अगाथा ख्रिस्ती: मसुरीच्या हॉटेलमधील 'ती' गूढ हत्या, जिने एका लेखिकेला कोट्यधीश बनवलं

फोटो स्रोत, GETTY IMAGES
- Author, शेरिलन मोलान
- Role, बीबीसी न्यूज, मुंबई
- Published
जेव्हा एखाद्या कटाचा भाग म्हणून हत्या होतात, तेव्हा त्यामागची कहाणी अधिक थरारक असते.
'रहस्यकथेची राणी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अगाथा ख्रिस्तीला हे चांगलंच ठाऊक होतं. तिची पहिली कादंबरी 'द मिस्टेरियस अफेअर अॅट स्टाईल्स' ही कौटुंबिक कलहामुळे झालेल्या हत्येची कथा सांगते.
1920 मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी एमिली इंग्लेथॉर्प या श्रीमंत महिलेच्या हत्येवर केंद्रित आहे. या महिलेचा दुसरा पती तिच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असतो आणि एमिलीचे संपूर्ण कुटुंब, तिचा जवळचा मित्र एव्हलिन हॉवर्डसह सगळे तिच्या पतीवर संशय घेत असतात.
हे पुस्तक अगाथा ख्रिस्तीच्या सर्वात वाचकप्रिय पुस्तकांपैकी एक आहे. हे पुस्तक विक्षिप्त गुप्तहेर हरकिली पॉयरोटची ओळख करुन देतं. तिच्या नंतरच्या पुस्तकांप्रमाणे हे पुस्तकही शंका-कुशंका, धक्कादायक घटना, साध्या साध्या गोष्टींमध्ये लपलेले गूढ संकेत आणि शेवटी मोठा धक्कादायक खुलासा यांनी भरलेलं आहे.
पण या कादंबरीचं कथानक उत्तर भारतातील मसुरी या हिल स्टेशनमध्ये शतकरभरापूर्वी घडलेल्या खऱ्याखुऱ्या हत्येच्या घटनेवरून घेण्यात आल्याचं मानलं जातं.
सप्टेंबर 1911 मध्ये 49 वर्षीय फ्रान्सिस गार्नेट ओर्म ही मसुरी येथील सवॉय हॉटेलमधील एका खोलीत मृतावस्थेत आढळून आली होती. हे हॉटेल एका आयरिश बॅरिस्टरनं बांधलं होतं.
शवविच्छेदन अहवालात फ्रान्सिसला सायनाईड मिसळलेल्या अॅसिडनं विषबाधा झालयाचं आढळून आलं. तिची मैत्रिण 36 वर्षीय ईवा माउंट स्टीफन्स हिच्यावर हत्येचा आरोप लावण्यात आला.
मसुरी हत्येचा प्रसिद्ध खटला
1912 मध्ये, एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं दावा केल्याप्रमाणे, ही हत्या ज्या 'विशेष परिस्थितीं'मुळे झाली, त्यामुळे या प्रकरणानं जगभरातल्या माध्यमांमध्ये स्थान मिळवलं.
एका ब्रिटीश वृत्तपत्रानं या प्रकरणाची प्रत्येक उलटतपासणी तपशीलवार प्रकाशित केली आणि ‘मसुरी मर्डर ट्रायल’, ‘हॉटेल मिस्ट्री’ आणि ‘क्रिस्टल गेझिंग ट्रायल’ अशी शीर्षकं दिली.
मसुरी येथे राहणारे भारतीय लेखक रस्किन बाँड यांनी त्यांच्या एका लेखात ही हत्या आणि ख्रिस्तीच्या पहिल्या पुस्तकातील संबंधावर लिहिलं आहे.
ते लिहितात, ख्रिस्तीनं 'गुन्ह्याच्या परिस्थिती'चा वापर केला, कारण त्या वेळी हे प्रकरण खूप लोकप्रिय झाले होते.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
फ्रान्सिस गार्नेट ओर्म एक दशकाहून अधिक काळ भारतात राहत होती आणि ती स्टीफन्सला भेटली. तिनं तिच्याशी मैत्री केली. स्टीफन्स आध्यात्मिक होती आणि लखनौला राहत होती.
त्यावेळी प्रकाशित झालेल्या वृत्तांनुसार, ओर्म एकल महिला होती आणि तिने स्टीफन्सकडून भविष्यकथन आणि इतर गूढ कौशल्यं शिकली होती.
दोघीही काही दिवस सॅवॉय हॉटेलमध्ये एकत्र राहिल्या. स्टीफन्सने दावा केला की, तिनं ओर्मची तब्येत बिघडल्यामुळे तिची काळजी घेतली.
पण फिर्यादीनं स्टीफन्सवर आरोप केला की, स्टीफन्सनं ओर्मला विष दिलं. कारण स्टीफन्सच्या मृत्यूपत्रात संपत्ती, दागिणे अशा गोष्टींचा उल्लेख होता. ओमर्च्या मृत्यूनंतर स्टीफन्सला ते बळकवायचं होतं.
दुसरीकडे, बचावपक्षानं दावा केला की, ओर्मनं आत्महत्या केली, कारण तिला मोठा धक्का बसला होता.
बचावपक्षानं असा युक्तिवाद केला की, ती ज्या पुरुषाशी लग्न करण्यासाठी भारतात आली होती. त्याचा मृत्यू झाला होता आणि ती त्याच्या खराब प्रकृतीमुळे ओर्म खूप त्रस्त होती.
ते गूढ कायम
या प्रकरणातील घडामोडींमुळे पोलिसांसह अनेकांचा गोंधळ उडाला.
जसं की, ओर्मच्या मृत्यूपूर्वी स्टीफन्सने लखनौ सोडल्याचं तपासात उघड झालं. दुसरं म्हणजे, ज्या खोलीतून ओर्मचा मृतदेह सापडला ती खोली आतून बंद होती.
पोलिसांना ओर्मच्या खोलीत झोपेच्या गोळ्या, आर्सेनिक आणि प्रुसिक ऍसिडच्या दोन लेबल्स वगळता कोणतीही औषधे सापडली नाहीत.
1900 च्या दशकाच्या सुरुवातीस, केमिस्टकडून औषधे घेताना खरेदीदारांना स्वाक्षरी करणं आवश्यक होतं. पण फिर्यादीनं निदर्शनास आणून दिलं की, प्रुसिक अॅसिडच्या पत्रावरील स्वाक्षरी ओर्मच्या स्वाक्षरीशी जुळत नाही.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
फिर्यादी पक्षानं असंही म्हटलं की, स्टीफन्सनं एका मित्राशी केलेल्या संभाषणात सहा महिने आधी ओर्मच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. तसंच, डॉक्टरांशी लग्न करण्याच्या आणि तिचं संपूर्ण संपत्ती त्याला देण्याच्या ओर्मच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
पण बचावपक्षानं सांगितलं की, स्टीफन्स ही ओर्मची जवळची मैत्रीण होती आणि तिनं विष विकत घेतलं किंवा तिच्या स्टीफन्सला विष दिलं याचे कोणतेही पुरावे नाही.
स्टीफन्सची अखेर निर्दोष मुक्तता झाली. न्यायाधीशांनी आपल्या निकालात म्हटलं की, "मिस ओर्मच्या मृत्यूचं खरं कारण कदाचित कधीच कळणार नाही."
या सर्व घटना ख्रिस्तीच्या पुस्तकातील घटनांसारख्याच आहेत. एमिलीचाही विषामुळे मृत्यू झाला आणि ओर्मप्रमाणेच तिचा मृतदेह आतून बंद असलेल्या खोलीत सापडला. शेवटी तिच्या मैत्रिणीनेच तिला विष प्राशन दिल्याचं समोर आलं. तिची सही खोटी करून तिनं विष विकत घेतलं आणि तिच्या मित्राच्या हत्येमागे पैसे मिळवण्याचा हेतू होता.
पुस्तकातील हुबेहूब परिस्थिती
आज अनेक दशकांनंतरही या प्रकरणांमधील साम्य चाहत्यांना आर्श्चयचकित करतं.
2022 मध्ये आंतरराष्ट्रीय अगाथा ख्रिस्ती महोत्सवात गुन्हेगारीविषयी लिहिणाऱ्या भारतीय लेखिका मंजिरी प्रभू यांनी ख्रिस्तीची पहिली कादंबरी आणि मसुरी हत्याकांड यांच्यातील मनोरंजक संबंधावर भाष्य केलं होतं.
पण भारतातील विषबाधा झालेल्या मृत्यूंमुळे प्रेरित झालेली ख्रिस्ती ही एकमेव व्यक्ती नव्हती. सेसिल वॉल्स यांनी आग्रा येथे घडलेल्या एका गुन्ह्याची कथा लिहिली. त्यावेळी हे शहर ब्रिटीशशासित भारतातील आग्रा आणि अवध या संयुक्त प्रांतांतर्गत येत होतं.
'द आग्रा डबल मर्डर: अ क्राईम ऑफ पॅशन फ्रॉम द राज'मध्ये मेरठमध्ये राहणारी एक इंग्रज महिला ऑगस्टा फुलम आणि डॉ. क्लार्क या अँग्लो-इंडियन पुरुषानं एकत्र राहण्यासाठी त्यांच्या जोडीदारांना विष देण्याची योजना कशी आखली याबद्दल लिहिलं आहे.
अमेरिका आणि युरोप प्रमाणेच, 19व्या शतकात भारतात विषप्रयोग करून हत्या होण्याच्या घटना सामान्य होत्या. आर्सेनिकसारख्या विषारी पदार्थाच्या विक्रीवर नियंत्रण नव्हतं.

फोटो स्रोत, GETTY IMAGES
डेव्हिड अरनॉल्ड यांनी त्यांच्या 'टॉक्सिक हिस्ट्रीज: पॉइझन अँड पोल्युशन इन मॉडर्न इंडिया' या पुस्तकात लिहिलं आहे की, आर्सेनिक विषामुळे त्याची खरेदी आणि वापर नियंत्रित करण्यासाठी 1904 मध्ये भारतीय विष कायदा लागू करण्यात आला.
ते लिहितात, "जेव्हा दहा वर्षांनंतर या कायद्याचे पुनरावलोकन केलं गेलं, तेव्हा संयुक्त प्रांत सरकारनं अलीकडच्या वर्षांत विषप्रयोग करून हत्या करण्याच्या दोन कुप्रसिद्ध प्रकरणांचा उल्लेख केला. यात ओर्म आणि फुलम-क्लार्क प्रकरणाचा समावेश होता."
सत्य घटनांवर आधारित गुन्हेगारी कथा हा एक मनोरंजक प्रकार आहे आणि चित्रपट, पॉडकास्ट आणि वेब सिरीजद्वारे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.
पण ख्रिस्तीच्या चाहत्यांसाठी 'द मिस्टेरियस अफेअर अॅट स्टाइल्स' नेहमीच त्यांच्या हृदयाच्या जवळ राहील.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























