बॅगेत सापडले संगीतकाराच्या मृतदेहाचे तुकडे, स्वेटरमुळे शोधला 'दत्तक' गुन्हेगार

फोटो स्रोत, UGC
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
(राज्यातील काही अत्यंत अवघड वाटणाऱ्या गुन्ह्यांचा पोलिसांनी गुंता कसा सोडवला याबाबत बीबीसी मराठीवर गुन्ह्यांची गोष्ट या मालिकेद्वारे काही घटनांची माहिती देत आहोत. त्यात मुंबईत 2019 मधील एका घटनेची ही कहाणी.)
मुंबईत माहीमच्या समुद्रकिनारी 2019 मध्ये एका बॅगेत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.
संशयास्पद बॅग वाहून किनाऱ्यालगत आल्याचे स्थानिक मच्छिमार आणि सागरी वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले होते.
बॅगेची झडती घेतली असता त्यात एक मृतदेह सापडल्याने गोंधळ उडाला.
याप्रकरणी माहीम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला याप्रकरणी बॅगेमध्ये सापडलेले अवयव यावरून मृतदेह कोणाचा याची ओळख पटली नव्हती.
अखेर पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर मिठी नदीमध्ये आणखी दोन बॅगा सापडल्या. त्यात मृतदेहाचे इतर अवयव होते. त्यांनंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत एका लहानशा पुराव्याच्या आधारे या हत्येची उकल केली होती.
हे प्रकरण नक्की काय होतं?
2 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळची सहा ते साडेसहा दरम्यानची वेळ होती. माहीम समुद्रकिनारी मखदूम शहा बाबा दर्गा परिसरामध्ये समुद्रकिनारी एक बॅग वाहून आल्याचं पाहायला मिळाले.
स्थानिक मच्छिमारांनी ही बॅग पाहिली, अन् सागरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
यानंतर घटनास्थळी परिसरातले स्थानिक मच्छिमार आणि पोलीस पोहोचून या बॅगेबाबत चौकशी केली होती.
काही वेळाने पोलिसांनी बॅग उघडली तर बॅगेमध्ये काही मानवी अवयव आढळले. पोलिसांनी लगेच फॉरेन्सिक टीमला बोलावले. या घटनेसंदर्भात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
या बॅगेत एक हात, एक पाय आणि गुप्तांगाचे तुकडे होते. हे सर्व अवयव एका लाल स्वेटरमध्ये गुंडाळलेले होते. हा स्वेटर या प्रकरणातील तपासासाठी फार महत्त्वाचा ठरला.
तीन बॅगांमध्ये अवयव सापडले
त्यानंतर तपासासाठी पोलिसांनी विविध पथकं नेमली. बॅगेत सापडलेले साहित्य, गुप्त बातमीदार, आजूबाजूच्या परिसरात असलेले सीसीटीव्ही आणि संशयितांना याप्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी केली.
स्वेटरवर असलेल्या माहितीनुसार पोलीस काही ठिकाणी शोध घेत होते.
त्यातच पोलिसांना आणखी एक बॅग वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरातील खाडीमध्ये सापडली. या बॅगेत एक हात आणि अवयवाचे इतर भाग होते.
मात्र, दुसऱ्या बॅगमध्ये मृतदेहाचे आणखी काही अवयव त्यात नव्हते. त्यामुळे पोलीस या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शोध घेत इतर भागांचाही तपास करत होते.

फोटो स्रोत, UGC
अखेर गुरुवारी प्रभादेवी परिसरामध्ये पोलिसांना तिसरी बॅगही सापडली. त्यात या मृतदेहाचे इतर अवयव पोलिसांना सापडले. अशा एकूण तीन बॅगमध्ये एका मृतदेहाचे वेगवेगळे अवयव पोलिसांना सापडले.
आता जवळपास सर्व अवयव सापडले होते, पण तो मृतदेह कोणाचा आणि त्या व्यक्तीची हत्या कोणी केली असेल? याचा उलगडा होत नव्हता.
सापडलेल्या बॅगेतील पुराव्यानुसार पोलीस दिवसरात्र या प्रकरणी मृतदेह कोणाचा याबाबत विविध दिशांनी तपास करत शोध घेत होते.
अखेर एका बॅगेत सापडलेल्या स्वेटरवरून पोलीस त्या स्वेटरच्या दुकानाचा शोध घ्यायला लागले.
स्वेटरवरून सापडला टेलर
बॅगेत सापडलेला स्वेटर हा ALMO Men's Wear या नावाने होता. हे दुकान मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये होते.
पोलिसांनी याप्रकरणी दुकानदाराकडे स्वेटरबद्दल चौकशी केली. त्यात या दुकानदाराने कपडे घेऊन जाणाऱ्या ग्राहकांच्या माहितीसाठी 100 पेक्षा अधिक पावती बूक तपासले. त्यात एका पावती पुस्तिकेत या स्वेटरबद्दल अधिक माहिती सापडली.
हा स्वेटर पोलीस पोहोचलेल्या त्याच दुकानदाराने शिवून दिला होता.
स्वेटर बेनेट रिबेलो या नावाने घेण्यात आला होते. हा तपकिरी रंगाचा स्वेटर होता. मात्र दुकानदाराकडे सापडलेल्या पावतीमध्ये बेनेट रिबेलो याचा फोन नंबर किंवा पत्ता नमूद नव्हता.
त्यामुळे पोलिसांना त्या व्यक्तीबद्दल अधिक माहिती मिळू शकली नव्हती. अखेर पोलिसांच्या एका टीमने यासंदर्भात सोशल मीडियावर शोध घेण्याचा प्रयत्न केला.
फेसबूकची मदत
पोलिसांना फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या नावांची अनेक खाती दिसली. त्यात या नावाची एक व्यक्ती पोलिसांना सापडली.
यात बेनेट रिबेलो यांनी घातलेला स्वेटर आणि मृतदेहाच्या बॅगमध्ये सापडलेला स्वेटर यामध्ये साम्य होतं.
तर याच अकाउंटवर पोलिसांनी अधिक माहिती तपासली, त्यावेळी रिबेलोचं व्हिजिटिंग कार्ड पोलिसांना सापडलं. त्यात त्याच्या घराचा पत्ता आणि अधिक माहिती मिळाली.

फोटो स्रोत, UGC
रिबेलो हे 59 वर्षांचे होते. ते एक संगीतकार होते आणि तो अनेक ठिकाणी संगीत कार्यक्रम करायचे अशी माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी घरी आणि आजूबाजूच्या परिसरात चौकशी केली असता, दहा दिवसांपासून ते दिसत नाहीत असं समजलं. याप्रकरणी रिबेलोचा भाऊ जूड याचीही पोलिसांनी चौकशी केली. त्यावरून मृतदेह हा रिबेलोचाच आहे हे स्पष्ट झालं.
दत्तक घेतलेल्या मुलीचा सुगावा
पोलिसांनी वाकोला येथे त्याच्या घरी आणि आजूबाजूला चौकशी केली असता रिबेलो हे त्यांच्या मुलीसोबत राहत होते, अशी माहिती मिळाली
ही मुलगी रिबेलो यांनी दत्तक घेतली होती, अशी माहितीही पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. अखेर पोलिसांनी 7 डिसेंबर रोजी मुलीला ताब्यात घेतलं. तिची याप्रकरणी सखोल चौकशी केली.
मुलीनं दिली कबुली
रिबेलो यांचे दोन विवाह झाले होते. दोन्ही लग्नानंतर त्यांचे घटस्फोट झाले होते अशी माहिती मुलीच्या चौकशी दरम्यान समोर आली.
दत्तक घेतलेली अल्पवयीन मुलगी आणि रेबेलो हे एकत्र राहत होते.
रिबेलो याची हत्या या अल्पवयीन मुलीने आणि तिच्या प्रियकराने मिळून केली असल्याची तिने चौकशीत कबुली दिली. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन प्रियकराला देखील अटक केली.
तसेच 21 वर्षीय एल्मिया चाऊस या तरुणालाही या प्रकरणी संशयावरून अटक करण्यात आली होती. रिबेलो तिचं शोषण करत होते असा आरोप तिनं हत्येची कबुली देताना केला.
तसेच अल्पवयीन मुलीचे एका मुलाबरोबर प्रेम होते ते त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे तिने आणि प्रियकरांनं मिळून त्यांचा खून केला.
खून का केला?
वाकोला येथे रिबेलोंच्या घरी 27 नोव्हेंबर 2019 रोजी हत्या करण्यात आली. द्वारका कुंज येथे रिबेलो आपल्या घरी मुलीसह राहत होते.
26 नोव्हेंबरला सायंकाळी अल्पवयीन मुलगी आणि प्रियकर यांनी त्यांची हत्या केली. त्यानंतर तीन दिवस मृतदेह घरीच ठेवण्यात आले होते.

फोटो स्रोत, Getty Images
यानंतर अल्पवयीन मुलीने आणि प्रियकराने एकत्रितपणे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन केला. त्यासाठी त्यांनी इंटरनेटवर काही व्हीडिओही पाहिले बघितले होते.
त्यांनी तीन दिवस चाकू गरम करून मृतदेहाचे तुकडे केले होते. दुर्गंधी पसरल्यामुळे घरामध्ये अगरबत्त्यांचा धूर आणि वास देखील पसरवला होता.
यानंतर मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर वेळ पाहून तीन बॅगमध्ये हे कापलेले अवयव भरण्यात आले. नंतर दोघांनी मिळून या बॅगा मिठी नदीमध्ये टाकल्या.
दोन्ही आरोपींना शिक्षा
या प्रकरणात मृतदेहाची विल्हेवाट लावलेल्या तिन्ही बॅगा समुद्रात टाकल्यानंतर एक बॅग मच्छीमार व पोलिसांना माहीम समुद्रकिनारी सापडली. त्यामुळे ही घटना समोर आली.
पोलिसांनी मिळालेल्या पुराव्यांवरून या प्रकरणी तपास केला आणि हत्येचा शोध लावला. सीसीटीव्ही, आरोपींची कबुली आणि अनेक तांत्रिक पुरावे जमा केले होते.
पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलगा, मुलगी यांना अटक करून बाल न्यायालयात हजर केले. त्यावेळी मुलगी 17 वर्षांची होती तर मुलगा 16 वर्षांचा होता.
पोलिसांनी दोन्ही आरोपींची काही दिवस सखोल चौकशी केली. यानंतर आरोप सिद्ध झाल्यानंतर कोर्टाने दोन्ही आरोपींना बालसुधारगृहामध्ये रिमांडसाठी पाठवले, अशी माहिती तात्कालीन तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
तर याप्रकरणी घाटकोपर येथून अटक करण्यात आलेल्या एका वीस वर्षीय तरुणाला 2021 मध्ये काहीही पुरावे त्याच्याबद्दल न सापडल्याने त्याला जामीन देण्यात आला.
दत्तक मुलगी नवी मुंबईची
याप्रकरणी आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलीला रिबेलो यांनी नवी मुंबईतील रबाळे परिसरातून एका कुटुंबीयांकडून दत्तक घेतले होते.
या प्रकरणासंदर्भात दत्तक मुलीच्या आई-वडिलांची देखील पोलिसांनी चौकशी केली.
रिबेलो यांना कोणीही नातेवाईक नसल्यामुळे आणि संपत्ती असल्यामुळे अल्पवयीन मुलीच्या घरच्यांनी रिबेलो यांना मुलगी लोभापोटी दत्तक दिली, असं सांगण्यात येतं.
रिबेलोने माझ्या मृत्यूनंतर सर्व संपत्ती ही या मुलीचीच होईल असं दत्तक मुलीच्या आई वडिलांना सांगितलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























