साप आणि मुंगूस यांच्यात खरोखरंच वैर असतं का? त्यांच्या लढाईत कोण जिंकतं?

साप आणि मुंगूस भारताच्या मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतात

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, साप आणि मुंगूस भारताच्या मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळतात
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

साप आणि मुंगूस यांच्यातील अटीतटीच्या लढाईबद्दल नेहमीच बोललं जातं. भारतात हे दोन्ही प्राणी सहजपणे आढळतात. त्यांच्याबद्दल मोठं कुतूहलदेखील असतं.

साप आणि मुंगूस यांच्यातील लढाई वर्णन भारतीय उपखंडातील अनेक प्राचीन आणि आधुनिक कथा आणि किश्शांमध्ये केलेलं असतं.

साप आणि मुंगसाच्या वैराच्या गोष्टी अनेक वेळा आपण ऐकल्या आहेत. साप आणि मुंगसाची लढाई झाली तर मुंगूस जिंकतं का?

आणि त्या लढाईत समजा साप मुंगसाला चावला तर मुंगसाचा मृत्यू का होत नाही? या प्रश्नांची उत्तर आपण पाहू.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

साप आणि मुंगूस यांच्यात खरोखरंच शत्रुत्व असतं का?

मुंगसात आणि सापांत वैर असण्याचं कारण असं सांगितलं जातं की साप मुंगसाची छोटी पिल्लं खातो.

त्यामुळे जर साप दिसला तर मुंगसाची मादी त्यावर आक्रमण करते. पण तज्ज्ञ सांगतात की केवळ अजगरच थोड्या मोठ्या प्राण्यांना गिळू शकतं. इतर साप पाली, सरडे, बेडूक, उंदीर खातात. मुंगसाला सापाकडून धोका नसतो पण सापाला मात्र असतो.

मुंगूस सापाच्या डोक्यावर थेट हल्ला करतो आणि त्याची कवटी चिरडतो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंगूस सापाच्या डोक्यावर थेट हल्ला करतो आणि त्याची कवटी चिरडतो

डॉ. रश्मी शर्मा यांनी मुंगूसांच्या वर्तनाबद्दल एक शोधनिबंध लिहिला आहे. त्याचं नाव 'स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ इंडियन मुंगूस' असं आहे.

त्यात म्हटलं आहे की "मुंगूस हे मुख्यत: दिवसा सक्रिय असतात. विषारी सापांशी लढाई करण्यासाठी आणि त्यांना मारण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांची चपळता ही त्यांची सर्वांत मोठी ताकद असते."

या शोधनिबंधात म्हटलं आहे की, "मुंगूस हे सर्वसाधारणपणे 6 ते 40 जणांच्या कळपात राहतात. त्यांच्या या कळपाचं नेतृत्व हे शक्तिशाली मुंगसाकडे जातं. मग ते मादी असो वा नर असो. कळपातील प्रत्येक मुंगसाचं एक विशिष्ट काम असतं."

"काही मुंगसांना आसपासच्या संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असते. त्यांच्या कामातदेखील बदल होतात. मुंगसाचे नाक, कान आणि डोळे अतिशय तीक्ष्ण असतात," असं या शोधनिबंधात म्हटलं आहे.

मुंगसाला सापाने चावल्यावर काय होतं?

मुंगसाकडे अशी काय शक्ती असते ज्यामुळे ते विषारी साप किंवा नागासमोरही तग धरू शकतात.

बीबीसी वाईल्डलाईफनुसार, मुंगसाच्या काही प्रजाती अशा असतात त्या अत्यंत विषारी आणि धोकादायक सापांपासून देखील स्वतःचे संरक्षण करू शकतात. सापाच्या विषात सर्वसाधारणपणे अतिशय सक्रिय असं अल्फा-न्युरोटॉक्सिन असतं. त्यामुळे आपल्या चेतासंस्थेकडून येणारे संदेश रोखले जातात. यामुळे अर्धांगवायू होतो आणि अखेर मृत्यू होतो.

परंतु मुंगसाच्या शरीरात सापाच्या विषाशी लढा देण्याची जबरदस्त क्षमता असते. त्यांच्या शरीरातील ॲसेटिलकोलीन रिसेप्टरमध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांच्या स्नायूंपर्यंत संदेश पोहोचतात. त्यामुळे जरी एखाद्या सापानं चावलं तरी तो मुंगूस त्याचा जीव वाचवू शकतो.

याचा अर्थ असा नाही की सापाच्या चाव्याने मुंगूस कधीच मारत नाही. तज्ज्ञ सांगतात की मोठा आणि अत्यंत विषारी साप असेल तर त्यात मुंगसाचा मृत्यू देखील होऊ शकतो.

किंबहुना, अजगरासारखे मोठे प्राणीच पिल्लं खातात, छोट्या सापांपासून त्यांना फारसा धोका नसतो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किंबहुना, अजगरासारखे मोठे प्राणीच पिल्लं खातात, छोट्या सापांपासून त्यांना फारसा धोका नसतो

जर एखाद्या अत्यंत विषारी सापाने मुंगसाच्या शरीरात प्रचंड प्रमाणात विष सोडलं तर तो मुंगूस मरू शकतो.

एखादा नवखा मुंगूसदेखील सापाविरुद्धच्या लढाईत जिंकतो. मात्र त्याची कोब्राबरोबरची लढाई अत्यंत भयानक असते.

'स्टडी ऑफ बिहेवियर ऑफ इंडियन मुंगूस' या शोधनिबंधात नमूद करण्यात आलं आहे की, "त्यांच्या शरीरात असलेल्या असेटिलकोलीन रिसेप्टर्समुळे (acetylcholine receptors) सापाच्या विषाचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत नाही. मात्र कोब्रासारख्या अत्यंत विषारी सापांशी ते सहसा लढाई करत नाहीत. त्यांना कोब्राचं मांस आवडत नाही."

मुंगूस आणि साप लढाई झाल्यावर कोण जिंकतं?

सर्वसाधारणपणे साप आणि मुंगूस हे एकमेकांचे शत्रू म्हणून ओळखले जातात. मुंगूस हा सस्तन प्राणी आहे.

ब्रिटानिकानुसार, मुंगूस हे मुख्यत: आफ्रिका, दक्षिण आशिया आणि दक्षिण युरोप आढळते.

मुंगूल प्रामुख्यानं जमिनीत असलेल्या बिळांमध्ये, झाडांच्या पोकळीत राहतात. मुंगसाचं मुख्य अन्न छोटे सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, प्राण्यांची अंडी आणि फळं हे असतं.

मुंगसाला सापाचे डोके पण आवडते. मुंगूस इतक्या जोरात हल्ला करतं की त्यात सापाचं डोकं ते पूर्णपणे चिरडून टाकतं. मुंगूस अत्यंत चपळ असतं आणि त्यामुळे हा हल्ला करण्याचे तो धाडस करू शकतो.

किंग कोब्रा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किंग कोब्रा

मुंगसाचा हल्ला इतका तीव्र असतो की कधीकधी साप त्याच्या एका फटक्यात मरतो. मुंगसामुळे सापांची संख्या देखील आटोक्यात राहते, त्यामुळे काही लोक ते पाळतात देखील.

जगभरात मुंगूसाच्या अनेक प्रजाती आढळतात. भारतात 'इंडियन ग्रे मुंगूस' ही मुंगुसाची प्रजाती प्रामुख्यानं आढळते.

याव्यतिरिक्त पट्टेरी मुंगूस देखील भारतात मोठ्या प्रमाणात आढळतो. आफ्रिकेत लांब झुपकेदार शेपटीचं मुंगूस आणि कांगारू मुंगूस या प्रजाती प्रामुख्यानं आढळतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.