एव्हरेस्ट 'डेथ झोन'मधून जिवंत परतण्याची थरारक कहाणी, मृत समजलेला 'शेर्पा' 6 दिवसांनी आला खाली

Caption- गेल्या आठवड्यात एव्हरेस्टवर बेपत्ता झाल्यानंतर मृत समजला गेलेला दावा शेर्पा (डावीकडे) जिवंत सापडला आहे.

फोटो स्रोत, Sagarmatha Pollution Control Committee (SPCC)

फोटो कॅप्शन, गेल्या आठवड्यात एव्हरेस्टवर बेपत्ता झाल्यानंतर मृत समजला गेलेला दावा शेर्पा (डावीकडे) जिवंत सापडला आहे.
    • Author, टोबी मॅन
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर एक अविश्वसनीय घटना घडली आहे. मृत समजलेला एक शेर्पा 6 दिवस 'डेथ झोन'मध्ये हरवल्यानंतर जिवंत सापडला आणि तो स्वतःच्या हिंमतीवर रांगत-रांगत खाली आला.

भीषण परिस्थितीवर मात करून शेर्पाने स्वतःचा केलेला बचाव चमत्कारिक मानला जात आहे.

एक ब्रिटिश गिर्यारोहकाने त्याच्यासोबत असलेल्या नेपाळी शेर्पासोबत (पर्वत मार्गदर्शक) घडलेला एक चमत्कारिक अनुभव सांगितला आहे.

माऊंट एव्हरेस्टवरून खाली उतरत असताना आपल्यापासून हा नेपाळी शेर्पा कसा वेगळा झाला, याची माहिती या माजी ब्रिटिश सैनिकाने दिली.

ब्रिटिश गिर्यारोहकाबरोबर गेलेला 'दावा शेर्पा' गुरुवारी (4 जून) जिवंत सापडला. विशेष म्हणजे हा शेर्पा 6 दिवस 'डेथ झोन'मध्ये होता. ब्रिटिश गिर्यारोहक ख्रिस थ्रॉल यांनी एवढ्या कठीण परिस्थितीतही शेर्पा जिवंत राहिला यावर विश्वासच बसत नसल्याचं सांगितलं.

थ्रॉल यांनी बीबीसीच्या 'न्यूज अवर'मध्ये सांगितलं की, "एक क्षण आम्ही त्याच्या मुलीसोबत रडत होतो आणि पुढच्याच क्षणी तो रांगत येताना दिसला. हे खूपच अविश्वसनीय आणि शब्दात न मांडता येण्यासारखं आहे."

'शेर्पा बेपत्ता झाला'

थ्रॉल यांनी दावा शेर्पा याला बेस कॅम्पकडे परत येताना शेवटचं पाहिलं होतं. त्या वेळी कठीण चढाईनंतर थोडा आराम करण्यासाठी तो त्याच्या बॅकपॅकवर बसला होता.

प्रसिद्ध गिर्यारोहक एडमंड हिलरी यांच्या नावावरून त्याला 'हिलरी दावा शेर्पा' असंही म्हटलं जातं. चढाई करत असताना थ्रॉल यांनी त्याला ओलांडलं होतं.

ते सुमारे 50 ते 100 मीटर एकटेच खाली उतरले. त्यानंतर त्यांना त्यांच्या ग्रुपमधील दुसरा सदस्य भेटला- एक पोलिश गिर्यारोहक, "त्याच्याकडे ऑक्सिजन नव्हतं आणि त्याला फ्रॉस्टबाइटमुळे (हिमबाधा) इजा झाली होती."

"लगेचच माझं लक्ष त्या तिघांपैकी सर्वात कमजोर सदस्याकडे गेलं, आणि तेव्हा मी त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं," असं त्यांनी न्यूज अवरला सांगितलं.

"मी त्या व्यक्तीला खाली उतरायला मदत करत असताना वर पर्वताकडे पाहिलं, तेव्हा हिलरी दावा हललेला पण दिसला नाही आणि तो खालीही उतरत नव्हता. नाहीतर त्याचा हेड टॉर्च तर आम्हाला दिसला असता."

दावा शेर्पाला शेवटचं कॅम्प 3 च्या वर, साधारण 7,500 मीटर उंचीवर पाहिलं गेलं होतं.

A man in a blue and yellow jacket shields his eyes with his arm as he lies on a yellow emergency stretcher under a grey blanket.

फोटो स्रोत, EPA

कुटुंबीयांकडून अंत्यविधीच्या प्रार्थनांनाही सुरुवात

पुढील 6 दिवस त्यांचा शोध सुरू होता, पण काहीच पत्ता लागला नाही. त्यामुळं त्यांच्या आत्म्यासाठी अंत्यसंस्कारासारख्या प्रार्थनाही सुरू केल्या होत्या, अशी माहिती त्याच्या पत्नीनं एएफपी या वृत्तसंस्थेला दिली.

त्याच्या जिवंत राहण्याच्या आशा मावळत असताना, दावा शेर्पा हळूहळू स्वतःच परत येत होता.

गुरुवारी (4 जून) त्याला जगातील सर्वात उंच पर्वतावरून हळूहळू खाली घसरत येत असताना सफाई कर्मचाऱ्यांच्या टीमने पाहिलं.

जेव्हा थ्रॉल यांनी सोशल मीडियावर दावा शेर्पा जिवंत सापडल्याच्या पोस्ट पाहिल्या, तेव्हा त्यांना सुरुवातीला तो 'स्पॅम' आहे असं वाटलं.

"हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. मी काल त्या कुटुंबाला भेटून मी सांत्वन केलं होतं," असं त्यांनी न्यूज अवरला सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, "हिलरीसाठी मी खूप आनंदी आहे आणि त्याच्याशी बोलण्यास खूप उत्सुक आहे."

एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक

फोटो स्रोत, Reuters

'हे खरोखरचं चमत्कारिक'

शोध मोहिमेचे नेतृत्व करणारे 8के एक्सपिडिशन्सचे कार्यकारी संचालक पेम्बा शेर्पा यांनी याला हा 'खराखुरा स्वतःचा बचाव' (ट्रू सेल्फ रेस्क्यू) असं म्हटलं आहे.

"दावा शेर्पा अनेक दिवस सर्व अडचणींवर मात करून जिवंत राहिला. हे खरोखरच एका चमत्कारापेक्षा कमी नाही," असे ते म्हणाले.

काठमांडूच्या एचएएमएस हॉस्पिटलमधील आयसीयूचे डॉक्टर निशांत धाकल यांनी, 'दावा शेर्पा शुद्धीवर असून त्याच्यावर उपचार सुरू' असल्याचे सांगितले.

"आम्ही त्याच्या फ्रॉस्टबाइट्समुळे झालेल्या जखमा, हायड्रेशन आणि इतर दुखापतींवर उपचार करत आहोत. त्याची पुढील तपासणी सुरू आहे आणि तो आमच्या आयसीयूमध्ये आहे."

"त्यांनी मला ओळखलं… ते ठीक आहेत आणि बोलतही आहेत," असं त्याची मुलगी मेंदो ल्हामो शेर्पाने रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं. "आम्ही खूप आनंदी आहोत."

या हंगामात 1 हजारपेक्षा जास्त लोकांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे, हा आतापर्यंतचा सर्वात गर्दीचा हंगाम ठरला आहे. एएफपीच्या माहितीनुसार, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)