'वर्षानुवर्षं बेपत्ता मुलांना शोधू न शकणारी यंत्रणा नेत्यांच्या मुलांसाठी कशी तत्पर होते?'

तानाजी सावंत आणि त्यांचा मुलगा ऋषिराज सावंत
फोटो कॅप्शन, तानाजी सावंत आणि त्यांचा मुलगा ऋषिराज सावंत
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

राज्याच्या माजी आरोग्यमंत्र्यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार पुण्यातल्या सिंहगड पोलीस ठाण्यात दाखल होते.

तातडीनं अपहरणाचा गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर काही वेळातच माजी मंत्री पोलिसांसोबत पत्रकार परिषद घेऊन सांगतात की मुलाचं अपहरण झालेलं नाही.

तो विमानानं मित्रांसोबत गेला आहे. तो दुसऱ्यासोबत नसून त्याच्या मित्रांसोबतच आहे.

मुलगा बँकॉकला गेला हे माहिती झाल्यानंतरही पोलीस यंत्रणा अगदी तत्परतेनं कामाला लागली.

पोलिसांसोबत या नेत्यानं थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मदत मागितली.

इतकंच नाहीतर केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही आदेश दिले आणि माजी मंत्र्यांच्या मुलाचं विमान बँकॉकला न जाता पुण्यातच उतरवलं.

हे माजी मंत्री आहेत तानाजी सावंत आणि ज्या मुलामुळे हे नाट्य घडलंय त्यांचं नाव आहे ऋषिराज सावंत.

सावंतांनी अगदी काही तासांमध्ये सगळी सरकारी यंत्रणा वापरून या सगळ्या घडामोडी घडवून आणल्या.

मुलगा मित्रांसोबत बँकॉकला गेला हे माहिती झाल्यानंतरही सरकारी यंत्रणा लावून मुलाला पुण्याला माघारी बोलवण्यात आलं.

मुलाचं अपहरण झालं नव्हतं तर मग अपहरणाची तक्रार का नोंदवली? मुलगा मित्रांसोबत गेला आहे हे माहिती झाल्यानंतरही मुलाला परत बोलवण्यासाठी सरकारी यंत्रणा इतक्या तत्परतेनं कामाला कशी लागली? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

मुलगा व्यवसायासंबंधित कामासाठी बँकॉकला चालला होता?

तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत आपल्या प्रविण उपाध्ये आणि संदीप वासेकर या दोन मित्रांसोबत पुणे विमानतळावर गेला. त्यांना सोडून कारचालक कार घेऊन घरी परतला.

ऋषिराजनं साडेचार वाजता बँकॉकसाठी उड्डाण घेतलं. पण, तानाजी सावंत यांनी इकडं अपहरणाची तक्रार नोंदवली आणि काही वेळातच माझ्या मुलाचं अपहरण झालं नाही असं सांगितलं.

मुरलीधर मोहोळ यांनी नागरी उड्डाण विभागाच्या महासंचालकांना सूचना केली. त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून हे विमान माघारी बोलावण्यात आलं.

तोपर्यंत हे विमान भारताच्या हवाई हद्दीतच होतं. त्यामुळे हे विमान माघारी बोलावता आलं. विमान लँड होताना ऋषिराज सावंतला वाटलं की आपण बँकॉकला आलो आहोत.

पण, प्रत्यक्षात विमानातून उतरला तेव्हा हे पुणे विमानतळ असल्याचं त्याला समजलं.

तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचा मुलगा

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, ऋषिराज सावंतनं पुणे विमान तळावरून आपल्या दोन मित्रांसोबत बँकॉकसाठी उड्डाण घेतलं.

या सगळ्या नाट्याबद्दल तानाजी सावंत यांचा मुलगा गिरीराज सावंत यांनी स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणतात, "माझ्या लहान भावाचा फोन लागत नव्हता. तो कुठेही दिसत नव्हता. त्यामुळे आम्ही सिंहगड पोलिसांत तक्रार केली."

"तो दहा दिवसांपूर्वीच दुबईला गेला होता. त्याला व्यवसायासंबधित कामासाठी बँकॉकला जायचं होतं. मात्र, घरचे लगेच बँकॉकला सोडणार नाही या भीतीनं तो खासगी विमानानं बँकॉकला गेला होता," असंही ते पुढं म्हणाले.

भावनिक झाल्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचं त्यांनी सांगितलं. ते सांगतात "त्याची आम्हाला माहिती नव्हती. आम्ही घरात एकमेकांना सांगून जात असतो. आम्ही भावनिक झालो होतो म्हणून आम्ही अपहरणाचा गुन्हा दाखल केला."

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पोलीस यंत्रणेमुळे माझ्या भावाला रात्री साडेनऊच्या सुमारास घरी आणता आलं," असंही त्यांनी पुढं सांगितलं.

मुलगा कौटुंबिक कारणासाठी खासगी विमानानं बँकॉकला गेला हे माहिती झाल्या नंतरही सरकारी यंत्रणा अगदी तत्परतेनं हलली.

विरोधकांचा हल्लाबोल

दरम्यान या प्रकरणावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका केली जातेय.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की "संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांना सापडत नाही. मात्र, सत्ताधारी पक्षाचे आमादर आणि माजी मंत्री महोदयांच्या मुलाचं विमान हवेतल्या हवेत परत बोलावून राज्यातील यंत्रणेनं आपली कुशलता सिद्ध केली. महाराष्ट्रातील गृहखातं आणि पोलीस किती तत्पर आहेत याचं उदाहरण पाहायला मिळालं.

"वरपासून खालपर्यंत सगळी यंत्रणा हलली आणि नेत्याच्या पुत्राचं विमान हवेतल्या हवेत परत फिरलं.

"अतिविशिष्ट लोकांच्या किरकोळ घरगुती कामांसाठी मनापासून झटणारे गृहखाते सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी अशीच तत्परता का दाखवत नाहीत?" असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

तानाजी सावंतांनी खोटी तक्रार दाखल केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय.

त्या म्हणतात, "माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालंच नव्हतं. भांडण करून निघून गेलेल्या मुलाला अडवण्यासाठी सगळी पोलीस यंत्रणा कामाला लावली. आपल्याकडे असलेला पैसा, आमदारकीचं पद, सत्तेत असल्याचा गैरवापर त्यांनी यावेळी केला."

राजकीय ताकद वापरत अपहरणाची खोटी केस दाखल करून घेतली असल्याचा असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

'पोलीस यंत्रणेतला हा ट्रेंड फार वाईट आहे'

इतर प्रकरणांमध्ये तक्रार नोंदवूनही बेपत्ता मुलांचा वर्षानुवर्ष शोध न लावणारी पोलीस यंत्रणा इथं इतक्या तत्परतेनं कशी काय कामाला लागली? असा सवाल माजी सनदी अधिकाऱ्यांनी केला आहे.

पोलीस यंत्रणा अशी कशी काय वागू शकते? याबद्दल आम्ही काही माजी पोलीस अधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली.

माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे स्वातंत्र्यानंतर या देशात निर्माण झालेल्या पोलीस यंत्रणेवर बोट ठेवतात.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "स्वातंत्र्यानंतर भांडवलदारांसाठी काम करणारी नोकरशाही भेटलेली आहे. पोलीस या नोकरशाहीमधला मोठा घटक आहे. अलीकडच्या काळात भाजपनं सत्तेत जाण्यासाठीच नोकरशाहीचा वापर केला. आपण श्रेष्ठांना मदत केली तर आपल्याला फायदा होईल असा ट्रेंड पोलिसांमध्ये सेट झालाय." हा ट्रेंड फार धोकादायक असल्याचं मत खोपडे यांनी व्यक्त केलं आहे.

महाराष्ट्र पोलीस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, "आपण श्रेष्ठांना मदत केली तर आपल्याला फायदा होईल असा ट्रेंड पोलिसांमध्ये सेट झालाय".

"अनेकदा मिसिंगची तक्रार होऊन दहा-दहा वर्ष होतात तरी कोणी त्याकडे बघत नाही. लहान मुलं असतील किंवा अपहरण झालेली मुलगी असेल त्यांचा कसा गैरवापर होईल याला पोलिसांचं प्राधान्य नसतं.

"पण, या नेत्याचा मुलगा विमानानं गेला आणि त्याला परत बोलावायचं असेल तर गुन्हा दाखल केल्याशिवाय आपल्याला आपले अधिकार वापरता येणार नाही हे पोलिस यंत्रणेला लगेच कळतं." असंही पुढं ते म्हणाले.

स्वातंत्र्य काळातले पोलीस आपल्याला नंतर मिळालेच नाहीत अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

'संयुक्त पत्रकार परिषदच संशयाला वाव देणारी'

राज्य गुप्तचर विभागाचे माजी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिरीष इनामदार पोलिसांनी तानाजी सावंतांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.

ते बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "अपहरण हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे त्याची पोलिसांनी लगेच दखल घेणं गरजेचं असतं. पण, हे एक विशिष्ट प्रकरण दिसतं ज्यात पोलिसांनी अतिवेगानं आणि अतिउच्च पातळीवरून दखल घेतल्याचं दिसतं. याची पार्श्वभूमी संबंधितांच्या घरातल्या वादावरून उद्भवलेली दिसते." असं पुढं ते सांगतात.

त्याबाबतच्या पत्रकार परिषदेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी संबंधित नेत्यासोबत का बसावं? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत तानाजी सावंतांची पत्रकार परिषद.
फोटो कॅप्शन, पोलिस अधिकारी शिरीष इनामदार यांनी पोलिसांच्या तानाजी सावंतांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

ते सांगतात, "अपहरण नव्हतं हे त्या नेत्यालाही सांगता आलं असतं किंवा काय घडलं हे सांगायला पोलिसांना वेगळी पत्रकार परिषद घेता आली असती. संयुक्त पत्रकार परिषदच संशयाला वाव देणारी आहे. यात पोलिसांची जास्त आत्मीयता दिसून येते. आता ही आत्मियता आहे की लाचारी आहे हे ज्याचं त्याने ठरवावं."

'पोलीस आणि तक्रारदार एकदम अपहरणाच्या निष्कार्षावर कसे पोहोचले?'

तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. पोलिसांनी लगेच गुन्हाही दाखल केला. त्यानंतर तपासाला सुरुवात केली.

गुन्हा तातडीनं का नोंदवला याबद्दल तानाजी सावंत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, की "एफआयआर दाखल केल्याशिवाय पुढच्या गोष्टी हलत नाही. पुढच्या प्रक्रिया करायच्या असतील तर गुन्हा दाखल करणं गरजेचं होतं."

पण, यावरही शिरीष इनामदार प्रश्न उपस्थित करतात.

ते म्हणतात, व्यक्ती हरवणं, व्यक्तीशी संपर्क न होणं, व्यक्तीचं अपहरण या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग तक्रारदार एकदम अपहरणाच्या निष्कार्षावर कसा पोहोचला.

पोलिसांनी देखील हे अपहरण आहे याची शहानिशा कशी केली? गुन्हा दाखल करण्यापूर्वी एक प्राथमिक चौकशीचा प्रकार असतो. पोलिसांना प्राथमिक चौकशी करता आली असती.

विमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुरलीधर मोहोळ यांनी सूचना केली आणि त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून ऋषिराज सावंत यांचं विमान माघारी बोलावण्यात आलं.

दखलपात्र गुन्हा असेल तर पोलिसांनी गुन्हा घडल्याची खातरजमा करण्यासाठी प्राथमिक चौकशी करून मग गुन्हा दाखल करावा असं कायद्यात सांगितलेलं आहे.

मग पोलिसांनी खातरजमा केली होती का? असा सवाल राज्य गुप्तचर विभागाचे माजी अतिरिक्त पोलीस आयुक्त शिरीष इनामदार उपस्थित करतात.

तसेच तानाजी सावंत यांचा मुलगा खासगी विमानानं बँकॉकला गेला होता. त्यासाठी जवळपास 76 लाख रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. याकडेही इनामदार लक्ष वेधतात.

ते म्हणतात, "हा तरुण मुलगा चार्टर विमान करून जातो. याला कमीत कमी 76 लाख रुपये भाडं असतं. हे भाडे कुठून देण्यात आले याचा देखील विचार व्हायला हवा ?"

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.