मुंबई महापालिकेची प्रभागसंख्या 226, ठाकरे गटाच्या याचिका फेटाळल्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा.
1. मुंबई महापालिकेची प्रभागसंख्या पूर्ववत, ठाकरे गटाच्या याचिका फेटाळल्या.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली प्रभागसंख्या 236 वरून पुन्हा 227 करण्याबाबतच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळल्या. या याचिकांमध्ये ठोस असे काही नाही, असे नमूद करून न्यायालयाने या याचिका फेटाळत असल्याचे जाहीर केले. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर आणि समीर देसाई यांनी वकील जोएल कार्लोस आणि देवदत्त पालोदकर यांच्यामार्फत याचिका करून शिंदे सरकारच्या प्रभाग संख्या कमी करण्याच्या निर्णयाला, तसेच त्याआधारे करण्यात आलेल्या कायद्याच्या वैधतेला आव्हान दिले होते.
न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्या खंडपीठाने सोमवारी या याचिकांवर निर्णय देताना त्या फेटाळल्या.
2. पिंपरी चिंचवड भागात होर्डिंग कोसळून पाच जणांचा मृत्यू
पिंपरी चिंचवड भागात होर्डिंग कोसळल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. पुण्याला लागून असलेलल्या किवळे गावात होर्डिंग कोसळल्याने पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई- पुणे-बंगलोर दृतगती महामार्गावर हे होर्डिंग लावण्यात आलं होतं. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.
पिंपरी चिंचवड भागात काल (17 एप्रिल) ला वादळी वाऱ्यांसह अचानक पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे काही जणांनी होर्डिंगचा आधार घेतला. त्याचवेळी होर्डिंग कोसळल्याने ही घटना घडली.
मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
3.शरद पवार यांच्या परवानगीनेच अजित पवार भाजपमध्ये जाणार- रवी राणा

फोटो स्रोत, Facebook
अजित पवार 33 महिन्याच्या सरकारला कंटाळले होते, त्यांचा श्वास तिथे गुदमरत होता. असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर अजित पवार यांचा विश्वास आहे. शरद पवार यांच्या परवानगीनेच अजित पवार भाजपमध्ये जाणार आहे असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. लोकमतने ही बातमी दिली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याविषयी सध्या वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपमध्ये जाणार आहे अशीही चर्चा सध्या सुरू आहे.
4. काँग्रेस ठाकरे गटातील मतभेद दूर- उद्धव ठाकरे
"सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात ताणलेले संबंध काँग्रेस नेते के.सी.वेणुगोपाल आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे संपुष्टात आले आहेत. दोन्ही पक्षांमधील गैरसमज दूर झाले असून लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेससह सर्व विरोधीपक्षांबरोबर शिवसेनाही मैदानात उतरली आहे," असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.
लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.
काँग्रेस शिवसेनेच्या पाठीशी आहे. तसंचे शिवसेनाही मैत्रीचे योग्य नाते निभावते असं वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. व
वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्लीला येण्याचं आमंत्रण दिलं असून सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेण्याचं आवाहन केलं आहे. हे निमंत्रण स्वीकारल्याचे संकेत ठाकरे यांनी दिले आहेत.
5. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचा भाजपला रामराम, काँग्रेसमध्ये प्रवेश

फोटो स्रोत, PTI
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सहा वेळा आमदार राहिलेले जगदीश शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीचं तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपशी 30 वर्षाहून अधिक असलेले संबंध तोडले. माजी मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यानंतर पक्ष सोडून जाणारे ते दुसरे नेते आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
कर्नाटकच्या धारवाड मतदारसंघातून ते सहा वेळा आमदार आहेत. मात्र त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं. आता काँग्रेस पक्ष त्यांना याच मतदारसंघातून तिकीट देणार आहे.
शेट्टार यांचे भाजपश्रेष्ठींशी टोकाचे मतभेद झाले होते.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























