न्यूयॉर्कमध्ये गोळीबार, घटनेत 4 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश

फोटो स्रोत, CBS News NewYork
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून घेतली त्यात त्याचा मृत्यू झाला.
या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन परिसरातील एका इमारतीमध्ये घडली. पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, गोळीबार करणारी व्यक्ती एकटीच होती.
अमेरिकेतील बीबीसीची सहकारी वृत्तसंस्था असलेल्या सीबीएस न्यूजच्या मते, हल्लेखोराचा मृत्यू स्वतःवर गोळी झाडून घेतल्यानं झाला.
पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले की शेन तामुरा या 27 वर्षीय तरुणाने हा गोळीबार केला.
जसा तामुरा इमारतीमध्ये आला त्यानंतर त्याने पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
'या गोळीबारानंतर हल्लेखोराने स्वतःवर गोळी झाडून घेतली, त्यात त्याचा मृत्यू झाला,' असे पोलिसांनी सांगितले.

फोटो स्रोत, Getty Images
या तरुणाने हे कृत्य का केले याबद्दल अद्याप माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की हल्लेखोराजवळ लायसन्स गन होती.
अमेरिकेत सतत गोळीबाराच्या घटना का घडतात?
पण अमेरिकेत सातत्याने अंदाधुंद गोळीबाराच्या घटना का घडत असतात? देशात सहज उपलब्ध होणाऱ्या बंदुकींविरोधात कायदा आणावा, म्हणून वेळोवेळी मागणीही उठत असते. मात्र या घटना काही कमी होताना दिसत नाहीत.
1. अमेरिकेत किती प्रकारच्या बंदुका मिळतात?
लष्करी पद्धतीची हत्यारं अशाप्रकारच्या गोळीबाराच्या घटनांसाठी कारणीभूत ठरतात, असं म्हटलं जातं.
अमेरिकेत सध्या चलनात असलेल्या शस्त्रास्त्रांपैकी सर्वाधिक 64 टक्के हँडगन्स आहेत.
त्याखालोखाल 4 टक्के रायफल्स, 2 टक्के शॉटगन्स आणि अन्य 2 टक्के असे बंदुकांचे प्रकार आहेत.
याव्यतिरिक्त उर्वरित 28 टक्के शस्त्रांची माहितीच नसल्याचं आकडेवारी सांगते.

फोटो स्रोत, Getty Images
2. बंदुकांची किंमत किती?
गोळीबारासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकीची किंमत 1,500 अमेरिकन डॉलर्स इतकी असते. हँडगन्स 200 अमेरिकन डॉलर्स मिळू शकतात. अमेरिकेत हे काही फारसं महाग नाही.
3. सर्वांत जास्त बंदुका कुठे आहेत ?
अनेक देशांमध्ये लष्कर वगळता सर्वसामान्य माणसांकडे किती शस्त्रं आहेत, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.
मात्र अमेरिकेत 39 कोटी शस्त्रं सर्वसामान्य जनतेकडे आहेत.
सर्वाधिक शस्त्र बाळगणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका आघाडीवर आहे.
1982 नंतर अमेरिकेत जाहीरपणे अंदाधुंद गोळीबार करण्याच्या 110 पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत.
2017मध्ये लास व्हेगास इथे झालेल्या गोळीबाराच्या घटनेत 58 लोकांचा मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
4. बंदुका बाळगण्याला पाठिंबा कुणाचा?
नॅशनल रायफल असोसिएशन ही संघटना कोणत्याही स्वरूपाच्या बंदुका बाळगण्यावरील नियमनाविरोधात आहे.
बंदुका बाळगल्याने नागरिकांना अधिक सुरक्षित वाटू शकतं, असं या संघटनेचा दावा आहे.
अमेरिकेतील राज्यकर्त्यांच्या जवळची म्हणून या संघटनेचं नाव घेतलं जातं.
अमेरिकेतील दर पाचपैकी एक बंदुकधारी व्यक्ती या संघटनेचा सदस्य आहे.
बंदुकांच्या धोरणासंदर्भात लॉबिंगकरता या संघटनेनं 5 दशलक्ष डॉलर्स एवढी प्रचंड रक्कम दोन वर्षांपूर्वी खर्च केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
5. वैयक्तिक हक्कांचा मुद्दा?
15 डिसेंबर 1791 मध्ये अमेरिकेच्या राज्यघटनेत केलेल्या सुधारणेनुसार बंदुकीच्या मालकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला होता.
1871 मध्ये विल्यम सी. चर्च यांनी शास्त्रोक्त पद्धतीने बंदुकीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी द नॅशनस रायफल असोसिएशनची स्थापना झाली होती.
बंदुका बाळगण्यासंदर्भात वेळोवेळी संसदेत चर्चाही झाली. 26 जून 2008मध्ये अमेरिकेच्या बंदूक बाळगण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


























