पीसीबीचा बांगलादेशला पाठिंबा, पाकिस्तान टी-20 वर्ल्ड कप खेळणार की नाही, याबाबत काय म्हटलं?

पाकिस्तान-बांगलादेश
    • Author, टिमोथी अब्राहम
    • Role, बीबीसी स्पोर्ट जर्नलिस्ट
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

बांगलादेशने पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतात खेळण्यास नकार दिला आहे. आता त्यांच्या जागी स्कॉटलंडचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

भारतासोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे कारण देत बांगलादेशने आयसीसीला आपले सामने भारताबाहेर घेण्याची मागणी केली होती.

भारताऐवजी हे सामने श्रीलंकेत आयोजित करावेत, अशी त्यांची मागणी होती. श्रीलंकेकडे या स्पर्धेचं सह-यजमानपद आहे.

बांगलादेशनं स्पर्धेत सहभागी होण्यास नकार दिल्यामुळं त्यांच्याजागी स्कॉटलँडचा संघात समावेश केला असल्याचं आयसीसीनं निवेदनात म्हटलं आहे.

एकीकडे स्कॉटलंड या स्पर्धेत खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी-20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

तसेच, या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाच्या सहभागाबाबतचा निर्णय सरकार घेईल, असंही म्हटलेलं आहे.

7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेतील पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळून लावली होती.

आयसीसीचे म्हणणे होते की, सुरक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारच्या धोक्याचे स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत. मात्र, त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपली मागणी पुन्हा एकदा लावून धरली होती.

पाकिस्तान सहभागी होणार की नाही?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टी-20 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

तसेच, या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाच्या सहभागाबाबतचा निर्णय सरकार घेईल, असंही म्हटलेलं आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तानच्या सहभागाबाबत एक विधान दिले आहे (फाइल फोटो)
फोटो कॅप्शन, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तानच्या सहभागाबाबत एक विधान दिले आहे (फाइल फोटो)

बीबीसी उर्दूने दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीने केलेल्या घोषणेच्या काही वेळापूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसिन नकवी यांनी म्हटलं होतं की, पाकिस्तान या मुद्द्याबाबतीत बांगलादेशच्या सोबत आहे. तसेच, या आयसीसी टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या संघाला भारतात पाठवलं जाईल की नाही, याबाबतचा निर्णय सरकारकडून घेण्यात येईल.

शनिवारी (24 जानेवारी) लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "पाकिस्तान सरकार आम्हलाा जो काही आदेश देईल, आम्ही तेच करू. पंतप्रधान शहबाज शरीफ सध्या पाकिस्तानमध्ये नाहीयेत. ते परतल्यानंतर, आम्ही तुम्हाला अंतिम निर्णयाबाबत सांगू शकू."

"आम्ही आयसीसी नव्हे तर पाकिस्तान सरकारच्या नियंत्रणाखाली आहोत, त्यामुळे सरकार जे सांगेल ते आम्हाला करावे लागेल."

भारतात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा सहभागी होण्यास नकार

भारतात होणाऱ्या टी20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी दिली.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरूल यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला.

याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलनं टी20 वर्ल्ड कपमधील सामने भारताबाहेर घेण्याच्या (आयसीसी) बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) अपीलबाबत वक्तव्य जारी केलं होतं. तसेच हे सामने आधी ठरलेल्या ठिकाणीच होतील, हे स्पष्ट केलं होतं.

बांग्लादेश क्रिकेट टीम
फोटो कॅप्शन, बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव टी-20 विश्वचषक सामने भारताबाहेर हलवण्याची विनंती केली होती.

भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या तणावावरून बांगलादेशनं आयसीसीला सुरक्षेच्या कारणास्तव भारताऐवजी श्रीलंकेत सामने घेण्याचं अपील केलं होतं.

त्यावर आयसीसीनं म्हटलं होतं की, त्यांनी बीसीबीच्या अपीलनंतर सुरक्षेसंबंधित सर्व आढावा घेतला. त्यानंतर हे ठरवण्यात आलं आहे की, इतक्या लवकर यात बदल करणं शक्य नाही.

त्याचबरोबर आयसीसीनं म्हटलं होतं की, आयसीसीच्या व्यवस्थापनानं देखील ही कोंडी सोडवण्यासाठी बीसीबीबरोबर अनेकवेळा चर्चा केली आणि बैठका घेतल्या. तसंच इव्हेंट सिक्युरिटी प्लॅनबद्दल सविस्तरपणे माहिती दिली. यात केंद्रीय आणि राज्य पातळीवरील कायद्याच्या अंमलबजावणी करण्याच्या यंत्रणांच्या पाठिंब्याही समावेश होता.

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत खेळला जाणार आहे.

आयसीसीनं काय म्हटलं?

आयसीसीनं त्यांच्या वक्तव्यात पुष्टी केली आहे की पुरुषांच्या टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं ठरलेल्या वेळापत्रकानुसारच आयोजन केलं जाईल. त्यामुळे बांगलादेशचे सामने भारतातच खेळले जातील.

आयसीसीनुसार, "बुधवारी, 21 जानेवारीला आयसीसी बोर्डाच्या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं (बीसीबी) त्यांचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत घेण्याची विनंती केल्यानंतर पुढील प्रक्रियेवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती."

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, बांगलादेशची घोषणा, 'भारतात T20 वर्ल्ड कप खेळणार नाही', आता पुढे?

आयसीसीनं त्यांच्या वक्तव्यात म्हटलं आहे, "सुरक्षाविषयक सर्व बाबींच्या मूल्यांकनांचा विचार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यात स्वतंत्र आढाव्याचाही समावेश होता. यातून संकेत मिळाला की देशातील स्पर्धेच्या कोणत्याही ठिकाणी बांगलादेशचे खेळाडू, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि कर्मचारी, अधिकारी आणि चाहत्यांना कोणताही धोका नाही."

"आयसीसीच्या बैठकीत ही गोष्ट समोर आली की स्पर्धेच्या अगदी आधीच कोणताही बदल करणं शक्य नव्हतं. त्याचबरोबर, सुरक्षेशी संबंधित कोणत्याही प्रकारचा धोका नसताना वेळापत्रकात बदल केल्यामुळे एक असं उदाहरण तयार होऊ शकतं, ज्यामुळे भविष्यात आयसीसीच्या आयोजनांना धोका निर्माण होऊ शकतो."

बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव टी-20 विश्वचषक सामने भारताबाहेर हलवण्याची विनंती केली होती.
फोटो कॅप्शन, बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव टी-20 विश्वचषक सामने भारताबाहेर हलवण्याची विनंती केली होती.

आयसीसीचे प्रवक्ते पुढे म्हणाले, "हे प्रयत्न करूनदेखील बांगलादेश क्रिकेट बोर्ड त्यांच्या भूमिकेवर ठाम होतं. ते वारंवार स्पर्धेतील त्यांच्या सहभागाला त्यांच्या एका खेळाडूच्या देशांतर्गंत लीगशी संबंधित वेगळ्या आणि असंबंधित घटनाक्रमाशी जोडत होते. या मुद्द्याचा स्पर्धेची सुरक्षा किंवा त्यातील सहभागाशी निगडीत अटींवर कोणताही परिणाम होत नाही."

ते म्हणाले, "आयसीसीचे ठिकाण आणि वेळापत्रकाशी निगडीत निर्णय, धोक्याचं आकलन, यजमानांनी दिलेलं आश्वासन आणि स्पर्धेत सहभागी होण्याच्या मान्य झालेल्या अटींनुसार आयोजित केल्या जातात. हे नियम स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व 20 देशांना समान प्रकारे लागू होतात. बांगलादेशच्या संघाच्या सुरक्षेवर परिणाम करणारे कोणतेही स्वतंत्र सुरक्षा निष्कर्ष नसल्यामुळे, सामन्यांचं ठिकाण बदलणं आयसीसीला शक्य नाही."

कसा सुरू झाला वाद?

ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांना सत्तेतून हटवण्यात आल्यापासून भारत आणि बांगलादेशमधील डिप्लोमॅटिक संबंध सातत्यानं बिघडत चालले आहेत.

बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू समुदायावर हिंसाचार झाल्याची प्रकरणं समोर आल्यानंतर भारतात अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनं केली होती.

यादरम्यान बांगलादेशचा जलदगती गोलंदाज, मुस्तफिजुर रहमान याला आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत कोलकाता नाईट रायडर्सनं (केकेआर) विकत घेतलं.

मुस्तफिजुर रहमान याला कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल 2026 साठी 9 कोटी रुपयांहून अधिक रकमेला विकत घेतलं होतं.

मुस्तफिजूर हा बांगलादेश क्रिकेट संघाचा एक स्टार खेळाडू आहे.
फोटो कॅप्शन, मुस्तफिजूर हा बांगलादेश क्रिकेट संघाचा एक स्टार खेळाडू आहे.

या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपाच्या अनेक नेत्यांनी चित्रपट अभिनेता शाहरुख खानवर टीका केली होती. कारण तो केकेआरचा सह-मालक आहे.

त्यानंतर 2 जानेवारीला बीसीसीआयनं केकेआरला मुस्तफिजुरला टीममधून काढून टाकण्यास सांगितलं.

मुस्तफिजुरला टीममधून काढल्यानंतर बांगलादेशच्या हंगामी सरकारचे युवा आणि क्रीडविषयक सल्लागार आसिफ नजरुल म्हणाले होते, "बांगलादेशच्या क्रिकेटपटूंचा आणि देशाचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही."

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं 4 जानेवारीला निर्णय घेतला की, टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळण्यासाठी त्यांचा क्रिकेट संघ भारतात जाणार नाही.

बांगलादेश क्रिकेट बोर्डानं आयसीसीला सामन्यांचं ठिकाण बदलण्याची आणि बांगलादेशचे सामने श्रीलंकेत खेळवण्याची अपील केली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)