'ललित मोदींना लाज वाटली पाहिजे'; थोबाडीत मारल्याचा व्हीडिओ 17 वर्षांनी समोर आल्यानंतर श्रीसंतच्या पत्नीची प्रतिक्रिया

श्रीसंत आणि त्याची पत्नी भुवनेश्वरी

फोटो स्रोत, INSTAGRAM/BHUWANESHWARI SHEESANT

फोटो कॅप्शन, श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी यांनी आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल क्लार्क यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी यांनी आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकेल क्लार्कवर जोरदार टीका केली आहे.

मायकेल क्लार्कच्या पॉडकास्टमध्ये आलेल्या ललित मोदींनी हरभजन सिंह आणि श्रीसंत यांच्यात 17 वर्षांपूर्वी झालेल्या 'थप्पड प्रकरणा'चा व्हीडिओ जारी केल्यानंतर ही प्रतिक्रिया आली आहे.

या जुन्या व्हीडिओत आयपीएल सामन्यानंतर हरभजन सिंह प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करतो, पण श्रीसंतच्या थोबाडात मारतो. यानंतर श्रीसंत मैदानावरच रडताना दिसतो.

क्रिकेट जगतात हे प्रकरण 'स्लॅपगेट' म्हणून प्रसिद्ध झाले.

2008 मधील एका आयपीएल सामन्यावेळी ही घटना घडली होती. मात्र, त्याचा व्हिडीओ प्रथमच ललित मोदी आणि क्लार्क यांनी 'बियॉन्ड 23' पॉडकास्टच्या ताज्या भागात जारी केला आहे.

हा सामना मुंबई इंडियन्स (एमआय) आणि पंजाब किंग्ज (तेव्हाचा किंग्ज इलेव्हन पंजाब) यांच्यात झाला होता.

श्रीसंतच्या पत्नीची प्रतिक्रिया

श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी यांनी इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटलं, "ललित मोदी आणि मायकेल क्लार्क तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुमच्यात कणभरही मानवता नाही. स्वस्त प्रसिद्धीसाठी आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी तुम्ही 2008 ची घटना उकरून काढली. हरभजन आणि श्रीसंत दोघांचीही आता शाळेत जाणारी लहान मुलं आहेत. तुम्ही त्यांच्या जुन्या जखमांवरील खपली पुन्हा काढत आहात. हे घृणास्पद, निर्दयी आणि अमानुष आहे."

"श्रीसंत यांनी अतिशय कठीण काळातून बाहेर येऊन पुन्हा सन्मानानं आयुष्य सुरू केलं आहे. पत्नी आणि मुलांची आई म्हणून आमच्या कुटुंबासाठी 18 वर्षांनंतर हा व्हिडीओ पुन्हा समोर येणे फार वेदनादायी आहे. कुटुंबाला पुन्हा त्या आघातातून जावं लागत आहे. तुम्ही केवळ व्ह्यूजसाठी हे केलं, पण यामुळे निर्दोष मुलांना त्रास सहन करावा लागला. आता मुलांना त्यांच्याशी काही संबंधच नाही अशा प्रश्नांना सामोरे जावे लागेल," अशी भावना भुवनेश्वरी यांनी व्यक्त केली.

श्रीसंत पत्नी भुवनेश्वरीसोबत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी यांनी इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत प्रतिक्रिया दिली.

"या नीच आणि अमानवी कृतीसाठी तुमच्यावर खटला चालला पाहिजे. श्रीसंत खंबीर आणि चारित्र्यवान व्यक्ती आहेत. कोणताही व्हीडिओ त्यांचा सन्मान हिरावून घेऊ शकत नाही. कुटुंबांना दुखवण्यापूर्वी देवाची भीती बाळगा. स्वतःच्या फायद्यासाठी मुलांनाही यात ओढू नका," असंही भुवनेश्वरी यांनी नमूद केलं.

यानंतर भुवनेश्वरी यांनी ललित मोदी आणि क्लार्कच्या पॉडकास्ट हँडलला टॅग करून म्हटलं, "सत्याचा सामना करण्याऐवजी तुम्ही माझी कमेंट डिलीट केली. व्ह्यूजसाठी पोस्ट करू शकता, तर मग सत्य दाखवण्याची हिंमतही दाखवा."

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

या प्रकरणावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "हरभजन-श्रीसंतचा व्हिडीओ 17 वर्षांनंतर बाहेर आला हे रोचक आहे. आम्ही फार थोड्या लोकांनी तो व्हिडीओ पाहिला होता आणि आम्ही तो सार्वजनिक करणार नाही, असं वचन दिलं होतं. कारण ते आयपीएलचं पहिलं वर्ष होतं आणि ही आयपीएलसाठी चांगली बातमी नव्हती."

हरभजन आणि श्रीसंत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या प्रकरणावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.

आकाश नावाच्या एका युजरनं लिहिलं, "ही केवळ 'थोबाडात मारण्याची'ची गोष्ट नव्हती. खरं सांगायचं तर या घटनेनंतर श्रीसंत सावरूच शकला नाही. कारण भज्जी त्याच्यासाठी मोठ्या भावासारखा होता."

विशाल नावाच्या आणखी एका युजरनं लिहिलं, "आयपीएलच्या इतिहासातील सर्वात सनसनाटी क्षणांपैकी एक भज्जी–श्रीसंत 'स्लॅपगेट'चा तो व्हिडीओ कधीही दाखवला गेला नव्हता."

ललित मोदींची प्रतिक्रिया

यापूर्वी ललित मोदींनी पॉडकास्टचा व्हिडीओ रिलीज केला आणि एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "माझ्या 'बियॉन्ड 23 पार्ट-3' पॉडकास्टमध्ये मायकेल क्लार्कसोबत ती चर्चित 'चपराक' दाखवण्यात आली आहे. मला हरभजन सिंह फार प्रिय आहे. मात्र, 17 वर्षांनंतर हे दाखवण्याची वेळ आली होती."

"अजून बरेच काही सांगायचे आहे, पण आता ते फक्त चित्रपटात दिसेल. या चित्रपटावर काम सुरू आहे. त्याची जबाबदारी माझ्या वतीने स्नेहा रजनी यांनी घेतली आहे. स्नेहा या मी आयपीएलचा अध्यक्ष आणि आयुक्त असताना सोनी इंडियाच्या मार्केटिंग हेड होत्या."

17 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

25 एप्रिल 2008 रोजी मोहाली येथे झालेल्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबनं मुंबई इंडियन्सचा 66 धावांनी पराभव केला.

पुरस्कार वितरणावेळी अचानक टीव्ही स्क्रीनवर श्रीसंत रडताना दिसला. मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू हरभजन सिंह याने श्रीसंतच्या थोबाडीत मारल्याचं नंतर समोर आलं.

हरभजन

फोटो स्रोत, Beyond23Pod

फोटो कॅप्शन, पुरस्कार वितरणावेळी अचानक टीव्ही स्क्रीनवर श्रीसंत रडताना दिसला.

या घटनेनंतर हरभजननं माफी मागितली. मात्र हरभजनचं 11 सामन्यांसाठी निलंबन करण्यात आलं आणि त्याच्यावर दंडही ठोठावण्यात आला. तेव्हा ती एक चपराक हरभजनसाठी कोट्यावधींचं नुकसान करणारी ठरली.

ते प्रकरण एवढं तापलं की, तत्कालीन आयपीएल आयुक्त ललित मोदींना हरभजनसह दिल्लीत पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यावेळी गर्दीसमोर हरभजननं फक्त 'सॉरी' म्हटलं आणि तो निघून गेला.

या प्रकरणात हरभजन व श्रीसंत बीसीसीआयचे तत्कालीन चौकशी आयुक्त सुधीर नानावटी यांच्यासमोर हजर झाले. बीसीसीआयनेही कठोर भूमिका घेत हरभजनला कारणे दाखवा नोटीस बजावली.

हरभजननं मागितली माफी

अलीकडेच हरभजनने रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनेलवर या घटनेवर भाष्य केलं.

तो म्हणाला, "माझ्या आयुष्यात जर एक गोष्ट बदलता आली असती, तर ती श्रीसंतशी झालेली ती घटना असती. जे झाले ते चुकीचे होते. मला तसे करायला नको होते. मी 200 वेळा माफी मागितली आहे."

हरभजन सिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2018 मध्ये दक्षिण अफ्रिकेत खेळताना हरभजन सिंग

"सगळ्यात वाईट वाटते म्हणजे या घटनेनंतर प्रत्येक वेळी आणि प्रत्येक मंचावर मला पुन्हा पुन्हा माफी मागावी लागली. ती घटना माझी चूक होती."

याच शोमध्ये हरभजननं श्रीसंतच्या मुलीच्या भेटीवरही भाष्य केलं.

हरभजननं सांगितलं, "मी तिच्याशी प्रेमाने बोलत होतो, पण तिनं मला सांगितलं की, 'मी तुमच्याशी बोलणार नाही. तुम्ही माझ्या पप्पांना मारलं.' हे ऐकून माझं मन तुटलं आणि डोळ्यांत अश्रू आले. त्यावेळी मी स्वतःला विचारलं की, मी त्या मुलीवर काय छाप सोडली आहे? ती मला वाईट माणूस समजत असेल. ती मुलगी मला असा व्यक्ती म्हणून बघत असेल ज्यानं तिच्या वडिलांना मारलं आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)