ई कोलाय : अन्नाद्वारे पसरणाऱ्या 'या' भयानक ‘सुपरबग’पासून स्वतःला कसं वाचवाल?

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेत मांस विकणाऱ्या कंपनीला बाजारातून जवळपास 3000 किमो मांस परत मागवावं लागलं आहे. कारण त्या मांसात जीवघेणे बॅक्टेरिया असू शकतात अशी शक्यता वर्तवली जातेय.
ख्रिसमसच्या काळात ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाने एका कंपनीने कच्च्या दुधापासून बनवलेलं चीज परत मागवण्याचे आदेश दिले होते.
ते चीज खाणारे लोक आजारी पडल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आलं. हे चीज खाऊन कमीत कमी 30 लोक आजारी पडले आणि स्कॉटलंडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यूही झाला.
अमेरिका आणि ब्रिटन दोन्ही ठिकाणी ज्या बॅक्टेरियामुळे हे अन्नपदार्थ भारतातून हटवावे लागले, त्या बॅक्टेरियाचं नाव आहे एशेरेकिया कोलाय, ज्याला ई. कोलाय असंही म्हटलं जातं.
2017 साली जागतिक आरोग्य संघटनेने या बॅक्टेरियाचं ‘सुपरबग’ या श्रेणीत वर्गीकरण केलं होतं.
सुपरबग म्हणजे असे बॅक्टेरिया ज्यांच्यावर अँटी-बायोटिक औषधांचाही फारसा परिणाम होत नाही.
भारतातही मृत्यू झालेत
ई-कोलाय बॅक्टेरियामुळे भारतातही अनेक मृत्यू झाले आहेत. प्रसिद्ध वैद्यकीय नियतकालित ‘द लँसेट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात असं म्हटलंय की भारतात बॅक्टेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक मृत्यू ई कोलायमुळे होतात.
या शोधनिबंधानुसार सन 2019 मध्ये ई कोलायच्या संसर्गामुळे भारतात जवळपास 1 लाख 57 हजार लोकांचा जीव गेला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, “तसं तर कोणीही आजारी पडू शकतं पण लहान मुलं, वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या लोकांना जास्त धोका आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार, “भारतात पाचपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांचा डायरियाने मृत्यू होण्यासाठीही ई कोलाय जबाबदार आहे.”
काय आहे हा बॅक्टेरिया? कसा पसरतो?
डॉ. कमल प्रीत हिमाचल प्रदेशातल्या लाल बहादुर शास्त्री मेडिकल कॉलेजमध्ये पॅथलॉजीच्या सह-प्राध्यापक आहेत.
त्या म्हणतात की ई कोलायच्या सगळ्यात प्रजाती हानिकारक नसतात. अनेकदा यातल्या काही प्रजाती निरोगी व्यक्तीच्या आतड्यात आढळून येतात. पण काही प्रजातींमुळे गंभीर आजारपण ओढावू शकतं.
त्या पुढे म्हणतात, “ई कोलाय मनुष्य आणि जनावरांच्या आतड्यात आढळून येतो तसंच मोकळ्या वातावरणातही सापडतो. दूषित अन्न, पाण्याचं सेवन केल्याने किंवा संक्रमित प्राण्यांच्या अथवा माणसांच्या संपर्कात आल्याने हा बॅक्टेरिया पसरतो.
दिल्लीमधले डॉ विनोद कुमार गोयल म्हणतात की हा बॅक्टेरिया आपल्या आतड्यात असतो आणि सहसा त्यामुळे काही त्रास होत नाही पण कधी कधी जीवघेणा ठरू शकतो.
या बॅक्टेरियामुळे होण्याऱ्या रक्ताच्या गंभीर संसर्गाला सेप्टिसीमिया म्हणतात.
डॉ कमल प्रीत यांनी सांगितलं की, “याच्या संसर्गाची मुख्य कारणं आहेत दूषित पाणी पिणं, अर्धवट शिजवलेलं मांस खाणं, कच्च्या भाज्या खाणं, कच्चं दूध किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाणं ही आहेत.”

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळेच अमेरिका आणि ब्रिटनच्या आरोग्य यंत्रणांनी कच्चं मांस आणि कच्च्या दूधापासून बनवलेलं चीज बाजारातून परत मागवण्याचे आदेश दिले.
डॉ कमल प्रीत म्हणतात, “ई कोलायच्या काही प्रजाती अन्न दूषित करतात. असं अन्न खाल्ल्याने तुम्ही आजारी पडता आणि वेळेवर उपचार मिळाले नाही तर जीवही जाऊ शकतो.”
काय आहेत लक्षणं आणि धोके ?
कॅनडाच्या अलबर्टामध्ये गेल्या सप्टेंबरमध्ये लहान मुलांमध्ये ई कोलायचा संसर्ग पसरला होता.
11 पाळणाघरांमध्ये जाणारे 250 लहान मुलं आजारी पडले होते. यातल्या किमान सहा मुलांना किडनी फेल झाल्यामुळे डायलिसिसवर ठेवावं लागलं होतं.
या सगळ्या मुलांचं जेवण एकाच ठिकाणाहून येत होत.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार ई कोलायची एक प्रजाती ‘शीगा’ नावाचा विषारी पदार्थ तयार करते. यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.
डॉ कमल प्रीत म्हणतात की, “ई कोलायच्या काही प्रजाती जे विष तयार करतात त्यामुळे रक्ताचे जुलाब होऊ शकतात, पोटात मुरडा येऊन पोट दुखू शकतं, उलट्या होऊ शकतात.”
डॉ विनोद कुमार गोयल जनरल फिजिशियन आहेत. ते म्हणतात, “हा बॅक्टेरिया मुत्रमार्गाद्वारे रक्तापर्यंत पोहचू शकतो. त्यामुळे किडनी फेल होऊ शकते किंवा रक्ताचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे लघवी करताना रक्त येणं,शरीरात पाणी कमी होणं अशी लक्षणं दिसू शकतात.”
डॉ कमल प्रीत म्हणतात की, “महिलांनी स्वतःचे गुप्तांग नेहमी पुढून मागे अशा रितीने स्वच्छ केले पाहिजेत, मागून पुढे नाही. म्हणजे विष्ठेतले बॅक्टेरिया मुत्रमार्गाद्वारे किडनीपर्यंत जाणार नाहीत.”
काय काळजी घ्यावी?
अमेरिकेची सरकारी आरोग्य संस्था सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार गर्भवती महिला, नवजात बाळं, कमी प्रतिकारशक्ती असणारे लोक, कॅन्सर, डायबिटीज आणि एचआयव्ही-एड्सग्रस्त लोकांना जेवणातून होणाऱ्या संक्रमणाचा जास्त धोका असतो.

फोटो स्रोत, Getty Images
यामुळे काळजी घेणं आवश्यक ठरतं तसंच वर उल्लेखलेली लक्षणं दिसली तर लगेचच डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे.
डॉ कमल प्रीत म्हणतात की, “स्वयंपाक करण्याआधी आणि जेवण करण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले पाहिजेत. तसंच मलविसर्जनानंतरही हात स्वच्छ पाणी आणि साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत.”
त्या पुढे म्हणतात, “अन्न व्यवस्थित शिजवलं पाहिजे. दूध उकळलं पाहिजे आणि मांसही नीट शिजवलं, कारण हा बॅक्टेरिया उष्ण तापमानात टिकू शकत नाही. याशिवाय जर तुम्ही सॅलड खात असाल तर फळं आणि भाज्या स्वच्छ पाण्याने धुतल्या पाहिजेत.”
जागतिक आरोग्य संघटनाही हेच सल्ले देते. याशिवाय शिजवलेलं अन्न आणि कच्च अन्न वेगवेगळं ठेवावं असंही म्हटलं आहे.
हा बॅक्टेरिया संक्रमित लोकांद्वारे किंवा प्राण्यांद्वारे पसरू शकतो त्यामुळे संस्था सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने म्हटलं आहे की जर तुम्ही जनावरांच्या संपर्कात वारंवार येत असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. जनावरांना स्पर्श केल्यानंतर हाथ स्वच्छ धुतले पाहिजेत नाही तर सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे.
हेही वाचलंत का?
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.
























