'म्हातारे झालो आहोत' असं सारखं वाटल्यामुळेही वाढू शकतं तुमचं वय, वाचा कसं

    • Author, मॉली गौरमन
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

वय वाढणं ही भीती नाही, तर एक सुंदर अनुभव आहे. संशोधन सांगतं की, जर आपण वाढत्या वयाकडे आनंदाने पाहिलं, तर आपण केवळ तरुणच वाटत नाही, तर आपलं आयुष्यही वाढतं. पण समाजात असलेल्या वयाबद्दलच्या पूर्वग्रहांना कसं सामोरं जायचं

? चला जाणून घेऊया काही सोपे मार्ग.

वयाबद्दलचे चुकीचे विचार, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका अहवालात असे म्हटले आहे की, आपण वयावरून कोणाबद्दल तरी किंवा स्वतःबद्दलही जे चुकीचे विचार करतो, जो भेदभाव करतो, तो थांबवणे खूप गरजेचे आहे. एक समान आणि चांगला समाज घडवण्यासाठी हा बदल आवश्यक आहे.

वयाबद्दलचे हे चुकीचे विचार सोडून दिले, तर त्याचे आरोग्यालाही फायदे होतात. संशोधनानुसार, यामुळे माणसाला तरुण वाटते आणि आयुष्यही वाढते.

हे खरे आहे की, कोणत्याही वयातील व्यक्तीला या भेदभावाचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ- 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या 'Gen-Z' तरुणांना अनेकदा जुनी पिढी 'आळशी' म्हणून हिणवते. पण, याचा सर्वात जास्त त्रास ज्येष्ठ नागरिकांना होतो आणि म्हणूनच या विषयावरील बहुतेक संशोधन त्यांच्यावरच आधारित आहे.

ब्रिटनमध्ये दर 3 पैकी 1 व्यक्तीला वयावरून होणाऱ्या भेदभावाचा किंवा टीकेचा सामना करावा लागतो. अमेरिकेतील एका अभ्यासात असे दिसून आले की, 50 ते 80 वयोगटातील 2,000 प्रौढांपैकी तब्बल 93% लोकांनी सांगितले की, त्यांना रोजच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे 'वयावरून होणारा भेदभाव' अनुभवावा लागतो. यात सर्वात जास्त प्रमाण हे 'स्वतःबद्दलच्या चुकीच्या विचारांचे' होते, त्यानंतर समाजात वयाबद्दल पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टींचा क्रमांक लागतो.

कॅनडातील 'मॅकमास्टर इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन एजिंग'चे वैज्ञानिक संचालक परमिंदर रैना म्हणतात, "या सगळ्यातली सर्वात मजेशीर गोष्ट म्हणजे, आज जो माणूस वयावरून दुसऱ्याला हिणवतोय, तो स्वतः सुद्धा कधी ना कधी म्हातारा होणारच आहे.

वाढत्या वयाबद्दलचे नकारात्मक विचार आपल्या मनात अगदी लहानपणीच घर करतात. एका संशोधनानुसार, वयाच्या 3 वर्षांपासूनच मुले आपल्या पालकांकडून, टीव्ही-सोशल मीडियाकडून किंवा आजूबाजूच्या लोकांमुळे हे विचार नकळत शिकतात.

म्हणूनच, एका संशोधकाने असे सुचवले आहे की, मुलांना लहानपणापासूनच 'वार्धक्य' म्हणजे काय, हे समजावून सांगायला हवे. यामुळे त्यांना मानवी जीवनाचे चक्र नीट समजेल आणि भविष्यात ते स्वतःच्या वाढत्या वयाकडे सुद्धा एका सकारात्मक नजरेने पाहू शकतील.

खरं तर आपण वाढत्या वयाबद्दल जसं बोलतो, तसंच आपल्याला स्वतःबद्दल वाटायला लागतं आणि त्याचाच परिणाम आपल्या जगण्यावर होतो. आजकाल टीव्ही किंवा सोशल मीडियावर जी भाषा वापरली जाते, ती नकळत आपले विचार बनवत असते.

परमिंदर रैना 'ग्रे त्सुनामी' या शब्दाबद्दल सांगतात. हा शब्द ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या संख्येसाठी वापरला जातो. पण 'त्सुनामी' हा शब्द वापरल्यामुळे असा चुकीचा अर्थ निघतो की, वाढतं वय किंवा ज्येष्ठ नागरिकांची संख्या हे समाजावर आलेलं एखादं मोठं 'संकट' आहे.

त्सुनामी ही एक खूप विनाशकारी आणि भयंकर गोष्ट आहे, पण वाढतं वय म्हणजे काही विनाश नाही. खरं तर, आजच्या आधुनिक आरोग्य सोयी-सुविधांमुळेच माणसं जास्त काळ जगू लागली आहेत हे आपल्या सर्वांचं एक मोठं यश आहे.

म्हणजेच वाढत्या वयाकडे 'संकट' म्हणून न बघता, मानवाने आरोग्याच्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचं ते एक फळ आहे, असं आपण समजायला हवं.

स्वतःलाच कमी लेखण्याची चूक

जेव्हा समाज वयावरून भेदभाव करतो, तेव्हा वृद्ध व्यक्तीही स्वतःबद्दल नकारात्मक विचार करू लागतात. उदाहरणार्थ, एखादी नवीन गोष्ट शिकण्याची क्षमता असूनही, 'आता माझं वय झालंय, मला हे जमणार नाही,' असं समजून ते मागे हटतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. यालाच 'स्टिरिओटाइप एम्बॉडिमेंट थिअरी' म्हणतात. म्हणजेच समाजातील चुकीचे विचार आपण स्वतःमध्ये इतके मुरवून घेतो की त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि रोजच्या कामावर होऊ लागतो.

थोडक्यात सांगायचे तर, आपण स्वतःबद्दल जसा विचार करतो, तसेच आपण बनत जातो.

जर एखाद्या व्यक्तीला 'तुझं वय झालंय' असं वारंवार सांगितलं, तर त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो आणि ती व्यक्ती ते काम नीट करू शकत नाही. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ केंटच्या तज्ज्ञ हॅना स्विफ्ट यांच्या मते, तरुण लोकांशी तुलना होण्याच्या भीतीने आणि समाजाच्या टोमण्यांमुळे मनामध्ये जी चिंता निर्माण होते, त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. त्याचा थेट परिणाम त्यांच्या कामावर होतो.

परमिंदर रैना म्हणतात की, 'सगळी म्हातारी माणसं कमकुवत किंवा आजारी असतात,' हा एक मोठा गैरसमज आहे.

"हे सत्यापासून खूप दूर आहे. बहुतेक ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या घरी स्वतंत्रपणे राहतात, स्वतःची कामं स्वतः करतात आणि समाजसेवेच्या माध्यमातून समाजासाठी मोठं योगदानही देतात."

परमिंदर रैना असं ही सांगतात की, हे खरं आहे की काही ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा थोड्या वेगळ्या आणि गुंतागुंतीच्या असू शकतात. त्यांना आरोग्याच्या मोठ्या समस्या असू शकतात, पण अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. याउलट, स्वतःची कामं स्वतः करणारी आणि एकदम ठणठणीत असणारी मोठी माणसं जास्त आहेत.

एक गोष्ट लक्षात ठेवा, वयाबद्दलचे बहुतेक चुकीचे समज हे समाजानेच बनवलेले आहेत.

वयामुळे आपण काय करू शकतो आणि काय नाही, हे ठरवणारा समाज कोण? जर तुमच्यात इच्छाशक्ती असेल, तर 'शिकण्यासाठी आता तुमचं वय झालंय' हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. ज्ञानाला आणि प्रगतीला वयाचं बंधन कधीच नसतं.

एका संशोधनात असं दिसून आलंय की, तुम्ही मनाने जितके तरुण राहता, तितकेच तुम्ही तरुण दिसता आणि जगता. अमेरिकेत झालेल्या एका 10 वर्षांच्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे की , ज्यांना आपण 'म्हातारे झालो आहोत' असं सारखं वाटतं, त्यांच्या आयुष्यातील समाधान किंवा आनंद हळूहळू कमी होतो. खरंतर माणूस वयाने नाही, तर विचाराने म्हातारा होतो.

वयाबद्दलचे चुकीचे विचार आणि 'आता माझं वय झालंय' ही भावना माणसाला आजारी पाडू शकते. तेव्हा शरीर आणि मन थकल्यासारखं वाटू लागतं. आणि विसरभोळेपणा वाढतो, विचार करण्याची शक्तीही मंदावते. इतकंच नाही, तर यामुळे नैराश्य ,सततची चिंता यांसारख्या मानसिक समस्याही निर्माण होऊ शकतात.

अशा विचारामुळे मोठी माणसं लोकांपासून लांब राहू लागतात आणि कोणात मिसळत नाहीत. मित्र-मैत्रिणींना भेटणं टाळतात. या एकाकीपणामुळे त्यांना समाजातून बाहेर फेकल्यासारखं वाटू शकतं, ज्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य अजूनच बिघडतं.

आम्ही आमच्या संशोधनात वारंवार पाहिलं आहे की, वाढत्या वयातही शरीर आणि स्नायू मजबूत होऊ शकतात. योग्य प्रयत्नांनी मोठी माणसंही खूप सक्रिय आणि फिट राहू शकतात. त्यामुळे माणूस काय करू शकतो याला वयाची कोणतीही मर्यादा नाही. उलट, जे लोक वाढत्या वयाकडे आनंदाने बघतात, ते जास्त काळ जगतात.

येले स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या प्रोफेसर बेक्का लेव्ही यांनी एका संशोधनात असे शोधून काढले की, जे लोक वाढत्या वयाकडे सकारात्मकतेने बघतात, ते इतर लोकांच्या तुलनेत सरासरी साडेसात वर्षे जास्त जगतात. त्या म्हणतात की, हा केवळ अंदाज नसून अनेक देशांमधील संशोधनातून सिद्ध झालेली गोष्ट आहे. त्यामुळे आनंदी राहणे हाच दीर्घायुष्याचा मंत्र आहे.

प्रोफेसर लेव्ही यांना असंही आढळलं की, चांगले विचार केल्यामुळे केवळ आयुष्यच वाढत नाही, तर बुद्धीही तल्लख राहते. आनंदी राहणाऱ्या लोकांमध्ये विसरभोळेपणाचे आजार होण्याचा धोका कमी असतो. त्यांच्या मेंदूचा स्मरणशक्ती वाढवणारा भाग जास्त काळ कार्यक्षम राहतो आणि तो अधिक काळ सुरक्षित राहतो.

"समाज नेहमी ठरवत असतो की कोणत्या वयात काय 'शोभून' दिसतं. मग ते कपडे असोत किंवा फिरण्याच्या जागा.

जर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने तरुणांसारखे कपडे घातले किंवा नाईट क्लबमध्ये गेले तर लोक त्यांना ट्रोल करतात किंवा टोमणे मारतात. हा सुद्धा एक प्रकारचा वयाचा भेदभावच आहे, जो लोकांना त्यांच्या आवडीनुसार जगण्यापासून रोखतो.

50 वर्षांवरील प्रत्येक व्यक्ती एकसारखीच नसते, हे जॅसिंथ बॅसेट कंपन्यांना पटवून देतात. त्यांच्या मते, जाहिरातींमध्ये फक्त पांढऱ्या केसांचे लोक दाखवून चालणार नाही, तर विविध प्रकारच्या ज्येष्ठ व्यक्तींना स्थान दिले पाहिजे. त्यांच्या एका सोशल मीडिया मोहिमेला 4.5 कोटी व्ह्यूज मिळाले, ज्यातून त्यांनी हाच संदेश दिला की 'आपल्या वयानुसार दिसण्यात आणि जगण्यात काहीच गैर नाही.

वेगवेगळ्या पिढ्यांनी एकत्र येऊन एकमेकांचे विचार ऐकले पाहिजेत," असे जॅसिंथ बॅसेट सांगतात. गेल्या 10 वर्षांत या विचारात खूप बदल झाला आहे. आता अनेक ज्येष्ठ महिला इन्स्टाग्रामवर सक्रिय झाल्या आहेत.

संशोधनानुसार, काही वयोवृद्ध महिला इन्फ्लुएन्सर्स आता स्वतःहून पुढे येत आहेत. फॅशन म्हणजे फक्त तरुणांसाठीच असते हा समज मोडीत काढण्यासाठी त्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करत आहेत.

जगातील अनेक संस्कृतींमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठा आदर केला जातो. आशियाई देशांमध्ये 'वडिलधाऱ्यांचा सन्मान' ही एक महत्त्वाची परंपरा आहे. जपानमध्ये तर दरवर्षी सप्टेंबरच्या तिसऱ्या सोमवारी 'ज्येष्ठ नागरिक सन्मान दिन' साजरा केला जातो आणि त्या दिवशी सुटी असते. तिथे 60, 77, 88 आणि 99 व्या वाढदिवसाचे खास सोहळे होतात. आदिवासी जमातींमध्ये तर ज्येष्ठांना 'जिवंत ग्रंथालय' मानले जाते, कारण ते आपल्या अनुभवातून आणि गोष्टींतून पुढच्या पिढीला ज्ञान देत असतात.

वय वाढणं ही खरं तर भाग्याची गोष्ट आहे. हे एक वरदान आहे.

रैना म्हणतात की, आजच्या काळात आपल्याला चांगलं आणि दीर्घ आयुष्य जगण्याची एक मोठी देणगी मिळाली आहे. आपल्याला मिळालेलं हे लांबलचक आणि चांगलं आयुष्य आपण आनंदात घालवायला हवं.

आपण फक्त 'वय झालंय' या विचाराने काळजीत राहिलो, पण विनाकारण वयाची काळजी करत बसून ही मौल्यवान भेट वाया घालवत आहोत.

वयाबद्दलचे चुकीचे विचार दूर करण्यासाठी आपण समाज आणि स्वतःच्या स्तरावर प्रयत्न केले पाहिजेत. विशेषतः आपल्या कुटुंबात आपण कोणाला आदर्श मानतो, हे महत्त्वाचे आहे. 2016 च्या एका अभ्यासात 85% लोकांनी सांगितले की, त्यांच्या पाहण्यात अशी किमान एक व्यक्ती जसे की आई-वडील किंवा आजी-आजोबा आहे, जी वाढत्या वयातही खूप उत्साहाने जगतेय. ज्यांच्यासमोर असे आदर्श असतात, त्यांच्या मनात म्हातारपणाबद्दल भीती किंवा वाईट विचार कमी असतात.

त्यामुळे समाजात बदल घडवण्यापूर्वी आपण आपल्या घरातूनच सुरुवात करायला हवी.

हॅना स्विफ्ट म्हणतात की, "आपल्याला समाजाचे नियम बदलावे लागतील. कोणत्या वयात काय करावं, याचे जे आपण निकष लावले आहेत, ते बदलायला हवेत. यासाठी वेगवेगळ्या वयोगटातील लोकांनी एकमेकांमध्ये मिसळणं गरजेचं आहे." संशोधनात असं दिसलंय की, जेव्हा तरुण आणि ज्येष्ठ माणसं एकमेकांना भेटतात, तेव्हा त्यांच्यातील दुरावा कमी होतो आणि यासाठी काही जास्त खर्चही येत नाही.

जगातील अशा जागा 'ब्लू झोन्स' जिथे लोक 100 वर्ष जगतात, तिथे कुटुंबातील सर्व पिढ्या एकत्र राहतात. या एकत्र राहण्यामुळे कोणालाही एकटं वाटत नाही आणि लोकांची एकमेकांशी नाळ जोडलेली राहते, ज्यामुळे आरोग्य उत्तम राहतं.

जशी मुलांची काळजी घेतली जाते, तशीच मोठ्या माणसांची काळजी घेणे ही सुद्धा समाजाची जबाबदारी आहे. आपला परिसर तरुण आणि वृद्ध अशा दोघांसाठीही सोयीचा असायला हवा.

बेक्का लेव्ही यांनी यासाठी 'ABC पद्धत' सांगितली आहे. 'A' म्हणजे जागरूकता. वाढत्या वयाबद्दल आपल्या मनात किंवा आजूबाजूला कोणते चुकीचे विचार आहेत, हे शोधण्यासाठी एक आठवडाभर ते डायरीमध्ये लिहून काढावेत.

B' म्हणजे नक्की चूक कोणाची आहे, हे ओळखणे. आपण अनेकदा सर्व समस्यांचे खापर 'वाढत्या वयावर' फोडतो, पण खरं तर तो 'वयाबद्दलचा भेदभाव' असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या डॉक्टरने 'तुमचं वय आता खूप झालंय, आता या उपचारांचा काही उपयोग नाही,' असं म्हणून उपचार नाकारले, तर ती वयाची चूक नाही, तर तो डॉक्टर करत असलेला भेदभाव आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे.

C म्हणजे आपल्या मनात असलेल्या चुकीच्या विचारांना आव्हान देणे. आपण नेहमी ऐकतो की, वय झालं की डोकं चालत नाही. पण हा विचार चुकीचा आहे आणि आपण तो मोडीत काढला पाहिजे. पण एका संशोधनात असं आढळलंय की, जर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीने नवीन तंत्रज्ञान किंवा एखादा छंद जोपासला, तर त्यांची लक्षात ठेवण्याची शक्ती वाढते. नवीन कौशल्ये शिकल्यामुळे मेंदू तल्लख राहतो. त्यामुळे शिकण्याला वयाचं बंधन कधीच नसतं.

वयावरून होणारा भेदभाव आज नाही तर उद्या आपल्यालाही सहन करावा लागू शकतो. त्यामुळे या भेदभावाचा लढा हा फक्त मोठ्या माणसांचा नसून आपल्या सर्वांचाच आहे. जर आपण आज ही विचारसरणी बदलली, तर उद्या आपलंही भविष्य अधिक सुखी आणि सन्मानाचं होईल.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.