‘बुद्धिबळ खेळताना मला कोणी सेक्स टॉयमधून सल्ले देत नव्हतं’

फोटो स्रोत, EPA
अमेरिकेचा 20-वर्षीय ग्रँडमास्टर हान्स निमन याने आपण बुद्धिबळ खेळताना लबाडी केली आणि त्याला सेक्स टॉयमधून सल्ले मिळत होते, त्यानुसार तो खेळत होता या आरोपाचा इन्कार केला आहे.
ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन याच्याविरोधात गेल्या वर्षी खेळताना त्याच्यावर आरोप झाला होता आणि यावरून कार्लसन ने बुद्धिबळाचा सामना अर्ध्यात सोडला होता.
या वादाने मागच्या वर्षी जागतिक बुद्धिबळाचं जग हादरलं होतं.
यावरून निमन आणि कार्लसनने एकमेकांना कोर्टात खेचलं होतं. गेल्याच महिन्यात या दोघांमध्ये 100 मिलियन डॉलर्सचा समझोता झाला.
आता हा वाद पुन्हा चर्चेत आलाय कारण निमनने पीअर्स मॉर्गन या इंग्लिश पत्रकाराला नुकतीच मुलाखत दिली.
त्याने लबाडी केली, चिटिंग केली या त्याच्यावर झालेल्या आरोपाबद्दल तो बोलत होता.
निमन म्हणाला की, “तुम्ही जिंकल्यानंतर लोक तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही लबाडी केलीये, मग खूप दुःख होतं.”
“अशा गोष्टी घडतात आणि या काळात मी खूप शिकलो बुद्धिबळाबद्दल आणि आयुष्याबद्दलही. माझा निग्रह आणखी पक्का झाला. ज्या सामान्यावरून वाद झाला त्या सामन्यात मी लबाडी केली नाही,” त्याने ठासून सांगितलं.
पिअर्स मॉर्गन यांनी निमनला सेक्स टॉयवरून जे आरोप झाले त्याबद्दलही विचारलं. निमनला सामन्यादरम्यान कोणीतरी सेक्स टॉयमधून संदेश देत होतं असं म्हटलं गेलं होतं.
यावर उत्तर देताना तो म्हणाला, “या एका आरोपाबदद्ल स्पष्ट सांगायचं तर तुम्ही पार्श्वभागात घालायचे बीड्स बुद्धिबळ खेळताना वापरलेत का?”
तो पुढे म्हणाला, “तुमचं कुतुहल पाहून मला जराशी भीती वाटतेय, तरीही सांगतो, नाही. मी पुन्हा पुन्हा सांगेन मला सामना खेळताना कोणीही सेक्स टॉयमधून संदेश देत नव्हतं.”
नक्की काय होतं प्रकरण?
सप्टेंबर 2022 चं हे प्रकरण आहे. विश्वविजेता मॅग्नस कार्लसनने हान्स निमनविरुद्ध खेळताना पहिल्या चालीनंतरच डाव सोडला होता. बुद्धिबळ जगतात खळबळ माजली होती.
ज्युलियस बेअर जनरेशन स्पर्धेत कार्लसनने डाव सोडल्याने या सामन्यात निमनला विजयी घोषित करण्यात आलं होतं.
पाच लाख डॉलरचं बक्षीस असलेल्या सिंकफिल्ड स्पर्धेत या प्रकरणाची सुरुवात झाली.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीत कार्लसनची लढत हान्स निमनविरुद्ध होती.
हान्स निमन हा खेळाडू जागतिक मानांकनात तुलनेने अत्यंत खाली असल्याने कार्लसनचा विजय निश्चित मानला जात होता. पण प्रत्यक्ष सामन्यात भलतंच घडल्याचं पाहायला मिळालं.
पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळत असल्याने सुरुवातीला कार्लसन आघाडीवर होता. सुरुवातीच्या टप्प्यात निमन थोडा घाबरल्याचं दिसून आलं. मात्र अखेर त्याने आघाडी घेऊन आपल्या डावपेचांमध्ये कार्लसनला अडकवलं.
अखेरीस, कार्लसनला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ग्रँडमास्टर लेव्हलच्या निमनने विश्वविजेत्या कार्लसनला पराभूत केल्यामुळे या पराभवाची जोरदार चर्चा झाली.

फोटो स्रोत, Reuters
तब्बल 53 सामने पराभूत न झालेल्या, गेल्या दशकात बुद्धिबळ क्षेत्रावर राज्य करणाऱ्या कार्लसनच्या या पराभवाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता.
यानंतर, दोन्ही खेळाडू दुसऱ्या फेरीत पुन्हा समोर आले होते. पण या सामन्यात कार्लसनने केवळ दोन चाली खेळून डाव सोडून दिला होता.
या सामन्यानंतर कार्लसनने स्पर्धेतूनही माघार घेतली. याविषयी त्याने कोणतंही स्पष्टीकरण किंवा खुलासा केला नाही. जागतिक पातळीवरच्या खेळाडूने असं करणं हे अनपेक्षित आणि धक्कादायक मानलं जातं.
कार्लसनच्या कृत्याविषयी क्रीडा समीक्षक आणि चाहत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच त्याने एक ट्विट केलं, ज्याचा मतितार्थ होता, ‘मी जर पुढे काही बोललो तर अडचणीत येईन.’
यानंतर ऑनलाईन चेस डॉट कॉम या कंपनीने निमनवर खटला भरला.
या कंपनीचा आरोप होता की निमनने ऑनलाईन बुद्धिबळ खेळताना लबाडी केली आहे.
यावर उत्तर देताना निमनने मान्य केलं की, "12 आणि 16 वर्षांचा असताना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ऑनलाईन खेळताना लबाडी केली होती, हे मी मान्य करतो. पण मी आता असंच काहीच केलेलं नाही.”
“मी निर्दोष आहे हे सिद्ध करायला मी कपडे काढून खेळायला तयार आहे,” असंही तो पुढे म्हणाला.
त्यानेही आरोप केला की चेस डॉट कॉम, कार्लसन आणि आणखी एक प्रमुख बुद्धिबळपटू हिराकू नाकामुरा त्यांचं करियर उद्धस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.
यानंतर या सगळ्यांनी एकमेकांवर खटले भरले. निमननेही या सगळ्यांवर मानहानीचा दावा करत कोर्टात खेचलं.
आता त्यांनी एकत्र येत कोर्टाबाहेर 100 मिलियन डॉलर्सची सेटलमेंट केली आहे.
मॅग्नस कार्लसन, Chess.com आणि लोकप्रिय बुद्धिबळपटू हिराकू नाकामुरा हे माझं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही हान्स निमनने यावेळी केला.
चेस डॉट कॉमने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं की, ‘त्याने प्रत्यक्ष खेळताना कोणतीही लबाडी केली असल्याचा पुरावा समोर आलेला नाही.’
कार्लसननेही म्हटलं की हा रिपोर्ट आपल्याला मान्य आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.























