पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वडनगरमध्ये 2800 वर्षं जुन्या वस्त्यांचे अवशेष सापडले

    • Author, टीम बीबीसी गुजराती
    • Role, नवी दिल्ली
  • Published

पंतप्रधान मोदींचे जन्मगाव असलेल्या वडनगरमध्ये 2800 वर्षे जुन्या वस्त्यांचे अवशेष सापडल्याचा दावा करण्यात आला आहे.

अलीकडील उत्खननात शतकानुशतके अखंड सांस्कृतिक सातत्य स्थापित झाल्याचा पुरावा दिसून आला आहे.

पुराव्यांवरून हडप्पा संस्कृतीच्या अधःपतनानंतरच्या 'अंधारयुग'च्या प्रदीर्घ काळ चाललेल्या समजुतीला आव्हान दिले गेले आहे. हे सापडलेले पुरावे वडनगरच्या इतिहासाचे अधिक सखोल चित्र दर्शवतात.

आयआयटी खरगपूर, भारतीय पुरातत्व विभाग, अहमदाबादस्थित भौतिक संशोधन प्रयोगशाळा, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि डेक्कन कॉलेजमधील तज्ज्ञांचे पथक येथे पुरातत्व उत्खनन आणि संशोधन करत होते.

सुमारे 2800 वर्षांपूर्वी वडनगरमध्ये मानवी वस्ती अस्तित्वात असल्याचे त्यांच्या संशोधनातून स्पष्ट झाले.

संशोधनातून काय समोर आले?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), खरगपूर यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, वडनगर येथील पुरातत्व उत्खननाच्या विस्तृत अभ्यासाच्या निकालांनी वडनगरचं प्राचीन अस्तित्व आणि कालांतराने तिची गतिशीलता अधोरेखित केली आहे.

'क्लायमेट, ह्युमन सेटलमेंट अँड मायग्रेशन इन साउथ एशिया फ्रॉम अर्ली हिस्टोरिक टू मिडीव्हल पीरियड: एव्हिडन्स फ्रॉम न्यू आर्कियोलॉजिकल एक्सकॅव्हेशन अॅट वडनगर, वेस्टर्न इंडिया' या शीर्षकाचा शोधनिबंध वडनगरच्या या प्राचीन अवशेषांबद्दल तपशीलवार निष्कर्ष सादर करतो.

उत्खननाचे नेतृत्व एएसआय म्हणजे भारतीय पुरातत्व खाते करत होते तर संशोधनासाठी गुजरात सरकारच्या पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाने निधी दिला होता.

हा अभ्यास 3000 वर्षांच्या कालावधीत वडनगरमधील विविध राजांच्या उदय आणि अस्ताविषयी माहिती सांगतो आणि मध्य आशियाई आक्रमणकर्त्यांनी वारंवार केलेल्या आक्रमणांचा पुरावा देखील देतो.

या संशोधनानुसार, या ऐतिहासिक घटनांमागील प्रेरक शक्ती-म्हणजेच, वडनगर इतके दिवस चैतन्यपूर्ण का राहिले यामागील कारणे- हवामानातील महत्त्वपूर्ण बदल, जसे की पावसातील चढ-उतार किंवा दुष्काळासारख्या घटनाबद्दल माहिती मिळते.

पुढे हा अभ्यास वडनगरच्या सात सांस्कृतिक कालखंडातील म्हणजे वैदिक-बौद्ध कालखंड, मौर्य काळ, इंडो-ग्रीक, शक-क्षत्रप कालखंड, हिंदू सोळंकी काळ, मुघल कालखंड-इस्लामी कालखंड आणि गायकवाड-ब्रिटिश राजवट यांचा आजपर्यंतच्या काळातील सातत्यपूर्ण मानवी वसाहतींशी संबंधित आहे.

या संशोधनातून स्पष्ट संकेत मिळतात की, वडनगरमध्ये झालेल्या बदलांत हवामानाची गेल्या काही वर्षांमध्ये मोठी भूमिका आहे.

वडनगर किती प्राचीन असू शकते?

आयआयटी खरगपूर येथील भूविज्ञान आणि भूभौतिकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अनिंद्य सरकार यांनी वडनगरमध्ये सापडलेल्या अवशेषांची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली .

ते म्हणाले, “आम्ही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) सोबत गेल्या चार-पाच वर्षांपासून येथे काम करत आहोत. एएसआय प्राचीन काळी किती आणि कोणत्या प्रकारच्या वसाहती असाव्यात हे शोधण्याचा प्रयत्न करत होते, त्याशिवाय पीआरएल-अहमदाबाद, जेएनयू, डेक्कन कॉलेज यांसारख्या संस्थाही वडनगरमध्ये बराच काळ संशोधन करत होत्या.

ते पुढे म्हणतात, “येथे एक अतिशय प्राचीन बौद्ध मठही सापडला आहे. 2016 पासून, एएसआयने येथे खोल खनन करण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे 20 मीटर खोल खणले. ज्यामध्ये सात संस्कृतींचे अवशेष सात युगांचे अस्तित्व सिद्ध करणारे सापडले आहेत."

"सर्वात जुने अवशेष 2800 वर्षे जुने म्हणजे इसपू 800चे असल्याचा अंदाज आहे. आमच्या प्राथमिक अंदाजानुसार वडनगर हे अंदाजे 3500 वर्षे जुने शहर असावे.”

एएनआयशी बोलताना पुरातत्व पर्यवेक्षक मुकेश ठाकोर म्हणाले, “पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2005 पासून वडनगरमध्ये पुरातत्व उत्खनन आणि संशोधन सुरू आहे. आतापर्यंत एक लाखाहून अधिक जीवाश्म सापडले आहेत.

ते म्हणतात, “हे शहर इतके दिवस टिकून राहण्याचे कारण म्हणजे तिची जलव्यवस्थापन व्यवस्था आणि जमिनीतील पाण्याचे चांगले स्रोत. वेळोवेळी येथे शेती व इतर व्यवसाय विकसित होत गेले आहेत. वडनगरमध्ये आतापर्यंत 30 ठिकाणी उत्खनन करण्यात आले आहे. या अवशेषांवरून हे सिद्ध होते की बौद्ध, जैन आणि हिंदू येथे एकोप्याने राहत होते.”

वडनगरमध्ये उत्खनन कधी सुरू झाले? आतापर्यंत काय मिळाले?

भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर हडप्पा, मोंहे-जो-दडो, तक्षशिला, पुष्कलावती ही पुरातत्व स्थळे पाकिस्तानात गेली.

1953 च्या सुमारास डॉ. बी. सुब्बाराव यांच्या नेतृत्वाखाली वडनगर येथे उत्खनन सुरू करण्यात आले. प्राथमिक उत्खननात लक्षणीय अवशेष मिळाले, जे येथे बौद्ध वस्ती असल्याचे सूचित करतात.

मात्र, दाट लोकसंख्येमुळे तेव्हा उत्खनन शक्य नव्हते. 1992 मध्ये वडनगर येथील माळवाडी तलावाजवळ शेतात नांगरणी करताना विचारवंताची मूर्ती सापडली, त्यामुळे तेथे भरपूर इतिहास दडला आहे, अशी आशा निर्माण झाली, पण त्यात यश आले नाही.

1 मे-1949 रोजी तत्कालीन बडोदा संस्थान मुंबईत विलीन झाले, अशा प्रकारे मेहसाणा जिल्हा आणि वडनगर तत्कालीन मुंबई राज्याच्या अंतर्गत आले.

1 मे-1960 रोजी बॉम्बे राज्याचे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये भाषेच्या आधारावर विभाजन करण्यात आले तेव्हा गुजराती भाषा बोलली जात असल्याने वडनगरचा गुजरातमध्ये समावेश करण्यात आला.

त्यानंतर 2006 ते 2012 या कालावधीत राज्य सरकारच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून वडनगरमध्ये उत्खनन करण्यात आले. 2003 पासून वडनगरमध्ये 'ताना-रिरी' संगीत महोत्सव आयोजित केला जातो. याशिवाय येथे नियमितपणे पुरातत्व उत्खनन आणि संशोधनावर चर्चासत्रे होतात.

नरेंद्र मोदी 2014 मध्ये देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर, एएसआय ने 2014 ते 2021 या काळात वडनगर येथे पुन्हा खोदकाम केले.

एएसआयचे पुरातत्वशास्त्रज्ञ अभिजित आंबेकर म्हणतात, "जेव्हा आम्ही उत्खननाच्या जागेपासून 20 मीटर खोल पोहोचलो तेव्हा पाणी लागले. मोटारच्या साह्याने पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु तिथला भाग कोसळल्यामुळे काम पुढे जाऊ शकले नाही.

जेव्हा शास्त्रज्ञांना 'अस्पर्श्य मृदा'' (व्हर्जिन सॉईल) सापडते तेव्हा ती पहिली मानवी वस्ती आणि संशोधन करण्यायोग्य सामग्री शोधणारा शेवटचा थर असल्याचे मानले जाते. यासाठी शास्त्रज्ञांनी कोर-सँपल बोरिंगे करण्याचा निर्णय घेतला."

आंबेकर पुढे म्हणतात, "जेव्हा वडनगरमधील सर्वांत उंच ठिकाण असलेल्या मानता दरबारगढजवळ माती परीक्षणासाठी ड्रिलिंग करण्यात आले आणि वेगवेगळ्या थरांमधून नमुने घेण्यात आले. मातीची भांडी आणि विटांचे नमुने पाण्याच्या खाली 24 मीटर खोलीवर आढळले. 25 मीटरवर अवशेष सापडले. आणि व्हर्जिन सॉइल सापडली. त्यात वडनगरचा इतिहास सुमारे दोन हजार 750 वर्षांपूर्वीचा आहे."

सध्याचे वडनगर हे इंग्रजी अक्षर 'L' च्या आकारात वसलेले आहे. त्याच्या इमारती आणि हवेल्यांवर मध्ययुगीन प्रभाव दिसून येतो. शर्मिष्ठा तलाव त्याच्या ईशान्येला आहे.

अर्जुनबारी, नाडीओल, आमटोल, घासकोल, पाथोरी आणि अमरथोळ हे शहराचे सहा दरवाजे होते. त्यापैकी चार दरवाजांना एएसआयचे संरक्षण आहे. एएसआयची उत्खननाची ठिकाणे लोकांसाठी खुली करण्याची योजना आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)