'आई भेटली तर तिला कडकडून मिठी मारेन'; स्वीडनची पॅट्रीशिया आईला शोधण्यासाठी नागपुरात

पॅट्रिशिया
    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published

''मी 6 वर्षांची असताना पहिल्यांदा शाळेत गेले. तेव्हा शाळेतील मुलं म्हणायचे ते त्यांच्या आईसारखी दिसतात, कोणी म्हणायचं ते त्यांच्या बाबांसारखे दिसतात. कोणी म्हणायचं त्यांचे डोळे आईसारखे आहेत.

"हे सगळं ऐकून घरी गेल्यानंतर मी आई-बाबांकडे बघायचे आणि नंतर स्वतःकडे बघायचे. माझा रंग, केस, डोळे सगळं त्यांच्यापेक्षा वेगळं होतं. आमच्यामध्ये कुठल्याच गोष्टी जुळत नव्हत्या. तेव्हाच मला वाटलं की मी कोणीतरी वेगळी आहे. मी त्यावेळी आई-बाबांना विचारलं, पण त्यांनी मला काहीही सांगितलं नाही.''

हे सांगताना 41 वर्षीय लेकीचा कंठ दाटून आला. कारण, ही लेक स्वीडनवरून महाराष्ट्राची उप-राजधानी नागपुरात आपल्या जन्मदात्या आईच्या शोधात भटकत आहे.

पॅट्रीशिया इरिकसन्स असं या महिलेचं नाव असून तिचा जन्म 24 फेब्रुवारी 1983 मध्ये नागपुरातील डागा हॉस्पिटलमध्ये झाला होता.

या रुग्णालयातील सोशल वर्करने मार्च महिन्यात त्यांना श्रद्धानंद आश्रमात पाठवलं होतं. तिथे तिची आई एक महिना सोबत राहिली. पण, चार मार्चला मुलीला आश्रमात ठेवून निघून गेली. त्यानंतर पॅट्रीशिया एक वर्षांची होताच स्वीडिश दाम्पत्यानं तिला दत्तक घेतलं. तेव्हापासून तिच्या स्वीडिश माता-पित्यानेच तिचं संगोपन केलं.

आईला शोधण्याचा प्रयत्न कसा सुरू केला?

स्वीडनच्या आई-वडिलांनी संगोपन केलं. तिला चांगलं शिक्षण दिलं. त्यानंतर पॅट्रीशिया नर्स म्हणून काम करू लागली. आपली खरी आई कुठं असेल? जिवंत असेल का? हा विचार मनात येतच होता.

पण, आईला कसं शोधायचं हे तिला समजत नव्हतं. स्वीडनच्या अॅडॉप्शन एजन्सीकडे चौकशी केली. पण, त्याचाही फायदा झाला नाही.

पॅट्रीशिया

फोटो स्रोत, Patricia

फोटो कॅप्शन, पॅट्रीशिया

याच काळात तिचं लग्न झालं. तिला एक मूल झाल्यानंतर परत तिला तिच्या आईची आठवण येऊ लागली. त्यानंतर तिनं आपल्या आईला शोधून काढायचं ठरवलं.

पॅट्रीशिया दत्तक नोंद असलेली कागदपत्रं घेऊन 2022 मध्ये पहिल्यांदा भारतात आली. तिनं थेट नागपूर गाठलं.

पण, त्यावेळीही काही मदत मिळू शकली नाही. त्यानंतर पुण्यातल्या अॅडॉप्टी राइट्स कौन्सिलच्या संचालिका अॅड. अंजली पवार यांच्याकडे मदत मागितली. तेव्हापासून अॅड. पवार आणि पॅट्रीशिया तिच्या आईला शोधायचा प्रयत्न करत आहेत.

पॅट्रीशिया आईच्या शोधात दुसऱ्यांदा नागपुरात आली

पॅट्रीशिया आईच्या शोधात रविवारी 31 मार्चला पुन्हा नागपुरात आली. यावेळी अंजली पवार देखील त्यांच्यासोबत होत्या.

पॅट्रीशिया

फोटो स्रोत, Patricia

फोटो कॅप्शन, पॅट्रीशिया

त्या सांगतात, श्रद्धानंद आश्रममध्ये जाऊन रेकॉर्ड तपासले. त्यावेळी शांता रामदास आणि शांता रामचंद्र अशी दोन नावं भेटली. पण, शांता रामचंद्र या महिलेला आम्ही शोधून काढलं. तिच्यासोबत पॅट्रीशियाचा कुठंही संबंध आढळून आला नाही.

आता दुसरी महिला शांता रामदास त्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्रद्धानंद आश्रममध्ये तिच्या आईचा उल्लेख अविवाहित असून डागा रुग्णालयाच्या रेकॉर्डवर वाईफ ऑफ रामदास असं लिहिलंय. त्यामुळे शांता रामदास या महिलेला शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पॅट्रीशिया

फोटो स्रोत, Patricia

फोटो कॅप्शन, पॅट्रीशिया

शांता रामदास इतक्या नावावरून आम्हाला पॅट्रीशियाच्या आईला शोधायचं आहे. ही नावं कुठंही असू शकतात. ज्यांना त्यावेळचं प्रकरण माहिती असतं तेच याबद्दल माहिती देऊ शकतात.

कागदपत्रावरील पत्त्यानुसार नागपुरातल्या शांतीनगर परिसरातही तिचा शोध घेतला. पण, आतापर्यंत तिला तिची खरी आई भेटली नाही. ती शुक्रवार 6 एप्रिलपर्यत तिच्या आईला शोधणार आहे.

त्यानंतर स्वीडनला परत जाणार असल्याचं अॅड. अंजली पवार यांनी सांगितलं. त्यानंतर अंजली पवार पॅट्रिशिया यांच्या आईला शोधण्याचं काम करतील.

'आई भेटली तर तिला मिठी मारेन'

"माझी आई मला भेटावी याची वयाच्या सहाव्या वर्षांपासून मी वाट पाहत आहे. पण, मला माझ्या सख्ख्या आईची माया भेटली नाही. मला माझ्या आईला डोळेभरून बघायचे आहे. आता माझी आई भेटली तर मी तिला मिठी मारेन. तिला मारलेली मिठी मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.

कारण, आईच्या मायेत जी ऊब मिळते ती कुटुंबात इतर कोणीही देऊ शकत नाही. आईच्या मिठीत जो आनंद असतो तो कुटुंबातल्या इतर व्यक्तीकडून मिळत नाही," हे सांगताना पॅट्रीशियाचा आवाज जड झाला होता.

अंजली पवार यांची संस्था नाळ जुळलेल्या आईला कसं शोधतात?

अंजली पवार यांची पुण्यात अडॉप्टी राईट कौन्सिल ही संस्था आहे, तसेच नेदरलँडमध्ये याच संस्थेची Against Child Trafficking ही संस्था आहे ज्याचे संचालक अरुण दोल्हे आहेत.

अंजली आणि अरुण दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून दत्तक मुलांची त्यांच्या खऱ्या आई-वडिलांसोबत भेट घालून देण्याचं काम करतात. दत्तक मुलांच्या हक्कासाठी ही संस्था काम करते. पण, अशा प्रकरणात खऱ्या आई-वडिलांचा कसा शोध घेतला जातो?

अरुण दोल्हे

फोटो स्रोत, Patricia

फोटो कॅप्शन, अरुण दोल्हे

याबद्दल अंजली पवार सांगतात, "Adoptee rights Council कडे प्रकरण येतं तेव्हा प्रक्रियेनुसार सेंट्रल अडॉप्शन अथॉरिटीकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. दत्तक मुलांनी काही माहिती दिली असेल तर कोणत्या संस्थेकडून दत्तक दिलं गेलं याविषयी माहिती काढतो.

"त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर दत्तक मुलांच्या आई-वडिलांना शोधत असतो. आई अविवाहित असेल तर प्रकरण गुपित ठेवून गुपचूप आई-मुलांची भेट घालून देतो. पण, काही प्रकरणात कुठलीच माहिती उपलब्ध होत नाही.

"अशा प्रकरणात तुटपुंज्या माहितीवर, दत्तक कागदपत्रांच्या नोंदीवरून त्यांच्या खऱ्या आई-वडिलांना शोधण्याचा प्रयत्न करतो. पण ही प्रक्रिया वेळखाऊ असली तरी काही वर्षांनी यश मिळतं," पवार सांगतात.

पॅट्रीशिया तिच्या स्वीडिश पालकांबरोबर

फोटो स्रोत, Patricia

फोटो कॅप्शन, पॅट्रीशिया तिच्या स्वीडिश पालकांबरोबर

अंजली पवार आणि अरुण दोल्हे यांनी आतापर्यंत 80 प्रकरणं हाताळली आहेत. काही प्रकरणांमध्ये त्यांना यश आलं.

हे सांगताना पवार त्यांना आलेले अनुभव सांगतात, "अशा प्रकरणांमध्ये दत्तक मुलांची आईसोबत भेट घालून देतो. प्रत्येक आईलाही आपल्या मुलाला भेटायचं असतं. पण,अनेक प्रकरणात आई चोरून भेटण्याचा प्रयत्न करतेय. कारण, तिच्या सुरू असलेल्या आयुष्यावर कुठलाही परिणाम होऊ नये. त्यासाठी आम्हीही प्रकरण पुरेपुर गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न करतो."

अनेक प्रकरणांमध्ये आपल्याला यश आल्यामुळे या वेळी देखील असं यश मिळून आपण माय-लेकींची भेट घडवून आणू असा विश्वास अंजली पवार यांनी व्यक्त केला.