19 वर्षीय तरुणीचा ओव्हनमध्ये सापडला मृतदेह, तिच्या मृत्यूचं गूढ काय?

गुरसिमरन कौर

फोटो स्रोत, MARITIME SIKH SOCIETY

फोटो कॅप्शन, गुरसिमरन कौर
    • Author, हरमनदीप सिंग
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

कॅनडात 19 वर्षाच्या गुरसिमरन कौरचा गूढ परिस्थितीत मृत्यू झाला आहे. कॅनडातील नोवा स्कोटिया प्रांताची राजधानी असलेल्या हॅलिफॅक्समधील वॉलमार्ट स्टोअरच्या वॉक इन ओव्हनमध्ये (औद्योगिक कामासाठी वापरली जाणारी भट्टी) गुरसिमरनचा मृतदेह सापडला आहे.

19 ऑक्टोबरला वॉलमार्टच्या ओव्हनमध्ये गुरसिमरनचा जळालेला मृतदेह सापडला होता. प्रथमदर्शनी हा मृत्यू अपघाती असल्याचं सांगण्यात आलं.

मात्र, सोशल मीडियावर जेव्हा या घटनेची चर्चा होऊ लागली, तेव्हा अनेक शंका व्यक्त करण्यात आल्या.

गुरसिमरनच्या कुटुंबीयांनी अद्याप या घटनेबद्दल कोणताही प्रश्न किंवा शंका उपस्थित केलेली नाही.

कॅनडातील आणि जगभरातील शीख समुदाय गुरसिमरनच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढे सरसावला आहे.

गुरसिमरन कौर कोण होती?

गुरुद्वारा मॅरिटाईम शीख सोसायटीचे सचिव बलबीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 वर्षांची गुरसिमरन कौर पंजाबातील जालंधर शहरातील होती. तिच्या पश्चात कुटुंबात तिचे आई-वडील आणि 12 वर्षांचा भाऊ आहे.

दोन वर्षांपूर्वी गुरसिमरन कॅनडातील नोवा स्कोटिया प्रांतात तिच्या आई आणि भावाबरोबर आली होती. त्याआधी एक वर्षासाठी ती तिच्या आई-वडिलांसोबत इंग्लंडमध्ये वास्तव्यास होती. तिचे आई-वडील इंग्लंडमध्ये जवळपास 10-12 वर्षे वास्तव्यास होते.

गुरसिमरन कौर, तिची आई आणि भाऊ यांना कॅनडातील कायमस्वरुपी वास्तव्याचा परवाना (PR) मिळाला होता. मात्र, तिच्या वडिलांना पीआर मिळालेला नव्हता. त्यामुळे ते पंजाबात परत गेले होते.

जेव्हा गुरसिमरनचा मृत्यू झाला, तेव्हा तिचा भाऊ पंजाबात जालंधर इथं त्यांच्या वडिलांबरोबर राहत होता.

बलबीर सिंग म्हणतात की, गुरसिमरनच्या वडिलांवर पंजाबात उपचार सुरू असल्यामुळे तिचा भाऊ वडिलांबरोबर राहत होता.

ते म्हणाले की, गुरसिमरनचे आई-वडील इंग्लंडमध्ये वास्तव्यास असल्यामुळे तिचं आणि तिच्या भावाचं संगोपन त्यांच्या काकांनी केली होतं.

पोलिसांचं या घटनेबद्दल काय म्हणणं आहे?

हॅलिफॅक्स रिजनल पोलिसांनी 22 ऑक्टोबरला 'एक्स' या सोशल मीडिया व्यासपीठावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवर या घटनेबद्दल लिहिलं, "19 ऑक्टोबर ला 6990 ममफोर्ड रोडवरील वॉल-मार्ट मध्ये 19 वर्षांच्या तरुणीच्या झालेल्या अपघाती मृत्यूचा तपास सुरू आहे."

"मृत तरुणी त्या वॉलमार्ट स्टोअरमध्ये कर्मचारी होती. तिचा मृतदेह स्टोअरच्या बेकरी विभागातील एका मोठ्या वॉक इन ओव्हनमध्ये सापडला होता. तिच्या मृत्यूबाबत तपास सुरू आहे. तिचा मृत्यू कसा आणि कशामुळे झाला याबद्दल अद्याप सांगता येणार नाही."

पोलीस

फोटो स्रोत, HALIFAX_POLICE/X

पोलीस म्हणाले की, "हा घटनेचा तपास कमालीचा गुंतागुंतीचा आहे. यात अनेक सहयोगी यंत्रणांचा समावेश आहे. या प्रकारच्या तपासासाठी अधिक वेळ लागू शकतो."

याआधी हॅलिफॅक्स रिजनल पोलिसांनी 22 ऑक्टोबरला त्यांच्या 'एक्स' अकाऊंटवरून जाहीर केलं होतं की त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मदतीसाठी पुढे सरसावला शीख समुदाय

बलबीर सिंग म्हणाले की, या घटनेच्या दुसऱ्या दिवशी त्यांना कळालं की, शीख सुमदायातील एका तरुणीचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुरुद्वारा मॅरिटाईम शीख सोसायटीनं लगेचच त्या तरुणीच्या आईला संपर्क केला आणि या संपूर्ण घटनेबद्दल जाणून घेतलं आणि त्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला.

गुरसिमरनच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी सोसायटीनं ऑनलाइन स्वरुपात पैसे गोळा केले. या उपक्रमाला जगभरातील शीख समुदायानं भरभरून मदत केली आणि पैसे दान केले.

गुरसिमरनच्या कुटुंबाला मदत करण्यासाठीच्या या उपक्रमा अंतर्गत 24 तासाच्या आत 1,93,000 हून अधिक कॅनेडियन डॉलर्स गोळा झाले. त्यामुळे 24 तासांनंतर हा उपक्रम थांबवण्यात आला.

बलबीर सिंग म्हणाले, "सुरूवातीला आमचं उद्दिष्ट फक्त 50 हजार डॉलर्स गोळा करण्याचं होतं. आम्हाला वाटलं होतं की इतके पैसे जमा होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतील. मात्र इतकी रक्कम तर फक्त 12 तासांच्या आतच जमा झाली होती."

मॅरिटाईम शीख सोसायटीचे सचिव बलबीर सिंग

फोटो स्रोत, MARITIME SIKH SOCIETY

फोटो कॅप्शन, मॅरिटाईम शीख सोसायटीचे सचिव बलबीर सिंग

"यानंतर आम्हाला ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी आणि इटली सारख्या देशांमध्ये राहणाऱ्या शीख समुदायाकडून फोन कॉल येऊ लागले. त्यांचं म्हणणं होतं की मदतीसाठी पैसे गोळा करण्याचा उपक्रम सुरू ठेवण्यात यावा. म्हणून मग आम्ही तो उपक्रम 24 तासांसाठी सुरू ठेवला."

याव्यतिरिक्त गुरुद्वारा मॅरिटाईम शीख सोसायटी गुरसिमरनच्या कुटुंबाला वैद्यकीय मदत देखील पुरवते आहे. यात मानसोपचाराही समावेश आहे. गुरसिमरनच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी देखील गुरुद्वारा मॅरिटाईम शीख सोसायटीनंच घेतली आहे.

गुरुद्वारा मॅरिटाईम शीख सोसायटी काय आहे?

कॅनडाच्या नोवा स्कोटिया प्रांताची राजधानी असलेल्या हॅलिफॅक्स मध्ये असणाऱ्या शीख गुरुद्वाऱ्याचं व्यवस्थापन गुरुद्वारा मॅरिटाईम शीख सोसायटी करते.

गुरुद्वारा मॅरिटाईम शीख सोसायटीच्या वेबसाईटनुसार, 4 जून 1978 ला गुरुद्वाऱ्याच्या इमारतीचा पाया घातला गेला. सध्या हरजीत सिंग या सोसायटीचे अध्यक्ष आहेत. तर बलबीर सिंग सचिव आहेत.

मॅरिटाईम शीख सोसायटीकडून संचालित गुरुद्वारा इमारतीचा फोटो

फोटो स्रोत, MARITIME SIKH SOCIETY

फोटो कॅप्शन, मॅरिटाईम शीख सोसायटीकडून संचालित गुरुद्वारा इमारतीचा फोटो

गुरसिमरनच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यापासून ते तिच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी, तिच्या कुटुंबाला मानसोपचाराची मदत करणं आणि इतर मदत पुरवण्याचं काम या सोसायटीकडून करण्यात आलं आहे.

बलबीर सिंग म्हणतात की या सोसायटीला आणि गुरुद्वाऱ्याला कॅनडा आणि इतर देशांमध्ये मोठी प्रतिष्ठा आहे. कारण या सोसायटीच्या स्थापनेपासूनच विचारवंत या सोसायटीचे सदस्य आहेत.

गुरसिमरनच्या अंत्यसंस्काराला विलंब का?

बलबीर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरसिमरनच्या अंत्यसंस्काराला आणखी काही दिवस लागतील. सध्या गुरसिमरनचा मृतदेह पोलिसांच्या देखरेखीखाली स्थानिक मेडिकल सेंटरमध्ये ठेवण्यात आला आहे. मृतदेहाच्या डीएनए चाचणीचा अहवाल हाती आल्यानंतरच तो कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

बलबीर सिंग म्हणाले, पोलिसांनी तपासाला सुरूवात करतानाच मृतदेहातून डीएनए चाचणीसाठी नमुने घेतले आहे. या चाचणीचा अहवाल हाती येण्यास आणखी 4 किंवा अधिक दिवस लागतील. डीएनए चाचणीचा अहवाल हाती आल्यानंतर, गुरुद्वारा मॅरिटाईम शीख सोसायटी गुरसिमरनवर शीख समाजातील प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करणार आहे.

बलबीर सिंग म्हणाले की जेव्हाही या प्रकारचे अपघात घडतात, तेव्हा पोलीस अनेक अंगांनी त्याचा तपास करतात. यामध्ये आत्महत्या, औद्योगिक अपघात, हत्या किंवा द्वेषातून केलेला गुन्हा अशा विविध पैलूंचा विचार केला जातो.

बलबीर सिंग पुढे म्हणाले की ही घटना घडल्याच्या दिवसापासून गुरसिमनरच्या आई धक्क्यामध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी या घटनेबद्दल अद्याप कोणताही प्रश्न उपस्थित केलेला नाही.