बॉसवर ऑनलाईन टीका करणं पडलं महागात, रिव्ह्यू लिहिणाऱ्याला झाली अटक

- Author, निऑल मॅकक्रॅकन
- Role, बीबीसी न्यूज नॉर्थ आयर्लंड मिड अल्स्टर रिपोर्टर
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
उत्तर आयर्लंडमधील एका व्यक्तीला संयुक्त अरब अमिरातीत (UAE) अटक करण्यात आली होती. त्यामागचं कारण देखील लक्ष वेधून घेणारं आहे. ही आयरिश व्यक्ती दुबईत एका डॉग ग्रूमिंग सलूनमध्ये (dog grooming salon) नोकरी करत होती.
(डॉग ग्रूमिंग सलूनमध्ये जिथे कुत्र्यांची साफसफाई केली जाते, कुत्र्यांचे त्यांचे केस, नखं इत्यादी बाबींची निगा राखली जाते.)
या आयरिश व्यक्तीनं तो जिथे नोकरी करत होता त्या सलूनच्या मालकाबद्दल गुगलवर नकारात्मक रिव्ह्यू दिल्यानं किंवा मत व्यक्त केल्याबद्दल त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र आता त्याची सुटका झाली असून घरी परतणं हा त्याच्यासाठी "नाताळचा चमत्कार" असल्याचं त्यानं म्हटलं आहे.
या आयरिश व्यक्तीचं नाव क्रेग बॅलेंटाइन असं आहे. ते उत्तर आयर्लंडमधील काउंटी टायरॉन या प्रांतातील कूक्स टाऊन चे रहिवासी आहेत. त्यांना ऑक्टोबर महिन्यात अबूधाबी विमानतळावर अटक करण्यात आली होती. ते नोकरी करत असलेल्या सलून मालकाबद्दल नकारात्मक टिप्पणी केल्याबद्दल त्यांना ही अटक झाली होती.
संयुक्त अरब अमिरातीत (UAE)सायबर गुन्ह्यांसंदर्भातील कायदे अतिशय कडक आहेत.
क्रेग यांच्यावर सलून मालकावर टीका केल्याचा किंवा त्यांची निंदा केल्याचा आरोप होता. त्यासाठी त्यांना संभाव्य तुरुंगवासाला देखील तोंड द्यावं लागलं.


मायदेशी साजरा करणार नाताळ
क्रेग 33 वर्षांचे आहेत. संयुक्त अरब अमिरातीत त्यांच्या प्रवासावर असलेली बंदी उठवण्यात आल्यानंतर गुरुवारी (19 डिसेंबर) सकाळी ते आयर्लंडमधील डब्लिन येथे पोहोचले. त्यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की "आयर्लंडच्या भूमीवर परतल्याचा आनंद आहे."
क्रेग म्हणाले, "हे खूपच जबरदस्त आणि धक्कादायक आहे. त्याचवेळी हे सर्व खूपच गोंधळात टाकणारं आहे."
ते पुढे म्हणाले, "एका मिनिटात सर्व काही बदलतं."
"हा नाताळचा चमत्कार आहे."
क्रेग म्हणाले, "मी जेव्हा डब्लिन विमानतळावर आलो, मी जेव्हा आकाशातून डब्लिन पाहिलं, तेव्हा माझ्या आनंदाला सुरुवात झाली. तो खूपच आनंदाचा क्षण होता."
ते म्हणाले, "पुढील एक-दोन तासात मी एक मोठं फ्राय (आयरिश डिश) घेईन आणि त्यानंतर माझं लक्ष माझे मित्र आणि कुटुंबीयांना भेटण्यावर असेल."

फोटो स्रोत, Getty Images
नाताळच्या अगोदरच आपल्या घरी परतल्यामुळे क्रेग अतिशय आनंदी आहेत. ते म्हणाले, "नाताळच्या पूर्वसंध्येला, आम्ही (मित्रमंडळी) 12 ख्रिसमस पब्जना भेट देणार आहोत. लिव्हरपूलमधील काही मित्रसुद्धा इथे येणार आहेत. दरवर्षी नाताळ याप्रकारे साजरा करतो. आज सकाळी मी त्यांना मेसेज पाठवला आहे की 'मी येतो आहे'."
12 ख्रिसमस पब्ज म्हणजे आयर्लंडमधील एक परंपरा आहे. नाताळमध्ये मित्रमंडळी किंवा कुटुंबीय 12 वेगवेगळ्या पब्ज एकाच दिवशी हजेरी लावतात आणि धमाल करतात.
(ख्रिसमस पब्ज म्हणजे जिथे लोक दारू, जेवणाचा आनंद घेतात)
उत्तर आयर्लंडमधील सरकारची मदत
क्रेस बॅलेंटाईन यांच्या प्रकरणात आयर्लंडमधील अनेक राजकारण्यांनी हस्तक्षेप केला. यात उत्तर आयर्लंडचे पहिले पंतप्रधान मिशेल ओ'नील, युयुपीचे (UUP) माजी नेते सर रेग एम्पे आणि मध्य अल्स्टरचे कौन्सलर ट्रेव्हर विल्सन यांचा समावेश आहे.
क्रेग बॅलेंटाईन आयर्लंडमध्ये परतल्यावर ओ'नील म्हणाले, "क्रेग आयर्लंडमध्ये परत आले आहेत ही बातमी ऐकून मला आनंद झाला. गेले काही महिने त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेची चिंता करणाऱ्या त्यांच्या कुटुंबासाठी कठीण होते."
ओ'नील पुढे म्हणाले, "या प्रकरणात शक्य असलेली सर्व प्रकारची मदत करताना माझ्या कार्यालयाला आनंद झाला. मला आशा आहे की क्रेग यांच्या कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठीशी राहणारं त्यांचं कुटुंब आणि त्यांची मित्रमंडळी यांच्याबरोबर यांच्याबरोबर ते आता मजेत वेळ घालवू शकतील."
काऊन्सलर कार्ल विल्सन यांनी देखील क्रेग बॅलेंटाईन आयर्लंडला परतल्याचं स्वागत केलं.
"हा त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी अतिशय तणावाचा काळ होता. सुदैवानं क्रेग आता त्यांचं कुटुंब आणि मित्रांबरोबर नाताळच्या सणाचा आनंद घेऊ शकतील," असं युयुपी काऊन्सलर विल्सन म्हणाले.

क्रेग बॅलेंटाईन यांनी याआधी बीबीसी न्यूजला सांगितलं होतं की त्यांची एवढीच इच्छा आहे की त्यांना नाताळसाठी त्यांच्या कुटुंबाकडे त्यांच्या घरी परतायचं आहे.
गेले काही आठवडे क्रेग यांच्यासाठी फारच कठीण होते.
क्रेग बॅलेंटाईन यांनी या प्रकरणात आधीच दंड भरला आहे. मात्र ते म्हणाले की कदाचित जानेवारी अखेर न्यायालयातील या प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्यांना दुबईला परतावं लागेल.
ते म्हणाले की या प्रकरणात आधीच काही नियोजन करण्याऐवजी किंवा आधीच काही विचार करून ठेवण्याऐवजी त्यांना जशी परिस्थिती येईल त्याप्रमाणे वागावं लागेल.
"नाताळच्या पूर्वसंध्येला, न्यायालयाच्या निकालाबद्दल आपलं थोडंसच कळू शकेल," असं ते पुढे म्हणाले.
"या प्रकरणाच्या निकालासाठी मला आणखी 30 दिवस वाट पाहावी लागेल. त्यानंतर ते निकालावर पुन्हा अपील करू शकतात. त्यामुळे यासाठी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल किंवा त्याहूनही अधिक वेळ लागू शकतो किंवा हे प्रकरण अगदी सहजतेनं देखील संपुष्टात येऊ शकेल," असं या प्रकरणाच्या निकालासंदर्भात क्रेग म्हणाले.
क्रेग बॅलेंटाईन यांना अटक का करण्यात आली होती?
2023 मध्ये क्रेग बॅलेंटाईन यांना दुबईतील एका डॉग ग्रूमिंग सलूनमध्ये नोकरी मिळाली होती.
तिथे जवळपास सहा महिने काम केल्यानंतर आजारपणामुळे त्यांना सुट्टी हवी होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या आजारपणाचा पुरावा म्हणून त्यांच्या मालकाला डॉक्टरचं सर्टिफिकेट दिलं.
मात्र जेव्हा क्रेग कामावर हजर झाले नाहीत तेव्हा संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांकडे ते फरार असल्याची नोंद करण्यात आली. याचा अर्थ होता आता क्रेग यांना संयुक्त अरब अमिरात सोडून जाता येणार नव्हतं.
नंतर क्रेग बॅलेंटाईन त्यांच्यावरील ही प्रवास बंदी उठवण्यात यशस्वी झाले. त्यानंतर ते मायदेशी म्हणजे उत्तर आयर्लंडला गेले. मात्र हे सर्व करण्यासाठी त्यांना दोन महिने लागले आणि त्यासाठी हजारो पौंडांचा खर्च आला.

फोटो स्रोत, Getty Images
संयुक्त अरब अमिरातीतील प्रवास बंदी उठल्यानंतर आणि उत्तर आयर्लंडमध्ये परतल्यानंतर क्रेग यांनी ते जिथे नोकरी करत होते त्या डॉग ग्रूमिंग सलूनबद्दल ऑनलाईन रिव्ह्यू दिला. त्यात क्रेग यांनी त्यांच्या माजी मालकाकडून त्यांना कथितरित्या झालेल्या त्रासाबद्दल लिहिलं.
क्रेग बीबीसीला म्हणाले की त्यांच्या गुगल पोस्टमध्ये, "त्यांना ज्या अग्निपरीक्षेला तोंड द्यावं लागलं, त्याबद्दल त्यांनी लिहिलं."
ऑक्टोबरच्या शेवटी, क्रेग बॅलेंटाईन एकदा संयुक्त अरब अमिरातीत एका छोट्या सुट्टीसाठी गेले होते. त्यावेळेस त्यांनी सलून मालकाबद्दल गुगलवर जी कथित टीका किंवा त्याची जी कथित निंदा केली होती त्याबद्दल क्रेग यांना तात्काळ अटक करण्यात आली होती.
त्यानंतर त्यांना अबूधाबीतून दुबईत पाठवण्यात आलं होतं. तिथे त्यांना त्यांच्यावरील खटल्याच्या निकालाची वाट पाहावी लागली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























