महाराष्ट्र केसरी : सिंकदरचे आईवडील म्हणतात, ‘आमच्या लेकरावर अन्याय झाला’ #5मोठ्याबातम्या

Published

आज सकाळी प्रमुख वेबसाईट आणि वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात आढावा खालीलप्रमाणे –

1. महाराष्ट्र केसरी: ‘आमच्या लेकरावर अन्याय झाला’, सिंकदरच्या आईवडिलांनी व्यक्त केल्या भावना

पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चर्चेचा विषय म्हणजे सिकंदर शेख. सोशल मीडियावर महाराष्ट्र केसरी विजेत्यापेक्षा जास्त सिकंदरची चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्र केसरी पुरस्कारापासून वंचित राहिलेल्या सिकंदरच्या आई-वडिलांनी स्पर्धेबाबत खंत व्यक्त केली.

आमच्या मुलावर अन्याय झाला आहे, पंचांचा निर्णय चुकला असं त्यांच्या आईवडिलांनी म्हटलं.

ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

"सिकंदरला हमाली करत आम्ही मोठं केलं. काबाड कष्ट करून त्याला पैलवान केलं सिकंदरने देखील रात्रंदिवस एक केले. त्याला उपांत्य फेरीत कमी पॉईंट दिलें गेले हे अतिशय निंदनीय आहे.आमच्या मुलावर जो अन्याय झाला ,तो इतर पैलवानांवर अन्याय होऊ नये," ते पुढे म्हणाले.

2. उर्फी जावेद मुस्लिम असल्यानेच तिला भाजपकडून टार्गेट केलं जातंय का? – तृप्ती देसाई

गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून राजकारणात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.

चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.

अशात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी वादात उडी घेतली आहे.

उर्फी जावेदला कुणी टार्गेट करत असेल तर आम्ही तिच्यासोबत आहोत, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

ही बातमी लोकमतने दिली आहे.

"आपला देश संविधानावर चालतो. उर्फी जावेदने काय कपडे घालावेत किंवा घालू नयेत. हा तिचा निर्णय आहे. याआधी देखील अनेक अभिनेत्रींनी बोल्ड किंवा अश्लील कपडे घातलेले आहेत. मात्र त्यावर कधीही कुणी आवाज उचलला नाही.

त्यांच्या बाबतीत आताही बोलले जात नाही. उर्फी जावेदलाच भाजपा का टार्गेट करत आहे. उर्फी जावेद मुस्लीम आहे म्हणून तिला टार्गेट केले जात आहे का?" अशी विचारणा तृप्ती देसाई यांनी केली आहे.

3. सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांचे काँग्रेसमधून निलंबन

डॉ. सुधीर तांबें यांच्यावर काँग्रेसपक्षाने निलंबनाची कारवाई केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उमेदवारी जाहीर होऊनही अर्ज न भरल्याने ही कारवाई करण्यात आली. 

चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे पक्षातून निलंबित राहतील त्यांच्या निलंबनाचे पत्रक काँग्रेस पक्षाने जाहीर केले आहे. राष्ट्रीय शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

ही बातमी झी 24 तासने दिली आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली होती, मात्र, त्यानंत त्यांचे सुपूत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला सत्यजित तांबे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगलेय.

त्यातच आता सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबेंचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आले आहे.

4. ओडिशात चेंगराचेंगरी, एका महिलेचा मृत्यू तर अनेकजण जखमी, जमावबंदी लागू

ओडिशामध्ये मकर संक्रांतीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला आहे. परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

ओडिशामधील कटक येथील सिंहनाथ मंदिर परिसरात मकर संक्रांतीच्या जत्रेवेळी चेंगराचेंगरी झाली. यानंतर मंदिर परिसरात कलम 144 अंतर्गत लागू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

5. राज्य आणखी गारठणार

पुढचे तीन दिवस राज्यात गार वारे वाहून थंडीचा कडाका कायम राहणार असल्याची बातमी दिव्य मराठीने दिली आहे.

अफगाणिस्ताकडून आलेल्या पश्चिम चक्रवात वाऱ्यांमुळे उत्तर भारतात थंडीची लाट आलेली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही दिसणार आहे त्यामुळे येत्या तीन दिवसात राज्यात पारा आणखी घसरू शकतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)