महाराष्ट्र केसरीचे पंच मारूती सातव यांना सिकंदर शेख प्रकरणावरून धमकीचा फोन #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Murlidhar Mohol/Twitter
आज सकाळी विविध वृत्तपत्रं आणि बेवसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्या खालीलप्रमाणे –
1. महाराष्ट्र केसरीचे पंच मारूती सातव यांना धमकीचा फोन, सिंकदरचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच पार पडली. यात सिकंदर शेख याची महेंद्र गायकवाड याच्यासोबत मॅच झाली होती. या मॅचच निर्णय पंचांनी चुकीचा दिला असाही आरोप झाला. सोशल मीडियावर हा विषयी ट्रेंडही झाला.
पण आता या मॅचचे पंच मारूती सातव यांना धमकीचे फोन यायला लागले आहेत. त्यांनी तशी तक्रार कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये केली आहे.
ही बातमी पुढारी ऑनलाईनने दिली आहे.
या प्रकरणी संग्राम कांबळे या पोलीस कर्मचाऱ्याची क्लीप सातव यांनी पोलिसांना दिली आहे.
दुसरीकडे सिंकदर शेख यानेही या प्रकरणावर भाष्य केलं आहे. लोकसत्तानेही बातमी दिली आहे.
सिंकदरने म्हटलंय की, “संग्राम कांबळे हे पहिल्यापासून गंगावेस तालमीचे फेसबुक अकाउंट चालवत आहेत. त्यांना कुठेतरी वाईट दिसलं, म्हणून ते बोलले आहेत. सगळीकडे रेकॉर्डिग व्हायरल झालं आहे. कोणतीही धमकी देण्यात आली नाही. फक्त तुम्ही असं का केलं ही विचारणा केली आहे.”
2. अपघातानंतर पहिल्यांदाच आली ऋषभ पंतची प्रतिक्रिया, ट्वीट करून दिली माहिती
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा गेल्या महिन्यात अपघात झाला होता. 30 डिसेंबर रोजी सकाळी दिल्लीहून रुरकी येथील त्याच्या घरी जात असताना त्याची कार उलटली.
तेव्हापासून पंत रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर प्रथम रुरकी आणि नंतर डेहराडून येथे उपचार करण्यात आले. यानंतर बीसीसीआयने त्यांना एअरलिफ्ट करून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले आणि पंतची शस्त्रक्रियाही तिथेच झाली.
या अपघातानंतर पहिल्यांदाच त्याने ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

फोटो स्रोत, ISHWAR CHAND
या अपघातातून सावरल्यानंतर ऋषभ पंतने ट्वीट करत क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले. तसेच त्याने दोन तरुणांचा खास उल्लेख करत आभार मानले आहेत.
संबंधित तरुणांचे फोटो शेअर करत “मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीन” असं पंतने लिहिलं आहे. संबंधित दोन तरुणांनी अपघाग्रस्त ऋषभ पंतची मोलाची मदत केली होती. रजत कुमार आणि निशू कुमार अशी या दोन तरुणांची नावं आहेत.
त्याने म्हटलं, “सर्वांनी दिलेला पाठिंबा आणि शुभेच्छांसाठी मी नम्र आणि कृतज्ञ आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती देताना मला आनंद होत आहे. रिकव्हरीचा मार्ग सुरू झाला आहे आणि मी पुढील आव्हानांसाठी तयार आहे. बीसीसीआय आणि जय शाह व सरकारी यंत्रणांचे आभार.”
3. शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? आज निवडणूक आयोगात सुनावणी
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी जरी फेब्रुवारी महिन्यात होणार असली तरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याची निर्णय मात्र त्या आधीच होण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण यावर आज सुनावणी होणार आहे.
ही बातमी APB माझाने दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता त्यावर काय निर्णय होतो याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
निवडणूक आयोगाने संघटनात्मक निवडणुकांना परवानगी दिली तर याचा अर्थ शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरे गटाचं अस्तित्व मान्य केल्यासारखं होतं. त्यामुळे एकतर मुदतवाढ किंवा त्याआधीच काही मोठा निर्णय या दोन शक्यता असल्याचं म्हटलं जातंय.
4. दाओसमध्ये पहिल्याच दिवशी 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक - उदय सामंत
दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या वतीनं आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला 45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
ही बातमी ABP माझाने दिली आहे.
दाओस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार आहे. तसेच महत्वाच्या उद्योगांसमवेत सामंजस्य करारही केले जाणार जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
5. 'एखादी व्यक्ती नाही, तर भगवा ध्वजच आमच्यासाठी आदर्श’ - मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणतीही व्यक्ती आपल्यासमोर आदर्श नाही. भगवा ध्वज आपल्यासमोर आदर्श आहे. आपल्या समोर तत्त्व आहेत आणि तत्त्वांमध्ये जर काही चिन्ह असेल तर तो भगवा ध्वज आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलंय.
ही बातमी लोकमतने दिली आहे.
पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले की, “रामभक्त हनुमान हे आमचे आदर्श आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श आहेत. आपल्याला भारत विश्वगुरू बनवायचा आहे. संपूर्ण जगाला या देशाची गरज आहे. आपले जीवन देशासाठी आहे. आपण जे काही कमावू, त्याचा देशासाठी त्याग करायला हवा.”
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























