डोळ्यांसमोर मायबापाचे मृत्यू पाहिले, व्यवस्थेनं हाती शस्त्र दिले; 'इंडियन रॉबिनहूड'ची थरारगाथा

तंट्या भिल्ल यांचा पुतळा

फोटो स्रोत, Rajesh johari

    • Author, नितीन सुलताने
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 13 मिनिटे

एक शांत स्वभावाचा मुलगा. समाजातील सर्वात दुर्लक्षित वर्गातला. फक्त अन्यायच पाहिलेला. सत्तेपुढं हतबल कुटुंब आणि कोवळ्या वयात डोळ्यांदेखत आईचा मृत्यू पाहिला. बापाचेही प्रचंड हाल पाहिले. त्याच व्यवस्थेचा तोही बळी ठरला.

अखेर शांत स्वभावाचा हा मुलगा बंडखोर झाला. एवढा की, त्या व्यवस्थेलाही घाम फुटावा. पुढं लोकांसाठी रॉबिनहूड बनला, ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं आणि आज इतिहासात त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद झाली.

ही तुम्हाला एखाद्या ब्लॉकबस्टर सिनेमाची गोष्ट वाटू शकते. पण ज्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्याची ही गोष्ट आहे, त्यांचं जीवन त्याहीपेक्षा ब्लॉकबस्टर म्हणावं असं आहे. ते म्हणजे 'इंडियन रॉबिनहूड' अशी ओळख असलेले तंट्या भिल्ल.

जन्माच्या 180 हून अधिक वर्षांनंतरही या आदिवासी जननायकाचं जीवन खऱ्या अर्थानं अनेकांना प्रेरणा देणारं आहे. आदिवासी समाजासाठी केलेल्या कामामुळं तर त्यांना समाजबांधवांनी जणू देवत्व अर्पण केलं आहे.

स्वतः विरोधात झालेल्या अन्यायानं पेटून उठल्यानंतर इतरांच्याही अन्यायाची जबाबदारी स्वतःहून खांद्यावर घेत लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी ते अखेरपर्यंत लढले.

ब्रिटिशांना पळता भुई थोडी करून सोडली होती. पण दगाबाजीचा फटका बसल्यानं ब्रिटिशांच्या हाती आले आणि अत्यंत वाईट पद्धतीनं त्यांचा अंत झाला.

पण लोकांच्या मनात त्यांनी मिळवलेलं स्थान एवढं घट्ट होतं की, आज जवळपास दोन शतकं होत आली तरी त्यांच्याबद्दलचा आदर तसाच आहे.

महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळानं 'महाराष्ट्राचे शिल्पकार' या मालिकेत महाराष्ट्रासाठी झगडणाऱ्यांचा परिचय काही पुस्तकांमार्फत करून दिला आहे. त्यात तंट्या भिल अर्थात 'तंट्या मामा' आपल्याला प्रसिद्ध लेखक आणि प्रकाशक बाबा भांड यांच्या 'जननायक तंट्या भिल' पुस्तकाच्या माध्यमातून भेटतात.

तंट्या मामांचा जन्म 26 जानेवारीचा असल्याची नोंद आहे. त्यानिमित्तानं त्यांची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

कर्जाच्या विळख्यात अडकलेलं कुटुंब

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तंट्या मामाचं संपूर्ण जीवन जर समजायचं असेल तर त्यासाठी त्यावेळची एकूण स्थिती लक्षात घेणंही अत्यंत गरजेचं आहे. त्यांचं कुटुंब मूळचं निमाड प्रांतातलं. हा प्रांत म्हणजे सातपुड्याच्या पायथ्याशी महाराष्ट्रातील खान्देश आणि मध्यप्रदेशातील खांडवा प्रांताच्या सीमेवरचा.

200 वर्षांपूर्वी हा संपूर्ण भाग मराठ्यांच्या ताब्यात होता. होळकर, भोसले यांचं या भागाच्या आसपास राज्य होतं. नंतर ब्रिटिशांच्या अंमलाखाली हा भाग गेला होता. या निमाड प्रांतात प्रामुख्यानं भिल्ल आणि आदिवासी समाज वास्तव्याला होता.

याच दुर्गम जंगलांमध्ये तंट्या भिल्ल यांचे पूर्वज किंवा कुटुंब राहायचे. जंगल हे भिल्ल, आदिवासींचं घर. तिथंच फळं, शिकार यावर त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. पण ब्रिटिशांनी कायदा करत जंगलं, डोंगर बळकावले. अधिकाऱ्यांच्या मदतीनं श्रीमंत सावकारांनी जमिनी बळकावल्या. त्यांच्या जमिनीवर शेतीसाठी मजूर राबत आणि त्यांच्यात अनेक आदिवासी तसंच भिल्ल असायचे.

हे गरीब भिल्ल, आदिवासी सावकारांचे कर्जबाजारी बनायचे आणि त्यांच्या अनेक पिढ्या तेच कर्ज फेडत त्यांची गुलामी केल्यासारखे राबत राहायचे. अशाच सावकारांच्या अत्याचाराने पिळून गेलेल्या एका कुटुंबातील होते तंट्या मामा.

तंट्या भिल्ल यांच्यावरील पुस्तक.

फोटो स्रोत, maharashtra government

निमाडमध्ये खांडवा भागातील बिरडा गावात भाऊसिंग राहायचा. त्याचं मूळ गाव पोखर तिथून आठ-दहा किलोमीटर दूर. तिथली वडिलोपार्जित जमीन कर्जापायी गावच्या पाटलानं हडपली. त्यामुळं भाऊसिंग पत्नी जीवणीसह दुसऱ्या पाटलाची शेती खंडानं करायचे. खंड म्हणजे भाडं म्हणून दिली जाणारी रक्कम. धान्याच्या रुपानं ती वसूल केली जायची.

पाऊस-पाणी इतर अडचणींमुळं भाऊसिंगला शेती परवडत नव्हती. हाती काही लागायचं राहिलंच, पण पोटाच्या अन्नासाठीही उलट पाटलासमोर हात पसरावे लागे. त्यामुळं हे कुटुंब जेरीस आलं होतं.

याच भाऊसिंग आणि जीवणी यांचा मुलगा होता तात्या. हाच तात्या म्हणजे आजच्या काळातील जननायक तंट्या मामा. पण तात्याचा तंट्या कसा बनला हेही महत्त्वाचं आहे.

मध्य प्रदेश सरकारच्या जनसंपर्क विभागातील माहितीनुसार तात्याचा जन्म 26 जानेवारी 1842 रोजी झाला होता. लेखक बाबा भांड यांनी मात्र त्यांच्या जन्मतारखेचा कुठेही दाखला मिळाला नसल्याचं म्हटलं. त्याकाळी आदिवासी मुलाची जन्मतारीख माहिती असणं तसं कठीणच असल्याचं ते म्हणतात.

डोळ्यासमोर गमावले आई-बाप

तात्या हा इतर मुलांसारखाच सामान्य होता. आई वडिलांबरोबर शेतात जाऊन राबायचं. जंगलात फिरायचं, गावातल्या मुलांबरोबर खेळायचं असा तो मोठा होत होता. पण त्याचवेळी आई-बापाचे हाल आणि कुटुंबाची दयनीय अवस्थाही त्याला आतून पोखरत होती.

काही वर्ष सततच्या दुष्काळाने भाऊसिंग जेरीस आला होता. शेतीत काही पिकत नसल्याचं खंडाची रक्कम वाढत होती. त्यासाठी सावकाराचा तगादा सुरू होता. खायलाही काही पिकेना. त्यामुळं शेतातली कंदमुळं आणि फळं खाऊन जगत होते.

पण नवरा आणि मुलासाठी पळपळ करणाऱ्या जीवणीची तब्येत बिघडली. एकदा अंथरून धरलं तर ती पुन्हा उठलीच नाही. भाऊसिंगही त्यानं खचला आणि दारुच्या आहारी गेला. तात्यानं सगळी जबाबदारी खांद्यावर घेतली. बापाचं कर्ज फेडण्यासाठी तो पाटलाकडं राबू लागला.

त्याचवेळी मित्रांसोबतही तात्या रमायचा. जंगलातील रहिवासी असल्यानं तीरकमठा (लहान आकाराचे बाण), लहान कुऱ्हाड, भाला ही पारंपरिक शस्त्र चांगली वापरायचा.

आजारानं खंगलेला भाऊसिंग गेला. त्यानं तात्याला सांगितलं होतं की, पोखरला जमिनीचा तुकडा आहे. त्यामुळं अंदाजे 30 वर्षांचा तात्या बायको भिकीसह पोखरला निघाला. भिकीही पोखरचीच होती.

तंट्या मामाचा पुतळा

फोटो स्रोत, Facebook

पोखरला आल्यानंतर मात्र तात्याला पुन्हा त्याच चक्रात अडकला. तिथंही पाटलाच्या शेतात राबू लागला. बापजाद्याची जमीन मागितली तर पाटलानं कर्ज दाखवलं. तात्यानं ते कर्ज फेडायचीही तयारी दाखवली.

पण, पाटलाकडून सुरू असलेल्या उडवाउडवीनं तात्या जमीन मिळणार नाही हे समजून गेला. प्रामाणिकपणे कर्ज फेडून, स्वतःच्या जमिनीवर कष्ट करून त्याला स्वाभिमानानानं जगायचं होतं. त्यासाठी काय करावं याच विचारात तात्या गुंतलेला होता. एका मित्राचं ऐकून त्यानं खांडव्याला सरकारकडं अर्ज केला. पण यंत्रणा पाटलाच्या बाजूनं होती. निकाल तात्याच्या विरोधात लागला.

यानंतर राग अनावर झालेला तात्या, हक्काचं ते मिळवायचंच असं त्याच्या शेतात गेला आणि तिथल्या पाटलाच्या माणसाला बदडून हाकलले. हक्कासाठी लढण्याची तात्याची तशी ती पहिली वेळ. पण पाटील सावध झाला.

पाटलानं तात्याविरोधात तक्रार केली. पोलिसांनी त्याला पकडून नेलं. कोर्टातही खोटी साक्ष दिली आणि तात्याला दोन वर्षांची शिक्षा झाली. मित्रांनी वरच्या कोर्टातून सोडवलं. पण पाटलांनी पुन्हा खोट्या आरोपात अडकवलं आणि तात्याला एका वर्षाचा तुरुंगवास झालाच.

पाटलाच्या मुलीशी संबंधाचे आरोप

तुरुंगातून आल्यानंतरही तात्या परत पाटलाकडं गेला. प्रामाणिकपणे जमीन मिळवावी अशी त्याची इच्छा होती. पाटलानंही 'कर्ज फेड जमीन देतो', असं गोड बोलून त्याला राबवून घेणं सुरू केलं. पण पाटलाची मुलगी यशोदेला वडिलांचा डाव माहिती होता. तात्याची बायको भिकीची मैत्रीण असल्यानं ती तात्याला मदत करायची. वडिलांच्या मनातलं कपटही तिनं तात्याला सांगितलं.

पण गावात तात्या आणि यशोदाच्या संबंधाच्या वावट्या उठल्या. पोरीनं भिल्लाच्या पोराशी लफडं केलं म्हणून पाटलालाही जातीबाहेर टाकलं. तात्या विरोधातही कारस्थान सुरू होतं. तात्या पुन्हा संतापला. विरोधकांच्या म्हशीचे कान कापले, लोकांना धमकावलं. त्यामुळं गावकीनं घाबरून 100 रुपये दंडावर पाटलाला माफ केलं.

पण सगळ्याला कंटाळून गाव सोडून शेजारच्या हिरापूर गावात गेला. तिथंही काबाडकष्टानं कुटुंबासह जगण्याची धडपड सुरू होती. पण, परत एका खोट्या गुन्ह्यात तीन महिने तुरुंगवास झाला. तात्यानं ते गावही सोडलं आणि सिआरो गावात आला.

पुतळा

फोटो स्रोत, Rajesh johari

इथंही तेच समोर मांडलं होतं. त्याच्या एका मित्रानं जुन्या गावातले पाटील पुन्हा त्याला चोरीच्या आरोपात अडकवणार असल्याचं सांगितलं. आधीच्या गावातले पाटील तात्याला घाबरले होते. त्यामुळं हे कुभांड रचलं होतं. इकडं दोनवेळा तुरुंगाचा खडतर अनुभव घेतलेल्या तात्याला परत आत जायचं नव्हतं.

पोलिसांच्या भीतीनं त्यानं गाव सोडलं आणि ज्या जंगलात बालपण गेलं पुन्हा त्याच जंगलाच्या आश्रयाला गेला. त्याच्याबरोबर दोन-तीन मित्रही होते.

पोलीस मागावर असल्यानं सतत ते भटकत राहायचे. उपासमार सुरू झाली. त्यामुळं संताप होऊ लागला. अन्यायामुळं सगळं जगच आपलं विरोधी आहे, अशी भावना तात्याच्या मनात दाटली. त्याला पाटलांचा सूड घ्यायचा होता.

या सगळ्यामुळं आजवर शांत, जगण्याची धडपड करणारा तात्या आता हक्कासाठी वाट्टेल ते करायला तयार होता. चूक काय किंवा बरोबर काय? याचा विचार करणं त्यानं तेव्हा बंद केलं.

तात्याचा बनला 'तंट्या'

पाटलांवर राग असलेल्या तात्यानं एखदा एका पाटलाच्या भावाला पकडलं. सहा दिवस त्याला डांबून ठेवलं. पण पाटलानं तात्याच्या मित्राला पाठवून मध्यस्थी केली आणि 100 रुपयांच्या मोबदल्याल भावाला सोडवलं.

या प्रकारानंतर गावातले पाटील जास्तच घाबरले होते. त्यांनी एक कट रचला. तात्याची जमीन हडपलेल्या शिवबा पाटलाचा पोरगा मोहन जंगलात तात्याकडं गेला. 'बापाची चूक कळली, ती सुधारायची' असं सांगत काही दिवस तिथंच तात्याबरोबर राहिला. तात्या मनानं अजून पूर्ण कठोर झाला नव्हता. तो मोहनच्या शब्दांत अडकला. पण तो वाईट वाटेवर जाऊ नये म्हणून त्याला सोडण्यासाठी गावात गेला.

तिथं पाटलानं परत तात्याला गोड बोलून अडकवलं. तू सगळं विसर, आम्ही तुला जमीन देऊन टाकतो. उद्या कागदावर सह्या कर आणि जमीन घेऊन शांतपणे जग, असं बोलले. तात्याचाही विश्वास बसला. कारण अशी वणवण त्यालाही नको होती.

पण दुसऱ्या दिवशी तात्या तिथं आला तेव्हा पोलीस दबा धरून बसले होते. पोलिसांनी तात्या आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. मोहननं मित्र बनून दगा दिला होता.

कोर्टात पुन्हा खोटे साक्षी पुरावे झाले, तात्या आणि त्याचे साथीदार दोषी ठरले. शिक्षा दुसऱ्या दिवशी सुनावली जाणार होती. रात्रीसाठी त्यांना खांडवा तुरुंगात पाठवलं. पण तात्याला पुढं सगळा अंधार दिसत होता. त्याला ते नको होतं.

पुतळा

फोटो स्रोत, UGC

तात्या तुरुंगाचं निरीक्षण करू लागला. तिथं एक खिडकी होती. त्यानं मित्रांच्या मदतीनं योजना आखली. खिडकी चुना, माती कोरून मोकळी केली. एकमेकांच्या खांद्यावरून वर चढून दुसऱ्या बाजुला उतरले. बराकीचं कुलूप तोडून पाच जण पळाले.

धोतरांची दोरी आणि माणसांची शिडी करत भिंती चढल्या आणि उतरले. सगळे तुरुंगाच्या भिंतीपलिकडे उतरले. शेवटी तात्या होत्या. पोलिसांना आवाज देत तो म्हणाला, 'तंट्या चालला, आता मला पकडून दाखवा'. पोलीस सावध झाले, मागावर निघाले पण तात्या साथीदारांसह निघून गेला होता.

आता तो तात्याही राहिला नव्हता, हीच वेळ होती तात्याचा तंट्या बनण्याची.

तंट्याला आता अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवायचा होता. तो जंगलात फिरत होता. साथीदारांमध्ये वाढ झाली. भाकरी, पीठ मागून, जंगलातली फळं खाऊन जगत होते. त्यांना कुणी घाबरून तर कुणी सहानुभुतीनं मदत करत होते.

खांडवा तुरुंगातून तंट्या पळाल्याची बातमी पसरली होती. पोलीस त्यांच्या मागावर होते. त्यामुळं तंट्याचं नाव घुमायला लागलं. तरुण त्याच्याकडं आकर्षित होऊ लागले.

'रॉबिनहूड' बनण्याचा प्रवास

पोलीस तंट्याला पकडण्यासाठी फास आवळू लागले. गावांवर नजर ठेवत मदत बंद केली. त्यामुळं तंट्याचे आणि त्याच्या साथीदारांचे हाल सुरू झाले. तेव्हा, एका सावकाराची सामान भरलेली बैलगाडी तंट्यानं लुटली. आपल्याकडून हिसकावणाऱ्याचे आपण हिसकावून घ्यायचं ठरवत त्याचा प्रस्थापितांच्या विरोधातील लढा सुरू झाला.

तंट्या साथीदारांसह गरजेपोटी कधीतरी खाण्या-पिण्यासाठी छोट्या मोठ्या चोऱ्या करायचा सुरू केल्या. पण तो सावकारांना लुटायचा, गरिबांना त्रास देत नव्हता. उलट गरजूंना मदत करायचा. त्यामुळं शेतकरी-आदिवासींना आपला वाटू लागला. स्त्रिया, लहान मुलांना कधी त्रास दिला नाही.

तंट्याला तीन वेळा तुरुंगात धाडण्यात हिंमत पाटलाचा हात होता. त्या मोबदल्यात पाटलाला बक्षीस मिळालं होतं. तंट्याला त्याचा सूड घ्यायचा होता. बक्षीसाची रक्कम लुटायची होती.

तंट्यानं एकदा टोळीसह त्याच्या घरी लूट केली. पण हिंमत पाटील पळून जात असतानाच तंट्याचा साथीदार बिजनियानं गोळी घातली आणि हिंमत पाटील गेला. त्याचं घर लुटून तंट्याची टोळी निघून गेली. पण त्यांना पाटलाला मारायचं नव्हतं. पण गोंधळेल्या बिजनियानं तसं केलं होतं.

तंट्याच्या टोळीनं आता एक खून केला होता, आणि त्यामुळं पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं.

आधीच भिल्ल, आदिवासी चोऱ्या-माऱ्या करतात असा समज पसरलेला होता. काही जणांमुळं या सगळ्या समाजावरच गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात आला होता.त्यामुळं पोलिस भिल्लांना पकडून मारहाण करायचे. त्यात हिंमत पाटलाच्या घटनेनंतर पोलीस आणखी रागात होते. पण तरी हाती काही लागत नव्हते.

नंतर तंट्यानं मालगुजर, सावकार, लोकांना लुबाडणारे बनिया यांना लुटायला सुरुवात केली. हसवरा गावात तर त्यांनं टोळीसह पोलिसांच्या वेशात जाऊन बनियाला लुटलं होतं. पण त्याचवेळी स्त्रियांना हात लावायचा नाही, त्यांच्या अंगावरचं सोनं ओरबडायचं नाही, लहान मुलांना त्रास द्यायचा नाही हे नियम घालून घेत, साथीदारांनाही तशी ताकीद दिली होती.

एकदा एका महिलेच्या अंगावर हात टाकला म्हणून तंट्यानं त्याचा हात छाटल्याचंही उदाहरण आहे.

तंट्या भिल यांचा पुतळा

फोटो स्रोत, ANI

लुटीतून मिळालेलं धन वाटून तंट्या गरिबांना मदत करू लागला. सावकारांच्या कचाट्यात अडकलेल्या लोकांना तो सोडवायचा. निमाडमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला सुरू झाला होता. गरीब आदिवासी, भिल्ल, शेतकरी यांना तो आपलासा वाटू लागला होता. लोक तक्रारी त्याच्याकडं नेऊ लागले, तो न्याय करू लागला.

निमाडातील सावकार आणि मालगुजार यांच्या सत्तेला तंट्यानं आव्हान दिलं होतं. त्यामुळं लोकांना तो आपला वाटला. शिवाय त्यामुळं लोकही अन्यायाविरोधात बोलू लागले. गावात त्याला मान मिळू लागला होता. तंट्यानं लोकांच्या मनात ब्रिटिशांविरोधातील राग वाढवला होता.

पोलिसांना मदत करणाऱ्या सावकार, मालगुजारांनाही धडा शिकवून तंट्या धाकात ठेवायचा. तंट्याचे गावांमधले हेर त्याला माहिती पुरवायचे. लूट झालेलेही पोलिसांना सांगायला घाबरायचे.

एका वर्षी पावसानं हात दिला. पिकं आली नाही तर गरिबांचे खान्या पिण्याचे हाल सुरू झाले. सावकार चढ्या भावानं धान्य विकू लागले. तंट्याला लोकांची उपासमार बघवत नव्हती. त्यानं खांडव्याच्या सावकाराचा धान्याचा ट्रक लुटला आणि आजूबाजूच्या गावांत मोफत धान्य वाटलं.

तात्याचा तंट्या बनलेल्याला लोकांनी आता तंट्या मामा बनवलं. मामा म्हणजे आईचा भाऊ, जो संकटात मदत करतो. बहिणींचं रक्षण करणारा. नंतर तर तंट्या मामाचा गावातील लग्नांत आहेरही जायचा. लहान सहान कामांपासून ते सावकारी छळ किंवा मुलीला सासरी होणारे त्रास सगळं काही तंट्याच्या दरबारी सोडवलं जाऊ लागलं.

त्यामुळं नंतरच्या काळात तंट्याचा उल्लेख इंडियन रॉबिनहूड असा करण्याचा आल्याचा उल्लेखही आढळतो.

बिजनियाला गावाच्या वेशीवर फाशी

बिजनिया तंट्याचा उजवा हात होता. शेरअली नावाच्या नव्या पोलीस अधिकाऱ्यानं तंट्याला पकडण्यासाठी फास आवळले. एका खबऱ्याच्या बातमीवरून बिजनिया पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याला हिंमत पाटलाचा खून आणि लूटीच्या आरोपात फाशी झाली.

हिंमत पाटलाच्या भुईफळ गावात दरोडा घातला म्हणून बिजनियाला तिथंच फाशी दिली. गावात वेशीजवळच्या झाडावर बिजनियाला फाशी दिली. दोन दिवस त्याचा मृतदेह तिथंच लटकत होता.

तंट्याला याचा धक्का बसला. रागात तंट्यानं ज्या गावच्या खबऱ्यानं माहिती दिली होती, त्या गावातली घरं लोकं बाहेर काढून जाळून टाकली.बिजनियाचा बदला घेण्यासाठी तंट्या स्वतः खबरी बनून शेरअलींकडे गेला. तंट्याचा अड्डा दाखवतो सांगून त्यांना घेऊन गेला, आणि रस्त्यात खरं रुप दाखवून त्यांना कपडे काढून उघडंच पळवून लावलं.

तंट्याचा उपद्रव वाढल्यानंतर सेंट्रल प्रॉव्हिन्सच्या चीफ कमिश्नरनी हॅमिल्टन नावाच्या अधिकाऱ्याला मोठं पद देत तंट्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी दिली. त्यांनी खांडवा, बेतूल, होशंगाबाद मधील अधिकारी होळकर महाराजांचे अधिकारी यांची बैठक घेतली.

गावात ग्रामरक्षक पथकं तयार केली. तंट्या किंवा त्याच्या माणसांची खबर मिळण्याची सोय केली. बक्षीसं देऊ केली. काही चांगला परिणामही दिसला. पण तंट्याही तयार होता. माहिती मिळताच तंट्यानं डाव सुरू केला. पोलिसांना एकाच वेळी अनेक गावांची खबर मिळू लागली. हॅमिल्टन पूर्णपणे गोंधळून गेले होते. अखेर त्यांना ही पथकांची योजना बंद करावी लागली.

तंट्या मामाला आदिवासी प्रेरणास्थान मानतात.

फोटो स्रोत, Rajesh johari

फोटो कॅप्शन, तंट्या मामाला आदिवासी प्रेरणास्थान मानतात.

तंट्याचा नावलौकिक वाढतच होता. पोलिसांना वेशांतर करून माहिती काढली आणि त्याचा अहवाल मोठ्या अधिकाऱ्यांना दिला. त्यात तंट्याला लोक देवासारखं मानतात, त्यामुळं कोणी त्याची माहिती देत नाही हे कळलं.

असंच एका ब्रिटिश अधिकाऱ्याला तंट्याचा बंदोबस्त करण्यासाठी बोलावलं होतं. तेव्हा तंट्यानं हमाल बनून त्यांना तंट्याची माहिती देतो असं सांगितलं. आधी बक्षिसाची अर्धी रक्कमही नेली. नंतर दुसऱ्या दिवशी साहेबांना तोंडावर मीच तंट्या असल्याचं सांगून फरार झाला. कधी न्हावी बनून तर कधी वेगळं रुप घेऊन तंट्या थेट अधिकाऱ्यांना आव्हान देत होता. गनिमी काव्यात त्याचा हातखंडा होता.

सावकार गरिबांची पिळवणू करतात त्यावर तोडगा काढणं गरजेचं असल्याचं तंट्याच्या लक्षात आलं होतं. त्यानं त्यावर उपाय काढला. तो सावकारांकडं जावं लागू नये म्हणूल लोकांना बिनव्याजी पैसे देऊ लागला. इतरही मदत सुरू केली.

बक्षिसापोटी 2500 एकर जमीन

होळकर, घाटाखेडी संस्थान, मकडाई संस्थान याबद्दल तंट्याला आपुलकी होती. ब्रिटिशांनाही भारतीय राजे आणि संस्थानिक तंट्याला मदत करत असल्याचा संशय होता. तसा आरोपही त्यांनी केला होता. स्थानिक किंवा भारतीय पोलिसांवरही ब्रिटिशांना विश्वास नव्हता.

तंट्या सुरुवातीला पळून गेला त्यावेळी त्याची माहिती देणाऱ्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं. पण तंट्या सापडेना. त्याच्या कारवाया वाढल्या. त्यामुळं बक्षीसाची रक्कम वाढत-वाढत फुगत गेली. शेवटी ही रक्कम 10,500 रुपये आणि 2,500 एकर जमीन एवढी वाढली होती.

सावकार, मालगुजार आणि सरंजाम यांच्या विरोधात लढून तंट्या सामान्यांना मदत करत होता. त्याबदल्यात त्याला कसलीही अपेक्षा नव्हती. त्यामुळं जननायक तंट्या अशी त्याची प्रतिमा लोकांमध्ये निर्माण व्हायला लागली होती.

तंट्या काही केल्या पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पोलिसांवरच विश्वास नसल्यानं खास तंट्याला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी विश्वासून पोलिसांची एक वेगळी फौज तयार केली होती. त्याला 'तंट्या फौज' किंवा 'तंट्या पोलीस' नावाने ओळखलं जात होतं.

ईश्वरी प्रसाद नावाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही फौज फिरत होती. पण त्यांनाही काही हाती लागत नव्हतं. तेही कंटाळून मोहीम सोडून निघून गेले. जवळपास दहा वर्षे पोलिस आणि तंट्याचा लपंडाव सुरू होता. पोलीस योजना आखायचे आणि तंट्या त्यावर उतारा शोधायचा.

पण पन्नाशी ओलांडलेल्या तंट्याला याचा कंटाळा येऊ लागला होता. सगळं सोडून शांतपणे जीवन जगावं अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी होळकर सरकारकडे माफी मागून त्यांच्याकडे चाकरी करण्याचं त्याच्या मनात सुरू होतं. त्यासाठी त्यानं प्रयत्न सुरूही केले होते.

दगाबाजीनेच अडकला जाळ्यात

खरगोनच्या बाणेरमध्ये गणपतसिंह राजपूतला तंट्या भेटायचा. त्याची बायको तंट्याची मानलेली बहीण होती. त्यामुळं तंट्याचा त्याच्यावर विश्वास होता. तंट्यानं त्याला होळकर सरकारने माफ केल्यास शरण जायला तयार असल्याचं सांगितलं.

गणपतसिंहला मात्र पैशाची हाव होती. त्यानं तंट्याला ओळखीद्वारे होळकर सरकारकडे बोलतो असं सांगितलं. तर दुसरीकडं नोकरी आणि बक्षीसाचं आश्वासन घेत तंट्याची खबर सरकारला दिली. पुन्हा एकदा ईश्वरी प्रसादलाच तंट्याला पकडण्याची जबाबदारी मिळाली.

गणपतच्या साथीनं ईश्वरी प्रसादनं कट रचायला सुरुवात केली. तंट्या दरवर्षी बहिणीकडे राखी बांधून घ्यायला यायचा. त्यामुळं पोलीस गणपतच्या शेजारच्या झोपडीत गळ लावून बसले. पण प्रचंड पाऊस होता. त्यामुळं त्यादिवशी तंट्या आलाच नाही.

राखी पौर्णिमा 10 ऑगस्टला होती. तंट्या आला नाही तरी पोलीस तसेच दबा धरून बसले. 11 ऑगस्टच्या संध्याकाळी तंट्या रस्ता नसल्यानं नदीतून पोहून तिथं पोहोचला होता. तिथं अखेर पोलिसांनी त्याला पकडण्यात यश आलं. तंट्याचे साथीदार पळून गेले. पण ईश्वरी प्रसादनं तंट्याला ताब्यात घेतलं.

तंट्या खरं तर थकला होता. मनानं आणि शरिरानंही. त्याला सरकारदरबारी चाकरी करायची होती. पण गणपतने तंट्याला धोका दिला होता.

तंट्याची न्यायाधीशांसमोर ओळख परेड झाली. 19 ऑगस्टला इंदूरला आणलं आणि दुसऱ्या दिवशी महाराज शिवाजीराव होळकरांसमोर उभं केलं. 20 ऑगस्टला तंट्याला फर्स्ट मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं. तंट्या ब्रिटिशांच्या राज्यातील असल्याने ब्रिटिशांसमोरच खटला चालवायचा आदेश झाला.

तंट्या मामाचा पुतळा

फोटो स्रोत, UGC

पण निमाडमध्ये तंट्यावरचे प्रेम पाहता, खटला व्यवस्थित चालणार नाही या भीतीनं ब्रिटिश अधिकाऱ्यांना जबलपूरमध्ये अटक दाखवून तिथंच खटला चालवायचं ठरवलं. खांडव्यामार्गे त्याला जबलपूरला आणलं.

तंट्याच्या विरोधात 26 सप्टेंबर 1889 ला खटला सुरू झाला. पण जननायक अशी प्रतिमा झालेल्या तंट्याबाबत लोकांमध्ये सहानुभूती वाढत होती. वीर तंट्याला कपट करून पकडल्यानं सरकारची नाचक्की झाली होती.

29 सप्टेंबरला तंट्याला दोषी ठरवण्यात आलं. 5 ऑक्टोबरची सुनावणी 9 ऑक्टोबरला झाली. तंट्याला फाशीच होईल असं सरकारला वाटत होतं, पण न्यायाधीशांनी जन्मठेप सुनावली.

ब्रिटिशांनी पुन्हा चक्रं फिरवली. तंट्यावर त्याचदिवशी हिंमत पाटलाच्या घरची लूट आणि खुनाचा दावा करण्यात आला. तंट्यानं या प्रकरणी आपल्याला गोवलं जात असल्याचं न्यायालयात सांगितलं. पण तरीही बिजनियानं गोळी चालवली असली तरी टोळीचा सदस्य आणि म्होरक्या म्हणून तंट्याला 19 ऑक्टोबर 1889 या प्रकरणी रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

पण तंट्याला शिक्षा झाल्याचं समजताच आदिवासी समाजातून मोठा संताप व्यक्त होऊ लागला. सरकार दरोडेखोर ठरवत असलं तरी त्यांच्यासाठी तंट्या त्यांचा कैवारी, त्यांचा जननायक होता.

अखेरची इच्छाही पूर्ण केली नाही

तंट्याच्या फाशीच्या शिक्षेविरोधात वकिलांनी अर्जही केला. पण त्याचा काही फायदा झाला नाही. तंट्याच्या फाशीचा दिवसही ठरला होता 4 डिसेंबर 1989.

तंट्याला अखेरची इच्छा विचारण्यात आली. त्याला बायको पोरांची आठवण येत होती. त्यांना भेटायचं होतं. पण तोपर्यंत ते पोहोचणं शक्य नव्हतं. त्यामुळं तुरुंगअधिकाऱ्यांनी फाशीची तारीख पुढं ढकलण्याची विनंती केली.

चीफ कमिश्नरसमोर तसा अर्ज पाठवण्यात आला. बार काऊन्सिलनंही चुकीची शिक्षा दिल्याचं पत्र दिलं होतं. पण चीफ कमिश्नरनी अर्ज फेटाळले.

तंट्याच्या फाशीचा दिवस सगळ्यांना समजला होता. त्यामुळं जबलपूर रेल्वे स्टेशनवर लोकांची गर्दी होत होती. तंट्या भिल्ल आणि आदिवासी समाजाबरोबरच सगळ्या गरिबांसाठीही देवदुतासारखा वागला होता. त्यामुळं त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी होती. ती गर्दीतून दिसत होती. जबलपूर शहरात पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नव्हती.

जबलपूरच्या सेंट्रल जेलच्या चारही बाजूंनी तंट्यावर प्रेम करणाऱ्या असंख्या बांधवांचा घेराव होता. सामान्यांसाठी देवासारखा, तरुणांसाठी प्रेरणास्थान बनल्यानं तंट्यासाठी ही गर्दी जमली होती. ती गर्दी नव्हती तर, त्यानं जमवलेलं कुटुंब होतं.

अखेर चार डिसेंबरला तंट्याला जबलपूरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली.

तंट्याच्या फाशीनंतर एक प्रकारची असंतोषाची लाट उसळली होती. अनेक तरुणांनी ब्रिटिशांविरोधात दंड थोपटले. आदिवासी स्वतःच्या हक्कासाठी लढू लागले. असं बरंच काही साध्य झालं होतं.

पातालपानी रेल्वे ट्रॅकजवळील तंट्या मामाचे मंदिर.

फोटो स्रोत, Rajesh johari

फोटो कॅप्शन, पातालपानी रेल्वे ट्रॅकजवळील तंट्या मामाचे मंदिर.

फाशीनंतर तुरुंगातील अधिकाऱ्यांनी तंट्याचा मृतदेह पातालपानी रेल्वे स्थानकाच्या ट्रॅकजवळ फेकून दिला होता, असं सांगितलं जातं. मध्य प्रदेश सरकारच्या काही निवेदनांमध्ये तसा उल्लेख आहे. तिथं तंट्या मामांचं एक मंदिरही आहे. बाबा भांड यांनी मात्र तशी काही अधिकृत नोंद नसल्याचं सांगितलं.

तंट्या मामांचं जन्मस्थळ म्हणजे मध्य प्रदेशातील सध्याच्या बडोदा अहिरमध्ये सरकारनं एक स्मारक उभारलं आहे. त्यांचे काही वंशजही इथं जवळच राहतात. तंट्या मामांच्या नावाने मध्य प्रदेश सरकारनं अनेक कल्याणकारी योजनाही सुरू केल्या आहेत.

बलाढ्य ब्रिटिशांना ज्याला पकडण्यासाठी सर्व कट कारस्थानं करुन पाहिले. बक्षीसं, आमिषं दिली, तंट्या फौज तयार केली, त्या सर्वाला तंट्या पुरुन उरला होता. पण बहिणीच्या प्रेमापायी तो फितुरीच्या कारस्थानात अडकला आणि ज्या अन्यायामुळं तो तात्याचा तंट्या बनला होता, त्याचाच पुन्हा एकदा बळी ठरला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)