You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कागलमध्ये थरार, 80 फुटांवर अडकला पाळणा, 18 जणांची 4 तासांनंतर सुटका
ऊर्स पाहायले गेलेले 18 जण पाळण्यात तब्बल चार तास अडकल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील्या कागलमध्ये घडली. इथे सुरू असलेल्या हजरत गैबीपीर ऊर्सात शुक्रवारी रात्री मोठा थरार पाहायला मिळाला.
आकाशपाळण्यात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने 18 जण सुमारे 80 फुटांवर हवेतच अडकले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, कोल्हापूर महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर सर्वांची सुखरूप सुटका केली.
हे रेस्क्यू ऑपरेशन मध्यरात्री दोनच्या सुमारास पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे या उरुसात आकाशपाळणे यात्रेकरूंचे आकर्षण असते. यंदा पहिल्यांदाच ‘जॉईंट व्हील’ नावाचा गगनचुंबी पाळणा उभारण्यात आला होता.
शुक्रवारी रात्री 9 वाजता या पाळण्यात 18 नागरिक बसलेले असताना अचानक बिघाड झाला आणि पाळणा हवेतच अडकला.
क्रेनच्या सहाय्याने जवळपास चार तास चाललेल्या या बचावकार्यात जवानांनी अत्यंत धाडसाने सर्व 18 जणांना सुरक्षितपणे खाली उतरवले. यात लहान मुलांचाही समावेश होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)