लष्करात नवीन सैनिकांची भरती करणं हे अमेरिकेसाठी मोठं आव्हान का ठरत आहे?

अमेरिका लष्कर

फोटो स्रोत, Getty Images

Published

7 जानेवारी 1973 रोजी अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांनी घोषणा केलेली की, यापुढे तरुणांनी सशस्त्र दलात भरती होणं अनिवार्य नसून ऐच्छिक असेल.

वयाच्या 19 व्या वर्षात पदार्पण करणा-या अमेरिकन तरुणांसाठी ही अतिशय मोठी बातमी होती.

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आणखी काही महिने गेले. परंतु ड्वाइट एलियट स्टोन ही जून 1973 मध्ये सैन्यात सक्तीने दाखल केली गेलेली शेवटची अमेरिकन व्यक्ती होती.

अशाप्रकारे अमेरिकेत 25 वर्षे लागू असलेला नियम संपुष्टात आला. गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ अमेरिकन लष्कर, हवाई दल, आणि नौदलामध्ये लोकं स्वेच्छेने भरती झाली आहेत.

मात्र गेल्या काही वर्षांत सैन्यात आणि विशेषतः लष्करामध्ये स्वेच्छेने भरती होणा-यांची संख्या कमी झाली आहे.

गेल्या दोन वर्षांत अमेरिकन लष्कराला नवीन सैनिकांच्या भरतीचं आपलं लक्ष्य गाठता आलेलं नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच अमेरिकन लष्करामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सैनिकांची संख्या रोडावली आहे.

या आठवड्यात आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की, अमेरिकन सैन्याला नवीन सैनिकांची भरती करणं कठीण का जातंय?

लोकसंखेच्या 1 टक्के वाटा सैन्यात

अमेरिकन संरक्षण तज्ज्ञ आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या प्राध्यापक नोरा बेन्साहेल म्हणतात की, एकेकाळी असा समज होता की प्रत्येक नागरिकाने युद्धाच्या वेळी देशाचं रक्षण करण्यासाठी लढलं पाहिजे. पण गेल्या 20-30 वर्षांत हा समज बदलला आहे.

त्यांच्या मते, "आता अनेक तरुणांना वाटतं की युद्ध हे त्यांचं काम नसून इतरांचं काम आहे."

परंतु तरूणांना लष्करात भरती करणं कठीण का होत चाललंय? यावर नोरा बेन्साहेल म्हणतात, "लष्कर ही सशस्त्र दलाची सर्वात मोठी शाखा आहे ज्यामध्ये शेकडो प्रकारच्या नोकऱ्या आहेत आणि त्यासाठी देशभरातून लोकांची भरती केली जाते."

"जमिनीवर लढण्याव्यतिरिक्त, हा गट इतर सशस्त्र दलांना देखील मदत करतो. परंतु देशाच्या लोकसंख्येपैकी फक्त 1 टक्के लोकं सैन्यात सामील होतात."

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, अमेरिकेत सैन्यात भरती झालेल्या अनेकांच्या कुटुंबातील इतर सदस्यही पूर्वी सैन्यात होते. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या मते, सैन्यात 80 टक्के लोकं अशी आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी यापूर्वी सैन्यात नोकरी केली आहे.

नोरा बेन्साहेल यांचं असं मत आहे की, फक्त सैन्यात भरती होणा-यांची संख्या कमी झाली आहे हा मुद्दा नसून, मुद्दा हा आहे की पिढ्यानपिढ्या तीच लोक सैन्यात सामील होताना दिसतायत.

म्हणजे देशाच्या एका मोठ्या वर्गाचा लष्कराशी कोणताही संबंध नसतो.

नोरा म्हणतात, "अमेरिकन लोकांना लष्कराविषयीच्या साध्या गोष्टीही समजत नाहीत, त्यामुळे त्यांना लष्कराशी संबंधित गोष्टी समजावून सांगणं अवघड काम आहे आणि त्यामुळे त्यांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रवृत्त करणंही कठीण जातंय."

सैन्यासमोरील अडचणी

अमेरिकन सैन्यासमोरील आणखी एक अडचण म्हणजे देशात सैन्यात भरती होऊ इच्छिणारे आणि ज्यांची पात्रता आहे यांच्यामधील दरी वाढताना दिसतेय.

नोरा यांनी सांगितलं की, "लष्करात भरती होण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. ज्या तरुणांना सामील व्हायचंय, त्यातील अनेकजण निकष पूर्ण करू शकत नाहीत. पात्र उमेदवारांचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चाललाय. गेल्या दोन वर्षांत सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक उमेदवारांपैकी केवळ 29 टक्के उमेदवारच पात्र ठरले आहेत.

परंतु भरती होण्यासाठी इच्छुक आणि पात्र लोकांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणं काय आहेत?

अमेरिका लष्कर

फोटो स्रोत, Getty Images

नोरा यांच्या मते, कोविडच्या साथीचा प्रभाव हेदेखील यामागचं एक कारण आहे.

त्या म्हणतात, “उत्तीर्ण होणा-या उमेदवारांची संख्या आता कमी होतेय. साथीच्या रोगानंतर उमेदवारांची शारीरिक तंदुरुस्तीदेखील कमी झाली आहे."

"दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक आजाराने ग्रासलेल्या लोकांनाही सैन्यात भरती करता येत नाही. उदाहरणार्थ, नैराश्य किंवा चिंताग्रस्त लोकांना सैन्यात भरती करता येत नाही. कोविडच्या साथीपासून लोकांना मोठ्या संख्येने याचा फटका बसला आहे.”

नोरा यांच्या म्हणण्यानुसार, अर्थव्यवस्थेत होणारे बदल हेदेखील तरुणांमध्ये सैन्यात भरती होण्यामागची आवड कमी होण्याचं एक कारण आहे. पूर्वी सैन्यात पगार आणि इतर फायदे खूप जास्त होते.

परंतु नवीन सैनिकांच्या भरतीत झालेली घट भरून काढण्यासाठी सरकार तरुणांना पूर्वीप्रमाणे सैन्यात भरती होणं अनिवार्य करेल याची शक्यता फारच कमी आहे.

संख्येचा खेळ

निवृत्त मरीन कर्नल आणि वॉशिंग्टन स्थित थिंक टँक स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजचे वरिष्ठ सल्लागार मार्क कॅन्सियन यांच्या मते, सैन्यात भरती झालेल्या लोकांवर अमेरिका दरवर्षी 80 कोटी डॉलर्स खर्च करते.

नवीन सैनिकांची भरती करताना कायमच अडचणी यायच्या पण गेल्या काही वर्षात या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तरिही, जगभरात अनेक ठिकाणी मित्र राष्ट्रांना मदत करण्यासाठी अमेरिकन सैन्य तैनात करण्यात आलंय.

अमेरिका लष्कर

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे आणि आपल्या सहयोगी देशांना लष्करी मदत देण्यास कटिबद्ध असल्याचं कॅन्सियन यांचं म्हणणं आहे.

हवाई दल आणि नौदलाचीही यात महत्त्वाची भूमिका आहे, परंतु जमिनीवर लष्कराचं अस्तित्व खूप महत्त्वाचं आहे. अमेरिकन आर्मीचे 76 मोठे लष्करी तळ आहेत, त्यापैकी 58 अमेरिकेत, 12 युरोपमध्ये, 6 पॅसिफिक महासागर क्षेत्रात आणि चार मध्य पूर्वमध्ये आहेत.

युरोपमध्ये 60,000 अमेरिकन सैनिक तैनात आहेत. जपानपासून दक्षिण कोरियापर्यंत मध्यपूर्वेत 10,000 आणि आशियामध्ये 40,000 सैनिक तैनात आहेत.

गरजेनुसार हे सैनिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तैनात केले जातात. सैनिकांची संख्या कमी झाल्यास त्याचा यावर परिणाम होऊ शकतो.

सैनिकांची कमतरता

मार्क कॅन्सियन यांच्या मते, अमेरिकेला 4 लाख 80 हजार सैनिकांची गरज आहे, तर त्यांच्याकडे फक्त 4 लाख 53 हजार सैनिक आहेत.

परंतु या कपातीचा जगातील अमेरिकेच्या लष्करी भूमिकेवर कसा परिणाम होईल?

मार्क कॅन्सियन म्हणाले की, "यामुळे दोन गोष्टी होतील. एक म्हणजे अमेरिकेच्या भूमीवर सैन्याची कमतरता भासेल. दुसरं म्हणजे, अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांसोबत जितके शांततापूर्ण लष्करी सराव करू इच्छित आहे तितके करू शकणार नाही. युद्ध परिस्थितीत हे सराव उपयुक्त ठरतात. दरवर्षी त्यांना या लष्करी सरावांची संख्या कमी करावी लागेल."

अमेरिका लष्कर

फोटो स्रोत, Getty Images

आधुनिक काळातील युद्धात तंत्रज्ञानाची भूमिकाही लक्षणीय ठरतेय. असे अनेक उपक्रम आहेत जे थेट युद्धाशी संबंधित आहेत, परंतु ते युद्ध क्षेत्रापासून खूप दूर बसून राबवले जातात.

याचा अर्थ भविष्यात सैनिकांकडून होणारी अनेक कामं तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करता येतील आणि लष्कराला कमी सैनिकांची गरज भासेल का?

मार्क कॅन्सियन म्हणतात, "बऱ्याच काळापासून अनेकांना असं वाटत आलंय की तंत्रज्ञानावर आधारित अचूक शस्त्रे शत्रूला लक्ष्य करू शकतील, कमी सैनिकांची गरज भासेल आणि युद्धे लवकर संपतील. अनेकवेळा हा समज चुकीचा ठरूनही ही गोष्ट वारंवार समोर येते. युक्रेनमध्ये काय चाललंय आपण पाहतच आहोत की तिथे केवळ तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाहीए तर सैनिक देखील मोठ्या संख्येने जमिनीवर लढतायत."

विश्वासार्हता

सैन्य भरतीमध्ये येणाऱ्या अडचणींपैकी काही कारणं कोरोना साथीशी संबंधित होती कारण साथीच्या काळात शिक्षणावर आणि रोगाचा तरुणांच्या शारीरिक क्षमतेवरही विपरित परिणाम झाला.

पण ड्यूक विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक पीटर फीव्हर म्हणतात की, नवीन ट्रेंड हेदेखील यामागं आणखी एक कारण आहे. अमेरिकन जनतेचं लष्कराविषयीचं मत हेदेखील या समस्येमागचं महत्त्वाचं कारण असल्याचं त्यांना वाटतं.

अमेरिका लष्कर

फोटो स्रोत, Getty Images

ते म्हणतात, "भूतकाळावर नजर टाकल्यास 70 च्या दशकात सामान्य लोकांचं लष्कराविषयी चांगलं मत नव्हतं. 80 च्या दशकात त्यात खूप सुधारणा झाली आणि डेझर्ट स्टॉर्म मोहिमेनंतर लोकांचं मत आणखी चांगलं झालं. 90 च्या दशकाच्या अखेरीस यात घसरण झालेली, पण अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यानंतर सैन्याबाबत लोकांचा दृष्टिकोन पुन्हा सकारात्मक झाला, जो जवळपास गेल्या तीन वर्षांपर्यंत कायम होता.

“त्यामुळे हा ट्रेंड बदलताना दिसतोय आणि तो पुन्हा 70 च्या दशकाची बरोबरी करणार नाही ना, याची चिंता आहे. परंतु परंपरेनुसार पाहिल्यास शांततेच्या काळात सैन्याकडे पाहण्याच्या लोकांच्या दृष्टीकोनात कायम अनिश्चितचा पाहायला मिळाली आहे."

अलीकडच्या वर्षांत, सामान्य लोकांचा लष्कराकडे पाहण्याचा दृष्टीकोन खूपच खराब झालाय. 2018 मध्ये रोनाल्ड रीगन फाऊंडेशनच्या एका संशोधनानुसार, 70 टक्के अमेरिकन लोकांनी सांगितलं की त्यांचा अमेरिकन सैन्यावर खूप विश्वास आहे.

आता फक्त 46 टक्के लोकांचाच लष्करावर विश्वास आहे.

नकारात्मक प्रतिमेचा प्रभाव

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पीटर फिव्हर म्हणतात, "आमच्या देशात आम्ही पाहतोय की लष्कराकडे बघण्याचा दृष्टिकोन खराब होत चाललाय. त्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातंय. देशाच्या सांस्कृतिक चर्चेत हे प्रश्नदेखील उपस्थित केले जाताहेत की देशाच्या लष्करात सर्व वर्ग आणि समुदायातील लोकांचा समावेश आहे का? त्याचवेळी, काही लोक असा प्रश्नही उपस्थित करताहेत की, आपलं सैन्य अधिक 'जागरूक’ म्हणजेच राजकीयदृष्ट्या बरोबर असण्याची चिंता असल्यामुळे सर्व वर्गांचा समान समावेश करण्याकडे त्यांचा अधिक कल आहे का?"

लष्कराशी संबंधित सांस्कृतिक चर्चेचा एक पैलू असाही आहे की, सैन्यात भरती होण्याबाबत स्त्री-पुरुषांची मतं आणि त्यांच्यासाठीची आव्हानंही भिन्न आहेत.

पीटर फीव्हर यांच्या मते, सशस्त्र दलात महिलांचं मोठे आणि विशेष योगदान आहे. परंतु लष्करातील लैंगिक छळाच्या शक्यतेवरून महिलांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

पीटर फीव्हर म्हणाले, "जेव्हा सैन्यात भरती होण्यासाठी संभाव्य उमेदवारांना सर्वेक्षणाचे प्रश्न देण्यात आले, तेव्हा अनेक महिलांनी लैंगिक छळाबद्दल चिंता व्यक्त केली. या समस्येचा सामना करण्यासाठी लष्कर व्यापक पावलं उचलत आहे. परंतु संपूर्ण अमेरिकेकन समाजात महिलांसोबत "लैंगिक गैरवर्तन किंवा लैंगिक छळाची समस्या पाहायला मिळते. त्यामुळे लष्करातही ते दिसून येईल हे उघड आहे."

लष्करात भरतीमध्ये येणाऱ्या अडचणींमागे लैंगिक छळ हेच सर्वात मोठं कारण नाहीए, असं त्यांचं म्हणणं आहे. पण भविष्यात सैन्य भरती करताना यामुळे येणाऱ्या अडचणी आणखी वाढू शकतात.

अशा प्रकारच्या समस्यांमुळे लोकांचा लष्कराकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)