‘ते म्हणाले माझ्या मेंदूत आग लागली आहे’ एका विचित्र रोगाची कहाणी

सुझॅना कॅहलन

फोटो स्रोत, Susannah Cahalan

फोटो कॅप्शन, सुझॅना कॅहलन
Published

भीतीच्या गर्तेत त्या अडकल्या. असं का झालं याचं काहीच स्पष्टीकरण नव्हतं.

त्यांना आवाज ऐकू यायला लागले. त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं, एका अनामिक भीतीने त्यांच्या शरीराचा ताबा घेतला. त्या वेड्यासारखं वागायला लागल्या, त्यांना सत्य आणि कल्पना यातला फरक कळेनासा झाला. एक विचित्र आजार जणूकाही त्यांच्या शरीराचा ताबा घेत होता.

त्या भेदलेल्या होत्या आणि डॉक्टर गोंधळलेले.

त्यांना अनेकदा फीट आल्या, त्यांच्या रोगाचं अनेकदा चुकीचं निदान झालं. त्यांना न्यूयॉर्कच्या एका दवाखान्यात अॅडमिट केलं गेलं.

त्या काळात त्यांच्या आयुष्यात काय झालं त्याचा त्यांनी स्वतःच्या शब्दात मांडलेला लेखाजोखा.

टाईम्स स्क्वेअर ही न्यूयॉर्कमधली सर्वात गोंधळाची, गर्दीची जागा आहे. इथे भरपूर होर्डिग्स लागलेली असतात, दुकानं आहेत, जेवणाची ठिकाणं आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या माझ्या कार्यालयात जाण्यासाठी मला याच गर्दीतून जावं लागतं.

त्या दिवशी सकाळी मी झगमगणारे होर्डिंग्स आणि गर्दीतून वाट काढत होते, तेवढ्यात माझ्या शरीरात काहीतरी वेगळं घडतंय असं मला जाणवलं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

माझी ऐकण्याची, वास घेण्याची, बघण्याची क्षमता एकदम अनेक पटींनी वाढली असं वाटलं. सगळंच माझ्या अंगावर आलं.

ते झगझगणारे लाईट मला आंधळं करू लागले. फोटोफोबिया नावाचा एक आजार असतो, ज्यात तीव्र प्रकाशामुळे तुम्हाला अंधारी येऊ शकते, फीट येऊ शकते. प्रकाशाप्रति डोळे अतिशय संवेदनशील होतात.

ऑफिसला आल्यावर मी एकदम उत्तेजित झाले होते. मी एकदम वेगाने बोलत होते, अचानक मला माझ्या करियबद्दल भव्य अशा कल्पना सुचल्या होत्या. मी माझ्या संपादकांना बाजूला नेलं आणि त्यांना माझ्या स्वप्नांबद्दल सांगितलं. मी मध्येच काय भलतं करायला लागले असा माझ्या संपादकांना प्रश्न पडला. त्यांनाही कळत नव्हतं की मला काय होतंय.

माझ्या जणू अंगातच आलं होतं. मी एरवी एक उत्साही व्यक्ती आहे, पण हे वेगळंच घडत होतं.

ऑफिसच्या लॉबीतून जात असताना मला वेगळीच भावना जाणवली. न्यूयॉर्क पोस्ट एक मासिक आहे आणि त्याच्या मुखपृष्ठावरच्या वादग्रस्त किंवा वेगळ्या फोटोंसाठी प्रसिद्ध आहे. यातली बरीच मुखपृष्ठ मुख्य लॉबीत फ्रेम करून लावली आहेत.

ती मुख्यपृष्ठ माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहात आहेत असं मला वाटलं. तिथल्या भिंती श्वास घेत आहे आणि छप्पर उडून गेलंय असा भास व्हायला लागला.

सुझॅना यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागलं

फोटो स्रोत, Susannah Cahalan

फोटो कॅप्शन, सुझॅना यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागलं

मी धडपडत लॉबीतून बाहेर पडले. मी कोणत्याही नशेच्या प्रभावाखाली नव्हते. मी माझ्या टेबलाखाली लपून बसले आणि ओक्साबोक्शी रडायला लागले.

एका मैत्रिणीने मला पाहिलं आणि ती ओढतच मला ऑफिसच्या बाहेर घेऊन गेली. तिच्या लक्षात आलं की माझ्या बाबतीत काहीतरी विचित्र घडतंय.

मी नैराश्याच्या गर्तेत अडकले होते. मला बेडवरून उठावसं वाटत नव्हतं, माझं डोकं मंद पडलं होतं, मला काहीच प्रेरणा मिळत नव्हती आणि मी सतत थकलेले असायचे.

काही दिवसांनी मला आणखी भीतीदायक शारीरिक लक्षणं दिसायला लागली.

माझ्या शरीराचा डावा भाग बधीर झाल्यासारखा होता. माझ्या हाताच्या आणि पायांच्या बोटांच्या संवेदना गेल्या होत्या. मला न्युरोलॉजिस्टकडे जावं लागलं आणि काही टेस्ट कराव्या लागल्या. पण सगळ्या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

एके दिवशी माझा बॉयफ्रेंड स्टीफनने मला उठवलं. मी खूप जोरजोरात दात खात होते. त्याने मला हाका मारल्या. माझे हात एकदम ताठ झाले आणि दोन्ही बाजूंना पसरले, जणूकाही मी एखादी ममी किंवा झोंबी झाले होते.

त्याच क्षणी मी गदागदा हलायला लागले. मला फीट आली होती.

स्टीफनने असं काही कधीच पाहिलं नव्हतं. पण त्याने मला कुशीवर झोपवलं. आकडी किंवा फीट आल्यानंतर असं करायचं असतं आणि त्याने 911 (इमर्जन्सी सेवा) ला फोन केला.

एक अँम्ब्युलन्स मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. ओपीडीमध्ये माझ्या आसपास आणखी पेशंट होतं, तिथे अगदी हलकल्लोळ माजला होता.

तिथल्या वातावरणाने माझी भीती आणि मनातली चलबिचल आणखीनच वाढली. मी शुद्धीवर आले तेव्हा माझी खात्री पटली की डॉक्टरांनी माझ्या आजाराचं चुकीचं निदान केलं आहे, आणि मी मरतेय. मी जोरजोरात किंचाळायला लागले. फीट येऊन गेल्यानंतर लोक जसे वागतात त्याच्या अगदी विपरीत हे वागणं होतं.

त्या पहिल्या फीटनंतर माझ्या आयुष्यात खूप काही बदललं.

मी झोपणं बंद केलं. त्याऐवजी मी घरात येरझऱ्या घालत असायचे. एकदा तर माझी आई रात्रीची दचकून उठली कारण मी ती झोपेत असताना मी तिच्या बाजूला तिच्याकडे एकटक पाहात उभी होते.

नंतर नंतर ती मला शेजारी घेऊन झोपायला लागली म्हणजे मी तिला किंवा स्वतःला इजा करणार नाही.

मला आणखी एक नवीन चाळा जडला. मी सतत माझे ओठ एकमेकांवर घासत राहायचे.

हे सगळं सुरू असतानाच मला फीट्स येतच होत्या. मग मी पुन्हा डॉक्टरकडे गेले. त्यांनी मला सांगितलं की माझ्या शरीरात एका विषाणूने प्रवेश केलाय. त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले. त्यातला एक प्रश्न होता – तू दिवसाला किती दारू पितेस? मी उत्तर दिल – रोज दोन ग्लास वाईन पिते.

पण त्या डॉक्टरांनी लिहिलं की मी रोज एक किंवा दोन बाटल्या वाईन पिते. त्यामुळे माझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि भविष्यात मी ज्या डॉक्टरकडे जाणार होते त्यांनाही मी दारूडीच वाटणार होते.

सुझॅना भ्रमिष्ट झाल्या होत्या

फोटो स्रोत, Susannah Cahalan

फोटो कॅप्शन, सुझॅना भ्रमिष्ट झाल्या होत्या

मला वाटणाऱ्या सततच्या अनाठायी भीतीमुळे मी इइजी (मेंदूची एक टेस्ट) करायला गेले. त्या टेस्टच्या रिपोर्टमध्येही काही समोर आलं नाही. ती टेस्ट करणाऱ्या तंत्रज्ञांनी सांगितलं की रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि अशा प्रकारचे रिपोर्ट ती वॉलस्ट्रीटवर (शेअर मार्केटमध्ये) काम करणाऱ्या लोकांमध्ये नेहमीच पाहाते. त्यात काहीही काळजी करण्यासारखं नाही. ‘सगळं तुझ्या डोक्यात आहे’, ती मला म्हणाली.

मी टेस्ट रूममधून बाहेर आहे. बाहेर वेटिंग रूममध्ये माझी आई आणि माझे सावत्र वडील माझी वाट पाहात बसले होते. त्यांना बघून मला खात्री पटली की हा सगळा त्यांचाच डाव आहे. इथे दिसणारे डॉक्टर्स माझ्या आईने आणि सावत्र वडिलांनी आणलेले भाडोत्री नट होते. टेस्टचा बनावही त्यांनीच रचला.

आपल्या आसपासच्या सगळ्याच गोष्टी खोट्या आहेत असं मला वाटायला लागलं.

मला वाटलं की मी किती हुशार आहे की मला काय घडतंय ते नक्की लक्षात येतंय, त्यांचं नाटकही मला कळून चुकलंय. मी काही भोळीभाबडी नाही त्यांना बळी पडायला.

सायकोसिस एक असा आजार आहे ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळे भ्रम होत असतात. कधी कधी तुम्हाला वाटतं तुम्हीच देव आहात आणि तुमच्याकडे सुपर पावर्स आहेत. मलाही तसंच काहीसं वाटायला लागलं होतं. मला वाटत होतं की माझ्या आसपासच्या गोष्टींवर माझं पूर्ण नियंत्रण आहे.

माझ्या आईचं माझ्यावर बारीक लक्ष होतं. ती मला मदत करण्याचा प्रयत्न करायची. ती नेहमी माझ्याच सोबत असायची. पण एकदा तिने म्हटलं की मी माझ्या सख्ख्या वडिलांच्या घरी थोडा वेळ घालवला पाहिजे.

त्यावेळी माझे आणि माझ्या सख्ख्या वडिलांचे संबंध इतके चांगले नव्हते जितके आता आहेत. मी त्यांच्या घरी रहायला गेले, पण त्यांचं घरही मला अनोळखी होतं. त्यामुळे माझ्या सायकोसिसमध्ये आणखीनच भर पडली. मी जास्त विचलित झाले.

त्या घरात रेल्वेचं एक मोठं पेटिंग होतं. त्यातून धूर निघतोय, आणि तो माझ्या दिशेने येतोय असे भास मला व्हायला लागले.

घरात अब्राहम लिंकन यांचा अर्धाकृती छोटासा पुतळा होता. मला वाटत होतं त्या पुतळ्याचे डोळे मी जिथे जाते तिथे माझ्यावर नजर ठेवून आहेत. मग मला आवाज ऐकायला यायला लागले. माझे वडील माझ्या सावत्र ठार आईला मारत होते. मी तिच्या किंकाळ्या ऐकल्या, ती सुटण्याची धडपड करत असल्याचंही मला ऐकू आलं.

पण प्रत्यक्षात असलं काही होत नव्हतं. सगळं माझ्याच डोक्यात चालू होतं. मी ओरडत तीन जिने चढून वर धावत गेले आणि माझ्या बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेतलं.

माझ्या वडिलांनी माझं ओरडणं ऐकलं, त्यामुळे तेही वर आले. त्यांनी बाथरूमचं दार ठोठावलं, पण मी त्यांना आत येऊच देत नव्हते. माझ्या डोक्यात चालू होतं की मी बाथरूममधल्या खिडकीतून खाली उडी टाकावी, म्हणजे मी माझ्या वडिलांपासून वाचेन, नाहीतर माझ्या सावत्र आईसारखं मलाही ते मारून टाकतील.

पण बाथरूममधला एक बुद्धाचा पुतळा माझ्याकडे पाहून हसत होता. त्याचं हास्य पाहून मी शांत झाले आणि खिडकीतून उडी मारली नाही.

पण त्या बाथरूममधून मला बाहेर काढण्यासाठी माझ्या वडिलांना कित्येक तास लागले. मला त्यांचं तोंडही पाहायचं नव्हतं. मी भीतीने चळाचळा कापत होते.

सुझॅना आपल्या आजारातून बऱ्या झाल्या आहेत आणि आता सर्वसामान्य जीवन जगत आहेत

फोटो स्रोत, Susannah Cahalan

फोटो कॅप्शन, सुझॅना आपल्या आजारातून बऱ्या झाल्या आहेत आणि आता सर्वसामान्य जीवन जगत आहेत

अखेर जेव्हा मी बाथरूमच्या बाहेर आले, त्यांनी माझ्या आईला फोन करून सांगितलं की, “आपल्याला आता तातडीने काहीतरी करायला हवं, गोष्टी हाताबाहेर जात आहेत.”

मला पुन्हा दवाखान्यात नेण्यात आलं आणि तिथे पोचल्या पोचल्या मला परत फीट आली.

माझी रवानगी फीट येणाऱ्या पेशंटच्या वॉर्डात झाली. तिथे मी महिनाभर होते.. तो सगळा महिना मी ‘वेड लागणं’ या प्रकारावर रिसर्च करण्यात घालवला.

जगात असतील नसतील तेवढ्या सगळ्या टेस्ट केल्या गेल्या. मला कॅन्सर आहे का, लाईम डिसीज आहे का? ऑटोइम्युन डिसीज आहे का? तपासलं गेलं. सगळे स्पेशालिस्ट डॉक्टर तपासून गेले.

प्रत्येक टेस्ट निगेटिव्ह आली.

पहिले दोन आठवडे मी भ्रमिष्टावस्थेत होते. माझे वडील आणि माझ्या सावत्र आईबद्दल मला जे भास होत होते ते थांबले नाहीत. मला ठामपणे वाटत होते की माझ्या वडिलांनी माझ्या सावत्र आईचा खून केला आहे. मला वाटत होते की वॉर्डातले इतर पेशंट गुप्तहेर होते आणि माझ्याबद्दल माहिती गोळा करत होते.

माझी मानसिक अवस्था बिघडली होती, एकाच वेळी मला प्रचंड भीती, अस्वस्थता, कोणीतरी हल्ला करेल अशी धास्ती वाटत होती, तर दुसरीकडे मला स्वतःत जादूई शक्ती आल्याचा भास होत होता. म्हणजे मी लोकांना तरूण किंवा म्हातारं करू शकते असं मला वाटायला लागलं.

एक फार शक्तीशाली हत्यार माझ्या हातात आलंय असं मला वाटलं.

मल आठवतं, मी एकदा हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या हातात एक स्वीच ऑफ केलेला मोबाईल होता आणि मी डोळे फाडून त्या स्क्रीनकडे पाहात होते.

“माझी बातमी आलीये,” मी किंचाळले. मला वाटलं की टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये मला दाखवत आहेत आणि माझा फोन टॅप होतोय.

मी सलाईनची नळी ओढून काढली, छातीला लावलेल्या यंत्राच्या वायरी तोडल्या आणि पळून जायचा प्रयत्न केला. मी सतत हॉस्पिटलच्या लॉबीत इकडून तिकडे पळत होते. मी नर्सेसला लाथाबुक्क्या मारल्या. शेवटी त्यांनी मला पकडलं आणि माझ्या खोलीबाहेर 24 तास सिक्युरिटी गार्ड ठेवला.

एकेदिवशी मला होणारे भास थांबले, पण त्याची जागा आणखी वाईट गोष्टीने घेतली. मी बोलणं पूर्णपणे बंद केलं. मला चालता येत नव्हतं, मला द्रवपदार्थ गिळताना त्रास व्हायचा. मी एका लाकडी ओंडक्यासारखी ताठ होऊन तासनतास पडून राहायचे. माझे हात वर केलेले असायचे आणि मी अजिबात हालचाल करत नव्हते.

याचं वर्णन डॉक्टरांनी कॅटॅटोनिया असं केलं. पण त्यांचं हे निदानही चुकीच्या दिशेन जात होतं.

डॉ सुहेल नज्जर माझ्या आयुष्यात येईपर्यंत माझ्या आयुष्यात सगळंच चुकीचं होत होतं. सुहेल यांनी माझ्या हातात एक पेन आणि कागद दिला आणि मला घड्याळाचं चित्र काढायला सांगितलं.

मी खूप वेळा गोल गोल गिरवत राहिले. घड्याळाचं वर्तुळ काढायला मला खूप वेळ लागला. मग मी 1 ते 12 असे आकडे लिहायला लागले. त्यालाही खूप वेळ लागला.

अखेरीस माझं घड्याळाचं चित्र काढून झालं. डॉ सुहेल यांनी ते हातात घेतलं आणि त्यांना धक्का बसला. मी 1 ते 12 सगळे आकडे घड्याळाच्या उजव्या बाजूला काढले होते. डावी बाजू पूर्णपणे कोरी होती.

मग डॉक्टरांच्या लक्षात आलं की माझ्या उजव्या बाजूच्या मेंदूत, ज्याने आपल्याला डाव्या बाजूच्या गोष्टी दिसतात, काहीतरी बिघाड झालाय.

मला मानसिक आजार नाही, तर माझ्या मेंदूत काहीतरी बिघडलंय याचा पुरावा मिळाला होता.

डॉक्टरांनी माझ्या आईवडिलांना माझ्या खोलीच्या बाहेर नेलं आणि त्यांचं पहिलं वाक्य होतं, “तिच्या मेंदूला आग लागलीये. तिचं स्वतःचं शरीर तिच्या मेंदूवर हल्ला करतंय.”

मग ते आत आले, त्यांनी माझा हात हातात घेतला आणि म्हणाले, “आपण यावर मार्ग काढू.”

जेव्हा ते म्हणाले की माझ्या मेंदूला आग लागलीये, याचा अर्थ होता की माझ्या मेंदूवर सूज आलीये, त्याची आग आग होतेय. या आजाराची लक्षण स्किझोफ्रेनियासारख्या मानसिक आजारांसारखी असतात, पण त्यांची कारणं शारीरिक असतात.

मला संशय आला की मला एखादा ऑटोइम्युन आजार असावा आणि तो संशय खरा ठरला. त्यावेळी पेन्सिलव्हेनिया विद्यापीठातल्या एका डॉक्टरांनी माझ्या रोगाचं निदान केलं. ऑटोइम्युन इन्सेफलाटिस या आजाराची मी जगातली फक्त 217 वी रूग्ण होते.

माझंच शरीर माझ्या मेंदूतल्या स्मृती, नवीन गोष्टी शिकणं आणि वागणं ही कार्य करणाऱ्या भागांवर हल्ला करत होतं.

जेव्हा माझ्या आजाराचं निदान झालं तोपर्यंत मी ना वाचू शकत होते, ना लिहू शकत होते, ना बोलू शकत होते. मला धड चालताही येत नव्हतं. मला स्टेरॉईड्सची ट्रीटमेंट सुरू झाली.

पण डॉ सुहेल आशावादी होते. त्यांनी मला सांगितलं की योग्य उपचारांनंतर माझ्या 80 ते 90 टक्के सुधारणा होईल.

दीड वर्षांनी मी पुन्हा माणसात परत आले – 100 टक्के.

(या लेखात सुझॅना कॅहलन यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस रेडियोच्या आऊटलूक कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीचा सारांश आहे. सुझॅना यांनी आपल्या अनुभवांवर आधारित ‘माय ब्रेन ऑन फायर’ हे पुस्तकही लिहिलेलं आहे.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)