'सैतानाला दगड मारण्याच्या' व्हायरल व्हीडिओवर वसीम अक्रम यांनी काय म्हटलं?

वसीम अक्रम आपले मित्र मिसबाह आणि फखर यांच्यासोबत हजला गेले होते.

फोटो स्रोत, fakhar alam

फोटो कॅप्शन, वसीम अक्रम आपले मित्र मिसबाह आणि फखर यांच्यासोबत हजला गेले होते.
    • Author, रशीद शकूर
    • Role, वरिष्ठ क्रीडा पत्रकार
    • Reporting from, कराची
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

हज हा इस्लामचा पाचवा महत्त्वाचा स्तंभ आहे. हज पूर्ण केल्यानंतर जगभरातील मुस्लिमांनी आता आपापल्या घरी परतण्यास सुरुवात केली आहे.

परंतु, याच दरम्यान पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि 'सुलतान ऑफ स्विंग' म्हणून ओळखले जाणारे वसीम अक्रम एका व्हायरल व्हीडिओमुळे चर्चेत आले आहेत.

या व्हीडिओवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

या व्हीडिओत वसीम अक्रम मीना येथे सैतानला दगड मारताना दिसतात. हजमध्ये ही एक महत्त्वाची धार्मिक गोष्ट (अनिवार्य आणि मूलभूत भाग) आहे. त्याला 'रामी' (रामी अल-जमरात) असं म्हणतात.

पण वसीम अक्रम यांची दगड मारण्याची पद्धत थोडी वेगळी होती. त्यांनी दगड क्रिकेटमधील आपल्या बॉलिंग अॅक्शनप्रमाणे फेकून मारले.

वसीम अक्रम हे क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी लेफ्ट-आर्म फास्ट बॉलर (डावखुरा वेगवान गोलंदाज) म्हणून ओळखले जातात. पण यावेळी त्यांनी दगड मारताना आपल्या बॉलिंग अॅक्शनची जी शैली वापरली, त्यामुळे ते मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

एका बाजूला लोकांनी याला एक मजेशीर शैली म्हटलं, तर दुसऱ्या बाजूला टीकाही झाली. सैतानला दगड मारण्याची ही धार्मिक क्रिया गंभीरतेने, सन्मानाने आणि आदराने केली जाते. त्यामुळे ती क्रिकेटच्या बॉलिंग अॅक्शनसारखी करण्याची गरज नव्हती, असं काही लोकांचं मत आहे.

या चर्चेत अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. काही लोकांचं म्हणणं आहे की, सैतानला दगड मारताना वसीम अक्रम यांना त्यांचा क्रिकेटचा काळ आठवला असेल.

त्यावेळी ते आपल्या स्विंग गोलंदाजीने दिग्गज फलंदाजांना अडचणीत आणायचे. कदाचित त्यामुळेच त्यांनी 'रामी' करतानाही आपला क्रिकेटसारखाच अंदाज वापरला असेल, असं लोक म्हणत आहेत.

सोशल मीडियावर काही लोकांनी असं म्हटलं की, हज म्हणजे मनोरंजन नाही. त्यामुळे त्यात पूर्ण आदर ठेवायला हवा.

तर वसीम अक्रम यांच्या कृतीचे समर्थन करणाऱ्यांनी सांगितलं की, दगड मारण्याचा जो उद्देश असतो, तो त्यांनी पूर्ण केला आहे आणि नियत (उद्देश) काय आहे हे फक्त अल्लाहलाच माहीत असतं.

पाकिस्तान उलेमा कौन्सिलचं मत काय आहे?

पाकिस्तान उलेमा कौन्सिलचे अध्यक्ष आलिमा ताहिर अश्रफी म्हणतात, "वसीम अक्रम यांच्या हजमधील इतर सर्व धार्मिक कृतींकडे दुर्लक्ष करून लोक फक्त त्यांनी बॉलिंग अॅक्शनने दगड मारल्याच्या कृतीवरच टिप्पणी करत आहेत. जणू त्यांनी काही मोठी चूक किंवा गुन्हा केला आहे."

"हज ही एक गंभीर धार्मिक कृती आहे यात काही शंका नाही. रामी करतानाही गांभीर्य असणे आवश्यक आहे. पण जर एखाद्या व्यक्तीने असं काही केलं असेल जे निषिद्ध नाही आणि ते पापही होत नाही, तर अशा प्रकारच्या टीकांना काही अर्थ राहत नाही."

आलिमा अश्रफी म्हणतात, "जर कुणी चूक केली असेल तरीही ती सुधारण्याचा मार्ग असा नसतो जो काही लोकांनी स्वीकारला आहे. अल्लाह सर्वांना चांगली बुद्धी देवो, जेणेकरून आपण इतरांच्या छोट्या चुका आणि कमतरता माफ करू शकू किंवा दुर्लक्ष करू शकू."

या व्हीडिओ मागची कहाणी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या हजच्या प्रवासात वसीम अक्रम यांच्यासोबत पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिसबाह-उल-हक आणि प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर फखर आलम हे देखील होते.

फखर आलम यांनी या व्हीडिओबद्दल बीबीसीशी बोलताना सांगितलं, "आम्ही तिघेही सकाळी लवकर रामीसाठी पोहोचलो होतो आणि त्या वेळी जास्त गर्दी नव्हती. आम्ही शांतपणे आणि आरामात सैतानाला दगड मारले. त्यावेळी मला असंही वाटलं की, काही लोक नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीनेही दगड मारत आहेत."

"मी असे अनेक व्हीडिओ पाहिले आहेत ज्यात काही लोक बंदुकीसारख्या अंदाजात (फायरिंग स्टाइल) दगड मारतात, तर काही लोक धावत येऊन दगड मारतात. त्या वेळी प्रत्येक मुसलमानाचा उत्साह आणि भावना खूप जास्त असतात."

"मी वसीम अक्रम यांना विनंती केली की, त्यांनी आपल्या बॉलिंग अॅक्शनने दगड मारावेत, म्हणजे मी त्याचा व्हीडिओ बनवू शकेन."

फखर आलम यांनी सांगितलं, "वसीम अक्रम आधी म्हणाले की, हे योग्य वाटणार नाही आणि लोक काय म्हणतील. पण मी त्यांना समजावलं की, यामागे प्रसिद्धी मिळवण्याचा कोणताही हेतू नाही. कारण उपखंडात त्यांचे खूप क्रिकेट चाहते आहेत. त्यामुळे त्यांना हा प्रकार वेगळा आणि आकर्षक वाटेल. शेवटी मला त्यांना पटवून द्यावं लागले आणि त्यानंतर मी हा व्हीडिओ बनवला."

"हा व्हीडिओ बहुतांश लोकांना खूप आवडला. काही लोकांनी यावर आक्षेप घेतले. त्यावर मी एवढेच म्हणेन की, अल्लाहने सर्वांच्या हृदयात मोठेपणा आणि समज द्यावी."

"अल्लाहला माहीत आहे की, माणसांकडूनच चुका होतात आणि तो क्षमाशील आहे. तो प्रत्येकाच्या नियती आणि हेतूला चांगलं ओळखतो आणि योग्य निर्णय घेणारा तोच आहे."

"पृथ्वीवर कोणालाही इतरांवर निर्णय देत बसण्याचा अधिकार नाही. या व्हीडिओमागचा हेतूही अल्लाहला पूर्णपणे माहीत आहे. या व्हीडिओचा उद्देश असा होता की, वसीम अक्रम यांना अशा अंदाजात पाहून अनेक लोक हजला जाण्यास प्रेरित होतील."

हजची कल्पना कशी सुचली?

वसीम अक्रम म्हणतात, "माझे मित्र उस्मान मला मागच्या 3-4 वर्षांपासून हजला जाण्यास सांगत होते. मी त्यांना नेहमी म्हणायचो की, योग्य वेळ आल्यावर नक्की जाईन."

"3-4 महिन्यांपूर्वी मी, मिसबाह आणि फखर यांनी ठरवलं की, यावेळी हजला जायचं. मग मी विचार केला की, आता मी 60 वर्षांचा होत आहे. त्यामुळे हे धार्मिक कर्तव्य पूर्ण करणे आवश्यक आहे."

3 जूनला वसीम अक्रम हे 60 वर्षांचे झाले.

Caption- मीना येथे वसीम अक्रम यांनी बॉलिंगच्या अॅक्शनने सैतानला दगड मारल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

फोटो स्रोत, Bob Levey/Getty Images

फोटो कॅप्शन, मीना येथे वसीम अक्रम यांनी बॉलिंगच्या अॅक्शनने सैतानला दगड मारल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.

वसीम अक्रम म्हणतात, "हा माझ्यासाठी एक खूप चांगला अनुभव होता. हा प्रवास कठीण होता, तरी हज हा अशा कठीण गोष्टी सहन करण्याचाच भाग आहे. मित्रांसोबत हज करणे खूप वेगळा आणि आनंददायी अनुभव असतो. या काळात आपण एकमेकांकडून खूप काही समजून घेतो आणि शिकतो."

हजचे कर्तव्य पूर्ण केल्यानंतर वसीम अक्रम यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर लिहिलं की, त्यांची प्रार्थना आहे की त्यांच्याप्रमाणे अनेक बंधू-भगिनींनीही हा आध्यात्मिक प्रवास करण्याचे धैर्य दाखवावे आणि हज करण्याचे सौभाग्य मिळवावे.

वसीम अक्रम यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते मदिनामध्ये पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या रोजा-ए-मुबारकसमोर उभे आहेत आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू दिसत आहेत.

या फोटोवर लोकांनी प्रतिक्रिया दिली की, ती जागाच अशी आहे की, तिथे कुणीही आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. अशा ठिकाणी डोळ्यात अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)