तृणमूलवर फुटीचं सावट, ममता बॅनर्जींच्या हातातून पक्ष जाण्याची वेळ; पुढे काय होऊ शकतं?

ममता बॅनर्जी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्रभाकर मणि तिवारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, कोलकाता
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ज्या पक्षाची स्थापना करून मेहनतीच्या जोरावर फक्त 13 वर्षांमध्ये ज्याला शून्यातून शिखरावर पोहोचवलं होतं, तो पक्षच आता त्यांच्या हातातून निसटेल का?

ममता बॅनर्जी स्वत:च्याच घरात (पक्षात) बेघर होण्याचा धोका आहे का?

तृणमूल काँग्रेसच्या 58 आमदारांनी बंड केल्यावर आणि हकालपट्टी केलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी सभागृहात विरोधी पक्षनेते झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात आता हेच प्रश्न विचारले जात आहेत.

याचबरोबर ममता बॅनर्जी आता पुढे काय करणार, याचेही अंदाज बांधले जात आहेत.

'फिनिक्स' नावाच्या जादुई पौराणिक पक्ष्याप्रमाणे त्या पुन्हा एकदा राखेतून भरारी घेऊ शकतात का?

चार दशकांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत ममता बॅनर्जी यांनी अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला आहे.

उदाहरणार्थ, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला फक्त एकच जागा जिंकता येणं असो किंवा 2006 च्या विधानसभा निवडणुकीत फक्त 29 जागा मिळणं असो. मात्र, संपूर्ण पक्षच त्यांच्या हातातून निसटत असल्याची परिस्थिती पहिल्यांदाच दिसते आहे.

दोन-तृतियांश आमदारांनी बंड केल्यानंतर तात्काळ पावलं उचलत ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या सर्व समित्या आणि संघटना बरखास्त केल्या आहेत. तसंच, निवडणुकीच्या निकालांचं सखोल विश्लेषण करणार असल्याचं सांगितलं आहे.

पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर त्या सातत्यानं बैठका घेत आहेत. या बंडानंतर त्यांनी अधिकृतपणे अद्याप कोणतंही वक्तव्यं केलेलं नाही.

मात्र, कदाचित पक्षातील या फुटीचा अंदाज त्यांना आधीच आला होता.

अभिषेक बॅनर्जी यांच्याबाबत उपस्थित झालेले प्रश्न

बंडखोर आमदारांनी स्पष्ट केलं आहे की, ते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर आणि पक्ष चालवण्याच्या त्यांच्या पद्धतीवर नाराज आहेत. ममता बॅनर्जींवर नाराज नाहीत.

मात्र, ममता बॅनर्जी यांच्यासमोरची अडचण म्हणजे की, हे माहित असूनही त्या अभिषेक यांना बाजूला सारू शकत नाहीत. त्यामागे कारणदेखील आहे.

पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की "पक्षात अभिषेक यांचं स्थान उंचावत गेल्यावर पक्षातील अनेक जुन्या नेत्यांचा रोष वाढत गेला होता, हे खरं आहे. त्याव्यतिरिक्त नवीन पिढीतील अनेक नेत्यांमध्ये देखील असंतोष वाढत होता. सुवेंदू अधिकारी यांनीदेखील याच कारणामुळे पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता."

ममता  बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी

या नेत्यानं असंही सांगितलं की, "सर्वकाही माहित असूनही ममता बॅनर्जी अभिषेकना बाजूला सारू शकत नाही. हा फक्त कौटुंबिक मुद्दा नाही."

"अभिषेक यांना बाजूला सारल्यास किंवा त्यांच्यावर कोणतीही कारवाई केल्यास त्यातून असा संदेश जाईल की त्या बंडखोरांसमोर झुकल्या आहेत. मात्र, नमतं घेणं ममतांच्या स्वभावात नाही."

तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या एका नेत्यानं सांगितलं की "बदलत्या परिस्थितीत ममता बॅनर्जी विधानसभेतील घटनेच्या कायदेशीर वैधतेला न्यायालयात आव्हान देण्याबाबत विचार करत आहेत. यासाठी कायदेतज्ज्ञांचा सल्लादेखील घेतला जातो आहे. पक्षातून काढण्यात आलेल्या एखाद्या आमदाराला विधानसभेत त्याच पक्षाचा नेता कसं काय बनवलं जाऊ शकतं? हा प्रश्न पक्ष न्यायालयात उपस्थित करेल."

या मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेस पुढील आठवड्यात कलकत्ता उच्च न्यायालयात खटला दाखल करणार आहे.

कायदेशीर आव्हान देण्याच्या तयारीत टीएमसी

तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि वकील कल्याण बॅनर्जी म्हणाले, "खऱ्या तृणमूल काँग्रेसमधून वेगळा होऊ बनलेला गट, ज्याला विरोधी पक्षाचा दर्जा मिळाला आहे तो बेकायदेशीर आहे. पक्षानं ऋतब्रत यांची आधीच हकालपट्टी केली होती. जो पक्षाचा सदस्यच नाही, तो तृणमूल काँग्रेसकडून विरोधी पक्षनेता कसा काय होऊ शकतो?"

"बंगालच्या विधानसभेच्या अध्यक्षांनी जे केलं आहे, त्याच्यासारखं दुसरं उदाहरण देशात मिळणार नाही. जो नेता पक्षातच नाही, त्याला विरोधी पक्षनेता करण्यात आलं आहे. या मुद्द्याला पक्ष कायदेशीर आव्हान देईल," असं ते म्हणाले.

टीएमसी आता त्यांच्या खासदारांच्या हालचालींवर देखील लक्ष ठेवून आहे

फोटो स्रोत, Sanjay Das

फोटो कॅप्शन, टीएमसी आता त्यांच्या खासदारांच्या हालचालींवर देखील लक्ष ठेवून आहे

याव्यतिरिक्त पक्ष आता त्यांच्या खासदारांच्या हालचालींवर देखील लक्ष ठेवून आहे. विशेषकरून चार वेळा खासदार झालेल्या काकोली घोष दस्तीदार यांच्या बंडखोर भूमिकेनंतर पक्षात ही शंका बळावते आहे की आम आदमी पार्टीच्या खासदारांप्रमाणेच त्यांच्या खासदारांची परिस्थिती तर होणार नाही ना.

बुधवारी (3 जून) रात्री उशीरा ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत देखील याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा झाली.

दिल्लीच्या दिशेनं पडणारी पावलं

दुसऱ्या बाजूला बंगालमध्ये सत्ता आणि त्यानंतर पक्षदेखील जवळपास हातातून गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आता दिल्लीकडे लक्ष केंद्रित केलं आहे.

ममता बॅनर्जी दिल्लीत 8 जूनला होणाऱ्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीत अभिषेक यांच्यासह सहभागी होणार आहेत. पक्षातील सूत्रांनी सांगितलं की, पुढील लोकसभा निवडणुकीत 'एकाविरुद्ध एक' (म्हणजे भाजपाच्या विरोधात एकच उमेदवार) म्हणजे प्रत्येक मतदारसंघात विरोधी पक्षांच्या आघाडीचा संयुक्त उमेदवार उभा करण्याच्या फॉर्म्युलाला त्या पाठिंबा देतील.

पक्षाच्या एका नेत्यानं सांगितलं, "त्या बैठकीत ममता बॅनर्जी बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे त्या एक नवीन फॉर्म्युला मांडू शकतात." मात्र त्या नेत्यानं याबाबत सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

ममता बॅनर्जी दिल्लीत 8 जूनला होणाऱ्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीत अभिषेकसह यांच्यासह सहभागी होतील

फोटो स्रोत, Sanjay Das

फोटो कॅप्शन, ममता बॅनर्जी दिल्लीत 8 जूनला होणाऱ्या इंडिया ब्लॉकच्या बैठकीत अभिषेकसह यांच्यासह सहभागी होतील

तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यानं सांगितलं, "मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्या पहिल्या दिल्ली दौऱ्याच्या वेळेसच तिथे बंग भवनमध्ये ऋतब्रत बॅनर्जी यांनी त्यांची भेट घेतली होती. त्याच दिवशी पक्षातील बंडाची बीजं पेरली गेली."

अर्थात भाजपाचे नेते ही बाब नाकारत आले आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमीक भट्टाचार्य म्हणाले, "हा तृणमूल काँग्रेसचा अंतर्गत मुद्दा आहे. भाजपाचा याच्याशी काहीही संबंध नाही."

सध्याच्या परिस्थितीसाठी तृणमूल काँग्रेस भाजपाच्या बंगाल मॉडेलला जबाबदार ठरवते आहे. इंडिया आघाडीतील त्यांचा सहकारी पक्ष असलेली काँग्रेसदेखील या मुद्द्यावर त्यांच्याशी सहमत आहे.

या दोन्ही पक्षांचं म्हणणं आहे की भलेही भाजपा अधिकृतपणे या फुटीला तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत बाब म्हणत असेल, मात्र पडद्यामागे त्यांचा पाठिंबा नसता तर ऋतब्रत यांची बंड करण्याची हिंमत झाली नसती आणि त्यांना इतक्या आमदारांनी पाठिंबादेखील दिला नसता.

आमदार किंवा खासदारही नसलेल्या ममता बॅनर्जी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांचं म्हणणं हे की, 1984 नंतरचा मधला 2 वर्षांचा काळ सोडला तर ममता बॅनर्जी खासदार किंवा आमदार नाहीत असं कधी झालं नाही.

मात्र, सध्या त्या खासदार किंवा आमदार होण्याची कोणतीही संधी दिसत नाही.

खासदार हाजी नूरुल इस्लाम यांच्या निधनामुळे बशीरहाट लोकसभा मतदारसंघातील जागा सध्या रिक्त आहे आणि तिथे पोटनिवडणूक होणार आहे.

मात्र, त्या जागेवरून ममता यांना निवडणुकीत उभं करण्याचा धोका पक्ष पत्करू शकत नाही. तिथे पराभव झाल्यास त्यांना आणि पक्षाला आणखी टीकेला सामोरं जावं लागेल.

विरोधी पक्षांनी तृणमूल काँग्रेसमधील या बंडासाठी ममता बॅनर्जी यांनाच दोष दिला आहे.

सीपीएमचे नेते मोहम्मद सलीम म्हणाले, "डाव्या आघाडीविरुद्ध लढण्यासाठी ममता बॅनर्जी यांनीच बंगालमध्ये भाजपाला पाय रोवण्यास मदत केली होती. आता त्यांना याचे परिणाम भोगावे लागत आहेत. पक्षाच्या या स्थितीसाठी त्याच जबाबदार आहेत."

ममता बॅनर्जींचे कट्टर टीकाकार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले, "ममता बॅनर्जींनीच कधीकाळी काँग्रेसमध्ये फूट पाडून तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. आता इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे. ममता बॅनर्जी यांना तशाच परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे."

पुढील वाटचाल किती कठीण?

राजकीय विश्लेषक म्हणतात की, ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत आधीदेखील अनेक प्रतिकूल परिस्थितींना तोंड दिलं आहे. त्यावर मात करण्यात यश मिळवलं आहे. मात्र, यावेळची परिस्थिती त्यांच्यासाठी अतिशय कठीण आहे.

ज्येष्ठ पत्रकार पुलकेश घोष म्हणाले, "ममता यांच्या यशाचं रहस्य म्हणजे त्यांच्याकडे असलेली नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फौज तर होतीच, त्याचबरोबर सामान्य जनतेचाही त्यांना प्रचंड पाठिंबा होता."

"मात्र, निवडणुकीच्या निकालांमधून हे स्पष्ट झालं आहे की आता त्यांना जनतेचा तसा पाठिंबा राहिलेला नाही आणि तशीच नेत्यांची फौजदेखील राहिलेली नाही. अशा परिस्थितीत या बंडामुळे निर्माण झालेल्या आव्हानावर मात करणं त्यांच्यासाठी अतिशय कठीण ठरू शकतं."

यावेळची परिस्थिती ममता बॅनर्जींसाठी खूपच कठीण असल्याचं विश्लेषकांना वाटतं

फोटो स्रोत, Samir Jana/Hindustan Times via Getty Images

फोटो कॅप्शन, यावेळची परिस्थिती ममता बॅनर्जींसाठी खूपच कठीण असल्याचं विश्लेषकांना वाटतं

सध्या ममता बॅनर्जी यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान पक्षाच्या खासदारांना एकत्र ठेवण्याचं आहे. जेणेकरून तिथेदेखील विधानसभेचं मॉडेल अंमलात येऊ नये, असं ते म्हणाले.

विद्यार्थी राजकारणाच्या काळापासूनच ममता बॅनर्जी यांच्या राजकारणाच्या चढ-उतारांना जवळून पाहणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक मोनिदीपा बॅनर्जी म्हणाल्या, "आमदारांचं बंड झाल्यानंतर खासदारदेखील याच मार्गानं जातील का? हाच प्रश्न आता ममता बॅनर्जी यांना सतावत असणार."

"कदाचित हा ममता यांच्या आयुष्यातील राजकीयदृष्ट्या सर्वाधिक आव्हानात्मक काळ आहे. त्यांचं राजकीय भवितव्य अंधकारमय दिसतं आहे. भूतकाळात त्यांना फायर ब्रँड नेत्या म्हटलं गेलं आहे. मात्र त्यांना हे सिद्ध करावं की लागेल की अजूनही त्यांच्यात ती धमक आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)