महाराष्ट्रात ठिकठिकाणी गारपीट, अकोल्यात मंदिराचं शेड कोसळलं, 50 जण अडकले, 6 जणांचा मृत्यू #5मोठ्याबातम्या

आज दिवसभरात विविध वृत्तपत्रं तसंच वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा असा..
1. अकोल्यात पावसामुळे मंदिराच्या शेडवर झाड कोसळले, 6 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वारे सुरू आहेत. अकोला जिल्ह्यातल्या पारस गावात अवकाळी पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.
इथल्या एका मंदिराच्या शेडवर झाड कोसळले. या शेडमधील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली 40-50 लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.
बाळापूर तालुक्यातील पारस गावात बाबूजी महाराज संस्थानामध्ये सायंकाळीची आरती सुरू होती. मंदिराला लागून असलेले मोठे कडुलिंबाचे झाड अचानक उन्मळून टिनशेडवर कोसळले. शेडखाली असलेले सर्व लोक दबले गेले. या घटनेत आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. 40 ते 50 जण पूर्णपणे दबले होते.
पाऊस आणि वारा यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळा येत आहे. जेसीबी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. माहिती मिळताच बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात पुणे, नाशिक, बुलढाणा, अकोला, हिंगोलीसह अनेक भागात जोराचा पाऊस झाला आहे.
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी हवामान विभागानं यलो अलर्ट दिलेला आहे.
2. ‘दादा पळून जाऊ का?’ या प्रश्नावर रोहित पवारांनी दिलं उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी ट्विटरवर #AskRohitPawar हा ट्रेंड सुरू केला होता. या दरम्यान लोकांनी त्यांना अनेक वैयक्तिक प्रश्नही विचारले, आणि रोहित पवारांनी त्यांना उत्तरं दिलं.
मात्र रोहित पवारांचं एक उत्तर व्हायरल होतंय.
ट्विटरवरील एका तरुणीने रोहित पवारांना आगळावेगळा प्रश्न विचारला. तिने तिचं एका मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याचा खुलासा केला. तसेच आम्ही पळून जाण्याचा निर्णय घेतला असून तुमच्या मते मी काय करावं? असा प्रश्न संबंधित तरुणीने रोहित पवारांना विचारला.
यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, “पळून जाण्यासाठी आई-वडिलांनी सहमती दिली असेल तर ते म्हणतात तसं नक्की करा.”
ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.
3. आज देशभरात कोरोना मॉकड्रिल
देशात कोरोनाच्या केसेस हळूहळू वाढायला लागल्या आहेत. 7 एप्रिलला संपलेल्या आठवड्यात देशभरात दररोज सरासरी 4188 केसेस आढळून येत होत्या. हीच सरासरी 17 मार्चला संपलेल्या आठवड्यात दररोत 571 इतकी कमी होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्या पार्श्वभूमीवर सोमवार, 10 एप्रिल आणि मंगळवार 11 एप्रिल रोजी देशभरात कोरोना मॉकड्रिल होणार आहे.
ही बातमी टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामाग्री रुग्णालयात आहे की नाही याची खात्री केली जाणार आहे.
मुंबईत सकाळी 11 वाजता जे जे रुग्णालयात, दुपारी 12 वाजता सेंट जॉर्ज रुग्णालय तर दुपारी 1 वाजता बॉम्बे रूग्णालयात मॉकड्रील होणार आहे.
4. बारावीची परीक्षा होणार दोनदा; नववी, अकरावीच्या परीक्षेतही बदल
दहावी आणि बारावीच्या वार्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांमध्ये आता आधीच्या वर्षाचे गुण मिळवले जाणार आहेत. तसेच सीबीएसई सारख्या केंद्रीय मंडळाच्या परीक्षा पद्धतीत समन्वय साधून बारावीची परीक्षा दोनदा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. त्यासाठी नवीन शिक्षण धोरणानुसार राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम मसुदा सरकारने तयार केला आहे.
ही बातमी लोकमतने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मसुद्यात अनेक प्रकारच्या नवीन शिफारसी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नवीन मूल्यांकन पद्धती विकसित केल्या जाणार आहेत. तर पदवीच्या अभ्यासक्रमातही अमुलाग्र बदल केले जाणार असून, नवीन पद्धतीत विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे मुभा मिळणार आहे.
या नव्या शिफारशीत देशभरात वर्षं 2023-24 च्या दहावी बारावीच्या परीक्षेपासून सीबीएसई मंडळाच्या परीक्षा मूल्यांकन पद्धतीत बदल केले जाणार आहेत. त्यात लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्नांचे महत्त्वही कमी केले जाणार असून, सुमारे 50 टक्के प्रश्नपत्रिका ही बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित असेल.
5. चंद्रपुरात पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; 2 ठार, 4 जखमी
चंद्रपूरमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. नागभीड तालुक्यातील सातबहिणींचा डोंगर येथील ही घटना आहे.
अशोक मेंढे आणि गुलाबराव पोचे असं मृतांचं नाव असून, त्या दोघांचं वय अंदाजे 60 वर्षं आहे. मधमाशांनी अचानक हल्ला केला. हा डोंगर उतरण्यासाठी अतिशय अवघड असल्यानं ते डोंगर उतरू शकले नाहीत आणि या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
ही बातमी न्यूज18 लोकमतने दिली आहे.
नागभीड तालुक्यात सातबहिणीचा डोंगर म्हणून एक ठिकाण आहे. या डोंगरावर महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. मात्र या डोंगरावर मोठ्याप्रमाणात मधमाशांची पोळी आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























