ देत नाही. हे आरोप तुमच्या मते खरे आहेत का? जर तसे असेल तर मी आत्ताच पद सोडतो. तुमच्यातील कोणी पुढे या, मी लगेच पक्ष तुमच्याकडे देतो. मी पळणार नाही, ठाम उभा राहीन. पण मला तुमचा पाठिंबा हवा."

फोटो स्रोत, ANI
ठाकरे यांनी ठाकरे परिवारावर होत असलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना सांगितले की त्यांच्या कुटुंबाने अनेक अडचणींचा सामना केला आहे आणि त्यांनी कधीही सत्तेसाठी मोह ठेवला नाही. 2019 मध्ये परिस्थितीमुळे त्यांना मुख्यमंत्री पद स्वीकारावं लागलं.
ते म्हणाले, "देशातील राजकारण ज्या दिशेने जात आहे, त्यामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास कमी होत आहे. ही दिशा अराजकतेकडे नेणारी आहे."
भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, "भाजप 'वन नेशन, वन इलेक्शन' पासून पुढे जात 'वन नेशन, नो इलेक्शन' कडे वाटचाल करत आहे."
त्यांनी 'जनरेशन Z' संदर्भातही भाष्य करताना सांगितले की, ज्यांना 'कॉकरोच' म्हटले जाते, तेच देशात बदल घडवणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये 2.5 लाख पॅरामिलिटरी दल तैनात केल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, एवढ्या फौजा एका महिलेला हरवण्यासाठी पाठवल्या जातात, तर मणिपूर किंवा POK मध्ये का नाही?
हा तर फक्त ट्रेलर- एकनाथ शिंदे
दरम्यान, मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानावर झालेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी 'ऑपरेशन टायगर'चा उल्लेख न करता आणखी नेते पक्षात येऊ शकतात, असे संकेत दिले.
ते म्हणाले, "आतापर्यंत जे दिसलं आहे ते फक्त ट्रेलर आहे, पूर्ण चित्रपट अजून बाकी आहे."
शिंदे म्हणाले, "बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारस माझे शिवसैनिक आहेत. वारसा रक्ताच्या नात्यांमुळे नाही तर विचारांमुळे ठरतो. शिवसेना हा काही जमिनीचा तुकडा नसून कोट्यवधी लोकांची विचारधारा आहे."

फोटो स्रोत, ANI
2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळं होऊन भाजपसोबत जाण्याच्या आपल्या निर्णयाचं त्यांनी समर्थन केलं.
ते म्हणाले, "माझं राजकीय करिअर संपेल, असं विरोधक म्हणत होते. पण आमच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत आपली ताकद वाढवली आहे."
आपल्या भाषणात शिंदे यांनी शिवसेनेतील फुटीनंतर सतत विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न 'खरा वारस कोण' याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























