बुधिनी मांझियान: जवाहरलाल नेहरूंना हार घातला आणि 'बहिष्कार' वाट्याला आला

बुधिनी मांझियान

फोटो स्रोत, THE PRIME MINISTERS MUSEUM AND LIBRARY SOCIETY

    • Author, झोया मतीन
    • Role, बीबीसी न्यूज, लंडन
  • Published

झारखंड राज्यातील आदिवासी महिला बुधिनी मांझियान यांना घर आणि काम सोडून जाण्यास भाग पाडण्यात आलं. त्यामुळे त्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य वनवासात घालवावं लागलं.

गेल्या महिन्यात मृत्यू झालेल्या मांझियान यांना त्यांच्या संथाळ या आदिवासी जमातीनं समाजातून बहिष्कृत केलं होतं. त्यावेळी त्या केवळ 15 वर्षांच्या होत्या.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना 63 वर्षांपूर्वी पुष्पहार घातल्याची ही शिक्षा त्यांना मिळाली होती. संथाळ जमातीतील परंपरेनुसार एकमेकांना हार घालणं म्हणजेच लग्न करण्यासारखं असतं.

मांझियान आणि त्यांनी सहन केलेला संघर्ष इतरांसाठी नेहमीच अज्ञात राहिला. पण त्यांच्या मृत्यूनंतर काही जणांनी त्यांचं वर्णन "नेहरूंची पहिली आदिवासी पत्नी" असं केलं. त्यामुळं पुन्हा या विषयावर चर्चा सुरू झाली.

आता झारखंडमधील अनेकजण गावातील नेहरूंच्या पुतळ्याच्या जवळच त्यांचं स्मारक उभारण्याची मागणी करत आहेत.

मांझियान यांच्या जीवनाबाबत अगदी त्रोटक माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या विकिपीडियाच्या पानावरही अगदी किरकोळ माहिती आहे. ते पेजही त्यांच्या मृत्यूनंतर तयार करण्यात आलेलं आहे.

वृत्तपत्र किंवा वेबसाईटवर अनेकदा त्यांच्याबद्दल लिहिलं गेलं, पण त्यांच्याबाबत पूर्ण माहितीच मिळाली नाही, हे अत्यंत निराशाजनक आहे.

एका आघाडीच्या वृत्तपत्रानं 2012 मध्येच त्यांचं निधन झाल्याचं चुकीचं वृत्त दिलं होतं. त्यांची अखेरची काही वर्षं दुःखात आणि प्रचंड अस्पष्ट वातावरणात गेल्याचं समोर आलं.

या सर्व विसंगतींमुळंच केरळमधील लेखिका सारा जोसेफ यांनी मांझियान यांच्या जीवनातून प्रेरणा घेत एक पुस्तक लिहिलं. त्यातून जोसेफ यांनी त्यांना जाणून घेण्याचा आणि "सामान्य जीवनात परत आणण्याचा" प्रयत्न केला.

नेहरु

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जोसेफ म्हणाल्या की, त्या 2019 मध्ये मांझियान यांना पहिल्यांदा भेटल्या तेव्हा त्यांना बोलताना भरपूर अडथळे आले.

कारण मांझियान सर्वसामान्यांसारखी भाषा बोलत नव्हत्या. "पण तरीही मी त्यांना पूर्णपणे समजू शकले," असं त्यांनी मला सांगितलं.

मांझियान या झारखंडमधील कोळसा उत्पादक भागाचं केंद्र असलेल्या धनबाद या लहानशा गावात लहानाच्या मोठ्या झाल्या होत्या. याठिकाणी असलेल्या लोकसंख्येपैकी जवळपास एक चतुर्थांश आदिवासी आहेत.

या भागातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (DVC)मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगारांपैकी मांझियान एक होत्या.

हा देशातला पहिला "बहुउद्देशीय प्रकल्प" होता. यात आधुनिक भारताची पायाभरणी करण्यासाठी धरणं, औष्णिक आणि जलविद्युत प्रकल्प यांचं जाळं तयार केलं जाणार होतं. नेहरूंनी एकदा याचं वर्णन "द नोबल मेन्शन ऑफ फ्री इंडिया" (स्वतंत्र भारतातील उदात्त महाल) असं केलं होतं.

पण त्याचबरोबर याची उभारणीही तेवढीतच वादग्रस्त ठरली होती. या प्रकल्पासाठी हजारो स्थानिकांना त्यांच्या वडिलोपार्जित जमिनींवरून विस्थापित करण्यात आलं होतं.

त्यात बहुतांश आदिवासींचा समावेश होता. कबोना सारख्या हजारो गावांचा समावेश होता. मांझियान यांना बहिष्कृत करण्यात आलं त्यापूर्वी त्या याच गावामध्ये राहत होत्या. या सर्वाचा त्यांच्यावर परिणाम झाला.

1959 मध्ये पंडित नेहरू यांनी ते पंचेत नावाच्या एका धरणाच्या उद्घाटनासाठी जाणार असल्याची घोषणा केली. त्यावेळी DVC नं पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी मांझियान आणि त्यांच्या एका सहकारी यांची निवड केली.

पण त्यानंतर सर्वकाही चुकीचं घडत गेलं.

कार्यक्रमामध्ये मांझियान यांना पंतप्रधानांना पुष्पहार घालण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान नेहरूंनीही परत त्यांच्या गळ्यात हार घातला. मांझियान यांना मात्र असं काही होईल, असं वाटलं नव्हतं.

तसंच 15 वर्षांच्या मांझियान यांनीच धरणाच्या पॉवर स्टेशनमधील बटन दाबून त्याचं उद्घाटन करावं असा आग्रहदेखील नेहरूंनी केला.

संध्याकाळी मांझियान जेव्हा गावात परत आल्या तेव्हा त्या शेवटच्या वेळी घरी जात आहेत, याची त्यांना जाणीवही नव्हती.

गावच्या प्रमुखांनी त्यांना बोलावलं आणि नेहरूंना हार घातल्यानं त्या त्यांच्या पत्नी बनल्याचं सांगितलं. संथाळ समुदायाचा बाहेरील व्यक्तीबरोबर विवाह न करण्याबाबतचा नियम मोडल्याचंही ते म्हणाले.

या गुन्ह्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी त्यांना सर्वकाही सोडून जावं लागेल, असं मांझियान यांना सांगण्यात आलं.

पंचेत धरण

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पंचेत धरण हा भारतातील सर्वात महत्वाकांक्षी जलविद्युत प्रकल्पांपैकी एक होता

संथाळ हा शांतताप्रिय समुदाय म्हणून ओळखला जातो. ते लहान लहान गटांमध्ये राहतात आणि परंपरांचं काटेकोर पालन करतात.

या समुदायामध्ये बाहेरच्या व्यक्तीबरोबर विवाह करण्यास परवानगी नसते. याचं उल्लंघन करणाऱ्यांना समाजातून बहिष्कृत करण्याची शिक्षा दिली जाते. पण याचा वापर हा प्रामुख्यानं महिलांचं शोषण करण्यासाठी केला जातो, असं सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे.

आदिवासी पुरुष हे कामाच्या निमित्तानं नेहमीच स्थलांतर करत असतात. पण अविवाहित महिला क्वचितच त्यांचं गाव सोडतात किंवा अशा कठिण परिस्थितीत एकट्या राहतात. जे अशा प्रकारचं पाऊल उचलतात ते अनेकदा तिरस्काराचा विषय बनत असतात.

मांझियान यांना माहिती होतं की, त्या एकदा गाव सोडून गेल्या तर त्यांना परत कधीही येता येणार नाही. त्यांनी गावच्या प्रमुखांशी चर्चा करण्याचा आणि कारणं देण्याचा खूप प्रयत्न केला. पण समुदायाचा निर्णय अगदी ठाम होता. त्यांच्यासाठी मांझियान या बहिष्कृत झालेल्या होत्या.

"कोणीही त्यांना मदत केली नाही. त्यांच्याच लोकांकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या," असं जोसेफ म्हणाल्या.

असहाय ठरलेल्या 15 वर्षीय मांझियान यांनी अखेर सगळं सामान घेतलं आणि गाव सोडलं.

धरणाच्या उद्घाटनाला आधुनिक भारताच्या इतिहासातील एक मैलाचा दगड असं म्हणण्यात आलं.

लहान मुलं

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, संथाल ही भारतातील सगळ्यात मोठी आदिवासी जमात आहे

त्यावेळी बातम्यांमध्ये मांझियान यांचा फारसा उल्लेख नव्हता किंवा काही ठिकाणी अगदी नावापुरता उल्लेख केलेला होता. पण एका दैनिकानं या तरुण संथाळ मुलीबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्या वृत्तपत्रात मांझियान यांचं वर्णन धरणाचं उद्घाटन करणारी भारतातील पहिली महिला, असं केलं होतं.

याच सुमारास त्यांना "नेहरूंची आदिवासी पत्नी" अशी पदवी मिळाल्याचंही जोसेफ म्हणाल्या.

पण दुर्दैव म्हणजे मांझियान यांना याबाबत काहीही माहिती नव्हतं. बहिष्काराचा तो काळ त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण काळ असलेल्या काही महिन्यांपैकी एक होता. त्यात कसंबसं जीवन जगण्याचा त्यांचा लढा सुरू होता, असंही त्या म्हणाल्या.

"प्रत्येकजण त्यांच्याबद्दल वाचत होता. पण कोणीही त्यांना मदत केली नाही. मांझियान यांना कुठंही जाता येत नव्हतं."

त्यातही 1962 मध्ये जेव्हा दामोदर व्हॅली कॉर्पोरेशननं त्यांना कामावरून काढून टाकलं, त्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यामुळं त्यांना मजुरी करण्याचा मार्ग अवलंबावा लागला. DVC त्यांना कामावरून काढून टाकण्याचं काही कारणही दिलं नाही.

दुसरीकडं पंतप्रधान पंडित नेहरू यांना त्यांच्या संघर्षाबाबत काहीही माहिती नव्हतं. तसंच पुरोगामी आणि आधुनिक विचारांना प्रोत्साहन देणारे नेहरू या संपूर्ण घटनेशी कशाप्रकारे जोडले गेले, हाही नकोसा योगायोग होता.

मांझियान यांच्या जीवनात चांगले दिवस येण्यासाठी बरीच वर्षे उलटून गेली होती. त्या सुधीर दत्ता नावाच्या व्यक्तीला नेमक्या कधी भेटल्या याची माहिती उपलब्ध नाही.

दत्ता शेजारच्या पश्चिम बंगाल राज्यामध्ये एका कोळसाखाणीत काम करत होते. मांझियान तिथंच राहत. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी विवाह केला.

सारा जोसेफ म्हणाल्या की, हे दाम्पत्य गरिबीत जगत होतं. मांझियान यांनी अनेकदा पुन्हा काम सुरू करण्याचा प्रयत्नदेखील केला.

सारा जोसेफ आणि मांझियान

फोटो स्रोत, SARAH JOSEPH

फोटो कॅप्शन, सारा जोसेफ (उजवीकडे) यांनी मांझियान (एल) यांच्या जीवनावर अनेक वर्ष संशोधन केलं

पण, 1985 मध्ये त्यांच्या कहाणीवर संशोधन करणाऱ्या दोन पत्रकारांनी नेहरूंचे नातू आणि तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी संपर्क साधला, असंही जोसेफ यांनी सांगितलं.

अखेर, दोन दशकांनी मांझियान यांना पुन्हा DVC मध्ये नोकरी मिळाली आणि त्यांनी निवृत्तीपर्यंत तिथं काम केलं.

"पण या सर्वात त्यांची काय चूक होती? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहतो," असं जोसेफ म्हणाल्या.

मांझियान यांनी मात्र कधीही मागं वळून पाहिलं नाही. त्यांनी प्रचंड धक्कादायक आणि संघर्ष केलेला भूतकाळ मागं सोडला आणि शांततेचं जीवन जगण्याचा मार्ग अवलंबला.

"माझ्या आजीबरोबर जे काही घडलं ते चुकीचं होतं. पण तिनं अखेरच्या क्षणीही कधी याची तक्रार केली नाही आणि शांततेत जगत राहिली," असं त्यांचे नातू मांझियान यांच्या मृत्यूनंतर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले.

त्यांचा पुतळा किंवा स्मारक उभं केल्यानं भूतकाळ बदलता येणार नाही, पण त्यामुळं त्यांची कहाणी मात्र पुन्हा सर्वांसमोर येईल.

हा संघर्ष फक्त मांझियान यांचा नाही. तर ज्या हजारो भारतीय महिलांची स्वप्नं अशाप्राकरे रुढी आणि परंपरांच्या नावाखाली आणि सामाजिक दबावामुळं चिरडली जातात, त्यांचाही हा संघर्ष आहे.

पण त्याचबरोबर आधुनिकीकरण आणि राष्ट्रनिर्मितीच्या नावाखाली जे लाखो लोक विस्थापित झाले, त्यांचंही मांझियान प्रतिनिधित्व करतात, असंही जोसेफ यांनी म्हटलं.

"विकासानं बळी घेतलेल्या सर्व पीडितांच्या त्या प्रतीक आहेत. त्यांना जगासमोर आणणं ही ऐतिहासिक आणि राजकीय गरज आहे."

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)