भारतीय पंतप्रधानांच्या संरक्षण व्यवस्थेत कधी चुका झाल्या होत्या? वाचा

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेहान फझल
- Role, बीबीसीसाठी
- Published
- वाचन वेळ: 10 मिनिटे
सुरक्षा व्यवस्थेतील चुकांमुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची (व्हीआयपी) हत्या होण्याच्या घटना जगभरात घडल्या आहेत. भारतात महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधीची हत्या ही त्याची उदाहरणं आहेत.
जोपर्यंत प्रत्यक्ष घटना होत नाही किंवा सुरक्षेत चूक होत नाही, तोपर्यंत कोणतीही सुरक्षाव्यवस्था भक्कमच वाटत असते.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अलिकडेच झालेला जीवघेणा हल्ला हे त्याचं ताजं उदाहरण आहे. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, मात्र ते थोडक्यात बचावले.
ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत काय चूक झाली, त्यात कोणते दोष होते यावर अमेरिकेत सखोल तपास होतो आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातील अति महत्त्वाच्या (व्हीआयपी) व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या यंत्रणादेखील आपल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत.
भारतात पंतप्रधानांना पुरवली जाणारी सुरक्षा ही जगातील सर्वोत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था समजली जाते.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानांसाठीची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत असली पाहिजे याची जाणीव झाली. तेव्हापासून देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत सातत्यानं सुधारणा केली जाते आहे.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा चुका अनेकदा झाल्या. त्यातून सुरक्षा यंत्रणांवर नामुष्कीची वेळ आली होती. अशा काही घटनांबद्दल जाणून घेऊया.
भुवनेश्वरमध्ये इंदिरा गांधीवर हल्ला
1967 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी इंदिरा गांधी प्रचारासाठी भुवनेश्वरला गेल्या होत्या. त्याठिकाणी त्यांची प्रचार सभा होती. सभेतलं त्यांचं भाषण सुरू होताच गर्दीतल्या काही लोकांनी व्यासपीठावर दगड फेकण्यास सुरुवात केली.
एक दगड सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर लागला. तर दुसरा दगड एका पत्रकाराच्या पायाला लागला. हे पाहताच दोन सुरक्षा रक्षक इंदिरा गांधी यांच्या आजुबाजूला आले.
परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा अधिकाऱ्यांनी इंदिरा गांधींना भाषण लगेचच संपवण्याची विनंती केली. पण, इंदिरा गांधींनी त्याला नकार दिला.
इंदिरा गांधींचं भाषण सुरू राहिलं आणि अधूनमधून व्यासपीठावर दगड फेकले जात राहिले. थोड्या वेळानं इंदिरा गांधींनी त्यांचं भाषण संपवलं आणि त्या व्यासपीठावरील खुर्चीवर बसल्या.

इंदिरा गांधीचं भाषण संपताच काँग्रेसच्या स्थानिक उमेदवारानं बोलण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर व्यासपीठावर दगडांचा मारा सुरू झाला.
कॅथरिन फ्रँक यांनी इंदिरा गांधीच्या चरित्रात लिहिलं आहे की, "हे पाहून इंदिरा गांधी लगेचच उभ्या राहिल्या आणि ताबडतोब माईककडे गेल्या आणि म्हणू लागल्या की, 'हा काय उद्धटपणा आहे? याच प्रकारे तुम्ही देश घडवणार आहात का?' तेव्हा एकाचवेळी अनेक दगड व्यासपीठाच्या दिशेने फेकण्यात आले. त्यातील एक दगड तर थेट इंदिरा गांधींच्या चेहऱ्यावर लागला. त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागलं. दगड जोरात लागल्यामुळे त्यांच्या नाकाचं हाड मोडलं होतं."

फोटो स्रोत, Getty Images
मात्र इंदिरा गांधी यामुळे डगमगल्या नाहीत. त्यांनी निवडणूक प्रचार सुरूच ठेवला. पुढचे अनेक दिवस त्या नाकावर प्लास्टर बांधून प्रचार सभांमधून भाषणं करत राहिल्या. स्वत:वर विनोद करत त्या लोकांना म्हणायच्या की, "मी तर बॅटमॅनसारखी दिसत आहे."
ही घटना म्हणजे, पंतप्रधानांच्या सुरक्षेतील एक मोठी चूक होती.
ब्लू बूकच्या नियमांचं उल्लंघन करत, लोकांना व्यासपीठाच्या इतक्या जवळ येण्याची संधी देण्यात आली होती. त्यामुळंच त्यांचे दगड व्यासपीठापर्यंत पोहोचू शकत होते. सुरक्षा व्यवस्थेसाठी हा खूप मोठा धडा होता.
'राजघाट'वर राजीव गांधीवर हल्ला
इंदिरा गांधी यांच्याच अंगरक्षकानं 1984 मध्ये त्यांची हत्या केली. या घटनेवर बरंच काही लिहिलं गेलं आहे. त्या घटनेला दोन वर्षेही झाली नव्हती तेवढ्यात राजीव गांधी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.
2 ऑक्टोबर 1986 च्या सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी राजीव गांधी राजघाटावरील समाधीस्थळाकडं जात होते. त्याचवेळी एक मोठा आवाज आला.
पंतप्रधानांच्या सुरक्षारक्षकांनी ताबडतोब त्यांच्याभोवती एक कडं तयार केलं. राजीव गांधी यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. मात्र, सुदैवानं ते बचावले होते. गोळी राजीव गांधी यांच्या मागे असलेल्या झाडांमध्ये शिरली. त्या फुलझाडांना मागील अनेक दिवसांपासून पाणी दिलं जात होतं. तिथं एखादं स्फोटक पुरण्यात आलं असेल तर ते कुचकामी ठरावं, हा त्यामागचा उद्देश होता.

फोटो स्रोत, Getty Images
गोळी झाडल्यानंतर उडालेल्या गोंधळात सर्व सुरक्षा रक्षक संपूर्ण राजघाटभर वेगवेगळ्या ठिकाणी पसरले.
त्याठिकाणचं प्रत्येक झाड, प्रत्येक ठिकाणाची त्यांनी तपासणी केली. पण काहीच सापडलं नाही. नंतर सुरक्षारक्षकांनी जवळपासच्या इमारतींची तपासणी सुरू केली. ही सर्व शोधाशोध सुरू असताना नेमकं एक झाड सुरक्षारक्षकांकडून सुटलं होतं. त्याच झाडामागे राजीव गांधींवर गोळी झाडणारा व्यक्ती, करमवीर सिंग लपलेला होता.
तीन गोळ्या झाडल्या
साधारण आठ वाजेच्या सुमारास राजीव गांधी, महात्मा गांधीच्या समाधीस्थळावर फुलं वाहून कारकडं परतत होते. त्याचवेळी दुसऱ्या गोळीचा आवाज आला.
त्यावेळी राजीव गांधी आणि राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंह यांच्याबरोबर कारच्या दिशेनं निघाले होते.
या घटनेबाबत इंडिया टुडेच्या 31 ऑक्टोबर 1986 च्या अंकात, इंदरजित बधवार आणि तानिया मिढा लिहितात, "गोळी झाडण्यात येताच झैल सिंह यांनी राजीव गांधींना म्हटलं की, 'हा हल्ला कुठून होत आहे?' त्यावर राजीव गांधींनी विनोदानं म्हटलं की, "मी आलो तेव्हा, माझं असंच स्वागत करण्यात आलं होतं. आता जाताना पुन्हा तसंच करत आहेत असं वाटत आहे."

हेही वाचा -

राजीव गांधींनी झैल सिंह यांना त्यांच्या बुलेटप्रूफ मर्सिडिजमध्ये बसवलं. मात्र ते सोनिया गांधीसोबत आपल्या अॅम्बेसेडर कारमध्ये बसत होते, तेव्हाच तिसरी गोळी झाडल्याचा आवाज झाला.
ती गोळी राजीव गांधी यांच्या मागे उभे असलेले कॉंग्रेसचे आमदार ब्रिजेंदर सिंह मोवाई आणि बयानाचे माजी जिल्हा न्यायाधीश राम चरण लाल यांना लागली. राजीव गांधींनी घाईने सोनिया गांधींना कारमध्ये बसण्यास सांगितलं त्याचवेळी सुरक्षारक्षकांनी राजीव गांधीच्या चारही बाजुंनी सुरक्षा कडं बनवलं.
याच दरम्यान सुरक्षारक्षकांनी दाट पानांनी झाकलेल्या एका झाडातून धूर निघत असल्याचं पाहिलं होतं. त्यांनी 9 एमएम जर्मन माउजर पिस्तुलातून त्या दिशेनं गोळ्या झाडल्या. तेव्हा अचानक हिरव्या रंगाचे कपडे घातलेला एक तरुण हात वर करून झाडीतून बाहेर येताना दिसला. तिथं हजर असलेले गृहमंत्री बुटा सिंह आणि दिल्लीचे लेफ्टनंट गर्व्हनर एचएल कपूर यांनी सुरक्षारक्षकांना त्या व्यक्तीला गोळ्या मारण्याचा आदेश दिला.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, दिल्लीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त गौतम कौल यांनी 'गोळी मारू नका' असं ओरडून सांगितलं.
नंतर तपासातून समोर आलं की, करमवीर सिंह बऱ्याच वेळापासून त्या झाडीच्या मागे लपून बसला होता. त्याच्याकडून प्लास्टिकची एक मोठी शीट, रुमालात बांधलेले भाजलेले चणे, पाण्याची कॅन, टेरामायसिन आणि पेनकिलर गोळ्या जप्त करण्यात आल्या.
राजीव गांधी समाधीस्थळावर येण्याच्या एक दिवस अगोदर तिथे पूर्ण तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी सुरक्षा रक्षकांबरोबरच्या कुत्र्यांनी भुंकून त्या झाडीकडे लक्ष वेधलं होतं. मात्र, तिथे मधमाशांचं पोळं असल्यामुळं सुरक्षारक्षक पुढे गेले नव्हते.
सुरक्षेसंदर्भात ही चूक फारच गंभीर होती. कारण काही दिवसांपूर्वीच गुप्तचर यंत्रणांनी राजघाट याठिकाणी राजीव गांधीवर हल्ला होऊ शकतो, अशी माहिती दिली होती.
नंतर दिल्ली पोलिसांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. अनेक मोठ्या कार्यक्रमांच्या आधी याप्रकारची माहिती अनेकदा दिली जाते. त्यामुळंच या माहितीलाही नेहमी प्रमाणेच धोक्याचा इशारा समजलं गेलं.
सुरक्षा व्यवस्थेतील या गंभीर हलगर्जीपणासाठी दिल्लीचे सहायक पोलीस आयुक्त गौतम कौल यांना निलंबित करण्यात आलं. ते राजीव गांधींचे मावस भाऊ देखील होते.
पंतप्रधानांच्या सुरक्षेत पुन्हा चूक
एका वर्षानंतर पुन्हा पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली. ऑक्टोबर 1987 मध्ये रशियाचे पंतप्रधान निकोलाय रिझकोव भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा ही घटना घडली होती.
पालम विमानतळावर दोन्ही पंतप्रधानांनी एकाच कारमध्ये बसून राष्ट्रपती भवनात जायचं ठरवलं.
विमानतळावर त्यांना आणण्यासाठी अनेक मंत्री, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि अनेक वरिष्ठ अधिकारी आले होते.
परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी दिल्लीचे पोलीस आयुक्त वेद मारवाह यांच्या कारमधून जाण्याचा निर्णय घेतला.दोन्ही पंतप्रधानांच्या आधी साऊथ ब्लॉकमध्ये पोहचण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता.
यामागचं आणखी एक कारण म्हणजे, पोलीस आयुक्तांच्या कारला कोणी रोखणार नाही आणि ती पुढे निघून जाईल असं त्यांचं मत होतं.

फोटो स्रोत, Getty Images
'वन लाइफ इज नॉट इनफ' या आत्मचरित्रात नटवर सिंह लिहितात की, "आम्ही साऊथ अव्हेन्यूत पोहोचलो आणि राष्ट्रपती भवनला जाण्यासाठी दक्षिणेस वळलो. तिथून आम्ही साऊथ ब्लॉककडे जाणाऱ्या रस्त्याकडे निघालो. तिथे आम्ही समोरून दोन्ही पंतप्रधानांच्या कारचा ताफा येत असल्याचं पाहिलं."
"वेद मारवाह यांनी ड्रायव्हरला लगेचच कार मागे घेण्यास सांगितलं. त्या ताफ्याच्या मार्गातून बाजूला होण्यासाठी त्यांनी तसं सांगितलं होतं. पण त्यांच्या अगदी मागे भजल लाल यांची कार होती. आम्हाला दोन्ही कार रिव्हर्स करण्यासाठी अर्धा मिनिट वेळ लागला. एक किंवा दोन सेंकदांचा फरक पडला नसता आम्ही व्हीआयपी गाड्यांशी समोरा-समोर भिडलो असतो."
माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांच्या मते, "त्याचवेळी रशियाच्या पंतप्रधानांसोबत असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी आमच्या दिशेने बंदूका रोखल्या होत्या. राजीव गांधींना हे समजलं तेव्हा त्यांनी गृहमंत्री बुटा सिंह यांना पोलीस आयुक्त वेद मारवाह यांना निलंबित करण्यास सांगितलं. दुसऱ्याच दिवशी मी पंतप्रधानांना भेटलो तेव्हा त्यांनी माझी चांगलंच सुनावलं."
"मी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र राजीव गांधींवर त्याचा परिणाम झाला नाही. सुरक्षा नियम मोडल्यामुळं रशियन अंगरक्षक तुम्हाला गोळी देखील मारू शकले असते, असं ते म्हणाले. वेद मारवाह यांना माझ्यामुळं सस्पेंड व्हावं लागलं या गोष्टीचं मला खूपच वाईट वाटलं. सुदैवानं काही दिवसांनी पंतप्रधानांना माझा मुद्दा लक्षात आला आणि त्यांनी वेद मारवाह यांचं निलंबन मागे घेतलं."
राजीव गांधी यांच्यावर श्रीलंकेत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातही हल्ला झाला होता. त्यावेळी ते भारताचे पंतप्रधान म्हणून कोलंबोच्या दौऱ्यावर गेले होते.
30 जुलै 1987 ला त्यांच्यावर श्रीलंकन नौदलाच्या एका सैनिकानं परेडच्या औपचारिक कार्यक्रमाच्या वेळी बंदूकीच्या दस्त्यानं मागून हल्ला केला होता. त्या नौसैनिकाचं नाव विजिता रोहाना असं होतं.
त्यानं राजीव गांधींच्या डोक्यावर बंदूकीच्या दस्त्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मागे काहीतरी हालचाल होत असल्याचं राजीव गांधींच्या लक्षात आलं होतं आणि त्यामुळेच ते थोडक्यात बचावले होते. त्यांना फारशी दुखापत झाली नव्हती.
या हल्ल्यामुळे श्रीलंका सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना प्रचंड नामुष्कीला तोंड द्यावं लागलं होतं.
नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत चूक
2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा पंजाबातील एका उड्डाणपूलावर 15-20 मिनिटं अडकला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे रस्ता अडवल्यानं या ताफ्याला थांबावं लागलं होतं. एका उड्डाणपुलावर अशा रितीनं थांबवावं लागणं हे पंतप्रधानाच्या सुरक्षेसाठी धोकादायक होतं.
पंतप्रधान जेव्हा एखाद्या ठिकाणी जातात किंवा प्रवास करतात तेव्हा त्यांच्यासाठी एक पर्यायी मार्गाचं नियोजन देखिल केलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
भटिंडा विमानतळावर उतरल्यानंतर पंतप्रधान राष्ट्रीय शहीद स्मारकाला हेलिकॉप्टरद्वारे जातील, असं आधी ठरलं होतं. पण, हवामान खराब असल्यामुळं त्यांना रस्त्यानं जावं लागलं होतं.
पंजाबच्या पोलिस महासंचालकांकडून हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधानांना रस्त्याने नेण्यात येत होतं. मात्र त्या प्रवासाला दोन तास लागले.
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजी वर
पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजे एसपीजीकडं असते. देशात आणि देशाबाहेरही याच संस्थेद्वारे पंतप्रधानांना सुरक्षा पुरवली जाते.
सुरुवातीच्या काळात पंतप्रधानांच्या निवासस्थानी राहणाऱ्या जवळच्या लोकांनाही एसीपीजी सुरक्षा पुरवली जायची. मात्र 2019 मध्ये या नियमात बदल करण्यात आला.
नव्या नियमांनुसार आता फक्त पंतप्रधानांनाच एसीपीजीची सुरक्षा मिळते.
1988 मध्ये एसपीजीची स्थापना झाली होती. त्यांचं मुख्यालय दिल्लीतील द्वारका परिसरात आहे.
एसपीजीच्या सुरक्षारक्षकांची निवड सीमा सुरक्षा दल, सीआरपीएफ, सीआयएसएफ, आरपीएफ आणि भारत तिबेट सीमा पोलिसांचे जवान यामधून केली जाते.
एसपीजीसाठी निवड झालेले सर्व सुरक्षा रक्षक या सुरक्षा दलांमधील सर्वोत्कृष्ट जवान असतात.
पंतप्रधानाना सुरक्षा पुरवणारे एसपीजीच्या जवानांनी काळ्या रंगाचा सूट घातलेला असतो. त्यांच्या डोळ्यावर काळा रंगाचा गॉगल असतो.

फोटो स्रोत, Getty Images
एसपीजीचे कमांडो आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवत असताना ते नेमके कुठे पाहत आहेत हे लोकांना कळू नये, हा काळा गॉगल लावण्यामागचा उद्देश असतो.
एसपीजीच्या कमांडोचे बूटदेखील खास असतात. या बुटांचे सोल अशा पद्धतीचे असतात जेणेकरून ते घसरत नाहीत. एसपीजी जवानांच्या हातातील ग्लोव्हजही वेगळ्या बनावटीचे असतात. त्यांची रचना अशी असते की एसपीजी कंमाडोच्या हातून हत्यारं निसटत नाहीत.
एसपीजीच्या दुसऱ्या संरक्षक कवचामध्ये जे कमांडो असतात त्यांच्याकडं बेल्जियममधून आयात केलेल्या साडे तीन किलोच्या रायफल असतात. या रायफल 500 मीटर अंतरापर्यत मारा करू शकतात.
प्रत्येक कमांडोने सव्वा दोन किलो वजनाचं बुलेट प्रूफ जॅकेट घातलेलं असतं. त्यांच्या हाताच्या कोपरांवर आणि गुडघ्यांवर खास पॅड बांधलेले असतात.
ब्लू बूक नियमांचं पालन
कमांडोंच्या प्रशिक्षणाच्या काळात त्यांना मार्शल आर्ट्स शिकवले जातात. कोणतंही हत्यार हाती नसताना हल्लेखोराशी लढण्याचं तंत्र यातून शिकवलं जातं. त्यांना क्लोज प्रोटेक्शन टीम म्हटलं जातं. त्यांच्याकडे पिस्तूल असतं, मात्र ते सर्वसामान्यांना दिसून येत नाही.
मोबाईल फोनचा वापर करून इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिवाईसच्या स्फोटाचा मोठा धोका व्हीआयपींना असतो. हा धोका लक्षात घेऊन पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये जॅमर्सचा वापर सुरू करण्यात आला. हल्लेखोरांना चकवण्यासाठी पंतप्रधानांच्या ताफ्यात त्यांच्या वाहनासारखीच आणखी दोन वाहने असतात.
पंतप्रधानांच्या राज्यांमधील दौऱ्यांआधी एसपीजी ब्लू बूक मधील नियमांचं कठोरपणे पालन करतं.
ब्लू बूक मधील नियमांनुसार पंतप्रधानांच्या दौऱ्यांच्या तीन दिवस आधी एसपीजी त्या दौऱ्याशी निगडीत सर्व लोकांबरोबर आणि संस्थांबरोबर एक बैठक घेते. यामध्ये त्या राज्यातील गुप्तचर संस्थांचे अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांचा समावेश असतो.
या बैठकीत पंतप्रधानांच्या दौऱ्याशी निगडीत सर्वच लहान-सहान बाबींवर चर्चा होते. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व स्तरांवर एक पर्यायी योजना तयार केली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
पंतप्रधानांच्या ताफ्यातील कारचा क्रमही आधीच ठरलेला असतो. सर्वात पुढे पायलट कार असते. त्यामागे मोबाईल सिग्नल जॅमर, नंतर डिकॉय कार, पंतप्रधानांची कार, मर्सिडिज अॅम्ब्युलन्स आणि मग इतर कार असतात.
सोबत एक स्पेअर म्हणजे अधिकची कारही असते. पंतप्रधानांच्या कारमध्ये बिघाड झाल्यास या कारचा वापर केला जाऊ शकतो.
परदेश दौऱ्यांसाठी एअर इंडिया-1
पंतप्रधान नेहमी एअर इंडिया-1 मधून परदेश दौऱ्यावर जातात किंवा परदेश प्रवास करतात. हे एक 747-400 बोईंग विमान असतं.
विमानतळावर पंतप्रधान येण्याआधी भारतीय वायुसेनेच्या आणखी दोन विमानांना सज्ज ठेवलं जातं.
शेवटच्या क्षणी जर पंतप्रधानांच्या विमानात काही बिघाड झाला तर या अतिरिक्त विमानांचा वापर करता येतो.
पंतप्रधानाचं विमान हवेत झेपावण्याआधी काही काळ सर्व परिसराला 'नो फ्लाईंग झोन' केलं जातं. म्हणजेच त्या परिसरात दुसऱ्या कोणत्याही विमानाचं उड्डाण होत नाही.
कठोर प्रशिक्षण
एसपीजी सुरक्षाव्यवस्थेच्या टीममध्ये समावेश होण्याआधी कमांडोंची तीन पातळ्यांवरील पार्श्वभूमी तपासली जाते.
एवढंच नाही तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची, दूरच्या नातेवाईकांची आणि मित्रांची देखील माहिती घेतली जाते, त्याबद्दल तपास केला जातो.
सुरुवातीचे तीन महिने कमांडोंना हत्यारांसह आणि हत्यारांशिवाय लढण्याचं आणि नेमबाजीचं प्रशिक्षण दिलं जातं.
मग त्यांना सर्व प्रकारची स्फोटकं आणि स्फोटकांसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची माहिती दिली जाते. त्याचबरोबर ही स्फोटकं निकामी करण्याचं कौशल्य देखील शिकवलं जातं.
याशिवाय त्यांना योग, ध्यान आणि मानसिक व्यायामाचं देखील प्रशिक्षण दिलं जातं.
एसपीजीच्या एका माजी अधिकाऱ्यानुसार हे कमांडो चालत्या वाहनातून सुद्धा अचूक नेमबाजी करू शकतात. गर्दीत उभ्या असलेल्या एखाद्या व्यक्तीवर नेम धरताना किंवा गोळी चालवताना इतर व्यक्तींना कोणतीही इजा पोहोचणार नाही याचं देखील त्यांना प्रशिक्षण दिलं जातं.
ते उत्तम पोहू शकतात. त्याचबरोबर अत्याधुनिक संचार किंवा संपर्क उपकरणं चालवण्यात ते पारंगत असतात. सुरुवातीच्या तीन महिन्यांचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्यांना पुढील तीन महिने आणखी कठोर प्रशिक्षण दिलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
रियल लाईफ सिच्युएशन म्हणजे प्रत्यक्ष घडू शकतात अशा घटनेसाठी त्यांची तयारी असते. हल्ला झाल्यावर आणि वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यावर त्यातून मार्ग काढण्याचं प्रशिक्षणही त्यांना दिलं जातं.
एखाद्या व्यक्तीनं एसपीजी कमांडोंच्या सुरक्षा कवचाच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर कोपराचा वापर करून त्याला धक्का देऊन मागे ढकलण्याचं प्रशिक्षण सुद्धा कमांडोंना दिलं जातं.
या धक्क्याचा परिणाम त्या व्यक्तीवर कित्येक आठवड्यांपर्यत राहतो हे अनेक वेळा असं दिसून आलं आहे.
एसपीजी कमांडोंना अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या धर्तीवर किंवा त्यांच्यासारखं प्रशिक्षण दिलं जातं. आता एसपीजीच्या प्रशिक्षणात इस्रायलच्या 'क्राव मागा' या ट्रेनिंग मॅन्युयलचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये कमांडोना बॉक्सिंग, कुस्ती, जुडो आणि कराटेमध्येही पारंगत केलं जातं.
प्रत्येक कमांडोची एक वार्षिक टेस्ट होते. जर कमांडो या चाचणीत अपयशी ठरले तर तत्काळ त्याला मूळ दलात म्हणजे ज्या सुरक्षा दलातून (पेरेंट कॅडर) तो आला असेल तिथे पाठवलं जातं. म्हणजेच तो एसपीजी कमांडो पथकाचा भाग राहत नाही.



























